पॅरा खेळाडूंना बक्षीस म्हणून 150 कोटींहून अधिक रक्कम, हरियाणाच्या पॅरा खेळाडूंचे कसे बदलले आयुष्य?

फोटो स्रोत, Paramjeet Kumar, Palak Kohli & Pranav Soorma
- Author, सौरभ दुग्गल
- Role, क्रीडा लेखक
हरियाणातील तीन तरुण – एक शहरी भागातील तर दोन ग्रामीण भागातले. दुर्दैवी अपघातांनी त्या तिघांचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं.
हे सर्व अपघात वेगवेगळ्या वेळेस आणि वेगवेगळ्या पद्धतीनं झाले.
एक अपघात 2007 मध्ये, हरियाणातील सोनिपतजवळ राष्ट्रीय महामार्गावर झाला. दुसरा अपघात म्हणजे 2012 मध्ये सोनिपतमधील एका गावातील कालव्यात पाण्यात सूर मारताना झालेली दुखापत. तिसरा अपघात म्हणजे फरीदाबादमध्ये सिमेंटचा पत्रा डोक्यावर पडला.
या अपघातांमध्ये अमित सरोहा, धरमबीर नैन आणि प्रणव सूरमा या तिघांची स्वप्नं चिरडली गेली.
तिघांचं आयुष्य व्हीलचेअरशी जोडलं गेलं. त्यामुळे दैनंदिन आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना इतरांवर अवलंबून राहण्याची वेळ आली.
मात्र तिघांनी हार मानली नव्हती. त्यांच्यात अजून जिद्द आणि हिंमत कायम होती.
सरोहा, नैन आणि सूरमा या तिघांनाही वेगवेगळ्या अपघातांमध्ये पाठीच्या कण्यालाच दुखापत झाली होती. त्यामुळे या तिघांनाही कमरेखाली पॅरालिसिस झाला आणि परिणामी कंबरेखालील शरीराची ताकद गेली.
मात्र व्हीलचेअरला खिळलेल्या या तिघांनी त्यावर मात केली. व्हीलचेअरमुळे येणाऱ्या आव्हानांना, अडचणींना आपल्या भविष्याचा ताबा घेऊ देण्यास त्यांनी नकार दिला.
पॅरा स्पोर्टस किंवा पॅरलल स्पोर्टस (parallel sports) म्हणजे समांतर खेळ ही खेळांची खास श्रेणी आहे.
विविध कारणांमुळे दुखापती किंवा अपंगत्वाला सामोरं जावं लागलं आहे, अशा व्यक्तींसाठी पॅरा स्पोर्टची रचना करण्यात आली होती.
अशा लोकांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यामध्ये या खेळांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे.
सरोहा, नैन आणि सूरमा या तिघांनाही पॅरा स्पोर्ट्समध्ये किंवा समांतर खेळांमध्ये आयुष्याचं नवं ध्येय, नवी दिशा सापडली. या खेळांनी त्यांना फक्त जगण्याची नवी उमेदच दिली नाही तर उज्ज्वल भविष्य दिलं. असं आयुष्य ज्याची अपघातापूर्वी त्यांनी कधीही कल्पनादेखील केली नव्हती.
आता त्यांच्या दुखापती, शारीरिक मर्यादा त्यांच्यासाठी ओझं राहिल्या नव्हत्या. ते आता आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाले आहेत. इतकंच नाही तर आपल्या कुटुंबाचा आर्थिक भार देखील उचलू लागले आहेत.
गेल्या वर्षी हांगझाऊ पॅरा-एशियन गेम्समध्ये सरोहा, नैन आणि सूरमा या त्रयीनं इतिहास घडवला.


140 कोटीहून अधिक लोकसंख्येच्या देशाच्या आशा, आकांक्षाचा भार पेलत त्यांनी पॅरा एशियाडमध्ये शानदार कामगिरी बजावली आणि F-51 श्रेणीमध्ये क्लब थ्रो प्रकारात सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी तीनही पदकं जिंकली.
क्लब थ्रो म्हणजे थाळीफेकसारखाच खेळ असतो. यात बेसबॉलच्या बॅटसारख्या आकाराचा लाकडी ठोकळा फेकायचा असतो.
या उल्लेखनीय कामगिरीनंतर कणखरपणा आणि आशेचे प्रतीक म्हणून तिघांचं स्थान अधोरेखित झालं.
आता पॅरिस पॅरालिंपिकमध्ये आपल्या देशाला तोच मान-सन्मान पुन्हा मिळवून देण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.
पॅरा- क्रांतीला बळ देणारी त्रयी
अमित सरोहा (वय वर्षे 39) सोनिपतमधील बयानपूर गावातील आहे. भारतात पॅरा स्पोर्ट्समधला अमित आघाडीचा खेळाडू आहे.
चार पॅरालिंपिक मध्ये (2012 लंडन, 2016 रिओ, 2020 टोकियो आणि आता 2024 पॅरिस) भाग घेणारा अमित पहिला भारतीय खेळाडू ठरणार आहे.

फोटो स्रोत, Amit Saroha
सप्टेंबर 2007 च्या एका रात्री झालेल्या रस्त्यावरच्या अपघातानं अमितला कायमचं व्हीलचेअरवर खिळवून टाकलं होतं.
मात्र दिल्लीतील इंडियन स्पायनल इंजुरीज सेंटरमध्ये त्या अपघातातून सावरताना अमितचा परिचय पॅरा स्पोर्ट्सशी झाला. या खेळांनी त्याच्या स्वप्नांना नवे पंख दिले.
धरमबीर नैन (वय वर्षे 35) सोनिपतमधील भदाना गावचा रहिवासी आहे. आयुष्याची दिशा बदलणारा असाच अपघात धरमबीरच्या वाट्याला आला. जून 2012 मध्ये त्याला हा अपघात झाला होता.
कालव्यात सूर मारत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज चुकल्यानं धरमबीर कालव्याच्या तळाशी असलेल्या क्रॉंक्रिटवर आदळला होता. त्यामुळे त्याचा कंबरेखालील भाग पूर्णपणे निकामी झाला.
दोन वर्षांनी अमित सरोहाची भेट झाल्यानंतंर धरमबीरचं आयुष्य बदलून गेलं. रिओ 2016 आणि टोकियो 2020 अशा दोन पॅरालिंपिकचा अनुभव गाठीशी असलेला धरमबीर आता पॅरिसमध्ये आपल्या तिसऱ्या पॅरालिंपिक साठी सज्ज झाला आहे.

फोटो स्रोत, Pranav Soorma
प्रणव सूरमाच्या आयुष्याला 2011 मध्ये दु:खद वळण लागलं. तो फरिदाबादमध्ये आपल्या एका चुलत भावंडाच्या घरी गेला होत.
त्यावेळेस एक सिमेंटचा पत्रा त्याच्या डोक्यावर पडला आणि त्याच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली.
सुरूवातीला आपल्या शारीरिक अपंगत्वातून सावरताना अभ्यास ही त्याची ताकद होती.
मात्र 2016 च्या रिओ पॅरालिंपिकमध्ये भारताच्या पॅरा खेळाडूंच्या कामगिरीनं त्याला प्रेरणा मिळाली.
त्यातून प्रणवनं पॅरा स्पोर्ट्सच्या दुनियेतील विविध पर्यायांचा शोध घेतला. 30 वर्षीय प्रणव आता पॅरिसमध्ये पॅरालिंपिकमधील पदार्पण करणार आहे.
हे तिघे म्हणजे सरोहा, नैन आणि सूरमा हरियाणात पॅरालिंपिकची क्रांती घडवून आणण्यात महत्त्वाचं योगदान देत आहेत.
पॅरिसला जाणाऱ्या भारतीय पथकातील 84 खेळाडूंपैकी सर्वाधिक म्हणजे 23 खेळाडू हरियाणा या कृषीप्रधान राज्यातील आहेत.
अमितनं 2010 च्या राष्ट्रकुल खेळांद्वारे (कॉमनवेल्थ गेम्स) आंतरराष्ट्रीय पातळीवर पदार्पण केलं होतं.
पॅरिस पॅरालिंपिकमधील भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल विश्वास व्यक्त करताना अमित म्हणतो,
"आधीच्या पॅरालिंपिकमध्ये (टोकियो) भारतीय पथकात 54 सदस्य होते. त्यांनी 19 पदकं जिंकली. पॅरालिंपिकमधील ही भारताची सर्वोत्कृष्ट कामगिरी होती.
"आता पॅरिस पॅरालिंपिकमध्ये भारत आतापर्यंतचा आपला सर्वांत मोठा संघ पाठवतो आहे. पॅरिस पॅरालिंपिकमध्ये भारतीय संघात 84 खेळाडू असणार आहेत. मला खात्री आहे की पॅरिस पॅरालिंपिकमध्ये भारत टोकियोपेक्षा अधिक उजवी कामगिरी करून दाखवेल."
अमित पुढे म्हणतो, "हरियाणाचा विचार करता, देशाच्या पॅरा स्पोर्ट्समध्ये हे राज्य प्रचंड योगदान देत आहे. हरियाणात या खेळांनी क्रांतीचं स्वरूप धारण केलं आहे."
हरियाणात पॅरा खेळांना असलेला नावलौकिक आणि सन्मान हे या क्रांतीमागची ताकद आहेत.
धरमबीर सांगतो, "2011 मध्ये माझ्या वडिलांचं निधन झालं. माझ्या दुखापतीमुळे माझ्या कुटुंबावर आर्थिक ताण आला होता. एका क्षणी मला वाटलं होतं की आता माझं आयुष्य संपलं आहे. आयुष्यात करण्यासारखं काहीही राहिलेलं नाही.
"मात्र पॅरा खेळांनी आयुष्याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलून टाकला," धरमबीर सांगतो.
धरमबीर 35 वर्षांचा आहे. 2024 च्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये क्लब थ्रो इव्हेंटमध्ये त्यानं कांस्य पदक पटकावलं होतं.
पॅरा-एशियन गेम्समध्ये पदक जिंकल्यानंतर, विमानतळावर माझं भव्य स्वागत करण्यात आलं. असं स्वागत सर्वसाधारणपणे नेहमीच्या खेळाडूंनी ऑलिंपिकमध्ये कामगिरी केल्यानंतर पाहायला मिळतं.
"माझ्या गावात माझं एखाद्या नायकाप्रमाणेच स्वागत करण्यात आलं. आख्खं गाव माझ्या स्वागतासाठी लोटलं होतं. सहसा अशी गर्दी राजकारण्यांसाठी होते," असं धरमबीर म्हणाला.
पॅरा-खेळांची पहाट
2000च्या आधी, हरियाणात पॅरा स्पोर्ट्सविषयी अजिबात जागरुकता नव्हती. या खेळाबद्दल क्वचितच माहीत असायचं.
त्यामुळे शारीरिकदृष्ट्या अक्षम असलेल्या किंवा अपंगत्व असलेल्या ज्या लोकांना खेळात रस असायचा त्यांना नेहमीच्या खेळाडूंशी स्पर्धा करण्याशिवाय इलाज नसायचा.
मात्र नव्या सहस्त्रकाच्या सुरुवातीला फरिदाबादच्या गिरराज सिंह या पॅरा-खेळाडूनं इतर खेळाडूंना हा मार्ग दाखवला. आज हरियाणा हे पॅरा-खेळांचं बलस्थान बनलं आहे.
2004 मध्ये अथेन्स पॅरालिंपिकमध्ये गिरराज भारतीय पथकात समावेश होणारे हरियाणाचे पहिला पॅरा-अॅथलीट बनले होते. दोन दशकानंतर भारतातील पॅरा स्पोर्ट्सच्या दुनियेवर हरियाणा पूर्णपणे वर्चस्व गाजवतं आहे.
2020 टोकियो पॅरालिंपिकमध्ये भारतानं 19 पदकं जिंकली होती. त्यातील सहा पदकं हरियाणाच्या खेळाडूंनी पटकावली होती. तर पॅरिस पॅरालिंपिकमध्ये भारतीय संघातील दर चौथा खेळाडू हरियाणाचा आहे.
पॅरा स्पोर्ट्समध्ये भारतात क्रांती घडवून आणणाऱ्या राज्यांमध्ये हरियाणा आघाडीवर होतं.
पॅरा-खेळाडूंना मोठ्या रकमेची बक्षीसं, सरकारी नोकऱ्या आणि सन्मान, पुरस्कार देऊन हरियाणानं या खेळाला चालना दिली. त्यामुळे या खेळाला जनमानसात प्रतिष्ठा मिळाली.

फोटो स्रोत, Giriraj Singh
"हरियाणा पॅरालिंपिक समितीनं 2007 मध्ये पहिली राज्य स्तरीय स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेत फक्त 85 पॅरा-खेळाडूंनी भाग घेतला होता.
“अपंगत्वामुळे समोर येणाऱ्या आव्हानांवर मात करत आज हरियाणात 3,000 हून अधिक पॅरा-अॅथलीट आहेत. ते अतिशय गांभीर्यानं खेळातील आपलं करियर पुढे नेत आहेत," असं गिरराज म्हणतात.
2002 मध्ये दक्षिण कोरियातील बुसान येथे झालेल्या पॅरा-एशियन गेम्समध्ये गिरराज यांनी 800 मीटर इव्हेंटमध्ये कांस्य पदक जिंकलं होतं.
ते पुढे म्हणतात, "आधी पॅरा-खेळांमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक ही राज्ये आघाडीवर होती. मात्र हरियाणानं या खेळांकडे गांभीर्यानं लक्ष पुरवण्यास सुरूवात केल्यानंतर यात हरियाणाचं निर्विवाद वर्चस्व निर्माण झालं आहे."
गिरराज सध्या हरियाणाच्या खेळ विभागाचे उपसंचालक आहेत.
2008 मध्ये गिरराज यांना 'भिम पुरस्कारा'नं सन्मानित करण्यात आलं होतं. हा पुरस्कार मिळणारे ते हरियाणाचे पहिले पॅरा खेळाडू होते. 'भिम अवार्ड' हा हरियाणातील खेळांसाठी देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार आहे.
त्याचबरोबर 2014 मध्ये त्यांना राष्ट्रीय स्तरावरील 'ध्यानचंद पुरस्कारा'नं देखील गौरविण्यात आलं होतं.
तेव्हापासून 20 पेक्षा अधिक पॅरा खेळाडूंना 'भिम पुरस्कारा'नं सन्मानित करण्यात आलं आहे. तर हरियाणातील आठ पॅरा खेळाडूंना अर्जुन पुरस्कार मिळाला आहे.
दोन पॅरा खेळाडूंना ध्यानचंद पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं असून तीन जणांना पद्मश्री पुरस्कारानं गौरविण्यात आलं आहे.
सामाजिक-आर्थिक बदल
संपूर्ण हरियाणा राज्यात अपंगत्व असलेल्या शेकडो जणांना पॅरा खेळांनी नवं बळ दिलं आहे.
या खेळांनी त्यांना आर्थिक स्वातंत्र्याबरोबरच समाजात प्रतिष्ठा, मान-सन्मान देखील मिळवून दिला आहे. एरवी त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला केलं जातं.
त्यांच्या कामगिरीची दखल घेताना केंद्र आणि राज्य सरकारं त्यांना रोख रकमांची बक्षीसं आणि नोकऱ्या देत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
2010 मध्ये भारतानं राष्ट्रकुल स्पर्धांचं (कॉमनवेल्थ गेम्स) आयोजन केलं होतं. तेव्हापासून केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं आंतरराष्ट्रीय पदकं मिळवणाऱ्या नेहमीच्या आणि पॅरा-खेळाडूंना दिलेल्या रोख बक्षिसांची रक्कम समान केली आहे.
अनेक राज्ये या खेळांच्या बाबतीत हरियाणाच्या पावलावर पाऊल टाकत आहेत.
गेल्या 15 वर्षांमध्ये हरियाणाच्या क्रीडा विभागानं पॅरा-खेळाडूंना 150 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम बक्षिस रुपात दिली आहे. यात टोकियो पॅरालिंपिकसाठीच्या 28.15 कोटी रुपयांचाही समावेश आहे.
80 पेक्षा अधिक पॅरा-अॅथलीटना हरियाणा क्रीडा विभागासह विविध सरकारी विभागांमध्ये नोकऱ्या मिळाल्या आहेत.
"एक काळ होता जेव्हा अपंगत्व असलेली व्यक्ती म्हणजे कुटुंबाला ओझं वाटायचं. मात्र पॅरा खेळांनी सर्व चित्र बदलून टाकलं आहे. आता तीच कुटुंब त्या खेळाडूंच्या कामगिरीचा अभिमान बाळगत आहेत."
"हे खेळाडू आता त्यांच्या कुटुंबावर अवलंबून नाहीत. किंबहुना तेच कुटुंबाचा मुख्य आर्थिक भार उचलत आहेत," असं सरोहा सांगतो.
स्पोर्ट्स अॅथोरिटी ऑफ इंडियानं सारोहाची नियुक्ती प्रशिक्षक म्हणून केली आहे.
आतापर्यंत सरोहाला विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये जिंकलेल्या पदकांबद्दल राज्य आणि केंद्र सरकारांकडून एकूण 10 कोटी रुपयांचं रोख रकमेचं बक्षीस मिळालेलं आहे.
गेल्या दोन वर्षांमध्ये सरोहानं दविंदर मोनू आणि दविंदर सरोहा या आपल्या दोघा सहकाऱ्यांना स्वत:च्या खिशातून प्रत्येकी 35 लाख रुपयांचे भत्ते दिले आहेत.
हे दोघेही प्रशिक्षणात त्याला सहाय्य करतात. हे दोघे सरोहाबरोबर एस्कॉर्ट आणि प्रशिक्षक म्हणून काम करतात.
"व्हीलचेअरला खिळल्यानंतर मी आर्थिकदृष्ट्या कधीही स्वतंत्र होऊ शकेन असं मला अजिबात वाटलं नव्हतं. माझ्या आंतरराष्ट्रीय पदकांमुळेच हे शक्य झालं. कारण त्यामुळेच मला रोख रकमांची बक्षिसं मिळाली. त्यामुळे मला माझं घर बांधता आलं आणि वेर्ना कार देखील विकत घेता आली," असं नैन सांगतो.
त्याला 5 कोटी रुपयांपेक्षा अधिकची रक्कम बक्षिसाच्या रूपात मिळाली आहे.
देशातील पॅरा खेळांना कलाटणी देणारं रिओ पॅरालिंपिक
दोन दशकांनंतर भारतीय पॅरा-अॅथलीटना 2004 च्या अथेन्स पॅरालिंपिकमध्ये पदकं जिंकता आली.
त्या स्पर्धेत राजस्थानच्या देवेंद्र झाझारियानं भालाफेकीत सुवर्णपदक पटकावलं. तर पंजाबच्या राजिंदर सिंह रहेलू यानं पॉवरलिफ्टिंग मध्ये कांस्य पदक जिंकलं.

फोटो स्रोत, Paramjeet Kumar
2004 मध्ये भारतीय पथकात हरियाणाकडून गिरराज हा एकमेव खेळाडू होता.
पुढील पॅरालिंपिकमध्ये म्हणजे 2008 च्या बीजिंग पॅरालिंपिकमध्ये भारताला एकही पदक जिंकता आलं नाही. या पथकात हरियाणा कडून एकही खेळाडू नव्हता.
2012 मध्ये लंडनमध्ये झालेल्या स्पर्धेत गिरिशा एन गौडानं रौप्य पदक पटकावलं. भारताला मिळालेलं हे एकमेव पदक होतं. तर हरियाणा कडून अमित सरोहा, जयदीप देसवाल आणि नरेंदर रणबीर हे तिघे खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते.
2016 च्या रिओ पॅरालिंपिक स्पर्धेनं भारत आणि हरियाणातील पॅरा खेळांचं चित्र पुरतं बदलून टाकलं. या स्पर्धेत भारतीय पथकानं पॅरालिंपिकमधील तोपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.
या स्पर्धेत भारतानं दोन सुवर्णपदकं, एक रौप्यपदक आणि एक कांस्यपदक पटकावलं होतं.
पॅरालिंपिक स्पर्धेत पदक जिंकणारी हरियाणाची दीपा मलिक ही भारताची पहिली महिला खेळाडू ठरली होती. त्या पॅरालिंपिक मध्ये भारतीय पथकातील हरियाणातील खेळाडूंची संख्या वाढून 10 वर पोचली होती.
त्यावेळेस भारतीय पथकात एकूण 19 खेळाडू होते. म्हणजे भारतीय पथकातील एकूण खेळाडूंपैकी निम्म्यापेक्षा जास्त खेळाडू हरियाणातून होते.
मग 2021 साली खेळवण्यात आलेल्या टोकियो पॅरालिंपिक मध्ये, भारतीय पथकातील हरियाणाच्या खेळाडूंची आणखी वाढली. 54 खेळाडूंच्या भारतीय पथकात हरियाणाचे 19 खेळाडू होते.
टोकियो पॅरालिंपिक मध्ये भारतानं 19 पदकं पटकावली होती. त्यातील सहा पदकं हरियाणाच्या खेळाडूंनी जिंकली होती.
यंदाच्या 2024 च्या पॅरिस पॅरालिंपिकमध्ये हरियाणाचं प्रतिनिधित्व वाढलं आहे. भारताच्या 84 खेळाडूंच्या पथकात 23 खेळाडू हरियाणाचे आहेत.

फोटो स्रोत, Paramjeet Kumar
प्रणव सूरमा सांगतो, "माझ्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर दोन दिवसांनी दिल्लीतील इंडियन स्पायनल इंज्युरी सेंटरमधील डॉक्टरनं ती हादरवून टाकणारी गोष्ट सांगितली. ती म्हणजे मला आता पुन्हा कधीही चालता येणार नाही. माझं उर्वरित आयुष्य मला व्हीलचेअरवरच काढावं लागेल."
"अखेर मीदेखील व्हीलचेअर हाच आयुष्यभरासाठी आपला जोडीदार असेल हे वास्तव स्वीकारलं.
व्हीलचेअरवरून मला माझ्या स्वप्नांचा पाठलाग करावा लागणार होता," असं सूरमानं सांगितलं.
सूरमानं दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून कॉमर्समध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि आता बॅंक ऑफ बडोदामध्ये सहायक व्यवस्थापकाच्या पदावर कार्यरत आहे.
2016 च्या रिओ पॅरालिंपिकमधील भारतीय पॅरा खेळाडूंच्या कामगिरीनं प्रेरित होऊन प्रणवनं 2018 मध्ये पॅरा खेळांमधील वाटचाल सुरू केली.
"अपंगत्वातून सावरताना सुरुवातीला अॅकेडमिक्स ही माझी ताकद होती. मात्र माझ्या स्वप्नांच्या दिशेनं झेप घेण्यासाठी पॅरा खेळांनी माझ्या पंखांना आणखी बळ पुरवलं," असं सूरमानं सांगितलं.
सूरमानं पुढे सांगितलं, "आयुष्याबद्दलचं माझं तत्वज्ञान अतिशय सोपं आहे. तुमच्याकडे असलेल्या गोष्टींचा पूर्ण वापर करा आणि तुमची सर्वोत्तम कामगिरी करा. या दृष्टीकोनामुळे माझी कामगिरी उंचावण्यासाठी मी प्रयत्नशील राहतो."
पॅरा खेळांच्या विकासातील आव्हानं
हरियाणामध्ये पॅरा खेळांमधील क्रांती घडून येते आहे आणि प्रत्येक पॅरालिंपिकगणिक भारतीय पथकातील हरियाणाच्या खेळाडूंची संख्या वाढते आहे.
मात्र असं असलं तरी राज्यातील सर्व पॅरा खेळाडूंना स्टेडिअम उपलब्ध करून देणं हे राज्यातील पॅरा खेळांचा विकास करतानाचं सर्वात मोठं आव्हान आहे.
"आम्ही जेव्हा स्टेडिअमची उपलब्धता म्हणतो तेव्हा ते फक्त खेळाडूंनी स्टेडिअम किंवा खेळाच्या मैदानापर्यंत पोहोचणं इतक्या पुरतं मर्यादीत नाही.
“प्रसाधनगृह, जिम आणि इतर पॅरा अथलीटना आवश्यक असणाऱ्या असंख्य सुविधांची उपलब्धता हा देखील मुद्दा आहे," असं अमित सरोहा म्हणतो.
व्हीलचेअरला खिळण्याआधी अमित हॉकीचा राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू होता.
"हरियाणाच्या प्रमुख शहरांमधील स्टेडिअम पॅरा खेळाडूंसाठी आणि विशेषत: जे खेळाडू व्हीलचेअरवर आहेत त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत.
“मात्र आजसुद्धा अनेक स्टेडिअमध्ये व्हीलचेअरवर असणाऱ्या खेळाडूंसाठी प्रसाधनगृहांची सुविधा उपलब्ध नाही."
"संबंधित यंत्रणेनं छोट्या क्रीडा केंद्रांवर पॅरा खेळाडूंसाठीच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी काम केलं पाहिजे, असं पुढे सरोहा सांगतो.
2024 च्या पॅरिस पॅरालिंपिकमध्ये पंजाबची उपस्थिती
यंदाच्या पॅरिस पॅरालिंपिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय पथकात पंजाबमधून तीन खेळाडू आहेत. हे तीन खेळाडू म्हणजे परमजीत कुमार (पॉवरलिफ्टिंग), पलक कोहली (बॅडमिंटन) आणि मोहम्मद यासर (अॅथलेटिक्स).

फोटो स्रोत, Mohd Yasser/Instagram
वयाच्या दुसऱ्या वर्षी पंजाबच्या परमजीत कुमारला दोन्ही पायांना पोलिओ झाला होता. 32 वर्षांचा परमजीत कुमार पॅरालिंपिकमध्ये पदार्पण करतो आहे.
2018 च्या पॅरा एशियन गेम्समध्ये त्यानं कांस्य पटकावलं होतं. तर नोव्हेंबर 2021 मध्ये जॉर्जियात झालेल्या जागतिक स्पर्धेत पदक जिंकून त्यानं इतिहास घडवला होता. अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिला पॅरा लिफ्टर ठरला होता.

फोटो स्रोत, Palak Kohli
परमजीत बालपणापासून कुठलीही हालचाल करण्यासाठी कुबड्या, व्हीलचेअर आणि तीन चाकी सायकलवर अवलंबून होता. त्यामुळे खेळातील कामगिरी हे परमजीत साठी तसं खूपच अशक्य स्वप्न होतं.
मात्र पोलिओबाधित असलेल्या राजिंदर सिंह रहेलूनं 2004 च्या अथेन्स पॅरालिंपिकमध्ये कांस्य पदक जिंकलं. त्याच्या कामगिरीमुळे परमजीतला आशेचा किरण दिसला.
त्यानंतर परमजीतनं जालंधरमधील त्याच्या हरिपूर खालसा या गावातील स्थानिक जिममध्ये जाण्यास सुरूवात केली. त्यानंतर 2009 मध्ये राजिंदर सिंह रहेलू पंजाब क्रिडा विभागाच्या पॉवरलिफ्टिंग प्रशिक्षकपदी आल्यानंतर परमजीत त्याच्या मार्गदर्शनाखाली तयारी करू लागला.
2015 मध्ये रहेलू स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया (SAI)मध्ये कार्यरत झाला आणि त्याची नियुक्ती गांधीनगरमध्ये झाली.
त्यानंतर परमजीत देखील पंजाबातून गुजरातमध्ये गेला. रहेलूकडून प्रशिक्षण मिळत राहावं यासाठी त्यानं हा निर्णय घेतला होता.
आपल्या वाटचालीविषयी बोलताना परमजीत म्हणतो, "मी रहेलू सरांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्यास सुरूवात केली. माझ्यासारख्या पोलिओ झालेल्या तरुणांसह अनेक अपंग ज्यांना खेळात करियर करायचं आहे त्यांच्यासाठी ते एक प्रेरणास्थान आहेत."
"मी जरी 2009 मध्ये पॉवरलिफ्टिंगची सुरूवात केली असली तरी 2013 मध्ये माझ्या राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरीमुळे मी खेळातील करियर बद्दल अधिक गंभीर झालो. या स्पर्धेत मी ज्युनियर श्रेणीत सुवर्णपदक मिळालं आणि सीनियर श्रेणीत कांस्य पदक पटकावलं होतं."
22 वर्षांची पलक कोहली जालंधरची आहे. तिची ही दुसरी पॅरालिंपिक स्पर्धा असणार आहे. यावर्षी 2024 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या एकेरी इव्हेंटमध्ये तिनं कांस्यपदक जिंकलं होतं. जन्मापासून तिचा डाव हात पूर्णपणे विकसित झालेला नव्हता.
लखनौमध्ये ती गौरव खन्ना यांच्याकडून ती प्रशिक्षण घेते आहे. गौरव खन्ना भारतीय पॅरा बॅडमिंटनचे प्रमुख प्रशिक्षक आहेत.
30 वर्षांचा मोहम्मद यासर पंजाबातील फतेहगड साहेबमधील बाथन खुर्द गावचा रहिवासी आहे. वयाच्या 8 वर्षी त्यानं हात गमावला. 2018 च्या पॅरा एशियन गेम्समध्ये गोळाफेक मध्ये त्यानं सुवर्णपदक जिकलं होतं. तर 2021 च्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये टॉप हॉनर्स जिंकलं होतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











