विष्णू नागराळे कोण होते, ज्यांचं नाव सांगलीच्या 'या' गावात विळ्या-खुरप्यांवर कोरलं जातं

- Author, संपत मोरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
आपल्या गावातील किंवा प्रदेशातील एखाद्या व्यक्तीने आपल्या कर्तृत्वाने एकेकाळी सर्वांना दिपून टाकलं असेल पण आता त्या व्यक्तीची आठवण कशी जपली जाऊ शकते? स्मारक किंवा वस्तूसंग्रहालय किंवा त्या व्यक्तीच्या नावाने एखादी वास्तू उभारुन ना... पण यासाठी अमाप खर्च लागू शकतो. पण वैयक्तिक स्तरावर काय केलं जाऊ शकतं?
असाच प्रश्न सांगली जिल्ह्यातील नागराळे गावातील रघुनाथ लोहार यांना पडला. आपल्या गावातील पैलवान 'रुस्तम ए हिंद' विष्णू नागराळे यांची आठवण कशी जपता येईल? याचा ते विचार करत असत. त्यातूनच त्यांना ही भन्नाट कल्पना सुचली आणि विष्णू नागराळेंची स्मृती जपली गेली.
पैलवान विष्णू नागराळे कोण होते आणि त्यांची स्मृती जपणारे लोहार कुटुंबीय यांची ओळख आपण या लेखातून घेऊ.
1970 पासून नागराळे गावात रघुनाथ लोहार यांनी लोखंडी खुरपी-विळे बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर आता त्यांचा मुलगा प्रकाश आणि नातू नितीन खुरपी बनवण्याचा व्यवसाय करत आहेत.
1970 पासून लोहार कुटुंबीय जी खुरपी बनवत आहे त्यावर विष्णू नागराळे यांचे नाव कोरले जाते. आपल्या गावातील पैलवानाबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या उत्पादनाला स्वतःचे नाव न देता 'विष्णू नागराळे' यांचे नाव दिले आहे.
आजवर किमान पाच लाख खुरप्यांवर त्यांनी असे नाव उमटवले आहे, असे प्रकाश रघुनाथ लोहार सांगतात.
1970 साली खुरप्याची किंमत 1 रुपये होती, आज एका खुरप्याची किंमत दोनशे रुपये आहे. महिन्याला तीनशे तर वर्षाला सरासरी तीन हजार खुरपी ते बनवतात. साध्या भट्टीवर आणि ऐरणीच्या सहाय्याने ते खुरपी बनवत आहेत.
ही खुरपी ज्या ठिकाणी ही जातात त्या ठिकाणी विष्णू नागराळेंच्या नावाची चर्चा होते असा विश्वास लोहार कुटुंबीयांना आहे.

कोण होते विष्णू नागराळे?
विष्णू नागराळे हे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळातील नामांकित मल्ल होते. त्यांना रुस्तम ए हिंद म्हटले जायचे. पुढील काळात पैलवान दारासिंग, गामा पैलवान, पैलवान हरिश्चंद्र बिरादार हे रुस्तम ए हिंद म्हणून गाजले.
नागराळे यांना मिळालेल्या 'रुस्तम ए हिंद' कसं म्हटलं जाऊ लागलं याविषयी, 'भारतीय मल्ल विद्या : उदय आणि विकास' या पुस्तकात लेखक कृ. गो. सूर्यवंशी सांगतात, "विष्णू नागराळे यांनी हजारभर कुस्त्या केल्या. भारतीय शारीरिक शिक्षण परिषदेने आयोजित केलेल्या मल्ल स्पर्धेत विष्णू यांनी भाग घेऊन कोणत्याही मल्लाविरोधात लढण्याचे आव्हान दिले. पण एकही मल्ल त्यांच्यासोबत लढायला आला नाही. त्यामुळे ते अजिंक्य ठरले. त्यानंतर त्यांना रुस्तम ए हिंद संबोधू लागले."
विष्णू यांचे आडनाव 'चव्हाण' पण गावाच्या प्रेमापोटी त्यांनी आडनावाच्या जागी चव्हाण ऐवजी नागराळे असे लावायला सुरुवात केली. पुढे भारतभर हेच नाव गेले.
स्वतःचे आडनाव सोडून गावाचे नाव लावणाऱ्या विष्णू नागराळे यांच्या कुस्तीतील कामगिरीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रघुनाथ लोहार यांनी त्यांचे नाव लोखंडी साहित्यावर उमटवण्यास सुरुवात केली.
विष्णू यांना मल्लाप्पा तडाखे या वस्तादांचे मार्गदर्शन मिळाले होते. त्यांच्या तालमीत विष्णू आणि त्यांचे भाऊ अण्णासाहेब हे पैलवानकी करत असत.
विळ्यावर नागराळेंचे नाव टाकण्याची कल्पना कशी आली या विषयी रघुनाथ लोहार यांचे चिरंजीव प्रकाश लोहार सांगतात, "माझे वडील रघुनाथ हे विष्णू नागराळे यांचे चाहते होते. त्यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांना मोठा धक्का बसला होता. पुढे त्यांनी व्यवसाय सुरू केल्यावर बनणाऱ्या प्रत्येक विळा आणि खुरप्यावर विष्णू नगराळे यांचे नाव कोरण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी कोल्हापूरहून शिक्का बनवून आणला."
"वडिलांनी पैलवान विष्णू यांच्या जशा स्मृती जतन करण्याचा प्रयत्न केला तोच वारसा आम्ही चालवत आहोत. महिन्याला एकूण विळे आणि खुरपी तयार होतात. प्रत्येक विळे खुरप्यावर नाव कोरलेले असते," असे प्रकाश सांगतात.

नागराळे यांच्याबाबत त्यांचे चुलत पणतू अॅड. सूर्यजीत चव्हाण सांगतात, "विष्णू नागराळे यांना त्यांचे भाऊ अण्णासाहेब चव्हाण यांच्यापासून कुस्तीची प्रेरणा मिळाली होती. कुस्तीचे धडे घेण्यासाठी विष्णू आणि अण्णासाहेब हे दोघे भाऊ कोल्हापूरला गेले. तिथे जाऊन त्यांनी सायकल पंक्चरचे दुकान सुरू केले. त्यातून जे काही पैसे मिळतील त्यावर खुराकाचा खर्च भागवला."
"कुस्तीतून आपल्या कुटुंबाचे, गावाचे नाव मोठे करायचे या ध्येयाने या दोन भावांनी कुस्तीसाठी खूप मेहनत केली. पण काही काळाने अण्णासाहेब यांनी कुस्ती थांबवून सगळे लक्ष विष्णू यांच्याकडे वळवले. या दोन भावातील बंधूप्रेम आदर्शवत होते. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीचा पराभव करून कुस्तीमध्ये आपल्या नावाची मोहोर उमटवली," सूर्यजीत चव्हाण सांगतात.


विष्णू यांचा आहार कसा होता याबाबत कृ. गो. सूर्यवंशी यांनी लिहिले आहे, "विष्णू नागराळे दररोज दोन हजार बैठका व पंधराशे जोर मारत असे. त्यांचा खुराक फार खर्चिक नसे. सकाळी पावशेर बदामची थंडाई आणि एक शेर दूध. संध्याकाळी पावशेर बदामची थंडाई आणि एक शेर दूध.
"हा नित्याचा खुराक होता. जर एखादी चुरशीची कुस्ती ठरली तर मैदानाच्या अगोदर काही दिवस नेहमीच्या खुराकासोबत एक डझन पायनळ्या व गर्दन इत्यादीची आकणी आणि मधून मधून मोसंब्याचा रस.."
1947 साली जगज्जेता गामा यांचे पुतणे अस्लम पंजाबी मोठ्या तयारीनिशी दक्षिण भारतात आले तेव्हा कर्नाटकातील बेडकीहाळ येथे त्यांची कुस्ती विष्णूसोबत झाली. यावेळी त्यांच्या हुकमी मुलतानी टांगेवर या डावावर अस्लमला विष्णू यांनी चितपट केले.
त्यांची पहिली गाजलेली कुस्ती मुंबईला झाली होती. यावेळी झालेल्या दोन कुस्त्यात त्यांनी रावसाहेब देऊळकर, केशव घाडगे यांना चितपट केले होते.
"या कुस्तीनंतर सर्वांत जास्त चर्चा बेडकीहाळ येथील अस्लम यांच्या सोबतच्या कुस्तीची झाली. त्यांच्या मुलतानी डावाची चर्चा अगदी तारेने पंजाबला पाठवली गेली," असे सांगली जिल्ह्यातील पै. नारायण साळुंखे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
पै. साळुंखे सांगतात, "सखाराम बागडी हे त्याकाळी कुस्तीतील मोठे नाव. वाळवा तालुक्यातील ताकारी येथे त्यांना विष्णू यांनी चितपट केले. पुढील काळात अंतू नरसिंगपूर, रघु बनपुरीकर, बाबू पवार, या मोठ्या मल्लांवर मात केली. भारतातील मल्लासोबत कुस्ती खेळणाऱ्या नागराळे यांनी युरोपमधील जॉर्ज कॅन्टेनटाईन यांनाही चितपट केले होते.
पंजाबमधील कर्तारसिंग, भूपतसिंग, जर्नलसिंग, अर्जुनसिंग, खडकसिंग, गुत्तासिंग अशा नामवंत मल्लांना अस्मान दाखवले. उत्तरप्रदेश, पंजाब, कर्नाटक या राज्यांतील अनेक मल्लांसोबतच्या त्यांच्या लढती गाजल्या.

गामा घराण्याचे वारसदार नागराळे यांच्यासोबत लढण्यासाठी आले, त्यावेळी भोलांचे भाऊ आझम पंजाबी यांच्यासोबत नागराळे यांची 70 मिनिटाची कुस्ती झाली. ही कुस्ती बरोबरीत सुटली, त्यानंतर अस्लम पंजाबी यांच्यासोबतचीही कुस्ती विष्णू यांनीच जिंकली.
"गामा घराण्यातील तीन पैलवानांना चितपट केल्यावर मात्र भोला यांचे मामा हमीदा पंजाबी यांनी विष्णू नागराळे यांचे कौतुक केले," अशी नोंद पै. हैबतराव पाटील यांनी 'महाराष्ट्र केसरी कुस्ती अधिवेशन 2008 स्मरणिकेत' केली आहे.
'भारतीय मल्लविद्या उगम आणि विकास' या ग्रंथात कृ. गो. सूर्यवंशी यांनी विष्णू नागराळे यांच्या प्रमुख लढती सांगितल्या आहेत. "मेदरसिंग पंजाबी, आझम पंजाबी, गुत्तासिंग पंजाबी, यांच्यासोबत विष्णू यांच्या कुस्त्या झाल्या होत्या. नाना बेरड,देवाप्पा इंगळहळी या दक्षिण भारतातील मोठ्या मल्लांसोबत विष्णू यांच्या कुस्त्या झाल्या. त्यांनाही विष्णू भारी ठरले.
"कोरेगाव तालुक्यातील नागझरी येथील कुस्तीप्रेमी धोंडीराम भोसले हे त्यांच्या गावी दरवर्षी जगभरातील मल्लांना बोलावून लढती घेत असत. या मैदानावर गोल्डस्टाईन, दुखरन आणि जॉर्ज कॅन्टेनटाईन या जगविख्यात मल्लांच्याविरोधात विष्णू लढले आणि जिंकले.
"त्यांच्या आयुष्यात अण्णाप्पा पाडळकर यांच्यासोबत मात्र त्यांची हार झाली. दोन वेळा पाडळकर यांच्यासोबत झालेल्या कुस्तीत एकदा बरोबरीत सोडवण्यात आली तर एकदा अण्णाप्पा सरस ठरले," असे सूर्यवंशी यांनी नोंदवले आहे.

फोटो स्रोत, Getty Images
विष्णू यांचा वारसा पुढे चालावा म्हणून गावकरी वस्ताद खाशाबा जाधव यांनी नागराळे गावात तालीम सुरू केली होती, पण काही वर्षांनी तालीम बंद पडली.
खाशाबा जाधव सांगतात, "विष्णू नागराळे यांचा मी शेजारी. त्यांच्या प्रेरणेतून आम्हालाही कुस्तीची आवड निर्माण झाली. जिल्ह्यात तालुक्यात राज्यात कोठेही गेलो तरी नागराळे म्हटलं की लोक आदराने बोलायची. आम्हाला समाधान वाटत असे."
"विष्णू नागराळे यांचा वारसा चालावा म्हणून आम्ही गावात तालीम सुरू केली. मी स्वतः मुलांना कुस्तीचे धडे देऊ लागलो. त्यांच्याइतका मोठा पैलवान ज्या मातीत घडला त्या गावात पुन्हा एकदा आम्ही पैलवान घडवण्याचा प्रयत्न करतोय. आमच्या गावच्या पैलवान फडावर कुस्ती करतो तेव्हा तो शड्डू ठोकून सांगतो, मी विष्णू नागराळेच्या गावचा हाय बघ."
'हे फक्त नागराळेंसाठीच... आमचं कौतुक करू नका'
प्रकाश लोहार नम्रपणे सांगतात की, "आम्ही त्यांची स्मृती जतन करतोय यात आमचे कौतुक करण्याची गरज नाही. आम्ही श्रद्धेने हे करतोय. विळा गरम असताना जेव्हा त्यावर शिक्का उठवतो तेव्हा त्यांची आठवण येते."
"जुन्या पिढीला विष्णू नागराळे माहिती आहेत. पण नव्या पिढीतील शेतकऱ्याने जर या शिक्क्याबाबत विचारले तर आम्ही लगेच पैलवानांचा इतिहास सांगतो, त्यावेळी आमचा उर अभिमानाने भरून येतो," असं प्रकाश लोहार सांगतात.

प्रकाश यांचा मुलगा नितीन यांनीही काही काळ पैलवानकी केलेली आहे.
ते सांगतात, "बाजारात अनेक प्रकारची खुरपी विळे मिळतात मात्र आम्ही दर्जा जतन केला आहे. आपण जो शिक्का उठवणार आहोत त्या नावाने आपली वस्तू जाणार आहे, त्यामुळे दर्जा टिकवणे महत्त्वाचे आहे. विष्णू नागराळे नावाची खुरपी अगदी पुणे मुंबई, दिल्ल्लीला सुद्धा गेली आहेत. आमच्या भागातील बाहेर असलेले लोकही आमची खुरपी घेऊन जातात."
10 डिसेंबर 1956 रोजी कोल्हापूरला विष्णू नागराळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.
1967 साली रोहतक पंजाब येथे हिंदकेसरी स्पर्धा झाली होती. त्यावेळी प्रवेशद्वारावर 'रुस्तम ए हिंद विष्णू नागराळे प्रवेशद्वार' असे नाव होते. भारतीय कुस्ती महासंघाने त्यांच्या कुस्तीतील कामगिरीची अशी नोंद घेतली होती.
( बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











