अंध धावपटू आंतरराष्ट्रीय स्पर्धांत पदकं कशी मिळवतात? गाईड रनरची नेमकी भूमिका काय असते?

- Author, दिव्या आर्य
- Role, बीबीसी प्रतिनिधी
रक्षिताला जन्मापासूनच दिसत नव्हतं आणि बालपणापासून ती जे ऐकत आली, ते खूपच वेदनादायी असं होतं. तिला आजही सर्व स्पष्टपणे आठवतंय. ती म्हणाली, "लहानपणी आमच्या गावातील लोक माझ्याबाबत नेहमी एकच बोलायचे, हिला काहीच दिसत नाही, ही निरुपयोगी आहे. ही काहीच करु शकणार नाही."
आज 24 वर्षांची तीच रक्षिता भारताची आघाडीची पॅरा अॅथलीटपैकी एक आहे. "आज मला स्वतःचा अभिमान वाटतो," असं रक्षिता म्हणते.
कर्नाटकमधील चिकमंगळूरमधील एका दुर्गम गावात रक्षिताचा जन्म झाला. ती दोन वर्षांची असताना तिच्या आईचं निधन झालं.
वयाच्या दहाव्या वर्षी तिनं आपल्या वडिलांनाही गमावलं. तिला आजीनं सांभाळलं. आजीलाही बोलता आणि ऐकू येत नाही.


रक्षिता सांगते, "आम्ही दोघं दिव्यांग आहोत. त्यामुळं माझी आजी मला चांगल्या पद्धतीनं समजून घ्यायची. जास्त काळजी करु नको, असं ती मला नेहमी म्हणायची."
जेव्हा रक्षिता 13 वर्षांची झाली. त्यावेळी तिच्या क्रीडा शिक्षकांनी तिच्याकडे एक उत्तम धावपटू बनण्याची क्षमता असल्याचं म्हटलं.

रक्षिता सांगते की, "असं कसं होईल? मला तर दिसतही नाही. ट्रॅकवर मी कशी धावेल? असा पहिला विचार माझ्या मनात आला."
तिच्या शिक्षकांनी तिला समजावून सांगितलं की, अंध धावपटू हे मार्गदर्शक धावपटूबरोबर (गाइड रनर) धावू शकतात. ते दोन ट्रॅकवर शेजारी धावतात. त्यांचे हात टेदरने (हातातील पट्टा) जोडलेले असतात.
टेदर एक छोटासा पट्टा असतो. त्याचे दोन्ही टोक हे गोलाकार असतात. दोन्ही धावपटू वेगवेगळी टोके धरून धावतात.
त्यानंतर रक्षिताच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली.

गाइड रनर काय करतात?
काही काळ तिचे सहकारी विद्यार्थीच गाइड रनर (मार्गदर्शक धावपटू) म्हणून तिच्याबरोबर धावत असत.
वर्ष 2016 ची ही घटना आहे. रक्षिता 15 वर्षांची होती. त्यावेळी ती राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी झाली होती. तेव्हा राहुल बाळकृष्ण नावाच्या व्यक्तीने तिला वेगात धावताना पाहिलं.
राहुल हे मध्यम अंतराचे धावपटू होते. ते रक्षिताप्रमाणेच 1500 मीटर स्पर्धेत धावत असत. काही वर्षांपूर्वी, ते एका दुखापतीतून बाहेर येत होते, तेव्हा पॅरालिम्पिक समिती ऑफ इंडियाच्या (PCI) एका प्रशिक्षकाने त्यांना पॅरा-ॲथलेटिक्सची ओळख करून दिली.
त्यावेळी राहुल यांना पॅरा अॅथलीटसाठी गाइड रनर आणि प्रशिक्षकांची कमतरता असल्याचं समजलं. त्यांनी दोन्ही गोष्टी शिकून घेतल्या. आता गाइड रनर आणि प्रशिक्षण ही दोन्ही कामं ते करतात. ते स्पोर्ट्स अॅथोरिटी ऑफ इंडियामध्ये प्रशिक्षक म्हणून काम करतात. त्यांना या कामाचे वेतन मिळते. परंतु, गाइड रनरचे वेतन मिळत नाही.
दृष्टिहीन धावपटू आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्यास त्याच्या मार्गदर्शकालाही पदक दिलं जातं आणि गाइड रनरसाठी हे सर्वात मोठं आकर्षण असतं.

राहुल यांना कधीच आंतरराष्ट्रीय पदक पटकावता आलं नव्हतं. ते म्हणाले, "मला अभिमान आहे की, मी माझ्यासाठी आणि देशासाठी आता हे करु शकतोय."
वर्ष 2018 मध्ये रक्षिताला प्रशिक्षणाची चांगली सुविधा मिळावी यासाठी राहुल यांनी स्वखर्चानं तिला बंगळुरुला आणलं. त्यानंतर चांगल्या कामगिरीच्या आधारावर रक्षिताची स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या हॉस्टेलवर राहण्याची सोय झाली. आता ती त्याच स्टेडियममध्ये राहुल यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे.
ते एकत्र धावतात म्हणजे काय करतात? याबाबत राहुल म्हणाले की, "आम्हाला धावपटूला सांगावं लागतं की ट्रॅकवर वळण येत आहे. आता तुम्हाला वळायचं आहे.
जेव्हा दुसरा धावपटू त्यांच्या पुढे निघून जात असेल तर आम्हाला त्यांना ते सांगावं लागतं. म्हणजे ते आणखी जोर लावून वेगानं धावण्याचा प्रयत्न करतात."
स्पर्धेच्या नियमांनुसार धावपटू आणि गाइड एकमेकांचा हात पकडू शकत नाहीत. एकत्र धावण्यासाठी ते फक्त टेदरचा वापर करु शकतात. फिनिश लाइन पार करेपर्यंत त्यांना ते हातात धरावं लागतं. त्याचबरोबर गाइडला धावपटूला ओढणं किंवा ढकलण्याची परवानगी नसते.
आणि रक्षिता धावू लागली
राहुल आणि रक्षिताच्या कष्टाला आता यश मिळू लागलं होतं. 2018 आणि 2023 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक जिंकले. पदक जिंकून परतल्यावर रक्षिताच्या गावात त्यांचं जल्लोषात स्वागत झालं.
एकेकाळी टोमणे मारणारे तेच गावकरी आता आपल्यासाठी कसा जल्लोष करत होते ते ती हसत हसत सांगते. गावकऱ्यांनी झेंडे फडकावत, नाचत, गाणं म्हणत संपूर्ण गावात तिची मिरवणूक काढली होती.

फोटो स्रोत, Getty Images
वर्ष 2024 मध्ये पॅरालिम्पिकमध्ये 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत पात्र ठरणारी रक्षिता पहिली दृष्टीहीन भारतीय महिला ठरली.
पॅरिसमध्ये रक्षिता आणि राहुल पुन्हा एकत्र धावले. परंतु, त्यांना पदक मिळू शकले नाही.
सिमरनलाही पंख मिळाले
पॅरिस पॅरालिम्पिकसाठी पात्र ठरणारी भारताची दुसरी दृष्टिहीन धावपटू सिमरन शर्माने मात्र बाजी मारली. तिने मार्गदर्शक अभयसह कांस्यपदक पटकावले.
सिमरन शर्मा थोडं पाहू शकते. तिने जेव्हा धावायला सुरुवात केली होती. तेव्हा ती एकटीच धावायची.
2021 मध्ये टोकियो पॅरालिम्पिकमध्ये जेव्हा सिमरन धावली तेव्हा तिला ट्रॅकवरील रेषा नीट दिसल्या नव्हत्या. त्यामुळं ती तिच्या रेषेपासून दूर गेली होती. तिला सांगण्यात आलं की, आता ती फक्त मार्गदर्शक धावपटूंसोबतच स्पर्धांमध्ये धावू शकेल.
देशाच्या राजधानीत प्रशिक्षण घेत असूनही सिमरनला गाईड रनर शोधणं कठीण होतं. सिमरन म्हणाली, "कोणताही धावपटू तुमच्याबरोबर धावू शकेल असं नसतं. तुम्हाला असा धावपटू लागतो, ज्याचं तंत्र तुमच्याशी जुळायला हवं आणि तो तुमच्याप्रमाणेच वेगानं धावू शकेल."
तिला गाइड रनर मिळाले. परंतु, त्यांचा वेग आणि तंत्र तिच्याशी जुळू शकलं नाही. अखेर, एका प्रशिक्षण संस्थेत सिमरनचं लक्ष युवा धावपटू अभय कुमार याच्याकडे गेलं.

18 वर्षीय अभय सराव करत होता. त्याला लगेचच कुठल्या स्पर्धेत धावायचं नव्हतं. सिमरनबरोबर गाइड रनरची संधी त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी नवा मार्ग मिळवून देण्यासारखी होती.
अभयने होकार दिला. परंतु, हे काम सोपं नव्हतं. तो म्हणतो, "तिने मला व्हिडिओ पाठवला. मी तो पाहिला. मी कुठलीही गोष्ट वेगानं आत्मसात करणारा धावपटू आहे, असं मला वाटलं. मला सर्वकाही समजलं. पण जेव्हा मी पहिल्यांदा धावलो तेव्हा ते खूप कठीण गेलं."
अभयनं एक उदाहरण देऊन स्पष्ट केलं, "जेव्हा आपण 'वक्र' मध्ये धावतो तेव्हा डावा हात, जो आतील बाजूस असतो, कमी हलतो. उजवा हात, जो बाहेरच्या दिशेने असतो, जास्त हलतो.
मी दीदीसोबत धावत असताना, मी तिच्या बाहेरच्या दिशेने असतो, त्यामुळं मला माझा डावा हात अशा प्रकारे हलवावा लागतो की तो तिच्या उजव्या हाताच्या हालचालीनुसार हलावा."
तो म्हणतो, "प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत ताळमेळ असणं गरजेचं असतं. फिनिश लाइन पार करण्याचेही काही नियम आहेत. या नियमानुसार, जेव्हा दृष्टिहीन धावपटू मार्गदर्शकाच्या आधी रेषा ओलांडतील तेव्हाच शर्यत पूर्ण मानली जाईल."
पॅरालिम्पिकमध्ये भारताला मिळालं पदक
सिमरन आणि अभयला सरावासाठी फारसा वेळ मिळाला नाही. एकमेकांना भेटल्यानंतर काही आठवड्यातच ते जागतिक पॅरा-ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 या त्यांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत धावणार होते.
त्यांची पहिली शर्यत 100 मीटरची होती. स्पर्धेत काय झालं हे त्यांना समजलंच नाही.
सिमरन म्हणाली, आम्हा दोघांनाही नियम नीट माहिती नव्हते. अभयला वाटलं की, त्याला मला आधी अंतिम रेषा पूर्ण करायला द्यायची आहे. त्यामुळं तो थांबला. परंतु, सिमरनला पुढे जाऊ देत अभयलाही ती लाइन पूर्ण करावी लागणार होती. त्यामुळं ते बाहेर पडले.
मात्र 200 मीटर शर्यतीपर्यंत त्यांना सर्व नियम चांगले समजले होते. ते सांमजस्याने धावले आणि सुवर्णपदकही जिंकले. सिमरन टी12 प्रकारात वर्ल्ड चॅम्पियन बनली.

फोटो स्रोत, Getty Images
त्याच उत्साहात ते पॅरिस पॅरालिम्पिकला गेले. 100 मीटर शर्यतीत ते चौथ्या स्थानी राहिले. परंतु, 200 मीटर शर्यतीत त्यांनी कांस्यपदक जिंकले. अशा प्रकारे भारतासाठी पॅरालिम्पिक पदक जिंकणारी सिमरन ही पहिली दृष्टिहीन महिला धावपटू ठरली.
"मी पदक जिंकलं आहे हे मला समजलंही नाही. त्यावेळी अभयनं मला सांगितलं की आपण फक्त जिंकलोच नाही, तर आपली वैयक्तिक सर्वोत्तम वेळही आपण नोंदवलेली आहे," असं सिमरन हसत हसत म्हणाली.
सिमरनला अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.
सरकार काय करतंय?
100 मीटर शर्यतीतील पराभव अजूनही सिमरनला त्रास देत आहे. अभय त्यांच्यासोबत किती वेळ धावेल हे सिमरनला माहित नाही. अभयचे स्वतःचे करिअर देखील आहे.
जेव्हा एखादा पॅरा-अॅथलीट जिंकतो तेव्हा मार्गदर्शक धावकालाही पदक मिळते परंतु पीसीआय त्यांना दीर्घकालीन मदत करण्यासाठी किंवा त्यांचं करिअर घडविण्यासाठी कोणताही मार्ग तयार करत नाही.
"आम्ही फक्त एका विशिष्ट कालावधीसाठी मार्गदर्शक धावपटूंच्या अन्न, निवास, वाहतूक आणि प्रशिक्षणाच्या गरजांची काळजी घेऊ शकतो," असे पीसीआयचे राष्ट्रीय अॅथलेटिक्स प्रशिक्षक सत्यनारायण म्हणतात.
रक्षिता आणि सिमरन यांनी आता प्रायोजकत्व करार केले आहेत. त्याच्या प्रशिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी प्रायोजक मदत करत आहेत. दोघेही स्वतः मार्गदर्शकाला आर्थिक मदत करतात. जिंकल्यानंतर मिळणारी बक्षिसाची रक्कम आम्ही त्यांच्यासोबत वाटून घेतो. पण राहुल आणि अभय सरकारकडून मदतीची आशा करतात. त्यांना असे वाटते की पॅरा-अॅथलीट्सप्रमाणे त्यांनाही सरकारी नोकऱ्यांमध्ये क्रीडा कोट्यासाठी पात्र बनवले जावे.

अभय आणि सिमरनच्या जोडीचे भविष्य काय असेल हे सध्या तरी माहित नाही, पण सिमरन आधीच पुढील पॅरालिम्पिकवर लक्ष ठेवून आहे. ती म्हणते, "मी मला मिळालेल्या पदकाचा रंग सोनेरी केल्याशिवाय (गोल्ड मेडल) राहणार नाही."
दुसरीकडे, रक्षिता देखील पदकाचे स्वप्न पाहत आहे. राहुलचा पाठिंबा तिला बळ देतो. दोघांचेही एक समान ध्येय आहे.
राहुलला विश्वास आहे की, "रक्षिताला जिंकायचेच आहे जेणेकरून लहान गावांमधील तिच्यासारख्या अधिकाधिक लोकांना खेळांबद्दल आणि त्याच्याशी संबंधित संधींबद्दल माहिती मिळेल. रक्षिता त्यांच्यासाठी प्रेरणास्थान असेल."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.












