'देवाने तुम्हाला तीच शिक्षा दिली' असं बृजभूषण सिंह विनेश फोगाटला का म्हणाले?

फोटो स्रोत, ANI
कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांच्या काँग्रेस प्रवेशावर कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खेळाडूंच्या आंदोलनामागं काँग्रेसचा हात होता, हे आता स्पष्ट झालं आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना बृजभूषण यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
विनेश फोगाटला काँग्रेसने हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी जुलानामधून उमेदवारी दिली आहे. तर बजरंगला पक्षात ऑल इंडिया किसान काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे.
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर विनेशनं बृजभूषण यांच्याविरुद्धचा संघर्ष शेवटपर्यंत सुरू ठेवणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच तिनं भाजपवरही टीका केली.
बृजभूषण शरण सिंह म्हणाले, "18 जानेवारी 2023 ला जंतर-मंतरवर आंदोलन सुरू झालं, तेव्हा पहिल्याच दिवशी हे खेळाडूंचं आंदोलन नाही, असं मी म्हणालो होतो. यामागं काँग्रेसचा हात आहे. विशेषतः भूपेंद्रसिंग हुडा, दीपेंद्र हुडा, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचा यामागे हात आहे, हे मी तेव्हाच सांगितलं होतं."
आमच्याविरुद्धच्या षडयंत्रात दीपेंद्र हुडा आणि काँग्रेसचा सहभाग होता, ही बाब आज सिद्ध झाली असंही ते यावेळी बोलताना म्हणाले.
विनेश आणि काँग्रेसवर आरोप
भूपेंद्र हुडा, दीपेंद्र हुडा, बजरंग किंवा विनेश हे मुलींच्या सन्मानासाठी बसले नव्हते, हे मला हरियाणातील जनतेला सांगायचं आहे, असं बृजभूषण यावेळी म्हणाले.
"ज्या दिवसाच्या घटनेचा माझ्यावर आरोप लावला जात आहे, त्या दिवशी मी दिल्लीत उपस्थितच नव्हतो. याचं उत्तर हे लोक देतील का? राजकारणासाठी या लोकांनी मुलींचा वापर केला आणि त्यांची बदनामी केली. महिला खेळाडूंच्या प्रतिमेला यामुळं धक्का बसला, " असे आरोपही त्यांनी केले.
बृजभूषण म्हणाले की, "मी मुलींचा गुन्हेगार नाही. गुन्हेगार असेल तर बजरंग, विनेश आणि हे आंदोलक आहेत. या संपूर्ण आंदोलनाची पटकथा लिहिणारे भूपेंद्रसिंग हुडा जबाबदार आहेत. मी नाही."

फोटो स्रोत, ANI
भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष असलेल्या बृजभूषण यांच्या मते, जंतर मंतरवरील आंदोलनानंतर अनेक लोकांना या आरोपांमध्ये तथ्य आहे, महिला, मुलींबरोबर काहीतरी चुकीचं झालं आहे, असं वाटलं. पण त्या लोकांनाही फसवणूक झाल्यासारखं वाटत आहे.
कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा ऑलिंपिकवरही परिणाम झाल्याचा आरोप त्यांनी केला. याची भरपाई कोण करेल? असा प्रश्न करत त्यांनी विनेश आणि बजरंग पुनिया यांच्यावर अनेक आरोप केले.
ते म्हणाले की, "हरियाणा राज्य भारतातील क्रीडाक्षेत्रात आघाडीवर आहे. पण या लोकांनी जवळपास पावणेदोन वर्ष कुस्ती ठप्प करून टाकली. आशियाई स्पर्धेत बजरंग पुनिया ट्रायल न देताच गेला होता हे सत्य नाही का?"
'देवाने तीच शिक्षा दिली'
कुस्तीतील तज्ज्ञांना आणि विनेश फोगाटलाही मला विचारायचं आहे, असं म्हणत बृजभूषण यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले.
एक खेळाडू एका दिवसात दोन वजन गटांत ट्रायल देऊ शकतो का? वजन केल्यानंतर पाच तासापर्यंत कुस्ती थांबवता येते का? तुम्ही कोणाच्या तरी हक्काचं उल्लंघन केलं नाही का? पाच तास तुम्ही कुस्ती थांबवली नाही का? रेल्वेच्या रेफरींचा वापर केला नाही का? असे प्रश्न बृजभूषण यांनी उपस्थित केले.

फोटो स्रोत, ANI
तुम्ही कुस्ती जिंकून पुढं गेल्या नव्हत्या. तुम्ही चिटींग करून गेल्या होत्या. ज्युनिअर खेळाडूंचा हक्क मारून गेल्या होत्या. देवाने तुम्हाला तीच शिक्षा दिली आहे."
विनेश फोगाटचं पॅरिस ऑलिंपिकमधलं पदक थोडक्यात हुकलं होतं. 50 किलो प्रवर्गात तिचं वजन 100 ग्रॅम जास्त भरल्यामुळं अंतिम फेरीत पोहोचूनही तिला अपात्र ठरवण्यात आलं होतं.


कांग्रेसचं प्रत्युत्तर
काँग्रेस नेते पवन खेरा यांनी बृजभूषण सिंह यांच्या आरोपांना उत्तर दिलं.
ते म्हणाले की, "जे चुकीचं काम करतात, भाजप त्यांना साथ देते. तर काँग्रेस ज्यांच्याबरोबर चुकीचं घडतं त्यांच्याबरोबर लढते, त्यांचा आवाज बनते म्हणून त्यांना काँग्रेस आवडते."
सहा खेळाडूंनी एफआयआर दाखल केला होता. बृजभूषण यांच्याविरुद्ध गंभीर आरोप आहेत. त्यावेळीही आम्ही मुलींबरोबर उभे होतो, उभे आहोत आणि पुढेही उभे राहू."

फोटो स्रोत, ANI
"बृजभूषण शरण सिंह यांना जिथं प्रचार करायचा आहे तिथं करावा. महिलांच्या बाजूनं कोण उभं आहे आणि कोण त्यांचा आवाज होऊ शकतं हेही लोकांना कळायला हवं," असं खेरा म्हणाले.
बृजभूषण यांनी हुडा कुटुंबीयांना लक्ष्य केल त्यावर खेडा म्हणाले की, "समाजात एखाद्याबरोबर चुकीचं काही घडलं, तर कोणताही जबाबदार नेता त्याबद्दल नक्कीच आवाज उठवेल. प्रियांका गांधी स्वतः कुस्तीपटूंच्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. त्यात चुकीचं काय आहे? हेच तर करायला हवं. अत्याचाराविरोधात आवाज उठवणाऱ्यांना आपण बळ देऊ शकलो नाही, तर मग आपण काय राजकारण करत आहोत?"
कुस्ती महासंघाचे अध्यक्ष काय म्हणाले?
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांनीही हे आंदोलन राजकीय होतं असं म्हटलं आहे.
आंदोलन काँग्रेसच्या इशाऱ्यावर होत होतं हे सर्वांना माहिती आहे. पंतप्रधान मोदींनी बृजभूषण सिंह यांचं कौतुक केलं होतं. तेव्हाच या आंदोलनाची पार्श्नभूमी तयार झाली होती, असं ते म्हणाले.
ऑलिंपिकचं वर्ष होतं आणि भारताला कुस्तीत पाच-सहा पदकं मिळाली असती. पण आंदोलन करून सगळ्यावर पाणी फेरलं, असा आरोपही त्यांनी केला.

फोटो स्रोत, ANI
बृजभूषण कुस्ती महासंघापासून दूर गेल्यानंतर हा मुद्दा थांबायला पाहिजे होता. मी कोणत्याही पक्षाचा नसून मलाही विरोध केला. त्यामुळं हे आंदोलन राजकीय होतं, असं संजय सिंह म्हणाले.
आंदोलनामुळं कुस्तीचे कँप झाले नाही. तसंच खेळाडूंना विदेशात सामन्यांसाठी जाता आलं नाही. त्याचा फटका बसला असा आरोपही, संजय सिंह यांनी केला.
विनेशने काय म्हटले?
काँग्रेसमध्ये प्रवेश करत असताना विनेश फोगाट हिने बृजभूषण आणि भाजपवर सडकून टीका केली.
"मी सुरुवातीपासून सांगत होते, की आमची लढाई अजून संपली नाही. न्यायालयात खटला सुरू आहे. भाजपचे सर्व लोक बृजभूषणला समर्थन करत आहेत. तर सर्व विरोधक आमच्यासोबत उभे आहेत.
आम्हाला रस्त्यावरून ओढत नेलं जात होतं, तेव्हा काँग्रेस एकमेव पक्ष होता जो आमच्या पाठीशी उभा राहिला. आम्हाला शक्ती मिळाली त्यामुळं आता ती लढाई आम्ही शेवटापर्यंत लढू," असंही विनेश म्हणाली.

फोटो स्रोत, ANI
विनेशने शनिवारी एक्सवर पोस्ट केली. त्यात लिहले की, "काँग्रेसने नेहमी महिला आणि खेळाडूंचे अधिकार आणि त्यांचा आवाज मांडला. त्या विचारांनी प्रेरित होऊन मी काँग्रेसच्या साथीनं देश आणि राज्यातील खेळाडू आणि महिलांसाठी काम करण्याचा निर्धार करत आहे. सकारात्मक बदल घडवणे आणि महिलांच्या विकासात येणाऱ्या अडचणी सोडवणे हा माझा मुख्य उद्देश आहे."
विनेशला पाठिंबा देणारी कुस्तीपटू साक्षी मलिक म्हणाली की, हा तिचा निर्णय आहे. तिला वाटलं म्हणून तिनं त्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला.
भाजप नेत्यांच्या सावध प्रतिक्रिया
विनेश फोगाटने काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर हरियाणा भाजपच्या नेत्यांंनी सावध प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री नायब सिंह सैनींनी म्हटलं की, "प्रत्येक व्यक्तीचं मत वेगळं असतं. त्यानुसार ते संबंधित विचारसरणीबरोबर जातात. पण, काँग्रेसनं त्यांची भूमिका स्पष्ट करावी."
हरियाणाचे माजी मंत्री आणि भाजप नेते अनिल विज म्हणाले की, "कोणीही कोणत्याही पक्षात प्रवेश करू शकतो. हा त्यांचा निर्णय आहे."

फोटो स्रोत, ANI
मात्र, एका दिवसापूर्वी विज म्हणाले होते की "काँग्रेस पहिल्या दिवसापासूनच या आंदोलनामागे होतं. काँग्रेसने आगीत तेल ओतल्यानेच हे आंदोलन एवढे दिवस चाललं. नसता या आंदोलनावर आधीच तोडगा काढता आला असता. 'देश की बेटी' ऐवजी विनेशला 'काँग्रेस की बेटी' व्हायचं असेल तर आमची काहीही हरकत नाही."
हरियाणा निवडणुकीवर काय परिणाम?
हरियाणा विधानसभेच्या 90 जागांपैकी 67 जागांसाठी भाजपनं काही दिवसापूर्वी उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर अनेकांनी उमेदवारी न मिळाल्यानं पक्षाचा राजीनामा दिला.
त्यामुळं हरियाणा भाजपमध्ये बंडखोरीचे वारे वाहत असल्याचं दिसून येतं.
हरियाणा निवडणूक जवळून पाहणारे स्थानिक पत्रकार कुमार मुकेश यांनी बीबीसीचे पत्रकार संदीप राय यांच्याशी बोलताना म्हटलं की, "ऑलिंपिक स्पर्धेनंतर विनेशला मिळालेल्या सहानुभूतीचा फायदा काँग्रेसला होईल."

फोटो स्रोत, X/CONGRESS
हरियाणातील शेतकरी सुरुवातीपासून काँग्रेससोबत आहेत. कुस्तीपटूंच्या आंदोलनालाही शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळाला होता, असंही ते म्हणाले.
विनेशची प्रतिमा शेतकऱ्याची मुलगी अशी आहे. त्यामुळं तिला उमेदवारी दिल्यानं शेतकऱ्यांमध्ये काँग्रेसची प्रतिमा आणखी उजळून निघेल. त्याचा राज्यातील इतर भागातही काँग्रेसला फायदा होईल, असंही ते म्हणाले.
एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर आगामी काळात हरियाणातील राजकारण आणखी रंजक होणार आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











