कंगना राणावत यांना ट्रम्प यांच्याबद्दलचं 'ते' ट्वीट करावं लागलं डिलीट; नेमकं काय घडलं?

फोटो स्रोत, Getty Images
अभिनेत्री आणि लोकसभा खासदार कंगना राणावत यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल केलेल्या सोशल मीडिया पोस्टबद्दल खेद व्यक्त केला असून आपली पोस्ट डिलीट केली आहे.
कंगना राणावत यांनी म्हटलं आहे की, ट्रम्प यांनी अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांना भारतात उत्पादन विस्ताराबद्दल केलेल्या सूचनेसंबंधी केलेली पोस्ट डिलीट करण्याची सूचना मला भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केली.
"माझे हे अत्यंत खासगी मत व्यक्त केल्याबद्दल मला खंत वाटते. सूचनेनुसार मी ती पोस्ट तात्काळ काढून टाकली," असं राणावत यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, Social Media
भाजप नेत्या आणि मंडीच्या खासदार कंगना राणावत यांनी एक्स (आधीचे ट्वीटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रम्प यांनी टीम कुक यांना केलेल्या सूचनेबद्दल एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी तीन मुद्दे नमूद करत ट्रम्प यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुलना केली होती.
ट्रम्प हे जगातील सर्वांत शक्तिशाली देशाचे नेते असले, तरी नरेंद्र मोदी हे जगातील सर्वांत लोकप्रिय नेते आहेत, असं म्हणत कंगनाने दोघांची तुलना केली होती. तसेच ट्रम्प यांचा निर्णय राजनयिक असुरक्षिततेच्या भावनेतून आला आहे का, असा प्रश्न उपस्थित केला होता.
कतारमधील एका कार्यक्रमात ट्रम्प यांनी म्हटलं होतं, "भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो, ते खूप चांगले काम करत आहेत. त्यांनी हाही दावा केला की, अॅपल आता अमेरिकेत आपले उत्पादन वाढवणार आहे, हे त्यांनी कुकसोबत केलेल्या चर्चेमुळे झालं आहे."
अॅपल कंपनी सध्या अमेरिकेत आयफोन तयार करत नाही. मात्र पुढील वर्षाच्या अखेरीस अमेरिकेतील आयफोन पुरवठ्याचा मोठा हिस्सा भारतात तयार व्हावा, असा कंपनीचा उद्देश आहे, जेणेकरून चीनवरील अवलंबित्व कमी होईल.
खासदार म्हणून निवडून आल्यानंतर आपल्या सोशल मीडियावरील मतांबद्दल खंत व्यक्त करण्याची कंगना राणावत यांची ही पहिलीच वेळ नाहीये.
केंद्र सरकारने 2021 मध्ये शेतकरी आंदोलनानंतर मागे घेतलेले कृषी कायदे पुन्हा लागू करावेत अशी मागणी राणावत यांनी सप्टेंबर 2024 मध्ये केली होती.
त्यांनी 23 सप्टेंबर 2024 रोजी म्हटलं होतं, "शेतकरी हिताचे कायदे परत यायला हवेत, असं मला वाटतं. हे वादग्रस्त ठरू शकतं हे मला माहीत आहे."
त्यांनी म्हटलं होतं, "शेतकऱ्यांनी स्वतःहून ही मागणी करावी. जसे इतर भागांतील शेतकऱ्यांना याचा फायदा मिळतो आहे, तसेच विकासासाठी अडथळे नसावेत."
दुसऱ्या दिवशी, भाजपा प्रवक्ते गौरव भाटिया यांनी हे राणावत यांचं वैयक्तिक मत असल्याचं म्हटलं.
कथितरित्या थोबाडीत मारल्याचे प्रकरण
कंगना राणावत आणि वाद यांचं घट्ट नातं आहे. आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असलेल्या कंगना यांनी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरून मंडीमधून निवडणूक लढवली होती. 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दोनच दिवसांत कंगना यांनी चंदीगढ विमानतळावर सीआयएसएफच्या महिला कॉन्स्टेबलनं आपल्या कानाखाली लगावल्याचं म्हटलं होतं.
"ही महिला कॉन्स्टेबल शेतकरी आंदोलनाची समर्थक होती. मी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला नाही. त्यामुळे त्याचा राग तिने माझ्यावर काढला," असं कंगना यांनी त्यांच्या व्हीडिओत म्हटलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
ज्या महिला कॉन्स्टेबलवर कंगनाला थोबाडीत मारल्याचा आरोप होता तिचं नाव कुलविंदर कौर होतं.
याप्रकरणात नेमकं काय घडलं होतं, त्याच्या राजकीय प्रतिक्रिया काय उमटल्या होत्या हे तुम्ही इथं क्लिक करून सविस्तर वाचू शकता.
खासदार होण्यापूर्वीही कंगना यांनी अनेकदा राजकीय वक्तव्यं केली होती, ज्यामुळे वाद झाला होता. त्याचबरोबर फिल्म इंडस्ट्रीतील गटबाजी, घराणेशाही, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण अशा अनेक विषयांवर कंगना यांनी वेळोवेळी केलेल्या विधानांमुळे वाद निर्माण झाला होता.
कतार एअरवेजच्या सीईओंना म्हटलं होतं मूर्ख
कतार एअरवेजचे सीईओ अकबर अल बाकर यांचा एक व्हायरल पॅरडी व्हीडिओ खरा मानून कंगना राणावत यांनी त्यांना इन्स्टाग्रामवर 'मूर्ख' म्हटलं होतं. पण सत्यता लक्षात आल्यानंतर कंगनाने ती स्टोरी काढून टाकली.
वासुदेव नावाच्या एका ट्वीटर युजरने एक व्हीडिओ प्रसिद्ध करून कतार एअरवेजवर बहिष्कार टाका, अशी मागणी केली होती.
त्याचा तो व्हीडिओ आणि कतार एअरवेजचे सीईओ अकबर अल बाकर यांच्या जुन्या मुलाखतीतला एक भाग काढून कुणीतरी एक नवा व्हीडिओ तयार केला होता.
हा व्हीडिओ असा एडिट केला की, पाहणाऱ्याला अकबर अल बाकर हे वासुदेवच्या बहिष्कारच्या मागणीला उत्तर देत आहेत असं वाटावं.

फोटो स्रोत, Getty Images
जावेद अख्तर यांनी दाखल केला होता मानहानीचा दावा
गीतकार जावेद अख्तर यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये कंगना राणावत यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता.
जून 2020 मध्ये अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये उपस्थित असलेल्या एका विशिष्ट 'गटा'चा हवाला देत कंगनाने एका मुलाखतीत आपल्याविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याचा दावा जावेद अख्तर यांनी तक्रारीत केला होता.
हे संपूर्ण प्रकरण येथे क्लिक करून समजून घेता येईल.
एक्स (ट्विटर) अकाउंट सस्पेंड
कंगना राणावतचं ट्विटर अकाऊंट (सध्याचं एक्स) बरखास्त करण्यात आलं होतं. ट्विटरच्या नियमांचं वारंवार उल्लंघन केल्यानं ही कारवाई करण्यात आल्याचं ट्विटरच्या प्रवक्त्यांनी म्हटलं होतं.
द्वेष पसरवणं आणि अपमानास्पद वागणूक देण्याविषयीच्या ट्विटरच्या नियमांचं कंगना यांनी उल्लंघन केल्यानं ही कारवाई करण्यात आल्याचं ट्विटरनं म्हटलं होतं.
या प्रकरणात नेमकं काय घडलं होतं? जाणून घ्या.

फोटो स्रोत, Getty Images
आपल्या ट्विटर अकाऊंटवर करण्यात आलेल्या कारवाईविषयी प्रतिक्रिया देताना कंगना राणावत यांनी म्हटलं, "ट्विटरनं माझं म्हणणं सिद्धच केलंय की, ते अमेरिकन आहेत आणि त्यांना वाटतं की, श्वेतवर्णीय म्हणून ते कृष्णवर्णीयांना गुलामांसारखं वागवू शकतात."
"त्यांना वाटतं की, ते तुमच्या विचारांवर, भाष्यावर नियंत्रण ठेवू शकतात. पण सुदैवाने माझ्याकडे इतरही प्लॅटफॉर्म आहेत, जिथे मी माझं मत व्यक्त करू शकते, माझ्या सिनेमांमधूनसुद्धा."
"मी या देशाच्या तमाम लोकांच्या पाठीशी उभी आहे, ज्यांना गुलामाची वागणूक देण्यात आली, ज्यांच्यावर अत्याचार केले गेले आणि ज्यांचा आवाज हजारो वर्षांपासून दाबला जातोय आणि अजूनही ज्यांच्या छळाला अंत नाही."
इलॉन मस्क यांच्याकडे ट्विटरची मालकी आल्यानंतर दोन वर्षांनंतर म्हणजे जानेवारी 2023 मध्ये त्याचं अकाउंट पुन्हा सुरू करण्यात आलं.
शेतकरी आंदोलनावर टीका
केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरुद्ध पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनावरही कंगना यांनी टीका केली होती. त्यावेळीही त्यांना वादाला सामोरं जावं लागलं होतं.
या विधेयकांचा MSP वर परिणाम होणार नाही, याचं आश्वासन देणारं ट्वीट पंतप्रधानांनी केलं होतं.
कंगना यांनी तेच ट्वीट रिट्वीट केलं. रिट्वीट करताना त्याबरोबर जे काही लिहिलं त्यावरून त्यांना टीकेला सामारं जावं लागलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
कंगना यांनी म्हटलं, "पंतप्रधानजी, जर कोणी झोपला असेल, तर त्याला जागं करता येतं. पण ज्यानं झोपेचं सोंग घेतलंय. जाणूनबुजून काही न समजल्याचं दाखवत असेल, तर आपण समजावून सांगून काही होणार नाही. हे तेच आतंकवादी आहेत, ज्यांनी सीएएमध्ये एकाचंही नागरिकत्व गेलं नाही, तरी रक्ताचे पाट वाहवले होते."
या ट्वीटनंतर #Arrest_Castiest_Kangna हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. इतरही अनेक हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले.
हे संपूर्ण प्रकरण इथे क्लिक करून सविस्तर वाचा.
मुंबईची तुलना पाकिस्तान प्रशासित काश्मिरशी
शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका करताना कंगना राणावत यांनी मुंबईची तुलना पाकिस्तान प्रशासित काश्मीरशी केली होती.
कंगना यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं, "मला मुंबईबाहेर जायला सांगून पुन्हा परत येऊ नका अशी खुली धमकी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली. हे पाहाता आणि मुंबईतले आझादीच्या ग्राफिटी पाहाता मुंबई पाकव्याप्त काश्मीर झाल्यासारखी का वाटत आहे?"
त्यावर अनेक राजकीय प्रतिक्रियाही उमटल्या होत्या. त्याचबरोबर रितेश देशमुख, रेणुका शहाणे यांच्यासारख्या कलाकारांनीही कंगना यांच्यावर टीका केली होती.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील आरोप
सुशांत सिंह राजपूतने बॉलीवूडमधील घराणेशाहीला कंटाळून आत्महत्या केली, असा आरोप कंगना यांनी केला होता. याप्रकरणी दिग्गज चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांना कंगना यांनी लक्ष्य केलं होतं.
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर कंगना एका व्हीडिओमुळे वादाचा केंद्रबिंदू बनल्या होत्या.
"सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. कटकारस्थानं करण्यात पटाईत असलेले लोक ही बातमी वेगळ्या पद्धतीने चालवत आहेत. मानसिकदृष्ट्या कमकुवत असलेले, तणावात असलेले लोक अशा प्रकारे आत्महत्या करतात, असं सांगितलं जात आहे. ज्या मुलाने स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीची स्कॉलरशिप मिळवली. जो रँक होल्डर आहे. तो मानसिकदृष्ट्या कसा काय कमकुवत असू शकतो? "असं कंगना यांनी त्यांच्या व्हीडिओत म्हटलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
यानंतर टीम कंगनाने आणखी एक व्हीडिओ अपलोड केला. यामध्ये सुशांतचा मृत्यू ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं म्हटलं होतं.
करण जोहरची टीकाकार
कंगना यांनी करण जोहरवर सातत्याने टीका केली आहे. याची सुरुवात 19 फेब्रुवारी 2017 रोजी करण जोहर यांच्या 'कॉफी विथ करण' कार्यक्रमातून होते. इथं त्यांनी थेट करण जोहरच्याच कार्यक्रमात जाऊन त्याच्यावर अनेक टोमणे मारले होते.
या कार्यक्रमात करणच्या एका प्रश्नाला उत्तर देताना कंगना म्हणतात, "जर माझं बायोपिक कधी बनवण्यात आलं, तर तुम्ही (करण जोहर) नव्या लोकांना संधी न देणाऱ्या बॉलीवूडच्या टिपिकल बड्या व्यक्तीची भूमिका करू शकता. तुम्ही बॉलीवूडमध्ये नेपोटिझमचा फ्लॅग बिअरर (ध्वजवाहक) आणि मूव्ही माफिया आहात."
कार्यक्रमात हे ऐकून करण जोहर यांनी फक्त स्मितहास्य देऊन विषय बदलला. पण काही दिवसांनी त्यांनी याचं प्रत्युत्तर दिलं.
लंडनमध्ये पत्रकार अनुपमा चोप्रा यांना दिलेल्या मुलाखतीत करण जोहर म्हणाले, "मी कंगनाला काम देत नाही, याचा अर्थ मी मूव्ही माफिया झालो असा होत नाही. तुम्ही महिला आहात, तुम्ही पीडित आहात, असं तुम्ही नेहमी सांगू शकत नाही. तुम्हाला बॉलीवूडमध्ये नेहमी धमकावलं जातं, असं तुम्ही प्रत्येकवेळी म्हणू शकत नाही. जर बॉलीवूड इतकंच वाईट आहे, तर ही इंडस्ट्री सोडून द्यावी."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











