कंगना रानौत: सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर कंगना का बनली आहे वादाचा केंद्रबिंदू?

- Author, हर्षल आकुडे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येसंदर्भात केलेले आरोप सिद्ध झाले नाहीत तर पद्मश्री पुरस्कार परत करेन, असं वक्तव्य केल्याने अभिनेत्री कंगना रानौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत कंगनानं हे वक्तव्यं केलं आहे.
सुशांतने बॉलीवूडमधील घराणेशाहीला कंटाळून आत्महत्या केली, असं कंगनाने यापूर्वी म्हटलं होतं. याप्रकरणी दिग्गज चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांना कंगनाने लक्ष्य केलं होतं. 'मुंबई पोलिसांनी मला बोलावले होते, मात्र मनालीत असल्यामुळे जबाब रेकॉर्ड करण्यासाठी कुणाला तरी पाठवा,' अशी विनंती केल्याचं कंगनाने या मुलाखतीत म्हटलं आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर कंगना तिच्या एका व्हीडिओमुळे वादाचा केंद्रबिंदू बनली होती.
"सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. कटकारस्थानं करण्यात पटाईत असलेले लोक ही बातमी वेगळ्या पद्धतीने चालवत आहेत. मानसिकदृष्ट्या कमकुवत असलेले, तणावात असलेले लोक अशा प्रकारे आत्महत्या करतात, असं सांगितलं जात आहे."
"ज्या मुलाने स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीची स्कॉलरशिप मिळवली. जो रँक होल्डर आहे. तो मानसिकदृष्ट्या कसा काय कमकुवत असू शकतो? त्याचे मागचे काही सोशल मीडिया पोस्ट काढून पाहा, तो लोकांना अक्षरशः भीक मागत आहे. ही इंडस्ट्री मला का स्वीकारत नाही, असं तो म्हणत होता."
'काय पो छे' सारख्या चांगल्या सिनेमातून पदार्पण करणाऱ्या सुशांतला कोणताच पुरस्कार नाही मिळाला. छिछोरे, धोनी, केदारनाथ यांच्यासारख्या सिनेमांचं काहीच कौतुक नाही. गली बॉयसारख्या टुकार चित्रपटाला इतके अवॉर्ड मिळाले. आम्हाला तुमच्याकडून काहीच नको. तुमचे चित्रपट नको. पण आम्ही केलेल्या कामाचं कौतुक का केलं जात नाही?"
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अभिनेत्री कंगना रनौत हिने दिलेली ही प्रतिक्रिया.
सुशांत 14 जूनला त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी टीम कंगना रनौतने या इन्स्टाग्राम खात्यावरून हा व्हीडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला होता.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Instagram पोस्ट समाप्त
कंगनाचा हा व्हीडिओ अपलोड होताच प्रचंड व्हायरल झाला. सुशांतच्या मृत्यूची कारणं जाणून घेण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे. पण कंगनाने त्याच्या मृत्यूसाठी बॉलीवूडमधल्या घराणेशाहीला जबाबदार धरलं आहे.
यानंतर टीम कंगनाने आणखी एक व्हीडिओ अपलोड केला. यामध्ये सुशांतचा मृत्यू ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं तिने म्हटलं आहे. मूव्ही माफियांनी सुशांतला सुनियोजित पद्धतीने मानसिकरीत्या दुर्बल बनवलं, असा आरोप करत काही बातम्यांची उदाहरणं तिने दिली.

फोटो स्रोत, Getty Images
कंगना बॉलीवूडमधल्या नेपोटिझमविषयी (घराणेशाही) पहिल्यांदाच बोलली, असं नाही. ती वेळोवेळी याविषयी बोलताना दिसते. पण सुशांतच्या मृत्यूनंतर आता कंगनाच्या भूमिकेविषयी जास्त चर्चा होऊ लागली आहे.
कंगनाच्या मुलाखतींचे जुने व्हीडिओ काढून ते पुन्हा सोशल मीडियावर पोस्ट करण्यात येत आहेत. निर्भीड आणि आक्रमक प्रतिक्रिया देणाऱ्या कंगनाला बॉलीवूडची शेरनी संबोधलं जात आहे.
कंगनाच्या जुन्या वक्तव्यांच्या आधारे करण जोहर आणि इतर स्टार किड्सवर निशाणा साधला जात आहे. एकूणच, सध्या इंटरनेटवर कंगना रनौत आणि तिची वक्तव्यं ट्रेंडिंगवर आहेत.
आपल्या वक्तव्यांनी नेहमीच वादाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या कंगनाच्या आयुष्यात डोकावून पाहिलं तर संघर्ष, वादविवाद, भांडणं आणि इतर रंजक घडामोडींची कमतरता बिलकुल नाही.
निसर्गरम्य हिमाचल प्रदेशातल्या मंडी जिल्ह्यातील छोट्याशा गावातून बाहेर पडून अभिनय क्षेत्रातील योगदानासाठी इतक्या कमी वयात पद्मश्री पुरस्कारापर्यंत मजल मारणाऱ्या कंगनाच्या आयुष्याचा प्रवास चढ-उतारांनी भरलेला आहे.
कंगनाची वादग्रस्त व्यक्तव्यं
गेल्या वर्षी 7 जुलैला कंगना रनौतने आपल्या 'जजमेंटल है क्या' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एक पत्रकार परिषद घेतली होती.
प्रश्नोत्तरादरम्यान एका पत्रकाराने प्रश्न विचारण्यास सुरुवात केलीसुद्धा नव्हती इतक्यात कंगनाने त्याला थांबवलं, ती म्हणाली, "जस्टीन, तू तर आमचा शत्रू बनलास. बेकार गोष्टी लिहित आहेस. इतका वाईट विचार कसा करू शकतोस?"
हे आरोप ऐकून पत्रकाराने कंगनाला कोणत्या लेखाबाबत बोलत आहे, हे विचारलं. पण यावर कंगनाने स्पष्ट असं काही सांगितलं नाही. गोष्ट वाढत जाऊन वातावरण गढूळ बनलं. पण नंतर हा विषय थांबवण्यात आला.
यानंतर एंटरटेनमेंट जर्नलिस्ट गिल्ड ऑफ इंडियाने कंगनावर बंदी घातली होती. पुढे मुंबई प्रेस क्लब, प्रेस क्लब आणि प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियानेही कंगनावर बंदी घातली. यानंतर कंगनाने ट्विटरवर दोन व्हीडिओ अपलोड करून मीडियावर निशाणा साधला आणि नोटीस पाठवली होती.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
बीबीसीने एका मुलाखतीत कंगनाला याबाबत विचारल्यानंतर त्या पत्रकाराने 'मणिकर्णिका' चित्रपटाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता असं सांगितलं. चित्रपट जिंगोइस्टिक(अति-राष्ट्रवादी) असल्याचा प्रचार तो करत होता त्यामुळे आपण त्याच्यावर नाराज होतो असं तिने सांगितलं.
गेल्या काही वर्षांत अशा प्रकारचे अनेक वाद कंगनाने आतापर्यंत ओढवून घेतले आहेत.
2009 मधल्या तिचं एक वक्तव्य पाहू, यात फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या मुली स्वतःला सेक्स ऑब्जेक्टच्या स्वरूपात सादर करतात. त्यांना अभिनयापेक्षा आपल्या दिसण्याची जास्त चिंता असते, असं वक्तव्य तिने केलं होतं.
त्यानंतर वेळोवेळी चालू विषयांवर कंगना व्यक्त झाली. यावर्षीचंच उदाहरण घेतलं तर जानेवारी महिन्यात दीपिका पदुकोन जवाहरलाल नेहरू विद्यापीठात गेल्यानंतर बोचरी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर सैफ अली खानने भारत संकल्पनेबाबत केलेल्या वक्तव्याचा तिने समाचार घेतला. तसंच सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांच्या निर्भया प्रकरणातील आरोपींना माफ करण्याच्या वक्तव्यावरसुद्धा तिने तिखट प्रतिक्रिया दिली होती.
अगदी ताजं उदाहरण म्हणजे, या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अमेरिकेत जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर आंदोलनं सुरू झाली होती.
या विषयावर बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत कंगना सेलिब्रिटींवर तुटून पडते. कंगनाच्या मते, "फेअरनेस क्रिमची जाहिरात करणारे सेलिब्रिटी आता कृष्णवर्णीय लोकांबाबत बनावट सहानुभूती दाखवत आहेत."
शिवाय पालघरमध्ये दोन साधूंची हत्या झाल्यानंतर त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती, हा मुद्दाही ती मांडते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
कंगनाने केलेल्या वक्तव्यांवर तिच्या समर्थनार्थ आणि विरोधातील अशा दोन्ही बाजूंच्या प्रतिक्रियांचा खच पडलेला तुम्हाला पाहायला मिळेल.
करण जोहरची टीकाकार
कंगना करण जोहरवर सातत्याने टीका करते. याची सुरुवात 19 फेब्रुवारी 2017 रोजी करण जोहर यांच्या 'कॉफी विथ करण' कार्यक्रमातून होते. इथं तिने थेट करण जोहरच्याच कार्यक्रमात जाऊन त्याच्यावर अनेक टोमणे मारले होते.
या कार्यक्रमात करणच्या एका प्रश्नाला उत्तर देताना कंगना म्हणते, "जर माझं बायोपिक कधी बनवण्यात आलं तर तुम्ही(करण जोहर) नव्या लोकांना संधी न देणाऱ्या बॉलीवूडच्या टिपिकल बड्या व्यक्तीची भूमिका करू शकता. तुम्ही बॉलीवूडमध्ये नेपोटिझ्मचा फ्लॅग बिअरर (ध्वजवाहक) आणि मूव्ही माफिया आहात.
कार्यक्रमात हे ऐकून करण जोहर यांनी फक्त स्मितहास्य देऊन विषय बदलला. पण काही दिवसांनी त्यांनी याचं प्रत्युत्तर दिलं.
लंडनमध्ये पत्रकार अनुपमा चोप्रा यांना दिलेल्या मुलाखतीत करण म्हणतात, "मी कंगनाला काम देत नाही, याचा अर्थ मी मूव्ही माफिया झालो असा होत नाही. तुम्ही महिला आहात, तुम्ही पीडित आहात, असं तुम्ही नेहमी सांगू शकत नाही. तुम्हाला बॉलीवूडमध्ये नेहमी धमकावलं जातं, असं तुम्ही प्रत्येकवेळी म्हणू शकत नाही. जर बॉलीवूड इतकंच वाईट आहे, तर ही इंडस्ट्री सोडून द्यावी."
खरं तर, करण जोहर यांची निर्मिती असलेल्या 'उंगली' चित्रपटात कंगनाने काम केलं आहे. पण हा चित्रपट आपल्या आयुष्यातला सर्वांत फ्लॉप चित्रपट होता, असं म्हणून या चित्रपटादरम्यानच आपले विचार पटत नसल्याचं लक्षात आल्याचं कंगना सांगते.

फोटो स्रोत, FACEBOOK/KARAN
एकीकडे कंगनाचे फॉलोअर्स वाढत असताना करण जोहरचे इन्स्ट्राग्राम फॉलोअर्स फक्त पाच दिवसांत जवळपास साडेपाच लाखांनी तर आलिया भट्टचे फॉलोअर्स साडेअकरा लाखांनी कमी झाले.
चित्रपट समीक्षक गणेश मतकरी यांच्या मते, "घराणेशाही प्रत्येक क्षेत्रात असते. पण आमीर खान, रणबीर कपूर, आलिया भट, वरुण धवन, अभिषेक बच्चन असे अनेक चांगले अभिनेते प्रिव्हिलेज्ड घरातून आलेले आहेत.
इरफान खान, के के मेनन, मनोज बाजपेयी, नवाजुद्दीन सिद्दीकी, राजकुमार राव, भूमी पेडणेकर अशा अनेक जणांनी कोणतीही पार्श्वभूमी नसताना स्वत:ची ओळख तयार केली आहे. त्यांच्या अभिनयाचे चाहतेही अनेक आहेत.
सर्व स्टार किड्सना धडाधड कामं मिळतायत असं नाही, त्याप्रमाणे तशी पार्श्वभूमी नसताना लोकप्रिय झालेले सगळेही उत्तमच काम करतायत अशातलाही भाग नाही.
"कंगना पूर्वीपासूनच तावातावाने अशा प्रतिक्रिया अनेक जणांविरुद्ध देत असते. पण तिने सर्वांनाच असं सरसकट दोष देणं टाळलं पाहिजे," असं मतकरी यांना वाटतं.
भट्ट कँपने दिली संधी
कंगना बॉलीवूडच्या प्रस्थापितांना नेहमी लक्ष्य करते हे आपल्याला माहीत आहे. पण कंगनाला बॉलीवूडमधलाच एक प्रस्थापित गट असलेल्या भट्ट कँपने पहिली संधी दिली होती.
पहिली संधी मिळण्याची कहाणी कंगनाने एका मुलाखतीत सांगितली आहे. कंगना वयाच्या 16 व्या वर्षी हिमाचल प्रदेशातून बाहेर पडून चंदीगढला आली. तिथून दिल्लीत येऊन काही दिवस मॉडेलिंग केलं. पुढे तिला चांगल्या ऑफर मिळू लागल्या. काही महिने अस्मिता थिएटर ग्रुपमध्येही तिने काम केलं. नंतर मुंबईत दाखल होऊन चित्रपट क्षेत्रात प्रवेश मिळवण्यासाठी तिने अनेक ऑडिशन दिले.

फोटो स्रोत, Getty Images
त्यावेळी भट्ट कँपची निर्मिती आणि इमरान हाश्मीची प्रमुख भूमिका असलेल्या 'गँगस्टर' चित्रपटासाठी हिरोईनचा शोध सुरू होता. कंगनाने यासाठी ऑडिशन दिलं पण ती त्यावेळी जेमतेम 18 वर्षांची होती. या चित्रपटातील अभिनेत्रीला एका आईचं पात्रही वठवावं लागणार होतं. त्यामुळे ऑडिशनच्या वेळी दिग्दर्शक अनुराग बासू यांना कंगना या भूमिकेसाठी लहान असल्याचं सांगितलं. या भूमिकेसाठी चित्रांगदा सिंगचा विचार केला जात होता, पण ऐनवेळी चित्रपट करणं शक्य नसल्याचं तिने कळवल्यानंतर अखेर कंगनाची निवड करण्यात आली. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
पुढे भट्ट कँपसोबतच वो लम्हे चित्रपटातही कंगनाने काम केलं. यानंतर तिला चांगल्या-चांगल्या चित्रपटांचे ऑफर मिळू लागले. तिच्या फॅशन, क्वीन, तनू वेड्स मनू या चित्रपटांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
चित्रपट समीक्षक अजय ब्रह्मात्मज यांच्या मते, कंगनाने मिळालेल्या संधीचा चांगला फायदा करून घेतला. तिला तिच्या कामाबाबत पुरस्कारही मिळाले. पण काही काळानंतर तिला इंडस्ट्रीत दुजाभाव मिळाल्याचा अनुभव आला असेल. अशा वेळी काही अभिनेते शांत बसतात, काही इतर मार्ग पत्करतात. पण कंगनाने त्यावर प्रतिक्रिया देण्याचं ठरवलं.
"पण हे करत असताना कधी-कधी मार्ग चुकीचा निवडते. ती पीडितेच्या भूमिकेत जाते. विविध विषयांना स्पर्श करून शेवटी सगळ्या गोष्टींचा संबंध स्वतःशी जोडते. विनाकारण सगळ्या पत्रकारांना नावे ठेवते. यामुळे कंगनाची प्रतिमा वादग्रस्त बनली आहे," असं ब्रह्मात्मज यांना वाटतं.
नकुशी ते पुरस्कारप्राप्त अभिनेत्री
हिमाचल मंडी जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात 23 मार्च 1987 ला अमरदीप रनौत आणि आशा रनौत यांच्या पोटी तिचा जन्म झाला.
तिचे पणजोबा आमदार होते, आजोबा आयएएस अधिकारी होते. वडील व्यापारी तर आई शिक्षिका होती.
कंगनाच्या जन्मावेळी त्यांच्या घरात आनंद व्यक्त करण्यात आला नाही, असं ती सांगते.
कंगनाच्या कुटुंबीयांना मुलगा होण्याची अपेक्षा होती. त्यामुळे तिला घरातच भेदभावाची वागणूक मिळाली. तिच्या घरात कुणी पाहुणा आल्यानंतर ती कशा प्रकारे नकुशी आहे, हे सांगितलं जात होतं.

फोटो स्रोत, Getty Images
या सर्वांचा परिणाम कंगना लहानपणापासूनच हट्टी आणि बंडखोर स्वभावाची होती, असं तिने हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. याच बंडखोर स्वभावातून तिने 16 व्या वर्षीच घर सोडलं. ती घराबाहेर पडल्यानंतर काही दिवस घरच्यांनी तिच्याशी बोलणं सोडलं होतं. पण नंतर त्यांच्यात समेट घडली. सध्या तिची मोठी बहीण रंगोली हीच कंगनाची मॅनेजर म्हणून काम पाहते.
छोट्या गावातून आलेल्या कंगनाने पुढे अभिनय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. गेल्या वर्षी आलेल्या मणिकर्णिका चित्रपटाच्या निमित्ताने तिने दिग्दर्शनातही हात आजमावून पाहिला आहे.
अभिनयासाठी कंगनाला आतापर्यंत तीन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. तर आजपर्यंतच्या वाटचालीसाठी तिला 2020 मध्ये पद्मश्री पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं आहे.
"हमें तो और भी जलील होना है"
'तनु वेड्स मनू रिटर्न्स' या 2016 मध्ये आलेल्या चित्रपटातील कंगनाच्या अभिनयाचं चांगलंच कौतुक झालं. या सिनेमातला 'हमें तो और भी जलील होना है' हा डायलॉग गाजला होता.
नातं जोडलेल्या व्यक्तींशी पुढे झालेले वाद आणि त्यानंतर वैयक्तिक आयुष्य चव्हाट्यावर येऊन झालेली बदनामी या सर्वांचा सामना कंगनाने केला.
कंगना मुंबईत बिलकुल नवी असताना तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात अभिनेता आदित्य पांचोलीशी तिचं अफेअर असल्याच्या चर्चा होत्या. पण आदित्यने मदतीच्या नावाखाली आपल्याला नजरकैदेत ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिने 2017 मध्ये एका टीव्ही मुलाखतीत केला होता.
यावर उत्तर देताना आदित्य पांचोली यांनी आपली बाजू स्पष्ट केली. कंगनाचा स्ट्रगल आपण पाहिला होता. तिने केलेले आरोप बिनबुडाचे असून कंगना चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी हे सगळं करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
अभिनेता हृतिक रोशनसोबत कंगना काही काळ रिलेशनशीपमध्ये होती, असं ती सांगते. पण हे नेहमीच हृतिकने फेटाळून लावलं आहे. एका मुलाखतीदरम्यान कंगनाने हृतिकला 'सिली एक्स' म्हटलं होतं. त्यानंतर दोघांच्या 'ई-मेल' लीकचं प्रकरण चांगलंच गाजलं होतं. हे तिचं पब्लिसिटी स्टंट आहे, असे आरोप करण्यात आले होते.

फोटो स्रोत, BOLLYWOOD AAJKAL
कंगनासोबत रिलेशनशीपमध्ये काही काळ राहिलेल्या अध्ययन सुमनने तर तिने आपल्यावर काळी जादू केल्याचा तसंच मारहाण केल्याचा आरोप केला होता.
पण आपण कधीच पब्लिसिटी स्टंटसारखे प्रकार केले नाहीत, असं स्पष्टीकरण कंगना देते. तिच्या मते, "तिच्या चित्रपटांनी अनेक रेकॉर्ड तोडले, इतिहास रचला. राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. चित्रपट येत-जात राहतील. मग तो काळ कोणताही असो, तुमचा चित्रपट प्रदर्शित होणार असो किंवा नाही. समाजात कुणी तुमच्याकडे बोट दाखवत असेल, तुम्हाला बेजबाबदार किंवा गुन्हेगार ठरवत असेल, तर तुम्ही न लाजता स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








