पृथ्वीराज मोहोळ 'महाराष्ट्र केसरी', पण शिवराज राक्षेच्या आक्षेपांनंतर सुरू झालेल्या वादाचं काय?

कुस्ती
    • Author, मतीन शेख
    • Role, मुक्त पत्रकार
    • Reporting from, कोल्हापूर

कुस्ती हा महाराष्ट्राचा रांगडा खेळ. दोन मल्लांचं द्वंद्व अर्थात 'मल्ल युद्ध'. या मल्ल युद्धात प्राचीन काळापासून न्यायदानाच्या प्रक्रियेला प्रचंड महत्त्व आहे. कुस्तीचा निकाल देत असताना पंचाने कोणत्याही मल्लावरती अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी; असं मल्ल युद्धाच्या आचारसंहितेत नमूद आहे.

सध्याची कुस्ती आधुनिक झाली आणि न्यायदानाची प्रक्रिया अधिक पारदर्शक होण्याची संधी निर्माण झाली. कुस्तीत तंत्रज्ञान आलं. कुस्ती स्पर्धेचं थेट प्रक्षेपण, त्याचं रेकॅार्डींग अशा अत्याधुनिक सोईसुविधा उपलब्ध झाल्यानं कुस्ती स्पर्धाचे आयोजक व पंच कमिटीला देखील टेक्नोसॅव्ही व्हावं लागलं.

कुस्तीत हे आधुनिक स्थित्यंतर आलं असताना देखील 'महाराष्ट्र केसरी'सारख्या मानाच्या कुस्ती स्पर्धेत पंचांनी दिलेल्या निकालावरुन दरवर्षी वाद निर्माण होण्याच्या घटना घडत आहेत. या घटनांमुळे महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेला गालबोट लागत असल्याची मतं कुस्ती शौकीनांमधून व्यक्त होत आहेत. अशीच एक घटना रविवारी (2 फेब्रुवारी) घडली.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेनं अहिल्यानगर (अहमदनगर) येथे सुरू असलेल्या 'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेत उपांत्य फेरी तसेच अंतिम सामन्यातही पंचांनी दिलेल्या निकालावर मल्लांनी आक्षेप घेतल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

मॅट विभागातील उपांत्य फेरीत पुणे जिल्ह्यातील खेडचा, परंतु सध्या नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करत असलेला शिवराज राक्षे आणि पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करत असलेला मुळशीचा पृथ्वीराज मोहोळ या दोघांची लढत होती. ही लढत सुरू झाल्यानंतर दोन्ही मल्ल आक्रमक होत एकमेकांवर हल्ला चढवत होते.

काही मिनिटे ही झटापट चालल्यानंतर पृथ्वीराज मोहोळने आपला प्रतिस्पर्धी शिवराज राक्षेवर ढाक या डावाचा प्रयोग केला. पृथ्वीराजने शिघ्रतेने केलेल्या ढाक डावाची तोड शिवराजला करता न आल्यानं शिवराज मॅटवरती पाठीच्या दिशेने आदळला.

कुस्ती

फोटो स्रोत, Facebook/Sangram Jagtap

फोटो कॅप्शन, पैलवान पृथ्वीराज मोहोळ

या स्थितीत पृथ्वीराजनं शिवराजची मान आवळून मॅटच्या दिशेने त्याला स्थिर केले होते. या घडीला कुस्तीच्या पंचांनी पृथ्वीराजनं शिवराजला चितपट केल्याचा निकाल दिला. मात्र, हा निर्णय शिवराज राक्षे, त्याचे कोच व त्याच्या समर्थकांनी मान्य न करत लढतीचा ॲक्शन रिप्ले दाखवण्याची मागणी केली.

ही मागणी करत असताना पंचकमिटी व शिवराजसह त्याच्या समर्थकांची पंचांशी बाचाबाची सुरू झाली. यावेळी शिवराजने पंचाची कॅालर धरत ओढले व त्यांना लाथ घालत हिंसक प्रतिक्रिया दिली. यामुळे पोलीस प्रशासनानं व आयोजकांनी शिवराज व त्याच्या समर्थकांना आखाड्यातून बाजूला केले.

शिवराजनं आपल्यावर अन्याय झाला आणि शिवीगाळ झाल्यानं रागाच्या भरात हिंसक कृती झाल्याची प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघानं शिवराज राक्षेवर तीन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचे संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी माध्यमांना सांगितले.

2023 मध्ये कुस्तीपटू शिवराज राक्षेने महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकल्यानंतर त्याचा सत्कार करताना तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, 2023 मध्ये कुस्तीपटू शिवराज राक्षेने महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकल्यानंतर त्याचा सत्कार करताना तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर.

आंतरराष्ट्रीय नियम काय सांगतात?

आता या कुस्ती लढतीचे विश्लेषण पुढीलप्रमाणे करता येईल. पृथ्वीराजनं केलेल्या ढाक डावाच्या प्रयोगानंतर शिवराज अप टू डाऊन पद्धतीनं मॅट वरती पाठीवर आदळला. या स्थितीत कुस्तीच्या आंतराष्ट्रीय नियमानुसार चितपटीनं निर्णय द्यायचा झाल्यास पंचानं खाली पडलेल्या मल्लांचे दोन्ही खांदे मॅटला समांतर चिकटलेले आहेत की नाही? याची खात्री करणे गरजेचे असते.

यावेळी पंच आपला हात मल्लाच्या पाठीखाली घालून खात्री करतात. तसेच पंच कमिटीतील सरपंचाकडे इशारा करत चितपटीने निर्णय द्यावा का? अशी विचारणा करतात. सरपंचांनी इशारा करताच निकाल दिला जातो.

या वेळी मात्र आपले दोन्ही खांदे मॅटला चिकटलेलेच नव्हते. त्यामुळे दिलेला निर्णय योग्य नसल्याचे मत शिवराजने नोंदवले.

शिवराज हा अंगपिंडानं मोठा असलेला पैलवान आहे, अशा पैलवानांचे खांदे रुंद असतात तर मान छोटी असते. ढाक डाव टाकताना वरचा पैलवान समोरच्या पैलवानाची मान आवळतो, त्यामुळं मानेखालून हात येत असल्यानं खांदा टेकलेला दिसत नाही.

कुस्ती

फोटो स्रोत, Getty Images

अशावेळी पंचांनी निकाल देण्याआधी काही वेळ थांबणं अपेक्षित होतं. पंचांनी सरपंचांकडं पाहून लगेचच निर्वाळा दिला. त्याहीवेळेस थोडं थांबायला पाहिजे होतं. पृथ्वीराजनं सुद्धा ढाक डाव टाकल्यावर आपला उजवा पाय शिवराजच्या अंगावर टाकायला पाहिजे होता, तसं झालं असतं, तर संभ्रम निर्माण झाला नसता.

पृथ्वीराजने मारलेला डाव बरोबर असला तरी चितपटीच्या स्थितीची स्पष्टता योग्यरित्या झाली असती, तर निकालात कुठला संभ्रम राहिला नसता असे कुस्तीचे जाणकार सांगतात.

कुस्ती निकालावर वेळेत आक्षेप घेत ॲक्शन रिप्लेची मागणी करण्याचा हक्क प्रत्येक खेळाडूला असतो. त्याच्या या हक्काचं संरक्षण होणं गरजेचं असतं. कुस्तीच्या निकालावर आखाड्यातच शिवराजला संवैधानिक पद्धतीनं न्याय मागता आला असता. परंतु, शिवराजची हिंसक भूमिका त्याच्यासाठी अडचणीची ठरली.

लाल रेष
लाल रेष

अंतिम लढतीत काय घडलं?

यानंतर अंतिम लढत ही सोलापुरचा मल्ल महेंद्र गायकवाड व पृथ्वीराज मोहोळ याच्यात झाली. ही लढत देखील तुल्यबळ मानली जात होती. दोन्ही मल्ल आक्रमकतेनं लढत होते. एकमेकांवर डाव करत एक-एक गुणांची वसुली दोघांनी केली होती.

कुस्ती लढतीचे 16 सेकंद उरल्यानंतर पृथ्वीराजनं महेंद्रला मॅटच्या डेंजर झोनच्या बाहेर ढकलत एका गुणाची आघाडी घेतली. आता पृथ्वीराजकडे दोन गुण व महेंद्रच्या खात्यात एक गुण होता. यानंतर मात्र महेंद्र कुस्ती लढण्यास तयार नव्हता.

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, पृथ्वीराज यंदाच्या महाराष्ट्र केसरी या मानाच्या गदेचा मानकरी ठरला.

पंचाच्या गुणदानाच्या पद्धतीवर तो समाधानी नव्हता. तसेच तो कुस्ती लढण्यास तयार नव्हता. 16 सेकंद बाकी असतानाच महेंद्र आखाडा सोडून बाहेर गेला. यामुळे पृथ्वीराज मोहोळला पंचानी विजयी घोषित केले आणि पृथ्वीराज यंदाच्या महाराष्ट्र केसरी या मानाच्या गदेचा मानकरी ठरला.

या स्पर्धेला एकुणच वादाचे गालबोट लागले.

कुस्ती स्पर्धेतील वादांचा इतिहास

दोन वर्षापूर्वी देखील पुण्यात झालेल्या कुस्ती स्पर्धेत सिकंदर शेख व महेंद्र गायकवाड याच्या लढतीवेळी पंचांनी केलेल्या गुणदानावरुन वाद निर्माण झाला होता. कुस्तीतल्या न्यायदानातील वाद वाढत असताना दिसत आहेत. हे वाद मल्लांसाठी तसेच महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रासाठी नुकसानकारक व बदनामीकारक आहेत.

कुस्तीत आंतरराष्ट्रीय तंत्रशुद्धता तसेच तंत्रज्ञान आले असले, तरी असे वादाचे प्रकार घडण्याची विविध कारणे आहेत. महाराष्ट्राने कुस्ती या खेळाला कायम प्राधान्य दिले.

शाहू महाराज आणि कुस्ती

मध्ययुगापासून ते आजपर्यंत कुस्तीच्या वाढ व विकासाचे विविध टप्पे आहेत. यातील महत्वाचा टप्पा म्हणजे छत्रपती शाहू महाराजांनी कुस्तीला दिलेला राजाश्रय होय. कुस्ती हा खेळ जिवंत राहावा व तरुणांनी बलोपासना करावी यासाठी त्यांनी विविध प्रयत्न केले.

शाहू महाराजांनी आखाडे उभारले, कायम कुस्तीच्या स्पर्धा भरवल्या. यामुळे लोक कुस्ती साक्षर झाले. कुस्तीचा निकाल देत असताना कुठल्याही मल्लावर अन्याय होणार नाही याची दक्षता पंचांनी घ्यावी असा आदेश शाहू महाराजांचा असायचा.

पंचाचा निर्णय चुकला किंवा एखादा मल्ल चुकीच्या पद्धतीनं खेळी करत असेल, तर राजर्षी शाहू महाराज स्वत: आखाड्यात उतरून न्याय निवाडा करत असल्याचे दाखले शाहूकालीन इतिहासात सापडतात.

छत्रपती शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रय दिला होता.
फोटो कॅप्शन, छत्रपती शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रय दिला होता.

जेव्हा राजश्रय संपला आणि कुस्तीला लोकाश्रय मिळाला तेव्हा देखील गाव खेड्यांमधील कुस्तीच्या फडातील न्यायदानाची पद्धत जबाबदारीची आणि योग्य असल्याचं दिसतं. या दोन्ही टप्प्यात कुस्तीचे प्रेक्षक कुस्ती साक्षर असल्यानं कुस्तीचे निकाल देत असताना पंचांवर प्रेक्षकांचा किंवा कुस्तीशौकींनाचा नैतिक दबाव असायचा. यामुळे योग्य तोच निकाल देण्याची जबाबदारी पंचांवर असायची.

अलीकडे कुस्तीचा लोकाश्रय संपत चालला आहे. कुस्तीमध्ये राजकीय पक्ष, संघटनांचा अंतर्भाव झाल्यानं कुस्ती राजकीय लोकांच्या आश्रयला गेली असल्याचं चित्र आहे. आपली राजकीय प्रसिद्धी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनामधून अनेक नेते मंडळी करताना दिसतात.

अशा स्पर्धेत कुस्ती साक्षर प्रेक्षकांची संख्या कमी झाल्यानं संयोजक तसेच पंचकमिटीवर नैतिक दबाव राहत नाही. यामुळे निकालात गोंधळ होण्याच्या शक्यता वाढतात. कुस्ती संघटनांमध्ये झालेल्या फुटीमुळं देखील कुस्तीचं नुकसान होत असल्याचं चित्र आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, विविध वादांमुळे या खेळाडूंचं तसेच महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राचं नुकसान होणार आहे.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

यंदाच्या अहिल्यानगर येथे झालेल्या स्पर्धेत पृथ्वीराज मोहोळ, गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे , उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड हे तिन्ही मल्ल महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे प्रमुख दावेदार होते.

उंचीनं कमी पण बुरूजबंद ताकदीच्या पृथ्वीराजनं कमी वयात चांगली प्रगती केली आहे. तो धाडसानं व आक्रमक पद्धतीनं कुस्ती लढतो. त्याचे वडील राजेंद्र मोहोळ हे देखील प्रसिद्ध मल्ल राहिलेले आहेत.

महाराष्ट्रातील आघाडीचा मल्ल शिवराज राक्षे हा देखील शेतकरी कुटूंबातून येतो. उंचपुरा, बलदंड शरिराचा मल्ल म्हणून त्याची ओळख आहे. दाकदीच्या जोरावर तो विजयश्री खेचून आणतो.

यानंतर महेंद्र गायकवाड देखील शांत पद्धतीने लढून विविध डाव मारण्यात पारंगत आहे. या सर्व मल्लांकडून महाराष्ट्राला खुप अपेक्षा आहेत. परंतू विविध वादांमुळे या खेळाडूंचं तसेच महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राचं नुकसान होणार आहे.

यासाठी कुस्तीला असणारा लोकाश्रय तसेच स्पर्धा आयोजक व पंचकमिटीनं स्पर्धेतील पारदर्शकता व योग्य न्यायदानाची पद्धत अवलंबण्याची गरज आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)