कुस्तीतील लैंगिक छळाचे आरोप म्हणजे हिमनगाचं फक्त टोक, इतर खेळांमध्ये अशी आहे स्थिती...

फोटो स्रोत, ANI
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Reporting from, मुंबई
विनेश फोगाट आणि साक्षी मलिक या भारताच्या दिग्गज महिला पैलवानांनी ब्रिज भूषण शरण सिंग यांच्याविरोधात पुकारलेल्या आंदोलनाकडे भारतीय कुस्तीमधली ‘मी टू’ मोमेंट म्हणूनही अनेकजण पाहतायत.
पण केवळ कुस्तीच नाही तर इतर काही खेळांमध्येही लैंगिक शोषणाचे आरोप आणि घटना समोर आल्या आहेत.
ह्यात काही प्रकरणांची चर्चा झाली, काही वेळा कारवाईही झाली तर काही वेळा चौकशीचं पुढे काय झालं हे समोर आलेलं नाही. पण या घटना म्हणजे हिमनगाचं केवळ टोक असल्याचंही सांगितलं जातंय.
लैंगिक अत्याचाराविषयी वाढलेली जागरुकता आणि 'मी टू मूव्हमेंट' यामुळे आता अशा घटनांनंतर तक्रारी नोंदवण्याचं प्रमाण वाढलं आहे. पण नेमकी ही समस्या किती गंभीर आहे, हे समजणं अवघड आहे.
कारण लैंगिक शोषणाविषयी भारतात अजूनही उघडपणे बोललं जात नाही आणि भारतीय खेळांचाही त्याला अपवाद नाही.
गेल्या दोन वर्षांमधल्या प्रकरणांवर नजर टाकली तर अंदाज बांधता येईल की हा प्रश्न फक्त कुस्तीपुरता आणि कुठल्या एखाद दोन राज्यांपुरता मर्यादित नाही.
आरजेडी खासदार मनोज कुमार झा यांनी 28 जुलै 2022 रोजी राज्यसभेत प्रश्न विचारला होता, की जानेवारी 2017 ते जुलै 2022 या वर्षांत लैंगिक शोषणाची किती प्रकरणं भारतातील क्रीडा आस्थापनांकडे नोंदवली गेली?
त्याला उत्तर देताना केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी माहिती दिली होती की, त्या कालावधीत स्पोर्टस अथॉरिटी ऑफ इंडियाकडे प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध लैंगिक शोषणाच्या 30 तक्रारी आल्या होत्या. त्यातील दोन तक्रारी निनावी होत्या.
त्यावर नेमकी काय कारवाई झाली, हे मंत्रालयानं स्पष्ट केलं नाही, पण तीसही प्रकरणांमध्ये योग्य ती पावलं उचलली गेली असल्याचा दावा त्यांनी केला.
2022-2023 मध्ये समोर आलेल्या घटना
एकीकडे पैलवानांचं आंदोलन सुरू असतानाच लैंगिक शोषणाचे आरोप आणि घटना समोर आल्या आहेत.
18 मे 2023 रोजी आसामच्या सोललगावमध्ये स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात SAIच्या प्रशिक्षण केंद्रात एका स्विमिंग कोचविरोधात तक्रार दाखल झाली.
आरोपी प्रशिक्षक मृणाल बासुमतारी यांच्यावर एक महिला वेटलिफ्टिंग प्रशिक्षक आणि अनेक महिला खेळाडू लैंगिक शोषणाचा आरोप ठेवलाय. यातल्या बहुतांशजणी अल्पवयीन आहेत.
SAI नं या प्रशिक्षकावर लगेच निलंबनाची कारवाई केली आणि या प्रकरणी आसाम पोलिसांनी तक्रार दाखल झाली असून तपास सुरू आहे.

एप्रिलमध्ये मुंबईतील एका 56 वर्षीय बॅडमिंटन प्रशिक्षकांवर दहा वर्षांच्या मुलीचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप ठेवण्यात आला. तक्रारदार मुलीनं आरोप केला आहे की ‘प्रशिक्षकांनी तिला ड्रेसिंग रूममध्ये बोलावलं, स्वतःच्या मांडीवर बसायला लावलं आणि तिच्या गालाचे आणि कपाळाचे पापे घेतले.'
पोलिसांनी या प्रशिक्षकांना अटक केली. मुंबईतील विशेष न्यायालायनं या प्रशिक्षकांना जामिन मंजूर केला, मात्र राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळवलेलं यश तुमचा बचाव ठरू शकत नाही, असं सुनावलं.
मार्च 2023 मध्ये उत्तराखंडच्या देहरादूनमध्ये क्रिकेट प्रशिक्षक नरेंद्र शाह यांच्यावर अल्पवयीन महिला खेळाडूंचं लैंगिक शोषण आणि विनयभंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला. एका मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण समोर आलं.
65 वर्षीय नरेंद्र शाह यांनी त्यानंतर जीव देण्याचा प्रयत्न केला, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
जानेवारी २०२३ मध्ये भारताच्या हॉकी संघाचा माजी कर्णधार, भाजपचा राजकारणी आणि हरयाणाचा क्रीडामंत्री असलेल्या संदीप सिंग यांच्याविरोधात एफआयआर दाखल झालं.
संदीप यांच्यावर एक महिला खेळाडू आणि ज्युनियर प्रशिक्षकाचं लैंगिक शोषण केल्याचा आणि धमकावणीचा आरोप ठेवण्यात आला आहे. संदीपनं त्यानंतर क्रीडामंत्रालयाचा कारभार मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याकडे सोपवला. मुख्यमंत्र्यांनी संदीपचं कॅबिनेटमंत्रीपद कायम ठेवलं आहे.

फोटो स्रोत, ANI
जून 2022 मध्ये भारतीय सायकलिंग टीमचे मुख्य प्रशिक्षक आर के शर्मा यांच्यासोबतचा करार SAI च्या चौकशी समितीनं दिलेल्या प्राथमिक अहवालानंतर रद्द करण्यात आला. शर्मा यांच्यावर भारताच्या एका महिला सायकलिस्टनं लैंगिक शोषणाचा आरोप ठेवला आहे.
त्या वर्षी मे महिन्यात भारतीय सायकलिस्ट्सचं एक पथक स्लोव्हेनियात ट्रेनिंग कँपसाठी गेले असताना आपल्यासोबत गैरवर्तणूक झाल्याचा आरोप या महिलेनं ठेवला होता. शर्मा यांनी एका हॉटेलरूममध्ये दोघांसाठी बुकिंग असल्याचं सांगत आपल्याला आधी त्यांच्या रूममध्ये राहण्यासाठी भाग पाडलं असा दावा तिनं केला होता. तसंच शरीरसंबंध ठेवण्यासाठी धमकावल्याचंही तिनं म्हटलं होतं.
SAI नं त्यानंतर सायकलिंग टीमला परत बोलावलं. तपासात इतर अनेक सायकलिस्टसनीही या प्रशिक्षकांविरोधात तक्रार केली होती.
2022 च्या जूनमध्येच भारतीय फुटबॉलमध्येही लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे खळबळ उडाली होती. भारताच्या महिला अंडर-17 टीमचे सहाय्यक प्रशिक्षक अॅलेक्स अँब्रोज यांच्यावर कथितरित्या एका अल्पवयीन मुलीचं शोषण केल्याप्रकरणी कारवाई झाली.
अॅलेक्स यांना निलंबित करण्यात आलं आणि नॉर्वेमधल्या सराव शिबीरातून घरी पाठवण्यात आलं. आपल्यावरचे आरोप अॅलेक्स यांनी नाकारले आहेत आणि ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनला कायदेशीर नोटीस पाठवली.
या प्रकरणी फेब्रुवारी 2023 मध्ये POSCO कायद्याअंतर्गत तक्रार दाखल झाली होती आणि अरेस्ट वॉरंट निघाल्याचं वृत्त होतं. पण पुढे काहीच कारवाई झालेली नाही.

जुलै 2021 मध्ये चेन्नईत नावाजलेले अॅथलेटिक्स प्रशिक्षक पी नागराजन यांच्यावर सात महिलांनी लैंगिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप ठेवला होता.
दोन महिने आधीच एका 19 वर्षीय धावपटूनं फिजियोथेरपी आणि स्ट्रेचिंगदरम्यान प्रशिक्षकांनी महिला खेळाडूंना नको तसे स्पर्श केल्याचं सांगत तक्रार दाखल केली होती.
नागराजन यांना अटक झाली असून त्यांच्यावर IPC आणि POCSO कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
जानेवारी 2020 मध्ये दिल्लीत एका क्रिकेट प्रशिक्षकांना अल्पवयीन महिला खेळाडूचा विनयभंग केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
या मुलीनं सोशल मीडियावर आपली व्यथा मांडली होती आणि माजी क्रिकेटर आणि दिल्लीचा खासदार गौतम गंभीरनं ही गोष्ट निदर्शनास आणल्यावर पोलिसांनी कारवाई केली होती.
पदाधिकाऱ्यांचं काय?
खेळांच्या जगात महिला खेळाडूंचा प्रशिक्षकांशी जास्त संपर्क असतो, त्यामुळे खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यात विश्वासाचं नातं असणं आणि दोघांनीही ते जपणं महत्त्वाचं असतं.
पण गेल्या काही वर्षांत समोर आलेल्या खेळातील लैंगिक छळाच्या प्रकरणांवर नजर टाकली तर खेळाडूंनी प्रशिक्षकांवर आरोप ठेवल्याच्या घटनांचं प्रमाण मोठं आहे.
इंडियन एक्सप्रेसनं 2020 साली केलेल्या पडताळणीनुसार त्याआधीच्या 2010-2020 या काळात स्पोर्टस अथॉरिटी ऑफ इंडियाकडे लैंगिक शोषणाच्या आरोपांची 45 प्रकरणं नोंदवली गेली आणि त्यातल्या 29 प्रकरणांमध्ये खेळाडूंनी प्रशिक्षकांवर आरोप केले होते.

पण क्रीडा क्षेत्रातल्या पदाधिकाऱ्यांवरही याआधी लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते.
भारतीय हॉकी फेडरेशन या बरखास्त संघटनेचे अध्यक्ष केपीएस गिल यांना त्यांच्या पोलिसखात्यातील महिला सहकारी रुपन बजाज यांच्याशी छेडछाड केल्या प्रकरणी 17 वर्षांनी शिक्षा सुनावण्यात आली होती.
2018 साली बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांच्यावर एका महिला सहकाऱ्यानं लैंगिक शोषणाचा आरोप लावला होता. पण पुढे चौकशीत जोहरी यांची आरोपांतून मुक्तता झाली.
विनेश, साक्षीच्या आंदोलनाची स्थिती काय आहे?
18 जानेवारीला विनेश, साक्षी आणि बजरंग पुनियानं दिल्लीच्या जंतरमंतरवर पहिल्यांदा आंदोलन पुकारलं होतं आणि भारतीय कुस्ती महासंघाचे तेव्हाचे अध्यक्ष आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपचे खासदार ब्रिज भूषण शरण सिंग यांच्यावर सात महिला पैलवानांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता.
ब्रिजभूषण यांनी हे आरोप नाकारले तर या संदर्भातला क्रीडा मंत्रालयाच्या चौकशी समितीचा अहवालही जाहीर झालेला नाही. दरम्यान आयओएनं पुढे ब्रिज भूषण यांच्या नेतृत्वातली कुस्ती महासंघाची कार्यकारिणीऐवजी कुस्तीचा कारभार त्रिसदस्यीय अॅड-हॉक पॅनेलची स्थापना केली.
पण ब्रिजभूषण यांच्यावर गुन्हा दाखल होत नसल्यानं पैलवानांनी पुन्हा आंदोलन पुकारलं.
कोर्टाच्या आदेशानंतर ब्रिजभूषण यांच्याविरोधात एफआयआर दाखल झालं. त्यात POCSO कायद्याची कलमही आहेत कारण एक पीडिता अल्पवयीन होती. पण हा लेख लिहिपर्यंत अटक झालेली नाही.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








