परवीन बाबी : स्टारडम, तीन प्रेम प्रकरणातलं अपयश आणि एकाकीपणाच्या वाटेवरचा प्रवास

फोटो स्रोत, TWITTER@FILMHISTORYPIC
- Author, प्रदीप कुमार
- Role, बीबीसी प्रतिनिधी
सत्तरच्या दशकात परवीन बाबी सिनेसृष्टीत ते सगळं काही करत होती, जे आजच्या अभिनेत्रींना करावं वाटतं. आधुनिकता आणि आत्मनिर्भरतेची सांगड तिच्या जगण्यात होती.
अतिशय कमी वयात मिळालेलं स्टारडम, प्रेमातील अपयश आणि नंतर आलेला एकाकीपणा असा परवीन बाबींचा प्रवास होता.
आणखी थोडं उलगडून सांगायचं, तर 'दीवार' सिनेमातील ते दृश्य आठवा, ज्या अमिताभ बच्चन बिअर बारमध्ये बसलेले असतात आणि त्यांना एकटं पाहून तिथं परवीन बाबी येते. कुठलीही ओळख-पाळख नसतान ती बोलायला सुरुवात करते.
एका हातात सिगरेट आणि दुसऱ्या हातात दारुचा पेला. अत्यंत विश्वासानं भरलेलं व्यक्तिमत्व. पाय दिसतील अशा डिझाईनचं अंगावर स्कर्ट.
खरंतर हे केवळ एक दृश्य. परवीन बाबीचं संपूर्ण करिअर अशाच दृश्यांनी भरलेलं आहे. ज्या काळात परवीन बाबी वावरत होत्या, त्या काळाला आव्हान देत त्या जगत होत्या...सिनेमातही आणि बाहेरही.
परवीन बाबी कमालीच्या आत्मनिर्भर होत्या. लग्नाआधी मित्रांसोबत संबंध प्रस्थापित करण्यात आणि ती नाती बिनधास्तपणे सांभाळण्यात त्यांना काहीच अडचण वाटत नव्हती.
हे सर्व करत असताना, त्यांच्या अभिनयातील कामाचा आलेखही वाढता होता, त्यात कुठेच कमतरता जाणवली नाही. कारकीर्दीवर कोणताच डाग दिसून येत नाही. आणि तसेही परवीन बाबींना अशा डागांची तमा नव्हती. किंबहुना, आजूबाजूच्या जागाचीही त्यांनी कधी फिकीर केली नाही.
छोट्या-छोट्या भूमिकांमधून चमक
'दीवार'मधील छोट्या भूमिकेतून परवीन बाबी यांनी आपल्या अभिनयाची चमक दाखवली आहेच. भूमिका छोटी असो, मोठी असो, त्यांनी जीव ओतून काम केलं. म्हणूनच कदाचित, सक्रीय सिनेकारकिर्दीच्या तीन दशकांनंतरही त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या अजूनही लक्षात आहेत.

फोटो स्रोत, TWITTER@NFAIOFFICIAL
नायककेंद्रित सिनेमांमध्ये परवीन बाबी यांच्या भूमिका तशा फारच छोट्या असत. मात्र, त्या छोट्या भूमिकाही परवीन बाबींना चर्चेत ठेवण्यासाठी पुरेशा ठरत.
सिनेमाच्या पडद्यावर ज्यावेळी स्त्रियांनी सलवार सूट आणि साडी परिधान करण्याचा काळ होता, त्याच काळात पाश्चिमात्य वातावरणात जडण-घडण झालेल्या परवीन बाबी यांना दिग्दर्शक बी. आर. इशारा यांनी पहिल्यांदा क्रिकेटर सलीम दुर्राणी यांच्यासोबत 1973 साली 'चरित्र' सिनेमात परवीन बाबींना संधी दिली. हा सिनेमात तर फ्लॉप ठरला, पण परवीन बाबू यांची जादू कायम राहिली.
4 एप्रिल 1949 रोजी गुजरातमधील सौराष्ट्रच्या जुनागढ येथील मध्यमवर्गीय मुस्लीम कुटुंबात जन्मलेल्या परवीन बाबी यांनी अहमदाबाद येथीळ सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये इंग्रजी साहित्यातून बीएचं शिक्षण पूरण केलं. त्यानंतर मॉडेलिंगमध्ये नशीब आजमावण्यासाठी त्या बाहेर पडल्या

फोटो स्रोत, TWITTER@FILMHISTORYPIC
अनेक ठिकाणी असे संदर्भ सापडतात की, याच काळात बी. आर. इशारा नव्या सिनेमासाठी अभिनेत्रीच्या शोधात होते. अशाच एकेदिवशी इशारा यांची नजर परवीन बाबी यांच्यावर पडली. परवीन बाबी या त्यावेळी सिगरेट ओढत होत्या. इशारा यांना परवीन बाबींना पाहूनच वाटलं की, आपल्या सिनेमात हीच अभिनेत्री असेल.
'टाइम'च्या कव्हरपेजवर
परवीन बाबी यांना पहिलं यश मिळालं, ते 'मजबूर' सिनेमातून. 1974 सालच्या या सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत परवीन बाबींनी काम केलं होतं.
त्यानंतर त्यावेळच्या अँग्री यंग मॅन असलेल्या अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनेक यशस्वी सिनेमे परवीन बाबी यांनी केले. त्यात दिवार, अमर अकबर अँथनी, शान आणि कालिया यांसारख्या सिनेमांचा उल्लेख करता येईल.
1976 साली तर परवीन बाबी यशाच्या शिखरावर होत्या. त्यावेळी प्रतिष्ठित मासिक 'टाइम'नं कव्हरपेजवर परवीन बाबींचा फोटो छापला होता.
'टाइम'च्या कव्हरवर स्थान मिळवणाऱ्या परवानी बाबी या पहिल्या बॉलिवूड कलाकार ठरल्या.

फोटो स्रोत, TIME MAGAZINE
सिनेमातील करिअरमध्ये परवीन बाबी यांना जसं यश मिळालं, तस यश त्यांना त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात मिळालं नाही. सुरुवातीला डॅनी यांच्यासोबत त्यांचं अफेअर झालं. मात्र, ते पुढे काही फार चाललं नाही.
डॅनी यांनी 'फिल्मफेअर'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, परवीन बाबी आणि त्यांची सोबत केवळ तीन-चार वर्षेच टिकली. त्यानंतर दोघांनीही वेगवेगळे रस्ते अवलंबले.
कबीर बेदींसोबतचं नातं
डॅनी यांच्यानंतर कबीर बेदी यांच्यावर परवीन बाबींचा जीव जडला.
कबीर बेदी आणि परवीन बाबी यांनी 1976 साली 'बुलेट' सिनेमात कामही केलं होतं. जवळपास तीन वर्षे हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले.
कबीर बेदींसाठी परवीन बाबी यांनी आपल्या यशस्वी करिअरवर पाणी सोडलं होतं.

फोटो स्रोत, TWITTER@FILMHISTORYPIC
त्यावेळी कबीर बेदी यांना एका इटालियन टीव्ही मालिकेत मुख्य भूमिका मिळाली होती. परवीन बाबी त्यावेळी कबीर बेदी यांच्यासोबत युरोपात स्थायिक झाल्या.
मात्र, दोघांमध्ये काही सर्व ठीकठाक नव्हतं. त्यामुळे परवीन बाबी माघारी परतल्या. त्या मायदेशी परतल्यावर हिंदी सिनेसृष्टीनंही त्यांना मोठ्या मनानं स्वीकारलं.
याच काळात प्रितीश नंदी यांच्या सांगण्यावरून परवीन बाबी यांनी 'द इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया'मध्ये आपल्या आठवणी लिहिल्या होत्या - "माझं करिअर यापेक्षा चांगलं कधीच नव्हतं. शर्यतीत मी पहिली आहे. परवीन बाबी नसलेला एकही सिनेमा मुंबईत बनत नाहीय. माझ्या या यशबद्दल अनेकांना आश्चर्य वाटतं.
काहींना या नशिबाच्या गोष्टी वाटतात. पण मी हे सांगू इच्छिते की, यात नशिबाचा काहीच भाग नाहीय. हे सर्व घाम आणि अश्रू आहेत, जे तुटलेल्या मनासोबत कठोर परिश्रमाचं फळ आहे. मात्र, यादरम्यान मी हे नक्कीच समजून गेलेय की, शो बिजमध्ये राहण्यासाठी विशिष्ट संघर्ष आहे, दबाव आहे आणि आव्हानंही आहेत. आता यात मी इतकं खोलवर गेलीय की, हे सर्व मला आता सहन करावंच लागेल."
महेश भट्ट यांच्यावर प्रेम
कबीर बेदी यांच्याशी ब्रेकअप म्हणजे आपल्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट असल्याचं सांगणाऱ्या परवीन बाबी पुढे महेश भट्ट यांच्यासोबत दिसू लागल्या.

फोटो स्रोत, YOUTUBE GRAB
1977 च्या अखेरीस या दोघांचा रोमान्स सुरू झाला. महेश भट्ट हेही कबीर बेदी यांच्याप्रमाणेच विवाहित होते. मात्र, तरीही ते पत्नी आणि मुलगी पूजा भट्ट यांना सोडून परवीन बाबी यांच्यासोबत राहू लागले.
हा काळ असा होता, परवीन बाबी यशाच्या सर्वोच्च स्थानी होती, तर महेश भट्ट एक फ्लॉप फिल्ममेकर होते.
परवीन बाबी यांच्यासोबतच्या नात्यावर आधारितच महेश भट्ट यांनी 'अर्थ' सिनेमा बनवला होता. याच सिनेमापासून महेश भट्ट यांच्या सिनेमाचा आलेख वर चढत गेला आणि दुसरीकडे परवीन बाबी यांचं मानसिक संतुलन काहीसं अस्थिर होऊ लागलं होतं.

फोटो स्रोत, YOUTUBE GRAB
महेश भट्ट यांच्यासोबतच्या नात्यादरम्यानच परवीन बाबी यांना मानसिक आजार सुरू झाला होता. महेश भट्ट यांनीच काही मुलाखतींमध्ये परवीन बाबींच्या या आजाराला 'पॅरानायड स्किझोफ्रेनिया' म्हटलं होतं. मात्र, परवीन बाबी यांनी कधीच आपल्याला हा आजार झाल्याचे मान्य केले नाही. आपल्याला मानसिक आजार अनुवंशिक असल्याचं मात्र त्या म्हणाल्या होत्या.
अध्यात्म
महेश भट्ट यांच्यासोबत नात्यात असतानाच परवीन बाबी अध्यात्मिक गुरू यूजी कृष्णमूर्ती यांच्या संपर्कात आल्या आणि त्यांच्याच सांगण्यावरून त्यांनी 1983 साली बॉलिवूडला राम राम ठोकला. त्यानंतर काही काळ त्या बंगळुरूत राहिल्या, त्यानंतर अमेरिकेत निघून गेल्या.
हा काळ असा होता, ज्यावेळी परवीन बाबी यांनी आपल्या करिअरला अधिक गांभिर्यानं घेतलं होतं आणि अमिताभ बच्चन यांच्या सावलीतून बाहेर पडत काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न त्या करत होत्या.
त्याचीच झलक जितेंद्र यांच्यासोबतच्या 'अर्पण' सिनेमात दिसली. या सिनेमात परवीन बाबी साडी परिधान केलेल्या दिसल्या.
एवढेच नव्हे, तर ऋषिकेश मुखर्जी यांच्या 'रंग बिरंगी' आणि इस्माइल श्रॉफ यांच्या 'दिल आखिर दिल है' यांसारख्या सिनेमातही त्यांनी काम केलं होतं. मात्र, या सगळ्याला अचान ब्रेक लागला.
अमेरिकेतही परवीन बाबी यांच्या मानसिक आजारावर कुठलाच उपचार झाला नाही.
अमिताभ बच्चन यांच्यावर आरोप
मानसिकरित्या आजारी असतानाच परवीन बाबी यांनी अमिताभ बच्चन यांच्यासह सिनेजगतातील अनेक दिग्गजांपासून आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं होतं.

फोटो स्रोत, SHAAN MOVIE
1989 मध्ये परवीन बाबी भारतात परतल्या आणि 2005 पर्यंत मुंबईतच राहिल्या. मात्र, बॉलिवूडच्या झगमगाटापासून दूर…
अमिताभ बच्चन यांच्यावरील परवीन बाबी यांचा संशय कशाप्रकारचा होता, याचा अंदाज डॅनी यांच्यासोबत बोलणं बंद झाल्याच्या गोष्टीवरून लावला जाऊ शकतो.
डॅनी यांनी याचा उल्लेख करत 'फिल्म फेअर'शी बोलताना सांगितलं होतं की, "एका मुलाखतीत अमितजींनी म्हटलं होतं की, मी त्यांचा चांगला मित्र आहे. परवीनने ती मुलाखत पाहिली आणि त्यानंतर ज्यावेळी मी तिच्या घरी गेलो, त्यावेळी तिने दरवाजाही उघडला नाही."

फोटो स्रोत, DEEWAR MOVIE
अमिताभ बच्चन यांच्याबाबतचा परवीन बाबींचा संशय शेवटपर्यंत कायम राहिला. मृत्यूच्या एक वर्ष आधी शेखर सुमन यांना दिलेल्या एका टीव्ही मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या, "मर्लिन ब्रँडो, एल्विस प्रिस्ले, लॉरेन्स ऑलिव्हर आणि मायकल जॅक्सन असताना अमिताभ बच्चन यांना शतकातील सर्वोत्तम स्टार निवडलं जातंय, यापेक्षा मोठा विनोद काय असू शकतो?"
आपल्या मर्जीनं जगणारी अभिनेत्री
शेखर सुमन यांच्यासोबतच्या मुलाखतीतच परवीन बाबी यांनी अमिताभ बच्चन यांना भारतातील दहावा सर्वाधिक हँडसम मॅन निवडल्याबद्दलही खिल्ली उडवली होती. देवानंद, फिरोज खान, शम्मी कपूर, शशी कपूर, किंबहुना राज कपूर किंवा ऋषी कपूर हे अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा सर्वाधिक हँडसम होते, असं परवीन बाबी यांचा दावा होता.
शशी कपूर यांचा मुलगा करण कपूर आणि संजय गांधी हेही अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा सुंदर असल्याचं परवीन म्हणाल्या होत्या.
मात्र, अमिताभ बच्चन यांनी परवीन बाबी यांच्याबाबत सार्वजनिक स्तरावर कधीही काही म्हटलं नाही.
2005 साली परवीन बाबी यांचं निधन झालं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना अमिताभ बच्चन म्हणाले, "आपल्या नियम-अटींवर जगणारी परवीन कलाकार होती आणि त्याचं जाणं हिंदी सिनेसृष्टीला मोठा फटका आहे."

फोटो स्रोत, YOUTUBE GRAB
मानसिक आजार असतानाही आणि आपल्याच मर्जीत जगतानाही, अखेरच्या काळात त्यांनी कधीच कुणाची मदत घेतली नाही. त्या कुणावरही अवलंबून राहिल्या नाहीत.
मात्र, हेही खरंय की, एकेकाळी ज्या परवीन बाबींच्या घरासमोर निर्मात्यांची रांग लागलेली असायची, त्याच घरासमोर शेवटच्या दिवसांमध्ये चिटपाखरूही दिसत नसे.
जवळपास एका दशकाचा 'स्टारडम' आणि जवळपास 50 सिनेमे सुद्धा परवीन बाबी यांच्या जगण्यातील पोकळीला भरून काढू शकले नाहीत. एकटेपणा त्यांना शेवटच्या दिवसात तर अधिकच टोचत राहिला.
कधी बॉलिवूडमध्ये टिकण्यासाठी दबाव, कधी प्रेमात मिळालेले धोके आणि कधी मानिसक आजाराशी लढा… या सगळ्या गोष्टींनी परवीन बाबी यांच्या कारकीर्दीला काहीसं फिकं नक्कीच केलं, पण बॉलिवूडमधील त्यांचं काम कायम राहिलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








