नवीन आयफोन ई-सिमवर, फोनमधून पारंपरिक सिमकार्ड हद्दपार होणार का?

अ‍ॅपल 2022 पासून अमेरिकेत फक्त ई-सिम असलेल्या आयफोनची विक्री करतोय

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, ग्राहम फ्रेझर
    • Role, तंत्रज्ञान पत्रकार

अ‍ॅपल ही स्मार्टफोन उत्पादनातली आघाडीची कंपनी आहे. मोबाईल वापरकर्त्यांमध्येही अ‍ॅपलची वेगळीच क्रेझ आहे. नवीन आयफोन केव्हा येणार याची ग्राहक आतुरतेने वाट पाहत असतात.

अ‍ॅपलचं नवीन प्रॉडक्ट मार्केटमध्ये येत नाही तोच त्याच्या दुकानाबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसून येतं. त्यामुळेच की काय, मोबाईल तयार करणाऱ्या इतर अनेक कंपन्या अ‍ॅपलचं अनुसरण करताना दिसतात.

अ‍ॅपलने नुकतचं आयफोनचं नवीन मॉडेल लाँच केलं, ते ही पारंपरिक सिमकार्डशिवाय. म्हणजेच अ‍ॅपलने आयफोनचं हे नवीन मॉडेल ई-सिमसह लाँच केलं आहे.

पण त्यामुळं पारंपरिक सिमकार्ड कालबाह्य तर होणार नाही? अशा शंका उपस्थित व्हायला लागल्या आहेत.

स्मार्टफोन्समधील सीम कार्डचा स्लॉट अत्यंत महत्वाचा मानला जातो. स्मार्टफोन्स वापरण्यासाठी संबंधित कंपनीचं सिम कार्ड टाकलं, की मोबइल वापरासाठी तयार.

परंतु आयफोन एअरमध्ये पारंपरिक सिम कार्डच्या पर्यायाला फाटा देण्यात आला असून यात फक्त ई-सिमचा पर्याय देण्यात आला आहे.

आयफोनच्या या नवीन मॉडेलमध्ये सिमकार्डचं स्लॉट नसणार आहे. हा फोन फक्त ई-सिमवर चालेल. त्यामुळे वापरकर्त्यांना नेटवर्क आणि प्लॅन बदलताना सिम कार्ड ट्रे उघडण्याची गरज भासणार नाही.

ई-सिमची खासियत म्हणजे, वापरकर्त्यांना फोनमधील सिम ट्रे न उघडता नेटवर्क आणि प्लॅन बदलण्याची सुविधा देते.

याबाबत माहिती देताना सीसीएस इनसाइटचे विश्लेषक केस्टर मान यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं की, अ‍ॅपलची ही घोषणा म्हणजे "सिमकार्डच्या समाप्तीची सुरुवात" आहे.

याचा अर्थ स्मार्टफोन्समधून हळू-हळून सिम ट्रे वगळला जाऊन प्लास्टिकच्या सिम कार्डचा वापर बंद होणार का? आणि तसं झालं तर याचा आपल्या फोनच्या वापरावर काय परिणाम होईल? जाणून घेऊया.

'फोनमधून सिम ट्रे होणार कालबाह्य'

सिम म्हणजे सब्स्क्राइबर आयडेंटिटी मॉड्यूल. ही चिप आपल्या फोनमधला एक महत्वाचा भाग आहे जो तुम्हाला मोबाईल नेटवर्क कंपनीशी जोडतो.

कॉल करताना, टेक्स्ट मॅसेज पाठवताना आणि डेटा वापरताना सिम मुख्य माध्यम असतो. मात्र, अलिकडच्या काही वर्षांत ई-सिम हा एक पर्याय म्हणून पुढे आला आहे.

नवीन फोनमध्ये वापरकर्त्यांकडे पारंपरिक प्लास्टिकचं सिम कार्ड किंवा ई-सिम दोन्ही वापरण्याचा पर्याय उपलब्ध आहे. परंतु, नव्याने लाँच झालेल्या आयफोनमध्ये त्यांनी पारंपरिक सिमकार्डचा पर्यायच ठेवलेला नाही. त्याऐवजी त्यांनी सरळ ई-सिमची सुविधा दिलीय.

अ‍ॅपलने मंगळवारी (9 सप्टेंबर) आपला सर्वात स्लिम असा आयफोन एअर बाजारात आणला. तसेच या फोनमध्ये केवळ ई-सिमचीच सुविधा असेल असंही जाहीर केलं. त्यामुळे जगभरात पहिल्यांदाच, ई-सिम-ओन्ली आयफोन उपलब्ध होणार आहे.

दरम्यान, अमेरिकेत ग्राहकांकडे 2022 पासून फक्त ई-सिम आयफोन आहेत.

2030 पर्यंत 301 कोटी फोनमध्ये ई-सिमचा वापर होईल असा अंदाज आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2030 पर्यंत 301 कोटी फोनमध्ये ई-सिमचा वापर होईल असा अंदाज आहे.

खरं तर, अ‍ॅपलने सिमकार्डचा वापर पूर्णपणे बंद केलेला नाही. तर नुकतेच लाँच झालेले इतर नवीन आयफोन (17, 17 प्रो, 17 प्रो मॅक्स) काही बाजारपेठांमध्ये फक्त ई-सिमच्या सुविधेसह लाँच झाले आहेत. असं असलं तरी, बहुतांश देशांमध्ये हे स्मार्टफोन्स सिम कार्ड स्लॉटसहदेखील उपलब्ध होतील.

दुसरीकडे सॅमसंग आणि गूगलसारख्या प्रतिस्पर्धी स्मार्टफोन उत्पादक कंपन्या मात्र पर्यायी ई-सिमची सुविधा देत आहेत. तर अनेक ठिकाणी प्लास्टिक सिमकार्डचाच वापर सुरू आहे.

मात्र तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ई-सिम भविष्यात पारंपरिक सिमकार्डची जागा घेईल, यात कोणतीही शंका नाही.

सीसीएस इनसाइटच्या अंदाजानुसार, 2024 मध्ये ई-सिम असलेले 103 कोटी स्मार्टफोन वापरात असून 2030 पर्यंत हा आकडा 301 कोटींवर जाण्याची शक्यता आहे.

पीपी फोरसाइटचे तंत्रज्ञान विश्लेषक पाओलो पेस्कातोरे याबाबत सांगतात, "काळ जसजसा पुढे जाईल तसतसे सिम ट्रे इतिहासजमा होतील."

ई-सिमचे फायदे काय?

ई-सिमच्या वापरामुळे अनेक फायदे होतील, असं पेस्कातोरे यांनी सांगितलं. ते म्हणाले, पहिला फायदा म्हणजे फोनमध्ये जागा वाढेल, ज्यामुळे मोठी बॅटरी बसवता येईल.

पर्यावरणाच्या दृष्टीनेही प्लास्टिक सिमकार्डचा वापर बंद होणे चांगले ठरेल. तसेच, परदेशात प्रवास करताना ई-सिम वापरणाऱ्यांना अधिक पर्याय मिळतील आणि बिलसंबंधी अडचण होणार नाही.

अ‍ॅपलचा 'आयफोन एअर' हा आतापर्यंतचा सर्वात स्लिम आयफोन आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अ‍ॅपलचा 'आयफोन एअर' हा आतापर्यंतचा सर्वात स्लिम आयफोन आहे.

तर केस्टर मान यांच्या म्हणण्यानुसार, यामुळे ग्राहकांचे वर्तन बदलेल आणि "लोकांची मोबाईल कंपन्यांशी संवाद साधण्याची पद्धत हळूहळू बदलत जाईल."

उदाहरणार्थ, ग्राहकांना कंपन्यांच्या मोठ्या स्टोअरमध्ये जाऊन सिम घ्यायची आवश्यकता राहणार नाही. तसेच, ज्यांना आपला वेळ वाचवायचा आहे आणि दुकानात जायचे नाही त्यांच्यासाठी हा हा मोठा फायदा असेल.

परंतु, हा बदल सहजासहजी स्वीकारला जाणार नाही, त्यासाठी काही वेळ लागेल, असं त्यांनी सांगितलं.

मान म्हणाले, "हा बदल विशेषतः वयोवृद्ध किंवा ज्यांना तंत्रज्ञानाची कमी माहिती आहे, अशांसाठी जरा किचकट पण महत्वाचा ठरेल. आणि अशा ग्राहकांना ई-सिमचा वापर कसा करायचा हे समजावून सांगण्यासाठी कंपन्यांना बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.