कंगना राणावतला कथितरित्या थोबाडीत मारल्याचे प्रकरण: आतापर्यंत काय-काय घडलं?

कंगना राणावत

फोटो स्रोत, Getty Images

कंगना राणावत आणि वाद यांचं घट्ट नातं आहे. चित्रपट अभिनेत्री असलेली कंगना आता मंडी मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व करणार आहे. लोकसभेत पाऊल ठेवण्यापूर्वीच एक नवा वाद सुरू झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

चंदीगड विमानतळावर CISF च्या महिला कॉन्स्टेबलने आपल्या कानाखाली लगावली असे कंगना राणावतने म्हटले आहे.

पुढे कंगना राणावत म्हणते, की ही महिला कॉन्स्टेबल शेतकरी आंदोलनाची समर्थक होती. मी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला नाही त्यामुळे त्याचा राग तिने माझ्यावर काढला असे कंगनाने व्हीडिओमध्ये म्हटले आहे.

4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. कंगना राणावतने भाजपच्या तिकिटावरुन हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभेसाठी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत कंगना राणावत विजयी झाली आहे.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF ) एका महिला कॉन्स्टेबलने चंदीगढ विमानतळावर आपल्याला थोबाडीत मारली असा आरोप कंगनाने केला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार या प्रकरणाचा तपास करण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांच्या समितीची स्थापना करण्यात आली आहे.

कंगना काय म्हणाली ?

कंगना राणावतनं या प्रकरणाबाबत एक व्हिडिओ जारी केला आहे आणि ती सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे.

ती म्हणाली, 'मला प्रसारमाध्यमांमधून आणि हितचिंतकांकडून फोन येत आहेत. मला सांगायचं आहे की मी पूर्णपणे सुरक्षित आहे.'

"मी सुरक्षा तपासणी झाल्यानंतर दुसऱ्या केबिनमधून जात होते, त्यावेळेस सीआयएसएफच्या एका महिला कॉन्स्टेबलनं मला थप्पड लगावली."

"त्या कॉन्स्टेबलनं असं का केलं असं विचारल्यावर कंगना म्हणाली, त्या महिला कॉन्स्टेबलचं उत्तर होतं की तिचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आहे," असं कंगनाने म्हटलं आहे.

कंगना राणावत

फोटो स्रोत, Getty Images

कंगना म्हणाली, "मी सुरक्षित आहेत मात्र मला चिंता वाटते की आपण पंजाबात वाढत असणाऱ्या दहशतवादाला कसं हाताळणार आहोत."

कंगना राणावत दिल्लीला एनडीएच्या बैठकीला हजर राहण्यासाठी येत होती. काल संसदेच्या केंद्रीय सभागृहात ही बैठक घेण्यात आली होती.

मंडीतून लोकसभा खासदार

कंगना राणावतनं हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक जिंकली आहे.

तिनं काँग्रेसच्या विक्रमादित्य सिंह यांचा 74,755 मतांनी पराभव केला आहे.

कंगनानं मार्चमध्ये हिमाचल प्रदेशातील बगलामुखी मंदिराला भेट दिली होती. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कंगणा म्हणाली की 'मातेची कृपा असेल तर मी मंडी लोकसभा मतदारसंघातून नक्कीच निवडणूक लढवेन.'

लोकसभेचं तिकिट मिळाल्यानंतर कंगनानं ट्विट करत म्हटलं होतं की, "माझ्या लाडक्या भारत देशासाठी आणि भारताच्या लोकांसाठी मी नेहमीच भारतीय जनता पार्टीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. आज भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वानं मला हिमाचल प्रदेशातील मंडी या माझ्या मूळ भागातून लोकसभेची उमेदवारी दिली आहे."

आणि आता कंगना लोकसभेची खासदार म्हणून निवडून आली आहे.

कॉन्स्टेबल निलंबित

ज्या महिला कॉन्स्टेबलवर कंगनाला थोबाडीत मारल्याचा आरोप आहे तिचं नाव कुलविंदर कौर आहे.

एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कुलविंदरचा भाऊ शेर सिंग म्हणाला, 'मागील दोन वर्षांपासून कुलविंदरची नियुक्ती चंदीगढ विमानतळावर झालेली आहे आणि ती सीआयएसएफमध्ये 15-16 वर्षांपासून कार्यरत आहे.'

शेर सिंग स्वत: किसान मजदूर संघर्ष समितीशी जोडलेला आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेनं अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं दिलेल्या बातमीनुसार कुलविंदर कौरला निलंबित करण्यात आलं आहे आणि तिला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती दिली आहे.

सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये कुलविंदर कौर म्हणत आहेत की, "शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या महिला शंभर-शंभर रुपये मजुरी घेऊन बसल्याचं विधान तिने (कंगनाने) केलं होतं. ती ज्यावेळी हे बोलली त्याचवेळी माझी आई त्या आंदोलनात बसलेली होती."

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असला तरी बीबीसीने त्याची स्वतंत्रपणे पुष्टी केलेली नाही.

शेतकरी आंदोलनाच्या वेळेस कंगना राणावतने केलेल्या विधानाचा दाखल कुलविंदर कौर देत होत्या.

राजकीय प्रतिक्रिया

कंगणाबाबतच्या घटनेनंतंर राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना हरियाणाचे मुख्यमंत्री नाईब सैनी म्हणाले की सुरक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याकडून असं वर्तन घडणं ही दुर्दैवी बाब आहे.

नाईब सैनी म्हणाले, कंगणाशी याप्रकारचं वर्तन अजिबात घडायला नको होतं.

कंगना राणावत

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि कर्नाल मतदारसंघातील लोकसभेचे खासदार मनोहरलाल खट्टटर यांनी या घटनेचं वर्णन दुर्दैवी असं केलं.

ते म्हणाले, "सुरक्षा दलांचं काम सुरक्षा पुरवणं हे आहे. त्यांनी त्यांचं काम केलं पाहिजे. जनभावनेशी त्यांचा काहीही संबंध नसतो. आम्हाला आशा आहे की सीआयएसएफ या संदर्भात विभागीय कारवाई करेल."

मंडी मतदारसंघातून कंगणाविरोधात निवडणूक लढवलेले काँग्रेसचे नेते विक्रमादित्य सिंह म्हणाले, "ही खूप दुर्दैवी घटना आहे. असं कोणाच्याही बाबतीत घडता कामा नये. खासकरून संसदेच्या एका महिला खासदाराबाबत तर अजिबात नाही. सीआयएसएफच्या काही कॉन्स्टेबल्सनी शेतकरी आंदोलनाला प्रतिसाद दिला होता. याबाबत काही तक्रारी होत्या, मात्र अशा पद्धतीनं थोबाडीत लगावणं खूपच दुर्दैवी आहे."

"आम्ही या घटनेचा निषेध करतो आणि सरकारनं याबाबतीत कारवाई केली पाहिजे."

कंगनाच्या शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधानांबद्दल

2020 मध्ये तीन कृषी कायद्यांविरोधात वर्षभर देशभर चाललेल्या शेतकरी आंदोलनाच्या काळात कंगना तिच्या वक्तव्यांमुले वादात सापडली होती.

सप्टेंबर 2020 मध्ये तिनं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल ट्विट करत म्हटलं होतं की जे लोक सीएए बद्दल चुकीची माहिती आणि अफवा पसरवत होते, ज्यामुळे दंगली झाल्या होत्या, तेच लोक आता शेतकरी बिलाबाबत चुकीची माहिती पसरवत आहेत.

कंगणा राणावत

फोटो स्रोत, Kangana/X

फोटो कॅप्शन, कंगणा राणावत

"ते देशात दहशत निर्माण करत आहे. ते दहशतवादी आहेत. मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला माहित आहे. काही लोक चुकीची माहिती पसरवत आहेत."

यानंतर कंगणानं पुन्हा ट्विट केलं होतं आणि स्पष्टीकरण दिलं होतं की जर कोणी हे सिद्ध केलं की तिनं शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटलं आहे, तर ती तिचं ट्विट डीलीट करेल.

पहिल्या ट्विटनंतर सारवासारव करण्यासाठी कंगणानं दोन ट्विट केले होते. मात्र तिनं आपलं पहिलं ट्विट डिलीट केलं नव्हतं.

कंगना तिच्या वक्तव्यावर ठाम राहिली आणि तिने स्पष्टीकरण दिले 'की जे शेतकरी विधेयकांविषयी अफवा पसरवत आहेत त्यांना तिनं दहशतवादी म्हटलं आहे, शेतकऱ्यांना नाही.'

दिलजितला टॅग करून खालिस्तानचा उल्लेख

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मार्च 2023 मध्ये कंगणानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात अभिनेता दिलजित डोसांज याला टॅग केलं होतं.

कंगना तेव्हा म्हणाली होती की, 'अनेक पंजाबी सेलिब्रिटींनी तिला सांगितलं आहे की खालिस्तान हा व्हायरल आजार आहे आणि भारत सरकारनं त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली पाहिजे.'

या पोस्टचा संबंध वारिस पंजाब या पंजाबातील संघटनेचे नेते अमृतपाल सिंह यांच्याविरोधात घेण्यात येत असलेल्या कारवाईशी होता.

दिलजित डोसांज यानं या पोस्टला उत्तर देत लिहिलं होतं की "पंजाब मेरा रहे वासदा." ( पंजाब समृद्ध होत राहो.)

सोशल मीडियावर कंगणा आणि दिलजित मध्ये होत असलेल्या वादादरम्यान मनोरजंन क्षेत्रातील अनेकांनी कंगणावर टीका केली होती.

कंगनानं आणखी एका पोस्टमध्ये दिलजितला टॅग केलं होतं.

त्यानंतर केलेल्या एका पोस्टमध्ये तिनं दिलजितला प्रश्न विचारला होता.

कंगनानं लिहिलं होतं, "आधी दिलजित धमक्या द्यायचा आणि त्याचे खालिस्तानी समर्थकसुद्धा खूप बोलायचे...ते आता शांत का आहेत?"

"आधी कोणाकडून प्रोत्साहन मिळाल्यामुळे ते उडत होते आणि आता त्यांना कशाची भीती वाटते आहे? याबद्दल मला सांगा?"

आणखी एका पोस्टमध्ये कंगणानं लिहिलं होतं की "जे खालिस्तान्यांना समर्थन देतात त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, पोलिस आले आहेत. आता कोणीही काहीही करण्याचे दिवस नाहीत. आता देशाचे तुकडे करण्याचा प्रयत्न करणं किंवा देशद्रोहाचा प्रयत्न करणं महागात पडेल."

या पोस्टमध्ये कंगणानं एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचं हातकडी असलेलं स्टिकर टाकलं होतं.

वादग्रस्त वक्तव्ये आणि भाजपाला पाठिंबा

सुशांत सिंह राजपुतच्या मृत्यूनंतर कंगणा राणावत अधिक आक्रमक झाली होती.

तिनं सर्व चित्रपटसृष्टीवर कठोर शब्दात टीका केली होती. पुन्हा एकदा कंगणानं नेपोटिझम आणि फिल्म माफियाचा मुद्दा मांडला होता.

मग तो करण जोहर असो की सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान, प्रत्येकावर तिनं निशाणा धरला होता.

फक्त एवढंच नाही तर तिला चित्रपटात पहिली संधी देणाऱ्या महेश भट्ट यांच्याशी देखील तिचा वाद झाला होता. त्यानंतरच तिला गॅंगस्टर, लम्हे आणि राझ-3 सारखे चित्रपट मिळाले होते.

सुशांत सिंहच्या मृत्यूचं रहस्य उलगडल्यानंतर कंगणानं म्हटलं होतं की बॉलीवूडमधील 99 टक्के लोक अंमली पदार्थांचं सेवन करतात.

कंगना

फोटो स्रोत, Facebook/Kangana

मागील काही काळापासून बॉलीवूडशी संबंधित प्रत्येक मुद्द्याबाबत कंगणा राणावत पुढे येत असते. त्याचबरोबर ती सोशल मीडियावर देशातील इतर मुद्द्यांबाबत प्रतिक्रिया देत असते.

कंगणाच्या या सर्व वक्तव्यांकडे मोदी सरकारला पूर्ण पाठिंबा देण्याच्या दृष्टीकोनातून पाहिलं गेलं.

अनेकदा कंगना भाषेच्या किंवा बोलण्याच्या मर्यादा ओलांडत असते.

दिल्ली दंगलीच्या वेळेस कंगणाची बहीण रंगोली हिनं ट्विट केलं होतं की "दिल्लीचं रूपांतर सीरियामध्ये झालं आहे. बॉलीवूडच्या या जिहादींचं काळीज कठोर झालं आहे. त्यांना कृमींसारखे चिरडा."

सुशांत सिंह राजपुतच्या प्रकरणात कंगणानं महाराष्ट्र सरकारवरदेखील निशाणा साधला होता. त्यावेळेस महाराष्ट्रात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेचे आघाडी सरकार होतं.

कंगणानं मुंबईचा उल्लेख पाकव्याप्त काश्मीर असा केला होता. त्यावरून राजकारण तापलं होतं. भाजपा आणि शिवसेना एकमेकांसमोर उभे ठाकले होते.

भाजपानं उघडपणे कंगणाला पाठिंबा दिला होता आणि तिला वाय प्लस दर्जाची सुरक्षादेखील पुरवली होती. त्यानंतर ती भाजपात जाणार असल्याची चर्चा लोकांमध्ये सुरू झाली होती.

मोदी सरकारमधील राज्यमंत्री आणि राज्यसभेचे खासदार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आधीच म्हटलं होतं की भाजपा कंगणाचं स्वागत करेल.

आणि आता ती भाजपाची खासदार झाली आहे.

कंगनाचं बॉलीवूडशी नातं

कंगना हे हिंदी चित्रपटसृष्टीतीला असं एक नाव आहे जे सतत चर्चेत असतं. काही वेळा वादांमुळे तर काही वेळा तिच्या उत्तम अभिनयामुळे आणि काही वेळा तिच्या भांडणांमुळे.

हिमाचल प्रदेशात जन्मलेल्या कंगणानं अभिनय क्षेत्रात यायचं ठरवल्यानंतर दिल्लीत अरविंद गौर या नाट्य दिग्दर्शकाकडे अभिनयाचे धडे गिरवले होते आणि त्यानंतर ती मुंबईत आली होती.

मुंबईत आल्यानंतर कंगणाचा संघर्ष सुरू झाला, मात्र तिला आदित्य पांचोलीकडून आधार मिळाला होता. त्यांच्या मैत्रीची खूपच चर्चा झाली होती आणि असं म्हटलं गेलं होतं की कंगणा, आदित्य पांचोलीची गर्लफ्रेंड आहे.

चित्रपटसृष्टीत मार्ग शोधताना कंगणा चित्रपट निर्माते महेश भट्ट यांना भेटली. महेश भट्ट यांनीच तिला 2006 मधील गॅंगस्टर या चित्रपटात प्रमुख भूमिका दिली होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग बासू यांनी केलं होतं.

या चित्रपटातील भूमिकेमुळे कंगना प्रसिद्धीच्या झोतात आली होती.

तिच्या पहिल्याच चित्रपटात कंगनानं इतका उत्तम अभिनय केला होता की तिचं फक्त कौतुकच झालं नाही तर तिला उदयोन्मुख कलाकाराचा फिल्मफेअर पुरस्कार (बेस्ट डेब्युट अवार्ड) देखील मिळाला होता.

कंगनानं मग इथून मागे वळून पाहिलं नाही.