विनेश फोगाटचा केवळ 100 ग्रॅमने घात केला, चूक कोणाची? 'त्या' दिवशी नेमकं घडलं काय?

विनेश फोगाट

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, विनायक दळवी
    • Role, बीबीसी मराठीसाठी, पॅरिसमधून

पैलवान विनेश फोगाट वजन वाढल्यामुळे ऑलिंपिकमध्ये अंतिम फेरीसाठी अपात्र ठरल्यानंतर या प्रकरणात अनेक उलट-सुलट प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.

क्युबाच्या पैलवानाला हरवल्यानंतर विनेश फोगाट अंतिम फेरीत पोहोचली होती आणि आता तिला किमान रौप्य मिळेल म्हणून तमाम भारतीयांचा आनंद हा गगनात मावेनासा झाला. पण अंतिम फेरीसाठी वजन होत असताना विनेशचे वजन मर्यादेपेक्षा 100 ग्रॅम अधिक भरले आणि कोट्यवधी भारतीय क्रीडा रसिकांच्या आनंदावर विरजण पडले.

वजनी गट असलेल्या सर्वच क्रीडाप्रकारांमध्ये, लाभदायक असणाऱ्या वजनी गटातून उतरण्यासाठी वजन कमी करणे आणि वाढवणे हे प्रकार सर्रास चालतात.

कारण कमी वजनाच्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये जिंकण्याची संधी अधिक असते. मात्र सर्वच देशांचे खेळाडू असे प्रकार करीत असल्यामुळे खेळाडूंसोबत असणाऱ्या वैद्यकीय टीमचे काम निर्णायक ठरत असते.

भारतीय संघासोबत यावेळी विविध क्षेत्रातील 13 डॉक्टरांचा ताफा होता. त्यामध्ये आहारतज्ज्ञांपासून मानसोपचार तज्ज्ञ आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश होता.

वैद्यकीय चमूचे प्रमुख डॉ. दिनशॉ पारडीवाला यांनी विनेश फोगाटच्या वजन प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “अंतिम स्पर्धेसाठी म्हणजे आज तिचे वजन वाजवीपेक्षा अधिक असल्याचे लक्षात आले होते. प्रशिक्षकांनी वजन कमी करण्याचे नेहमीचे सोपस्कार सुरू केले होते. विनेशलाही आपण वजन खाली 50 किलोच्या आत आणू, याबाबत आत्मविश्वास होता."

मात्र 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम वजन जास्त असल्याचे लक्षात आले. 50 किलोपेक्षा हे वजन अधिक असल्याने तिला स्पर्धेतून बाद करण्यात आले.

पण या सगळ्यादरम्यान विनेशच्या शरीरातलं पाणी कमी झालं होतं. त्यामुळे तिच्या शरीरातील पाण्याची पातळी घटणार नाही, यासाठी तत्काळ उपचार केले गेले.

सुरक्षिततेचा उपाय म्हणून तिच्या रक्ताची चाचणीही करून घेतली. विनेशच्या बाबतीत कसलाही धोका आढळला नाही.

ती शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या ‘नॉर्मल’ असून विनेशने स्वत:ही आपण व्यवस्थित असल्याचे सांगितले असं भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षा पीटी उषा यांनी म्हटलं आहे.

शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मी ठणठणीत आहे, मात्र अपात्र ठरविले गेल्यामुळे मी निराश झाले आहे असं विनेश म्हणाली आहे.

मेरी कोमला जेव्हा वजन वाढवावं लागलं

वजन सांभाळणं कुस्ती, बॉक्सिंगमधल्या खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं.

1952 च्या ज्या हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये भारताला खाशाबा जाधव यांनी कांस्य पदक मिळवून दिले होते; त्याच ऑलिंपिक स्पर्धेत त्यांच्यापेक्षा वरच्या वजनी गटात केशव माणगावे हे देखील सहभागी झाले होते.

तेव्हा वेगळ्या पद्धतीनं कुस्तीच्या स्पर्धा खेळवल्या जायाच्या. माणगावे त्यात पाचव्या फेरीपर्यंत पोहोचले होते, मात्र पदकापर्यंत ते पोहचू शकले नाहीत, कारण लढतीच्या आधीच्या रात्री त्यांनी भरपेट जेवण केले.

मात्र वजन वाढल्यामुळे ते अपात्र ठरले नव्हते तर अमेरिकेच्या जो हेन्सन नावाच्या मल्लाकडून ते हरले होते.

विनेश फोगाट : केवळ 100 ग्रॅमने घात केला, चूक कोणाची?
विनेश फोगाट : केवळ 100 ग्रॅमने घात केला, चूक कोणाची?
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

खेळाडूंचे वजन कमी करून खेळणे जसे घातक असते तसेच वजन वाढवून खेळणेही धोक्याचे असते. त्यामुळे त्यांच्या क्रीडा कौशल्यावरही परिणाम होत असतो.

महिला बॉक्सर मेरी कोम हिने लंडन ऑलिंपिकमध्ये कांस्य पदक पटकाविले होते. मेरी खरंतर लाईट फ्लायवेट गटात खेळायची आणि त्या गटात तिनं 2010 सालची वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली होती.

पण 2012 सालच्या लंडन ऑलिंपिकमध्ये जेव्हा पहिल्यांदाच महिला बॉक्सिंगचा समावेश झाला, तेव्हा तीनच वजनी गट होते आणि मेरीच्या वजनी गटाचा त्यात समावेश नव्हता.

तेव्हा ऑलिंपिक खेळण्याची संधी लक्षात येताच मेरीनं त्यावेळी स्वत:चे वजन वाढवले होते.

कुस्तीतले आंतरराष्ट्रीय पंच आणि जाणकार दिनेश गुंड यांच्याशी बीबीसी मराठीनं बातचीत केली. ते सांगतात, “जागतिक कुस्ती संघटनेची म्हणजे UWWची प्राथमिकता आहे खेळाडूचं संरक्षण. वजन कमी करण्याच्या नादामध्ये बऱ्याचदा पैलवानांना डिहायड्रेशन होतं. त्यामुळे काही खेळाडूंना दुखापती झाल्याच्या किंवा त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळेच वजनातली सूट UWW नं बंद केली, जेणेकरून खेळाडू त्यांच्याच वजनी गटात खेळतील."

विनेशच्या बाबतीत काय काय घडलंय?

विनेशने 2022 सालच्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये 53 किलो वजनी गटात सहभागी होऊन सुवर्णपदक पटकाविले होते. (तिचे स्पर्धा खेळत नसतानाचे वजन स्वाभाविकच यापेक्षा थोडे अधिक होते.)

आता पॅरिस ऑलिंपिकमध्ये मात्र ती खालचा वजनी गट म्हणजे 50 किलो गटात खेळली. त्याआधी झालेल्या पात्रता स्पर्धेत ती या वजनी गटात प्रथमच सहभागी झाली होती.

साधारण 53-55 किलोपासून 50 किलोवर वजन आणण्यासाठी आणि ते तेवढंच राखण्यासाठी तिला या स्पर्धेच्या वेळी कायम आहारावर, पाण्यावर नियंत्रण ठेऊन घाम गाळावा लागला.

पॅरिस ऑलिम्पिकमध्येही विनेश अन्न-पाणी वर्ज्य करून आपले वजन 50 किलोच्या आत ठेवत होती आणि स्पर्धेच्या पहिल्या दिवशी ती या गटात खेळण्यासाठी पात्र ठरली.

मात्र आज सकाळी वजनाच्यावेळी तिचा अंदाज चुकला आणि वाढलेले वजन तिला निर्धारीत वेळेच्या आत 50 किलोच्या खाली आणता आले नाही.

विनेश फोगाट : केवळ 100 ग्रॅमने घात केला, चूक कोणाची?

फोटो स्रोत, Getty Images

विनेश 53 किलो वजनी गटातून येऊन 50 किलो वजनी गटात खेळत होती. तिचं वजन जर 50 किलो वजनी गटाच्या सीमेवर होते तर तिच्या सोबतच्या सपोर्ट स्टाफनंही अधिक काळजी घेणे गरजेचे होते.

भारतीय ऑलिम्पिक टीमसोबत गेली अनेक वर्षे काम करणारे एक अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर सांगतात,

“विशेषतः फायनलच्या दिवशी, कारण आदल्या दिवशीही विनेशने अन्न-पाणी न घेता, वजन कमी करण्याचे अनेक सोपस्कार केले असणार.

“त्यावेळी एक गोष्ट संबंधितांकडून दुर्लक्षली गेली असण्याची शक्यता आहे. सतत सलग सामने खेळल्यानंतर खेळाडूंना शरीरात अंतर्गत स्नायूंना दुखापती होत असतात; त्या बाहेरून कळत नाहीत.

“मात्र स्नायू किंवा अन्य भागांना झालेल्या अशा छुप्या आणि सुप्त दुखापतींमुळे खेळाडूचे वजन अचानक 100 ते 200 किंवा 300 ग्रॅमपर्यंत वाढू शकते. हा परिणाम जर ऐन वजनाच्या वेळी झालेला असेल तर हरप्रयत्नाने तिने गाठलेली 50 किलोची मर्यादा त्यावेळी किंवा वजनाच्या वेळी अचानक ओलांडली गेली असेल.”त्यामुळे हा अचानक उद्भवणारा बदल सोबत असणाऱ्या वैयक्तिक अधिकारी किंवा सपोर्ट स्टाफच्या कदाचित लक्षात आला नसेल, असं त्यांना वाटतं.

सपोर्ट स्टाफमध्ये कोण कोण असतं?

कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी एक खेळाडू जातो, तेव्हा त्याच्यासोबत जाणारी सहाय्यकांची टीमही जात असते. हे सगळेजण खेळाडूला त्याच्या किंवा तिच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम कामगिरी बजावण्यासाठी मदत करतात.

भारताच्या हॉकी टीमच्या सपोर्ट स्टाफचे सदस्य

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारताच्या हॉकी टीमच्या सपोर्ट स्टाफचे सदस्य

ऑलिंपिक सारख्या स्पर्धांमध्ये पंधरा दिवसात सर्व स्पर्धा होतात, त्यामुळे कार्यक्रम अगदी भरगच्च असतो. त्यावेळी प्रत्येक खेळाडूचा फिटनेस, क्रीडा कौशल्यानुसारकमी वेळात सराव करणे, दुखापतींचे पुनर्वसन आणि अन्य गोष्टी करण्यासाठी 24 तास उपलब्ध असलेली व्यवस्था लागते.

या सहाय्यकांच्या टीममध्ये प्रशिक्षक, फिजियोथेरपिस्ट, न्यूट्रिशनिस्ट, स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग विशेषज्ञ यांचा समावेश असतो.

साधारणपणे प्रत्येक टीमसोबत राष्ट्रीय प्रशिक्षक असतात आणि वैयक्तिक खेळांमध्ये राष्ट्रीय प्रशिक्षकांसोबत काहीवेळा वैयक्तिक प्रशिक्षकही जाऊ शकतात.

नेमबाजीसारख्या खेळासाठी सहाय्यक टीममध्ये मानसशास्त्रज्ञांची नेमणूक केलेली असते. तर कुस्ती, बॉक्सिंग आणि ज्युडोसारख्या खेळांसाठी स्पारिंग पार्टनर म्हणजे खेळाडूला सराव देण्यासाठी खेळणारे खेळाडू असतात.

त्याशिवाय संपूर्ण भारतीय पथकासाठी वैद्यकीय टीम तसंच मीडिया व अन्य गोष्टींसाठी वेगवेगळे अधिकारी यांची नेमणूक केली जाते.

या खेळाडूमध्ये आणि सपोर्ट स्टाफमध्ये एक समन्वय असला पाहिजे, सहकार्य पाहिजे आणि ते एखाच वेव्हलेंथवर असायला पाहिजेत.

उदाहरणार्थ, स्वप्नील कुसाळे साठी क्रीडा मानसशास्त्रज्ञ म्हणून वैभव आगाशेची निवड कशी केली, याविषयी दीपाली देशपांडे सांगतात, "स्वप्नीलची भाषा अवगत असणारा म्हणजे मराठी असावा, पुरुष असावा (म्हणजे स्वप्नील त्याच्यासोबत जास्त कंफर्टेबल असेल) आणि त्याने त्या खेळामध्ये काम केलेलं असावं म्हणजे त्याला त्या खेळाचं परिपूर्ण ज्ञान असेल. हे तीन निकष पूर्ण केल्यामुळेच स्वप्नीलला वैभवसोबत काम करण्याचा फायदा झाला."

थोडक्यात नेमकं कोणत्या तज्ज्ञांनी खेळाडूंसोबत असायला हवं, याची निवड करण्याचे निकष योग्य असायला हवेत. त्याबाबतीत आपल्या इथे मिक्स अँड मॅच असं दिसतं.

त्या त्या खेळाच्या क्रीडा संघटनांना, काही खऱ्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना बाजूला ठेवून हा समन्वय साधता येणारच नाही. वर्षभर त्या संघटनांची माणसं काम करत असतात.

विनेशसोबत तिचे वैयक्तिक प्रशिक्षक व्होलर अकोस, क्रीडा वैज्ञानिक सल्लागार वेन पॅट्रिक लोंबार्ड, फिजियोथेरपिस्ट अश्विनी जीवन पाटील, स्ट्रेंथ अँढ कंडिशनिंग तज्ज्ञ मयांक सिंह गरिया तसंच स्पारिंग पार्टनर शुभम आणि अरविंद यांचा पथकात समावेश झाला होता.

अनेक प्रश्न

खेळाडूंच्या वजनाचे नियंत्रण नियमन आणि अन्य वैयक्तिक गोष्टींची काळजी करण्याकरिता पुरेसा मेडिकल स्टाफ भारत सरकारने दिला होता.

असे असतानाही विनेशच्या बाबतीत असं काय घडलं की ज्यामुळे तिच्यावर अपात्र होण्याची वेळ आली?

चार वर्षांची खेळाडूंची मेहनत कोणाच्यातरी दिरंगाईमुळे वाया गेली आहे का? याची उत्तरं शोधावी लागतील.

विनेशच्या बाबतीत नेमकं काय झालं, ते टाळता आलं असतं का याची नीट चौकशीही व्हायला हवी, कारण त्यातूनच पुढे दुसऱ्या कुणा भारतीय खेळाडूच्या बाबतीत असं होणार नाही याची काळजी घेता येईल.

वजन जास्त झाल्यामुळे अपात्र ठरलेली विनेश ही पॅरिस ऑलिंपिकमधील पहिलीच खेळाडू नाही. यंदा या स्पर्धेत जुडो आणि कुस्तीमध्ये आणखी ही काही खेळाडू वजनी गटात बसत नसल्याने अपात्र ठरले आहेत.

प्राथमिक फेरीत अपात्र ठरल्यास खेळाडूंना फारसं दुःख होत नाही. पण पदकापासून वंचित होणं मात्र जिव्हारी लागतं. कारण चार वर्षांची त्यांची मेहनत पाण्यात गेलेली असते.

पदकांपर्यंत पोहोचूनही विनेश रिकाम्या हाताने परत येणार आहे. नंतरच्या चार वर्षांची काहीच खात्री देता येत नाही.

त्यामुळेच वजनाविषयीचे हे नियम एवढे कठोर का असावेत का? असाही प्रश्न विचारला जातो आहे. याबाबत व्यावसायिक पैलवान जॉर्डन बरोने चांगल्या सूचना केल्या आहेत.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

त्याने सोशल मीडियावर म्हटले आहे की, “कुस्ती खेळल्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या कुस्ती आधी एक किलो वजन वाढवण्याची मुभा असावी. वजन करण्याची वेळ साडेआठ ऐवजी साडेदहा वाजताची असावी. एखादी फायनलिस्ट वजनामुळे अपात्र ठरली तर दुसरीला सुवर्णपदक द्यावं.”

शेवटी आपल्या ट्विटमध्ये जॉर्डनने विनेश फोगाट हिला रौप्य पदक देण्याची शिफारस केली आहे.

सध्या या घटनेवर भावनिक प्रतिक्रिया उमटत आहेत. पण खेळात शेवटी नियम हा नियम असतो आणि त्या नियमात बसत नसल्यानं आज भारतानं हातात आलेलं एक पदक गमावलं आहे.