महाराष्ट्र केसरीः सादिक पंजाबी या पाकिस्तानच्या पैलवानाने कोल्हापूरमधल्या लोकांचं मन कसं जिंकलं होतं?

सादिक पंजाबी

फोटो स्रोत, हिंदकेसरी दिनानाथ सिंह

फोटो कॅप्शन, सादिक पंजाबी
    • Author, पराग फाटक
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

मलमली कुर्ता, त्यातून डोकावणारी पिळदार शरीरयष्टी, दणकट बांधा, सफेद लुंगी आणि पायात वाजणारी कोल्हापूर चप्पल. आपल्या अद्भुत कुस्ती कौशल्याने भल्याभल्या मल्लांना चीतपट करणारे पाकिस्तानचे पैलवान सादिक पंजाब यांचं उमेदीच्या काळातलं हे वर्णन.

50-60च्या दशकात पाकिस्तानातून थेट कोल्हापूर गाठून कुस्तीचा फड आणि करवीरवासीयांची मनं जिंकणाऱ्या सादिक यांचं जुलै 2020 मध्ये निधन झालं.

त्यांच्या निधनाने कोल्हापूरच्या कुस्ती आखाड्यातलं एक धगधगतं पर्व निमाल्याची भावना कोल्हापुरातील कुस्तीप्रेमींनी व्यक्त केली होती. भारत-पाकिस्तान संबंध ताणलेले असतानाच्या काळातही कोल्हापूरकरांनी सादिक यांना अंतर दिलं नाही.

'मुलाला पैलवान बनवून कोल्हापुरात आणेन'

"शाहू महाराज हे कला क्षेत्र तसंच क्रीडा क्षेत्राचे आश्रयदाते होते. कोल्हापूरमध्ये कुस्तीची परंपरा रुजवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. कोल्हापुरातल्या मल्लांना चांगलं मार्गदर्शन मिळावं, ते तयार व्हावेत या विचारातून शाहू महाराजांनी देशातल्या चांगल्या पैलवानांना कोल्हापुरात आणलं. स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रसिद्ध पैलवान गुलाम अहमद यांचा मुलगा निका पंजाबी हे शाहू महाराजांचे दत्तक मल्ल होते.

"खासबाग मैदानावरच्या एका महत्त्वपूर्ण लढतीत निका यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. हा पराभव जिव्हारी लागलेल्या निका यांनी शपथ घेतली की मुलाला पैलवान बनवून कोल्हापुरात आणेन. 1954 साली निका पाकिस्तानहून कोल्हापूरला आले ते मुलगा पैलवान सादिक याला घेऊनच", ज्येष्ठ पत्रकार आणि सादिकचा यांचा खेळ 'याचि देही याचि डोळा' पाहणाऱ्या नाना पालकर यांनी असंख्य आठवणी जागवल्या.

सादिक यांचा दरारा

सादिक यांनी कराडच्या रामराव मुळीक यांचे शिष्य राघू बनपुरी याला अस्मान दाखवले. त्यानंतर सांगलीच्या विष्णुपंत सावर्डेकरांशी दोन हात केले. पहिल्या लढतीत सावर्डेकरांनी सादिकला लोळवलं मात्र दुसऱ्या लढतीत सादिकने उट्टं काढलं. पैलवान मारुती वडार यांना यांना हरवल्यानंतर सादिक यांचा दबदबा वाढू लागला.

महम्मद हानिफ आणि रामचंद्र बिडकर या तत्कालीन मोठ्या मल्लांना नमवत सादिकने आपली तय्यारी दाखवून दिली. सादिक यांना आव्हान देणार कोण अशी परिस्थिती होती. त्यावेळी हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांनी आव्हान स्वीकारलं. 75 मिनिटं चाललेल्या या लढतीत सादिक यांची दमछाक उडाली. परंतु कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली. पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे आणि सादिक यांच्यात झालेली झुंज अविस्मरणीय झाल्याची आठवण नाना सांगतात. एक तास लढून सादिकने यांनी बाजी मारली.

गोगा-सादिक मुकाबला

सादिक यांना आव्हान देण्यासाठी त्या काळातला मोठं नाव असलेला गोगा पैलवान कोल्हापुरात आले. परंपरागत कुस्तीची परंपरा गोगा यांना लाभली होती. त्यांचे भाऊही मल्ल होते.

मुंबईहून करवीरनगरीत दाखल झालेले गोगा साधना लॉजमध्ये उतरल्याची आठवण नाना यांनी सांगितली. खासबागेत सादिक-गोगा यांच्या मुकाबल्यासाठी राज्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातून दर्दींची गर्दी जमली होती.

चुरशीच्या मुकाबल्यात सुरुवातीला दोघांनीही एकमेकांचा अंदाज घेत पट काढण्याचा प्रयत्न केला. लाल मातीत तासभर संघर्ष केल्यानंतर सादिक यांची पाठ मातीला लागली. यावेळी सादिक यांचे वडील निका प्रेक्षकांमध्ये उपस्थित होते. पराभव सहन न झाल्याने त्यांनी सादिकच्या श्रीमुखात लगावली. पराभव आणि नंतरच्या या अपमानाने सादिकच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कोल्हापूरकरांचा सादिक लाडका होता. हा प्रसंग पाहून प्रेक्षकही हळहळले.

सादिक पंजाबी

फोटो स्रोत, हिंदकेसरी दिनानाथ सिंह

पैलवान सादिक विहिरीत पडले तेव्हाची गोष्ट...

"ठराविक वर्षांनी सादिक कोल्हापुरात येत राहिले. असंच एकदा ते आले आणि मराठा लॉज इथे राहिले होते. तालमीत मारुती माने यांच्याबरोबर सराव केल्यानंतर विहिरीवर जाऊन आंघोळ करत असत.

एकदा पायरी उतरून बादलीने पाणी घेताना सादिक यांचा तोल गेला आणि ते विहिरीत पडले. त्यांना पोहता येत नव्हतं. त्यांनी आरडाओरडा केला. मारुती माने, बापू राडे आणि तालमीतल्या बाकी पैलवानांनी मिळून सादिक यांना बाहेर काढलं आणि सादिक यांचे प्राण वाचवले", असं नाना सांगतात.

नजर जमिनीकडे झुकलेली

सादिक आपल्या कारकीर्दीत विविध टप्प्यावर कोल्हापुरात येत राहिले. वावरत असताना त्यांना बघण्यासाठी लोक उत्सुक असायचे. परंतु त्यांची नजर जमिनीकडे असायची अशी आठवण नाना सांगतात. लोकांची उत्सुकता मी समजू शकतो परंतु परस्त्रीकडे पाहणं योग्य होणार नाही अशी सादिक यांची भूमिका होती.

पैलवान असले तरी वावरताना कोणताही डामडौल नाही. अत्यंत साधं, छक्केपंजे नसलेलं असं त्यांचं चारित्र्यवान व्यक्तिमत्व होतं. म्हणूनच कोल्हापूरकरांनी त्यांना अमाप प्रेम दिलं. पाकिस्तानबाबत कोल्हापूरकरांच्या मनात तीव्र द्वेष होता. परंतु त्यांनी सादिक यांना तशी वागणूक कधीच दिली नाही.

'कुस्ती लढ के पैसा कमाकर जा रहाँ हूँ'

कुस्तीच्या निमित्ताने सादिक कोल्हापुरात असताना सावत्र भावाने मालमत्तेवर ताबा मिळवला होता. घर नीट चालावं यादृष्टीने कुस्ती खेळण्यासाठी सादिक कोल्हापुरात परतले. त्यावेळी झालेल्या लढतींमध्ये सादिक यांचा पराभव झाला मात्र त्यांची ताकद प्रतिस्पर्ध्यांना ठाऊक होती.

'मेरे बच्चे भूखे है' या त्यांच्या शब्दांनी उपस्थितांना हेलावून टाकलं. सादिक यांना आर्थिक मदत होऊ शकेल यासाठी निधी गोळा करूया असं स्थानिक कुस्तीगिरांनी सांगितलं. परंतु सादिक यांनी नम्रपणे त्याला नकार दिला. 'किसके सामने हात फैलाने से अच्छा मैं कुश्ती लढ के पैसा कमाकर जा रहाँ हूँ' असं सादिक म्हणाले होते.

हिंदकेसरी मारुती माने आणि सादिक-ऐतिहासिक लढत

1968 पर्यंत अजिंक्य मल्ल म्हणून सादिक यांनी नाव कमावलं होतं. सांगलीचे पैलवान हिंदकेसरी मारुती माने हे कारकीर्दीच्या अंतिम टप्प्यात होते. त्यांनी सादिक यांचं आव्हान पेललं. खासबाग मैदानात झालेल्या मुकाबल्यात सादिक यांचं आक्रमण मारुती माने यांनी परतावून लावलं.

मारूती माने यांनी सगळी ताकद पणाला लावून सादिक यांना अस्मान दाखवलं. कवठेपिरानसारख्या गावातून मोठे झालेल्या मारुती माने यांनी सादिकला हरवताच प्रेक्षकांनी मैदान डोक्यावर घेतलं.

"1975 नंतर सादिक पाकिस्तानला परतले. लाहोरमधल्या आखाड्यात पैलवानांना ते माती आणि मॅटवर कुस्तीचं प्रशिक्षण देत होते. सादिक सुरुवातीला श्री शाहू विजयी गंगावेश तालीम आणि नंतर मठ तालमीचा भाग होते. कोल्हापूरकरांचं त्यांच्यावर अतिशय प्रेम होतं. आजही त्यांच्याबद्दल भरभरून बोललं जातं", असं पैलवान आणि कुस्ती अभ्यासक गणेश मानुगडे यांनी सांगितलं.

'रंकाळ्यावर प्रेम करणारा संस्कारी पैलवान'

"सादिक यांच्यासारखा पैलवान आणि माणूस सहजी निर्माण होत नाही. निसर्गाची देणगी त्यांना लाभली होती. ते अतिशय देखणे पैलवान होते. टोमॅटोसारखे लालबुंद व्हायचे. धिप्पाड शरीरयष्टीचे राजबिंडे वाटावं असं व्यक्तिमत्व होतं", अशी आठवण हिंदकेसरी दिनानाथ सिंह यांनी सांगितली.

ते कोणत्याही कुस्तीला नाही म्हणत नसत. वडील निका सदैव त्यांच्याबरोबर असत. पहाटे साडेतीनला त्यांचा दिवस सुरू होत असे. रोज 3000 जोर, 3000 बैठका मारत असत. ताकदीसाठी मांसाहार करत असत. दुधात सुकामेवा घोटून थंडाईचा आहार घेत. वडीलच त्यांना मालीश करत असत.

एकदा कुस्ती खेळायला सादिक यांनी नकार दिला. तेव्हा निका यांनी पायातल्या मोजडीने सादिक यांना ती तुटेपर्यंत मारलं होतं. कुस्तीप्रती अतीव निष्ठा असणारी अशी ती माणसं होती असं दिनानाथ सांगतात. रंकाळ्यावर जाणं त्यांना प्रचंड आवडायचं. रंकाळ्यावर जाऊन आलं की दिवसभराचा शीण हलका होऊन जातो असं ते आवर्जून सांगत. कोल्हापुराच्या पाण्यात वेगळेपण आहे. या मातीशी त्यांचं घट्ट नातं निर्माण झालं होतं असं दिनानाथ सांगतात.

सादिक यांनी एवढ्या कुस्त्या मारल्या पण कधीही गर्व केला नाही. समोरच्या व्यक्तीला आदर देऊन बोलायचे. भारत-पाकिस्तान संबंध ताणले गेले पण कोल्हापूरकरांचं सादिक प्रेम जराही कमी झालं नाही. सादिक यांना व्हिसा मिळण्यात कधीच अडचण आली नाही. कोल्हापूरहून मुंबई, मुंबईहून दिल्ली, दिल्लीहून लाहोर असा रेल्वेने प्रवास करायचे. खेळातलं कर्तृत्व विलक्षण होतंच पण त्यांच्या माणूसपणातून आम्ही खूप काही शिकलो" असं दिनानाथ सांगतात.

इतर पैलवान मित्रांशी जिव्हाळ्याचे संबंध

सादिक यांची कोल्हापूरमध्ये अनेक पैलवानांशी मैत्री होती. त्यांच्या घरी येणं-जाणं, लग्नसमारंभात जाणंही असायचं. कोल्हापूरमधील पांडुरंग म्हारुगडे मोतीबाग तालीम येथे कुस्तीचा सराव करत.

ते आणि सादिक चांगले मित्र होते असे पांडुरंग म्हारुगडे यांचे पुत्र भरत म्हारुगडे सांगतात. "आपल्या आई-वडिलांच्या विवाहाला सादिक उपस्थित होते, ते कोल्हापूरला आले की घरी येऊन जायचे", असं भरत सांगतात. पांडुरंग यांनी आपल्या पुतण्याचे नाव सादिक ठेवावे असा हट्ट धरला होता. त्यांच्या कुटुंबाने तो पूर्णही केला. अशाप्रकारे सादिक यांच्यावर कोल्हापूरमधल्या लोकांचं विशेष प्रेम लाभलं होतं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)