पॅरिस 2024 : भारताला पॅरालिंपिकमध्ये ऑलिंपिकपेक्षा जास्त पदकं का मिळाली?

पॅरा-धावपटू प्रीती पालनं पॅरिसमध्ये दोन कांस्यपदकाची कमाई केली

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पॅरा-धावपटू प्रीती पालनं पॅरिसमध्ये दोन कांस्यपदकाची कमाई केली
    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

पॅरिसमध्ये भारताच्या पॅराअ‍ॅथलीट्सनी पदकांची लूट केली आणि पॅरालिंपिकमधली भारताची आजवरची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.

भारतीय क्रीडाप्रेमींसाठी ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट ठरली आहे. पण त्याचबरोबर अनेकांना या यशानं कोड्यातही टाकलं आहे. याचं कारण म्हणजे भारताची ऑलिंपिकमधील कामगिरी.

ऑलिंपिकसाठी भारतानं 110 खेळाडूंचं पथक पाठवलं होतं आणि भारताच्या खात्यात सहा पदकं जमा झाली. त्यात एक रौप्य तर पाच कांस्य पदकांचा समावेश होता. त्याशिवाय सहा खेळाडूंनी चौथं स्थान मिळवलं.

पण त्यानंतर दोन आठवड्यांत सुरू झालेल्या पॅरालिंपिकमध्ये मात्रं भारताच्या 84 जणांच्या पथकानं ऑलिंपिकपेक्षा चौपट पदकं मिळवून दिली.

साहजिकच अनेकांना प्रश्न पडला आहे की ऑलिंपिकपेक्षा पॅरालिंपिकमध्ये भारतानं चांगली कामगिरी कशी बजावली?

खरं तर दोन्ही स्पर्धांमधली तुलना करणं योग्य ठरणार नाही. कारण दोन्हीमधल्या स्पर्धांचं स्वरूप आणि सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या क्षमता वेगवेगळ्या असतात.

असं म्हणतात की, ऑलिंपिक माणसाच्या शारीरिक क्षमतेची कसोटी पाहतं, तर पॅरालिंपिक माणसाचा निर्धार आणि हिंमतीची कसोटी पाहतं.

तरीही केवळ आकडे पाहिले, तर भारताची पॅरालिंपिकमधली कामगिरी तुलनेनं सरस वाटते. आणि यामागे काही कारणं आहेत.

जास्त पदकं, कमी स्पर्धा

मुळात पॅरालिंपिकमध्ये ऑलिंपिकपेक्षा जास्त पदकं दिली जातात आणि सहभागी होणाऱ्या देशांची संख्या कमी असते.

पॅरिस ऑलिंपिकमध्ये एकूण 32 क्रीडाप्रकारांत 329 सुवर्णपदकांसाठी 204 संघांच्या खेळाडूंमध्ये स्पर्धा रंगली तर पॅरालिंपिकमध्ये 22 क्रीडाप्रकारांत 549 सुवर्णपदकांसाठी 170 संघांमध्ये लढती होतायत.

ग्राफिक्स

साहजिकच पॅरालिंपिकमध्ये पदकं जिंकण्याच्या संधी अधिक आहेत. त्यामुळे दोन्हीमध्ये सहभागी होणाऱ्या एखाद्या देशाच्या खात्यात ऑलिंपिकपेक्षा पॅरालिंपिकमध्ये जास्त पदकं जमा होणं स्वाभाविक आहे.

उदाहरणार्थ, टोकियोमध्ये चीननं ऑलिंपिकमध्ये 89 तर पॅरालिंपिकमध्ये 207 पदकं मिळवली होती.

तर ग्रेट ब्रिटननं टोकियो ऑलिंपिकमध्ये 64 तर पॅरालिंपिकमध्ये 124 पदकं मिळवली होती.

भारताच्या खात्यातही टोकियोत ऑलिंपिकमध्ये 7 तर पॅरालिंपिकमध्ये 19 पदकं जमा झाली. पॅरिसमध्येही पदक तालिकेचं चित्र काहीसं असंच दिसतं.

पण हेही लक्षात घ्यायला हवं की, ऑलिंपिकमध्ये जास्त पदकं मिळवणारे अमेरिका, जपानसारखे श्रीमंत देश पॅरालिंपिकमध्ये मात्र तुलनेनं थोडे मागे सरकताना दिसतात.

ग्राफिक्स

याउलट नायजेरियासारखा देश ऑलिंपिकपेक्षा पॅरालिंपिकमध्ये जास्त चांगली कामगिरी बजावतो आहे. युक्रेनचीही पॅरालिंपिकमधली कामगिरी उत्तम राहिली आहे.

यामागेही काही कारणं आहेत.

ग्राफिक्स

इतर संबंधित बातम्या -

ग्राफिक्स

आरोग्य सुविधा

ऑलिंपिकमधल्या कामगिरीचा एखाद्या देशाची लोकसंख्या आणि जीडीपी (सकल राष्ट्रीय उत्पन्न) यांच्याशी थेट संबंध जोडता येतो, असं आजवरच्या अनेक अभ्यासांतून दिसून आलं आहे.

म्हणजे श्रीमंत देश सर्वाधिक पदकं मिळवतात असं म्हणता येणार नाही, पण ऑलिंपिकच्या पदक तालिकेत टॉप टेनमध्ये असणारे देश तुलनेनं श्रीमंत आहेत हेही नाकारता येणार नाही.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

पण पॅरालिंपिकच्या बाबतीत श्रीमंतीपेक्षा देशातल्या आरोग्यसुविधा आणि अपंगत्वाकडे बघण्याचा दृष्टीकोन या दोन गोष्टी जास्त निर्णायक ठरतात. ग्रेट ब्रिटन अमेरिकेपेक्षा पॅरालिंपिकमध्ये जास्त चांगली कामगिरी बजावण्यामागे हेही एक कारण सांगितलं जातं.

भारतासारख्या देशामध्ये आरोग्याच्या सुविधांमध्ये असमानता आहे. पण जगातल्या इतर अनेक देशांच्या तुलनेत, अगदी अमेरिकेपेक्षाही, भारतात या सुविधा स्वस्तात उपलब्ध आहेत.

त्यामुळे भारतात पॅरा-खेळाडूंनाच नाही, तर एखाद्या अपंगत्व असलेल्या कोणत्याही व्यक्तीला गरजेचे असलेले वैद्यकीय उपचार मिळण्याची शक्यताही जास्त आहे.

पॅरा-क्रीडासंस्कृती

दुसरा मुद्दा देशातल्या क्रीडासंस्कृतीशी निगडीत आहे.

अनेक देशांत अपंग व्यक्तींकडे कलंक म्हणून पाहिलं जातं किंवा त्यांच्यावर दया दाखवली जाते. तिथे शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या विकलांग खेळाडूंकडे खेळाडू म्हणून पाहिलं जात नाही.

भारताचाही त्याला अपवाद नव्हता, पण अलीकडच्या काळात, गेल्या चार ऑलिंपिक स्पर्धांदरम्यान या दृष्टीकोनात सामाजिक पातळीवर आणि क्रीडा नियोजनाच्या पातळीवरही बदल झालेला दिसतो.

त्याचंच प्रतिबिंब भारताच्या पॅरालिंपिकमधल्या कामगिरीतही पडलं आहे, असं म्हणता येऊ शकतं.

पॅरिस ऑलिंपिकमध्ये रिकर्व्ह तिरंदाजीत हरविंदरसिंगनं ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवलं

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पॅरिस ऑलिंपिकमध्ये रिकर्व्ह तिरंदाजीत हरविंदरसिंगनं ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवलं

गेल्या दोन दशकांत पॅरा स्पोर्टसकडे बघण्याचा भारताचा दृष्टीकोन बराच सुधारला आहे. तसंच केंद्र आणि राज्य सरकारांकडून आणि खासगी पातळीवर खेळाडूंना मिळणारी मदतही वाढली आहे.

2010 मध्ये भारतात आयोजित राष्ट्रकुल स्पर्धांपासून केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं आंतरराष्ट्रीय पदकं मिळवणाऱ्या नेहमीच्या आणि पॅरा-खेळाडूंना दिलेल्या रोख बक्षिसांची रक्कम समान केली आहे.

यात हरियाणा हे राज्य आघाडीवर आहे. पॅरा-खेळाडूंना मोठ्या रकमेची बक्षीसं, सरकारी नोकऱ्या आणि सन्मान, पुरस्कार देऊन हरियाणानं या खेळाला चालना दिली आणि त्यामुळे पॅरा खेळांना जनमानसात प्रतिष्ठा मिळाली.

अनेक राज्ये आता पॅरा खेळांच्या बाबतीत हरियाणाच्या पावलावर पाऊल टाकत आहेत, असं क्रीडा लेखक सौरभ दुग्गल बीबीसीसाठी लिहिलेल्या लेखात म्हणतात.

खेळाडूंमधली जागरुकता

भारतात पॅरा खेळांविषयी जागरुकताही वाढते आहे, तशी खेळाडूंची संख्या वाढते आहे. यात स्वतः खेळाडूंची भूमिकाही महत्त्वाची आहे, असं व्हीलचेअर-क्रिकेटर राहुल रामुगडे सांगतात.

“शारीरिक अपंगत्वाचा सामना करणाऱ्या व्यक्ती स्वतःचा त्यातून बाहेर पडण्यासाठी, स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी उत्सुक असतात. त्यांना काहीतरी करून दाखवायचं असतं. खेळण्याची संधी मिळाली तर ते आपलं सर्वस्व देण्यासाठी तयार असतात. इतकंच नाही, तर आता अनेक पॅरा खेळाडू स्वतःच इतरांची मदत, मार्गदर्शन करण्यासाठी पुढे येताना दिसतात.”

मरियप्पन तंगवेलू

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मरियप्पन तंगवेलूनं सलग तीन पॅरालिंपिकमध्ये पदकांची कमाई केली

स्वतः राहुल आणि त्यांचे सहकारी व्हीलचेअर क्रिकेट खेळतात आणि या खेळाच्या प्रसारासाठी काम करतात.

ऑलिंपिकपेक्षा पॅरालिंपिकमध्ये प्रकाशझोत तेवढा तीव्र नसतो आणि देशवासियांच्या अपेक्षांचा भारही तुलनेनं कमी असतो.

साहजिकच पॅरा खेळाडूंवर दबाव कमी असतो. आपल्याला आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं आहे, पदकाचं ध्येय्य गाठायचं आहे अशी भूक मात्र त्यांच्यात जास्त असते, जी त्यांना प्रेरणा देत राहते.

अनेक पॅरा-खेळाडूंच्या कामगिरीतही कमालीचं सातत्य दिसतं. उदाहरणार्थ, मरियप्पन तंगवेलूनं सलग तीन ऑलिंपिकमध्ये उंच उडी स्पर्धेत पदकं मिळवली आहेत.

अजूनही सुधारणेला वाव

गेल्या दीड-दोन दशकांत पॅरा-खेळांकडं पाहण्याचा भारतातला दृष्टीकोन बदलला असला, तरी या खेळाडूंसमोरच्या अडचणी कायम आहेत.

टोकियो आणि पॅरिसमध्ये सुवर्णकमाई करणारी नेमबाज अवनी लेखरा सुरुवातीला शूटिंग रेंजवर जिथे सराव करायची, तिथे व्हीलचेअरसाठी वेगळी वाटही किंवा रँपही नव्हता.

अवनी लेखरा सुरुवातीला नेमबाजीचा सराव करायची त्या रेंजवर व्हीलचेअरनं जाण्यासाठी खास सोयही नव्हती.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अवनी लेखरा सुरुवातीला नेमबाजीचा सराव करायची त्या रेंजवर व्हीलचेअरनं जाण्यासाठी खास सोयही नव्हती.

आजही देशभरातल्या अनेक स्टेडियम्समध्ये तीच स्थिती आहे आणि अनेकदा सरावाच्या ठिकाणी किंवा जिममध्ये येता-जाताना पॅरा खेळाडूंचा विचार केलेला नसतो, याकडे राहुल रामुगडे लक्ष वेधतात.

हाच मुद्दा भारताच्या राष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक सुमा शिरूर यांनीही अवनीचं कौतुक करताना मांडला होता.

पॅरिसमध्ये अवनीच्या यशानंतर सुमा यांनी सांगितलं होतं की,“पॅरिसनंतर अवनीच्या प्रवासातला पुढचा टप्पा म्हणजे तिला आणखी थोडं स्वतंत्रपणे जगता यायला हवं. पण आपल्या देशात ही गोष्ट सोपी नाही. कारण आपल्याकडे ‘पॅरा-फ्रेंडली’ म्हणजे अपंग व्यक्तींना सोयीची ठरेल अशी व्यवस्थाच नाही. आपल्याकडच्या सार्वजनिक जागाही व्हीलचेअर-फ्रेंडली नाहीत.”

भारताच्या पॅरालिंपिकमधल्या यशाकडे पाहताना हाच मुद्दा लक्षात ठेवणं आणि त्यावर काम करत राहणं गरजेचं आहे. तरच भारताला पॅरालिंपिकमधलं यश कायम राखता येईल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)