सिकंदर शेख : हमालीनं थकलेल्या वडिलांच्या खांद्यावर ठेवली 'रुस्तम-ए-हिंद'ची गदा

सिकंदर शेख
    • Author, मतीन शेख
    • Role, बीबीसी मराठीसाठी

महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध कुस्तीपटू सिकंदर शेखने नुकत्याच पंजाबमध्ये झालेल्या कुस्ती स्पर्धेत 'रुस्तम-ए-हिंद' हा मानाचा किताब जिंकला आहे. हा किताब जिंकणारा सिकंदर शेख महाराष्ट्रातील चौथा पैलवान ठरला आहे.

पंजाबच्या रुपनगर जिल्ह्यातील जांदला येथे 'रुस्तम-ए-हिंद 2024' स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत देशभरातील नामवंत मल्लांनी सहभाग नोंदवला होता.

रोशन किरलगड या मल्लाचा पराभव करुन सिकंदर अंतिम फेरीत पोहोचला होता. पुढे बग्गा कोहली या तगड्या मल्लाशी त्यांचा अंतिम सामना रंगला होता.

रोमहर्षक झालेल्या या अंतिम लढतीत सिकंदरने शेखने बग्गा कोहलीवर विजय मिळवत 'रुस्तुम-ए-हिंद' हा किताब आपल्या नावे केला.

सिकंदरला मानाची गदा, ट्रॅक्टर आणि रोख रक्कम बक्षीस म्हणून आयोजकांकडून देण्यात आले. 'रुस्तम-ए-हिंद' या किताबावर नेहमीच उत्तर भारतीय मल्लांचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे.

महाराष्ट्रातील हरिश्चंद्र बिराजदार, अमोल बुचडे आणि असाब अहमद या तीन मल्लांनी हा किताब जिंकला होता.

आता सिकंदर हा किताब जिंकणारा महाराष्ट्रातील चौथा मल्ल ठरला आहे. सिकंदरच्या या यशाबद्दल महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात आनंद व्यक्त होत आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

सिकंदरने बीबीसी मराठीशी बोलताना या विजयाचे श्रेय आपल्या चाहत्यांना दिले आहे. तो म्हणाला, "आतापर्यंत मी महान भारत केसरी, महाराष्ट्र केसरीसारखे मानाचे किताब जिंकले आहेत. काही महिन्यापूर्वी मला गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती. या दुखापतीतून मी कसा बरा होईल? असे वाटत होते. मात्र, माझ्या चाहत्यांच्या, वस्तादांच्या आणि आई-वडिलांच्या आशीर्वादाने मी दुखापतीतून बाहेर पडल्यानं हा किताब जिंकू शकलो. महाराष्ट्रासह देशभरातील चाहत्यांचे प्रेम हीच माझी खरी ताकद आहे. माझे पुढील ध्येय हिंद केसरी किताबासह ॲालिम्पिक विजेता होण्याचे आहे. भारताला ॲालिम्पिक पदक देणे हेच माझे अंतिम उद्दिष्ट असेल."

कोण आहे सिकंदर शेख?

महाराष्ट्रात शेतकरी, कामगार वर्ग समूहातून आलेल्या अनेक मल्लांनी कुस्ती क्षेत्रात नाव कमावले.

ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव, हिंदकेसरी गणपत आंधळकर ते कुस्ती सम्राट आस्लम काझीपर्यंत अनेक उदाहरणे घेता येतील.

गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात अशाच एका मल्लांची चर्चा सुरू आहे तो म्हणजे एका हमालाचा पोरगा म्हणून ओळखला जाणारा पैलवान सिकंदर शेख.

गेल्या वर्षी फुलगाव, पुणे येथे झालेल्या 66 व्या महाराष्ट्र केसरी अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सिकंदर शेखने महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेवर अवघ्या 23 सेकंदात झोळी डावावर चितपटीने विजय मिळवत 'महाराष्ट्र केसरी' हा मानाचा किताब जिंकून विक्रम रचला.

सिकंदर शेख

फोटो स्रोत, instagram.com/sikandar_shaikh_official

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

सिकंदरच्या या विजयाचा जल्लोष संबंध महाराष्ट्रात झाला होता. सोशल मीडियावरही 'सिकंदरमय' वातावरण बनलं होतं.

सिकंदर मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ गावचा. घरात आजोबापासूंनचा कुस्तीचा वारसा. पण या वारशावर गरिबीची गडद छाया कायमची. घरात सिकंदरचे वडील रशीद शेख पैलवानकी करायचे.

बीबीसी मराठीशी बोलताना रशीद सांगतात, "मी पैलवानकी करत असताना तालमीची स्वच्छता करायचो, त्या बदल्यात तालमीतील मल्ल जो खुराक देतील, तो खायचो आणि सराव करायचो. खुराकाला जवळ पैसा नव्हता. पैलवानकी सुरू असतानाच वडिलांची प्रकृती खालावली म्हणून मला घरी परतावे लागले आणि घरच्यांनी माझी लग्नगाठ बांधून दिली. संसाराचा गाडा हाकत असतानाच दोन वेळच्या खाण्याचीही भ्रांत झाली होती. मात्र, तेव्हाही कुस्ती सोबतीला होती."

रशीद पुढे सांगतात की, "मी पुन्हा कुस्ती लढायला सुरुवात केली. कुस्तीत जिंकलेल्या इनामावर जगणं सुरू होते. त्यात आमच्या संसारवेलीवर हुसेन आणि सिकंदर ही दोन फुले उमलली आणि मिळणाऱ्या बक्षीसांच्या रकमेवर चार जणांचे पोट भरेना झाले. मग मी स्थानिक मार्केट यार्डात हमाली करण्याचा पर्याय निवडला. दिवसभर हमाली करायचो, घाम गाळायचो पण कुस्तीची नशा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. माझ्या लहानग्या मुलांना घेऊन आखाड्यात जाऊ लागलो. हमालीने थकलेलं शरीर सावरत आखाड्यात उतरून मुलांना कुस्तीचे धडे देऊ लागलो. सिकंदरने कमी वयात कुस्ती आत्मसात केली. विविध किताब जिंकून त्याने आमचे स्वप्न पूर्ण केले आहे."

सिकंदरचं 'जग जिंकण्याचं' स्वप्न

महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, हिमाचप्रदेश, जम्मू, उत्तर प्रदेश सह अखंड भारतातील प्रसिद्ध कुस्ती मैदानात सिकंदरने जिंकली आहेत.

वडिलांनी ज्या खांद्यावरून पोती वाहिली, त्या खांद्यावर सिकंदरने मानाची गदा ठेवत, वडिलांच्या कष्टाचे पांग फेडले आहे.

देशभरात कुस्त्या लढून सिंकदरने बक्षिसांची लयलूट केली आहे. यामध्ये दोन महिंद्रा थार कार, तीन ट्रॅक्टर, पाच अल्टो कार, पंचवीस बुलेट, सात टीव्हीएस, सात स्प्लेंडर दुचाकी तर तब्बल पन्नासच्या वर चांदी गदा त्याने आपल्या नावावर केल्या आहेत.

सिकंदर शेख

फोटो स्रोत, instagram.com/sikandar_shaikh_official

सिकंदर सध्या कोल्हापूरच्या शाहू विजयी गंगावेश तालमीत सराव करतो. वस्ताद विश्वास हारुगले हे याठिकाणी मुख्य प्रशिक्षक आहेत. उत्तम पाटील, आस्लम काझी यांचे ही त्याला मार्गदर्शन मिळत आहे.

सिकंदरच्या सरावाबद्दल बीबीसी मराठीशी बोलताना त्याचे वस्ताद विश्वास हारुगले सांगतात, ''कमी वयात अधिक क्षमता असलेला मल्ल म्हणून सिकंदरची ओळख आहे. सकाळी सहा तास आणि संध्याकाळी सहा तास तो कसून सराव करतो. मातीतल्या कुस्तीसह मॅट वरील कुस्तीचे तंत्र त्याने लवकर आत्मसात केले आहे.

"पुरेपूर उंची, बलदंड शरीर, लवचिकता, डावबाजी आणि आक्रमकता ही सर्व गुणवैशिष्ट्ये सिकंदरच्या अंगी आहेत. प्रतिस्पर्धी मल्लाने हल्ला चढवण्या आधीच आक्रमण करत त्या मल्लांस चितपट करण्याचे तंत्र सिकंदरच्या अंगी आहे.

"कुस्ती लढताना झोळी, घिस्सा, भारंदाज, घुटना यांसारखे डाव तो मारतो. जागतिक स्तरावर पोहोचण्यासाठी सिकंदरची तयारी आम्ही सध्या करुन घेत आहोत."

'महाराष्ट्र केसरी' किताब जिंकून कुस्तीतून निवृत्ती घेणाऱ्या मल्लांचे प्रमाण महाराष्ट्रात जास्त आहे. हा मान मिळाला की प्रतिष्ठा मिळते, तो मल्ल नावारुपाला येतो आणि इथेच तो आपल्या कुस्तीची समाप्ती करतो.

या मूळ कारणामुळे महाराष्ट्रातील मल्ल ऑलिम्पिकपासून दूर आहेत, असा एक निष्कर्ष काढला जातो. परंतु, या किताबावरच समाधान न मानता सिकंदरला भारताचे प्रतिनिधित्व जगभर करायचे असल्याचे तो सांगतो.

ऑलिम्पिकमध्ये सहभागी होवून भारतासाठी पदक जिंकण्याचे त्याचे स्वप्न आहे. यानिमित्ताने सिकंदर कुस्तीचे जग जिंकण्याचे स्वप्न पाहत आहे.

कुस्तीचा असाही इतिहास

'कुस्ती' हा रांगडा खेळ. बल आणि बुद्धीचा संगम घडवत खेळला जाणारा खेळ. शक्ती बरोबरच बुद्धिचातुर्याचा कसबी वापर करणारा खेळाडू हा मल्लयोद्धा, पैलवान म्हणून गणला जातो. अगदी अनादी काळापासून कुस्ती जगभर खेळली जाते.

आंतरराष्ट्रीय स्तरावर आता मॅटवरची कुस्ती खेळविली जाते. मात्र, भारतीय कुस्ती ही प्रामुख्याने लाल मातीवरच विकसित झाल्याचे दिसते. 'कुस्ती' हा मराठी शब्द 'कुश्ती' या फार्सी शब्दावरून तयार झाला आहे. त्याचा अर्थ मल्लयुद्ध, अंगयुद्ध किंवा बाहुयुद्ध असा आहे.

इ. स. पू. 3000 वर्षे ईजिप्त देशातील नाईल नदीजवळ बेनीहसन येथील मशिदीच्या व दर्ग्याच्या भिंतींवर केलेल्या कोरीव कामात कुस्त्यांतील डावपेचांचे शेकडो देखावे पाहावयास मिळतात.

प्राचीन ग्रीक वाङ्मयातही मल्लयुद्धाचा उल्लेख आढळतो. होमरच्या इलिअड या सुप्रसिद्ध महाकाव्यात ॲजेक्स व ओडिसियस यांच्यामध्ये झालेल्या कुस्तीचा उल्लेख आहे. भारतात वैदिक वाङ्मयात कुस्तीचे मोठे दाखले आहेत.

आदिमानवापासून आत्मसंरक्षणासाठी मानव ज्या लढाया व चढाया करीत आला, त्यांतूनच कुस्तीच्या द्वंद्वाचा उगम झाला.

पुढे माणसा-माणसांमधील द्वंद्वात स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी मल्लविद्या उपयुक्त ठरली. कालांतराने या प्राथमिक द्वंद्वास जागतिक स्वरूप प्राप्त झाले व त्याचे स्वतंत्र असे शास्त्र बनत गेले.

कुस्ती

फोटो स्रोत, Getty Images

भारतीय मल्लविद्येचे श्रेष्ठत्व जगाला पटवून देणाऱ्या जगज्जेत्या मल्लाचे नाव गामा पैलवान ऊर्फ गुलाम मोहम्मद.

गामा पैलवान हा स्वातंत्र्यपूर्व पंजाब प्रांतातील मल्ल. इ. स. 1910 साली त्याने लंडन येथे कुस्तीचे जागतिक अजिंक्यपद मिळविले. गामाचा धाकटा भाऊ इमामबक्ष हा गामाप्रमाणे नामांकित मल्ल होता.

या दोघांच्या तोडीचा गुंगा नावाचा पैलवानही प्रसिद्ध आहे. गुलाम अलिया याने इ. स. 1902 मध्ये यूरोपातील सर्व प्रसिद्ध मल्लांना जिंकून 'रुस्तम- इ-हिंद' ही पदवी मिळविली होती. कल्लू अलिया व त्याचा मुलगा गामा कल्लू हेही सुप्रसिद्ध मल्ल होते.

अहमदबक्ष या मल्लाने इ. स. 1912 मध्ये यूरोपात जाऊन तेथील मध्यमगट वजनाच्या सर्व प्रसिद्ध पैलवानांना हरविले होते.

महाराष्ट्रात कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांचा काळ हा मल्लविद्येचा वैभवकाळ समजला जातो. या काळात मल्लविद्येला उत्तम राजाश्रय मिळाला. छोटेमोठे संस्थानिकही आपल्या पदरी मोठ्या अभिमानाने मल्ल बाळगीत.

लाल रेष

या बातम्याही वाचा :

लाल रेष

मोगल बादशहांच्या काळातही कुस्तीला राजाश्रय मिळत असे. हिंदू राजे, सरदार तसेच मुस्लिम नबाब आपल्या पदरी नामांकित मल्ल बाळगत.

गावोगाव जत्रा, उत्सव, उरूस यांमध्ये कुस्त्यांचे फड होत. याच काळात प्रसिद्ध आखाडे निर्माण झाले. शाहू महाराजांनी कुस्ती या खेळावर पुत्रवत प्रेम केले. जगज्जेता गामा ऊर्फ गुलाम मोहम्मद या मल्लाला त्यांनी खुराक पुरवला.

गामाचा धाकटा भाऊ इमाम बक्ष हा शाहू महाराजांच्या संस्थानाचा आश्रित मल्ल होता. पुढे पाकिस्तानी मल्ल सादिक पंजाबी हा देखील कोल्हापुरात वास्तवास होता.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर विविध संस्थाने खालसा झाली अन् कुस्तीला, मल्लांना मिळणारा राजाश्रय थांबला. या कठीण काळात कुस्तीला लोकाश्रयाचा आधार मिळाला. यात्रा, जत्रा, उरूसात भरणाऱ्या स्पर्धेतून कुस्ती जिवंत राहिली.

महाराष्ट्राच्या कुस्तीत मुस्लिम मल्लांचा शड्डू

दख्खन मध्ये छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या स्वराज्यात, तसेच निजामशाही आणि आदिलशाहीत मल्लविद्येला विशेष स्थान होते.

या तिन्ही साम्राज्यात सहभागी असणारे अनेक मुस्लिम सरदार, सैनिक तसेच बरीच सामान्य रयत कुस्ती या खेळात पारंगत होती. याचवेळी कुस्तीच्या झुंजींना मनोरंजक दृष्टीकोनातून न पाहता बलोपासना म्हणून ध्यानी घेतले जाऊ लागले.

अलीकडच्या शतकात महाराष्ट्रात कृषिजण संस्कृतीशी निगडीत वर्ग कुस्ती खेळात सक्रिय असल्याचा आढळतो.

सिकंदर शेख

फोटो स्रोत, instagram.com/sikandar_shaikh_official

शेतकरी, शेतमजूर, असंघटित कामगारांच्या अनेक मुलांनी मल्लविद्येत प्राविण्य मिळवले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर तसेच मराठवाड्यातील छ. संभाजीनगर (औरंगाबाद), धाराशिव (उस्मानाबाद), बीड, लातूर जिल्ह्यात मुस्लिम मल्ल आढळतात.

महाराष्ट्राला लागून असणाऱ्या बेळगाव, विजापूर, हैद्राबाद भागात ही मुस्लिम मल्लांनी कुस्ती या खेळाचा वारसा जपला आहे.

कुस्ती सम्राट आस्लम काझी सांगतात, "कुस्ती हा असा खेळ आहे, ज्या खेळात धर्म, जात, वर्ग, वंशाला कोणतेही स्थान नाही. तांबड्या मातीलाच सर्वस्व मानून प्रत्येक मल्ल एकाच आखाड्यात सर्वांच्या बरोबर घाम गाळत असतो, सर्वांच्या सोबतीने राहून एकाच ताटात जेवण करत असतो. कुस्तीचा आखाडा हे ठिकाण समता-बंधुत्वाचे महत्वाचे उदाहरण म्हणून घेता येईल."

महाराष्ट्रातील दिग्गज मुस्लिम मल्लांवर महाराष्ट्राच्या कुस्तीशौकीनांनी अफाट प्रेम केले. यामध्ये कुस्ती सम्राट पै.आस्लम काझी, पै.सिकंदर शेख, महाराष्ट्र केसरी सईद चाऊस, एकाच कुटूंबातील तीन महाराष्ट्र केसरी ईस्माईल शेख, आप्पालाल शेख, मुन्नालाल शेख तसेच हिंदकेसरी हजरत पटेल, महाराष्ट्र केसरी बालारफिक शेख, राष्ट्रीय कुस्तीगीर व भारतीय महिला कुस्ती संघाची प्रशिक्षक शबनम शेख यांची नावे प्रामुख्याने घेता येतील.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.