विस्मरणात गेलेले शिलेदार, अंकल सॅम आणि 'ते' 12 तंत्रज्ञान; वाचा आयफोन बनण्यामागची 'खरी' गोष्ट

स्टीव्ह जॉब्स

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, स्टीव्ह जॉब्स (फाइल फोटो)

9 जानेवारी 2007 रोजी त्यावेळच्या जगातील सर्वात महान आणि कुशल उद्योजकानं एक ऐतिहासिक घोषणा केली. ही घोषणा होती त्याने बनवलेल्या एका नव्या उत्पादनाची.

हा आविष्कार होता आयफोनचा. या उत्पादनानं जगातील सर्वात जास्त नफा आणि लोकप्रियता कमावत इतिहास रचला. इतकंच नव्हे तर आपलं जग कायमसाठी बदलून टाकलं.

आयफोन. ॲपल कंपनीच्या स्टीव्ह जॉब्सनं तयार केलेलं एक छोटं यंत्र ज्याने संवाद आणि संपर्काव्यतिरिक्तही इतर अनेक क्षेत्रात क्रांती आणली. आपल्या आजच्या अर्थव्यवस्थेला आधुनिक बनवण्यात या आयफोनचा मोठा वाटा आहे.

आयफोन हा अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरतो. पहिली बाब म्हणजे हे उत्पादन कमवत असलेला नफा प्रचंड आहे.

ॲपल कंपनी फक्त आपल्या या एका उत्पादनातून जितका पैसा कमावते तितका पैसा मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय कार्पोरेट कंपन्या आपल्या सगळ्या कारभारातूनही कमावत नाहीत. बड्या बड्या उद्योगांना एकटा आयफोन खप आणि नफ्याच्या जोरावर मागे टाकतो.

आयफोनमुळे एक नवीन उत्पादनाचा प्रकार बाजारपेठेत आणला आणि हे उत्पादन सगळ्यांवर वरचढ ठरलं. तो म्हणजे स्मार्टफोन.

आज या स्मार्टफोनशिवाय आपलं पानंही हालत नाही इतका तो आपल्या सगळ्यांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेला आहे. नंतर या आयफोनची नकल करत इतर कंपन्यांनी आपले स्मार्टफोन्स बाजारात आणले. त्या अर्थाने आयफोन हा जगातील पहिला स्मार्टफोन म्हणता येईल.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

आज स्मार्टफोन ही जगात सर्वाधिक विकली व वापरली जाणारी वस्तू आहे. स्मार्टफोनची व्याप्ती आकड्यांमध्ये मोजायची झाल्यास आज जगात 7.4 अब्ज स्मार्टफोन यूजर्स आहेत. म्हणजेच जगातील 87 टक्के लोकांकडे स्मार्टफोन आहे.

पण या स्मार्टफोनची सुरूवात आयफोननेच केली. अन्यथा 20 वर्षांपूर्वी स्मार्टफोन नावाची संकल्पनाच अस्तित्वात नव्हती. आज जगातली बहुतांश लोक स्मार्टफोन यूजर्स आहे. स्मार्टफोनशिवाय जगण्याची कल्पना करणं अशक्य आहे.

आयफोनमुळे त्यासंबंधी इतरही क्षेत्रांमध्ये सुद्धा क्रांती घडून आली आणि नवनव्या बाजारपेठा उदयाला आल्या. जसे की सॉफ्टवेअर, संगीत आणि जाहिराती. अर्थात ही क्षेत्र आधीपासून अस्तित्वात होतीच. पण स्मार्टफोनच्या आगमनामुळे या क्षेत्रांचा अक्षरशः कायापालट झाला.

स्मार्टफोन्स

फोटो स्रोत, Getty Images

आयफोनबाबतच्या या गोष्टी सगळ्यांनाच ठाऊक आहेत. पण या सहाजिक तथ्यांच्या पलीकडे जात आणखी खोलात जायचा प्रयत्न केल्यास अनेक रंजक गोष्टी तुम्हाला या आयफोनमध्ये गवसतील.

आयफोनच्या निर्मितीचं श्रेय आपण ॲपलचा मालक स्टीव्ह जॉब्स, त्याचा सुरुवातीचा सहकारी स्टीव्ह वॉझनिएक, त्याच्यानंतर कंपनीचा कारभार सांभाळणारा टीम कूक व आयफोनची रचना मांडणारा डिझायनर जॉनी इव्हला देतो.

अर्थात आयफोन बनवण्यात या लोकांचा निर्वावादपणे मोठा वाटा आहे. पण आयफोन कसा बनला या कथेतील महत्वाचे शिलेदार आपण विसरतो. आयफोन बनण्यात या विस्मरणात गेलेल्या शिलेदारांचा वाटा देखील तितकाच किंबहुना जास्त मोठा आहे.

स्टीव्ह जॉब्स यांच्या मृत्यूनंतर युरोपमध्ये लोकांनी त्यांना वाहिलेली श्रद्धांजली

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, स्टीव्ह जॉब्स यांच्या मृत्यूनंतर युरोपमध्ये लोकांनी त्यांना वाहिलेली श्रद्धांजली

हे शिलेदार कोण याचं उत्तर शोधण्याआधी काही मूलभूत प्रश्नांना भिडावं लागेल. जसं की अशी कोणती गोष्ट आहे जी आयफोनला आयफोन बनवते?

काही जण म्हणतील आयफोनचं अतिशय सुंदर डिझाईन, तर काही यूजर इंटरफेअरचं नाव घेतील‌. काही जणांसाठी अतिशय खोलात जाऊन छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करुन बनवण्यात आलेलं अत्याधुनिक सॉफ्टवेअर सर्वात महत्त्वाचं असेल. तर काही जणांना त्याचं हार्डवेअर ही आयफोनची सर्वात लक्षवेधी व जमेची बाजू वाटेल.

अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसणाऱ्या या आयफोन व त्यानंतर आलेल्या इतर स्मार्टफोन्सच्या निर्मितीमागे अशा कितीतरी गोष्टी आहेत, ज्याकडे आपल्यासारख्या बहुतांश सामान्य लोकांचं कधी लक्षही गेलं नसेल. पण त्यामुळे या गोष्टींचं महत्त्व खचितच कमी होत नाही.

लॉस एंजेलिस काउंटी फेअरमध्ये अॅपल पॅटन्स असलेले महाकाय आयफोन्सचे प्रदर्शन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, फाइल फोटो
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

स्मार्टफोन्स ज्यामुळे प्रत्यक्षात येऊ शकले अशा 12 महत्वाच्या तंत्रज्ञानांची यादीच अर्थशास्त्रज्ञ मारियाना माझुकटो यांनी बनवली.

पहिलं तंत्रज्ञान म्हणजे अत्यंत लहान आकाराचे मायक्रोप्रोसेसर्स, दुसरं तंत्रज्ञान मेमरी चिप्स. तिसरं आहे सॉलीड स्टेड हार्ड ड्राइव्हज, चौथं तंत्रज्ञान म्हणजे लिक्वीड क्रिस्टल डिस्प्लेचं आणि पाचवं आहे लिथियमपासून बनलेली बॅटरी.

हे सगळे तंत्रज्ञान स्मार्टफोनच्या बर्हिभाग म्हणजेच हार्डवेअरचा भाग झाले.

आता वळूया स्मार्टफोनच्या अंतर्गत नेटवर्क आणि सॉफ्टवेअरकडे.

हीच यादी पुढे नेत सहावं तंत्रज्ञान आहे फास्ट - फोरियर - ट्रान्सफॉर्म अल्गोरिदमचं. हे तंत्रज्ञान म्हणजे एक अतिशय क्लिष्ट गणिती सूत्र आहे.

ध्वनी, प्रकाश आणि रेडिओ लहरींसारख्या ॲनालॉग सिग्नल्सना संगणक समजू शकेल आणि त्यावर प्रक्रिया करू शकेल अशा डिजीटल सिग्नल्स मध्ये परावर्तीत करण्याचं काम हा फास्ट - फोरियर - ट्रान्सफॉर्म अल्गोरिदम करतो.

सातवं तंत्रज्ञान जे स्मार्टफोन बनण्यासाठी अनिवार्य होतं ते म्हणजे तुम्हा सगळ्यांनाच माहित असलेलं इंटरनेट. इंटरनेटशिवाय स्मार्टफोन स्मार्ट होऊच शकत नाही.

स्मार्टफोन्स

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, स्मार्टफोन्स

आठव्या तंत्रज्ञानामुळे अतिशय क्लिष्ट आणि गुंतागुंतीचं इंटरनेट वापरायला अगदी सोप्पं आणि सहज झालं. हे तंत्रज्ञान म्हणजे एचटीटीपी आणि एटीएमएल.

या अनुक्रमे कोडिंगच्या भाषा आणि प्रोटोकॉल आहेत. या तंत्रज्ञानामुळेच इंटरनेट वर्ल्ड वाईड वेबच्या सोप्प्या स्वरूपात आणता आलं जेणेकरून सामान्य माणसांना त्याचा सहज वापर करता येईल.

नववं तंत्रज्ञान आहे सेल्युलर नेटवर्क. सेल्युलर नेटवर्क शिवाय स्मार्टफोन स्मार्ट असणं तर दूर साधा फोनही होऊ शकला नसता. कारण मोबाईल म्हटलं की त्याला नेटवर्क असणं ही पहिली अट असते.

दहावं तंत्रज्ञान आहे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम म्हणजेच जीपीएसचं. अकरावा तांत्रिक आविष्कार म्हणजे टच स्क्रीनचा आणि शेवटचा बारावा आहे तो सिरी म्हणजेच आवाजावरून मदत पुरवणारा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या रुपातील स्वयंचलित मदतगार.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स

फोटो स्रोत, Getty Images

कुठलाही आयफोन किंबहुना स्मार्टफोन हे 12 तंत्रज्ञान विकसित झाल्याशिवाय बनूच शकत नाही. मारियानं आयफोन बनवण्यासाठी अनिवार्य असलेल्या या बारा तंत्रज्ञानाची यादी बनवली आणि हे तंत्रज्ञान कसे विकसित झाले, याचा इतिहासात जाऊन शोध घेतला.

हा शोध घेतल्यानंतर एक आश्चर्यकारक खुलासा तिला झाला. तो म्हणजे आयफोन बनवण्यामागे सर्वात मोठा हात स्टीव्ह जॉब्सचा नव्हे तर अंकल सॅमचा आहे.

आयफोन बनवण्यात महत्वाचे ठरलेले हे सगळे बारा तंत्रज्ञान स्टीव्ह जॉब्स अथवा तत्सम खासगी उद्योजक / तंत्रज्ञाने नव्हे तर सरकारने ते ही अमेरिकन सरकारनं विकसित केलेले आहे

आयफोन-12

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आयफोन-12

आता यातले काही तंत्रज्ञान हे सर्वश्रुत आहेत. त्यामुळे ते ॲपलने विकसित केलेले नसावेत, याची लोकांना कल्पना आहे. कारण आयफोन येण्याआधीपासून हे तंत्रज्ञान अस्तित्वात होते. उदाहरणार्थ वर्ल्ड वाईड वेब.

वर्ल्ड वाईड वेबच्या निर्मितीचं श्रेय टिम बर्नर्स - ली या शास्त्रज्ञाला जातं. सर्न (CERN) या भौतिकशास्त्रावरील संशोधन संस्थेत सॉफ्टवेअर अभियंता म्हणून तो कामाला होता. सर्न ही युरोपातील जिनिव्हा इथे वसलेली संशोधन संस्था युरोपातील वेगवेगळ्या देशांनी दिलेल्या सरकारी निधीतून उभा राहिलेली आहे.‌

खुद्द इंटरनेट देखील अमेरिकन सरकारच्या संरक्षण मंत्रालयानं पुरवलेल्या निधीतून जन्माला आलं. The Advanced Research Projects Agency Network (ARPANET) हे अनेक संगणकांंना जोडून तयार केलं गेलेलं जगातील पहिलं जाळं होतं. हा अमेरिकेच्या संरक्षण विभागाचाच प्रकल्प होता.

1969 ते 1990 या काळात हा प्रकल्प कार्यरत होता. सुरुवातीच्या काळात हे लष्करानं विकसित केलेलं तंत्रज्ञान फक्त सुरक्षा यंत्रणाच वापरत असतं. विशेषतः या काळात पेटलेल्या शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन सरकारनं हे इंटरनेटचं जाळं निर्माण आणि विकसित केलं. त्यावेळच्या सोव्हियत रशियाविरोधात छुप्या युद्धनीतींमध्ये या तंत्रज्ञानाचा अमेरिकेनं वापर केला.

एकदा शीतयुद्ध संपल्यानंतर 1990 च्या दशकात मग हे तंत्रज्ञान सामान्य लोकांसाठी उपलब्ध व्हायला सुरुवात झाली. जीपीएस तंत्रज्ञानाच्या उगमाची कथा देखील अगदी तंतोतंत अशीच आहे. हे तंत्रज्ञान सुद्धा अमेरिकन लष्करानं विकसित केलं आणि शीतयुद्धात सोव्हियत रशिया विरोधात युद्धनीती साठी वापरलं.

सुरुवातीच्या काळात जीपीएस वापरायचा अधिकार फक्त लष्कराला होता. शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर हे जीपीएसचं तंत्रज्ञान सामान्य लोकांसाठी खुलं करण्यात आलं.

टेक्नोलॉजी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अत्याधुनिक टेक्नोलॉजीमुळे जगाचा कायापालट झालाय

हे सगळे तंत्रज्ञान लोकप्रिय आहेत. त्यामुळे तुम्हाला यांच्याविषयी थोडीफार माहिती नक्कीच असेल. यादीतील पुढच्या तंत्रज्ञानाविषयी लोकांना फारशी माहिती नसली तरी स्मार्टफोन बनण्यासाठी ते तितकेच महत्त्वाचे आहेत.

इंटरनेटच्या आधी टेलिफोन, टेलिव्हिजन आणि ग्रामोफोन ही संवादाची व मनोरंजनाची साधनं होती. ती ॲनॉलॉग सिग्नलद्वारे चालायची. संगणक, आयफोन आणि नंतर स्मार्टफोननं हे सगळे सिग्नल डिजीटल झाले.

ॲनॉलॉग सिग्नल्सचं हे डिजीटलायझेशन फास्ट - फोरियर - ट्रान्सफॉर्म नावाच्या तंत्रज्ञानामुळे शक्य झालं. हे तंत्रज्ञान म्हणजे एक प्रकारचा अल्गोरिदम अथवा गणितीय सूत्र आहे. जॉन टुके नावाच्या गणित तज्ञानं अपघातानंच या अल्गोरिदमचा शोध लावला.

अमेरिकन लष्करासाठी तो एक विशिष्ट यंत्र बनवत असताना त्याला हा शोध लागला. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष केनेडी त्यावेळी शत्रूराष्ट्र सोव्हियत रशिया करत असलेल्या आण्विक चाचण्यांवर देखरेख ठेवण्यासाठी प्रयत्न करत होते. याचाच भाग म्हणून त्यांनी 1963 साली राष्ट्राध्यक्षांच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे प्रमुख बनून जॉन टुकेची नियुक्ती केली.

रशियाच्या आण्विक ताकदीचा अंदाज घेणारं यंत्र विकसित करण्याचे आदेश केनेडी यांनी या समितीला दिले होते. हे यंत्र विकसित करत असतानाच जॉन टुकेनं फास्ट - फोरियर - ट्रान्सफॉर्मचा शोध लावला. अमेरिकन लष्कराच्या आण्विक शस्त्रांच्या क्षेत्रात लागलेला हा शोध स्मार्टफोन बनवण्याच्या कामी आला.

तंत्रज्ञान

फोटो स्रोत, Getty Images

स्मार्टफोनला स्मार्ट बनवणारा आणखी एक महत्त्वाचा गुण किंवा वैशिष्ट्य म्हणजे टच स्क्रीन. इ ए जॉन्सन नावाच्या एका अभियंत्यानं टच स्क्रीन तंत्रज्ञानाचा शोध लावला. ब्रिटिश सरकारच्या रॉयल रडार इस्टॅब्लिशमेंट या संशोधन संस्थेत काम करत असताना त्यानं हे तंत्रज्ञान प्राथमिक स्वरूपात विकसित केलं.

प्राथमिक स्वरूपातील या तंत्रज्ञानाला आणखी विकसित करून त्याला मूर्त स्वरूप देण्याचं काम सुद्धा आणखी एका सरकारी संशोधन संस्थेनंच केलं‌. ही संस्था म्हणजे सर्न (CERN). पुन्ही तिचं संस्था जिने वर्ल्ड वाईड वेबची निर्मिती केली होती.

सुरुवातीच्या टप्प्यातील या मल्टी - टच तंत्रज्ञानाला मोठ्या आणि व्यावहारिक स्वरुपात आणण्याचं काम मग वेन वेस्टरमन आणि जॉन एलियास या दोन अमेरिकेतील डेवालेअर विद्यापीठातील संशोधकांनी पार पाडलं. या दोघांची मल्टी टच तंत्रज्ञानाची कंपनी मग ॲपलने विकत घेतली आणि हे तंत्रज्ञान हस्तगत केलं.

सुरूवातीच्या टप्प्यात तर हे तंत्रज्ञान इ ए जॉन्सननं सरकारी संस्थेनं पुरवलेल्या निधीतूनच उभारलं होतं. हे तंत्रज्ञान अंतिम टप्प्यात विकसित करण्याचं वेन वेस्टरमननं केलेलं कामही सरकारी निधीतूनच शक्य झालं. कारण वेन वेस्टरमनला या संशोधनासाठी अमेरिकन नॅशनल सायन्स फाऊंडेशन आणि सीआयएनी (अमेरिकन गुप्तचर यंत्रणा) पैसा पुरवला होता.

आता राहता राहिली गोष्ट ती सिरीची

साल 2000 मध्ये म्हणजे आयफोन येण्याच्या 7 वर्ष आधी डिफेन्स ॲडवान्सड रिसर्च प्रोजेक्ट्स एजन्सी या अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या विभागानं स्टॅनफोर्ड रिसर्च इन्स्टिट्यूटला एक तंत्रज्ञान विकसित करायला सांगितलं. त्यासाठी अमेरिकेच्या सरकारनं या संशोधन संस्थेला बक्कल पैसा देखील पुरवला.

लष्कराच्या दैनंदिन कारभारात सहाय्य करू शकेल असं एक आवाजावरून आदेशाचं पालन करू शकणारं स्वयंचलित यंत्र लष्कराला हवं होतं. अमेरिकन सरकारच्या आदेशावरून मग स्टॅनफोर्ड रिसर्च इन्स्टिट्यूटमधील संशोधकांनी असं यंत्र विकसित केलं.

या महत्वकांक्षी प्रकल्पात अमेरिकेतील 20 विद्यापीठांना सामील करून घेण्यात आलं. सिरीचं तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी पुढची अनेक वर्ष हे सगळे संशोधक झटले आणि शेवटी हे प्रयत्न फळाला आले‌. आवाजावरून आदेशाचं पालन करू शकेल असं यंत्र तयार झालं.

2007 साली हे संशोधन सार्वजनिक करण्यात आलं आणि व्यावहारिक पातळीवर त्याचा वापर सुरू झाला. त्यालाच आज आपण सिरी म्हणून ओळखतो.

2010 साली ॲपलनं या तंत्रज्ञानाचा मालकीहक्क विकत घेतला. यासाठी ॲपलला किती पैसे मोजावे लागले, याचा आकडा मात्र गुप्तच ठेवला गेला. त्यामुळे ही देवाणघेवाण काहीशी संदिग्ध म्हणून वादग्रस्त देखील ठरली. पण सिरीचा शोध लावण्यात ॲपलचं काही योगदान नव्हतं, हे मात्र उघडच आहे.

2007 साली हे संशोधन सार्वजनिक करण्यात आलं आणि व्यावहारिक पातळीवर त्याचा वापर सुरू झाला. त्यालाच आज आपण सिरी म्हणून ओळखतो.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सिरी म्हणजेच आवाजावरून मदत पुरवणारा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या रुपातील स्वयंचलित मदतगार.

हार्ड ड्राईव्ह, लिथियम आयन बॅटरी, लिक्वीड क्रिस्टल डिस्प्ले आणि सेमीकंडक्टर हे आयफोनच्या हार्डवेअरचा भाग आहेत. या सगळ्या तंत्रज्ञानाच्या विकासामागची गोष्ट देखील पुन्हा अशीच आहे. कोण्या हुशार वैज्ञानिकाचा महान शोध व खासगी - सरकारी क्षेत्राची भागिदारी यातून हे तंत्रज्ञान आकाराला आले. पण हे शोध लावण्यासाठी लागलेला सगळा खर्च हा सरकारने उचललेला होता.

बहुतांशी तर अमेरिकेच्या लष्कराचं भक्कम पाठबळ या सगळ्या तंत्रज्ञानाच्या विकासाला लाभलं होतं. आज अख्खी सिलीकॉन व्हॅली ही सेमीकंडक्टरवर उभी आहे. कारण सिलीकॉन व्हॅलीतील उद्योगांमध्ये ज्या काही वस्तू व सेवा पुरवल्या जातात त्या सगळ्या सेमीकंडक्टरनेच बनलेल्या आहेत. या सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधील प्राथमिक घटक पदार्थ हा सेमीकंडक्टर आहे.

स्मार्टफोनचं हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर बनवण्यासाठी सर्वात आधी इंटिग्रेटेड सर्किट ही प्राथमिक गोष्ट अनिवार्य असते. या इंटिग्रेटेड सर्किटवरच कुठल्याही स्मार्टफोनच्या सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचा डोलारा उभा राहतो. स्मार्टफोन मध्ये बसवाव्या लागणाऱ्या या इंटिग्रेटेड सर्किटचं तंत्रज्ञान फेअरचाईल्ड सेमीकंडक्टर या कंपनीनं विकसित केलं होतं.

ही कंपनी खासकरून तिच्या सुरुवातीच्या काळात अमेरिकेच्या लष्करासाठी मोठ्या प्रमाणावर उत्पादन करत असे. अमेरिकचं लष्कर हाच या कंपनीचा प्रमुख ग्राहक होता. अमेरिकन लष्करानं दिलेल्या पाठबळावरच ही कंपनी उभी राहिली व मोठी झाली. नंतर इंटिग्रेटेड सर्किटची निर्मिती करू शकली.

त्यामुळे आयफोनमधील इंटिग्रेटेड सर्किट ही सुद्धा पुन्हा त्या अर्थाने सरकारी देणंच आहे. आयफोनचा गाभा असलेल्या इंटिग्रेटेड सर्किटचा शोधही ॲपलनं लावलेला नाही. हे तंत्रज्ञान सुद्धा ॲपलनं आयतं दुसरीकडून विकत घेतलेलं आहे.

सिरीचं तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी पुढची अनेक वर्ष हे सगळे संशोधक झटले आणि शेवटी हे प्रयत्न फळाला आले‌.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सिरीचं तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी पुढची अनेक वर्ष हे सगळे संशोधक झटले आणि शेवटी हे प्रयत्न फळाला आले‌.

याचा अर्थ खुद्द आयफोनच अमेरिकेच्या लष्करानं बनवलाय, असा दावा मी करत नाहीये. किंवा सर्नने (CERN) फेसबुक आणि गूगल बनवलंय, असं म्हणणं देखील अतातायीपणा ठरेल.

आज ज्या तंत्रज्ञानांचा वापर आपण दैनंदिन जीवनात करत आहोत, ते तंत्रज्ञान विकसित करण्यात व सामान्य लोकांपर्यंत त्याचे फायदे पोहोचवण्यात खासगी क्षेत्राचाही निश्चितच महत्त्वाचा वाटा आहे. पण हे सुद्धा तितकंच खरं आहे की सरकारी पाठबळाशिवाय हे तंत्रज्ञान विकसित होणं शक्यच नव्हतं.

सरकारने गुंतवणूक केली, या संशोधनासाठी शास्त्रज्ञांना आर्थिक व संस्थात्मक रसद पुरवली म्हणून हे शोध लागू शकले. यात हा प्रकल्प फसून शोध न लागता लावलेले सगळे पैसे बुडण्याचा देखील धोका होता. सरकारने तो पत्कारला.

खासगी कंपनी अथवा एखाद्या उद्योजकानं तो पत्कारला नसता. कारण नफ्याची खात्री असल्याशिवाय खासगी क्षेत्र गुंतवणूक करत नाही. संशोधनात तर खचितच करत नाही. सरकार ते करू शकतं आणि करतं देखील. आज जगासमोर ज्या समस्या आणि आव्हानं आहेत त्यांची उत्तरं सौर उर्जा, पवनचक्क्या व जलविद्युत निर्मिती अशा अपारंपारिक उर्जा व बायो टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानात दडलेली आहेत.

या क्षेत्रात तांत्रिक संशोधन व विकास करायचा असल्यास मागचे जे काही शोध आपण लावलेले आहेत त्यामागे कुठली व्यवस्था व पद्धत कामी आली, हे कोणी विसरता कामा नये. एखादा उद्योजक कितीही हुशार आणि दूरदृष्टीचा असला तरी खासगी क्षेत्राची असलेली मर्यादा आणि सरकारी क्षेत्राच्या ताकदीकडे कानाडोळा करणं खचितच शहाणपणाचं ठरणार नाही.

स्टीव्ह जॉब्स हा अतिशय अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेला तंत्रज्ञ व उद्योजक होता

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, स्टीव्ह जॉब्स हा अतिशय अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेला तंत्रज्ञ व उद्योजक होता

स्टीव्ह जॉब्स हा अतिशय अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेला तंत्रज्ञ व उद्योजक होता, हे कोणी नाकारू शकत नाही. त्याने अतिशय महत्वाच्या व नवा पायंडा प्रस्थापित करणाऱ्या गोष्टी घडवून आणल्या. पिक्सरसारखा ॲनिमेशन स्टुडिओ ही स्टीव्ह जॉब्सच्याच डोक्यातून आलेली संकल्पना होती.

हा ॲनिमेशन स्टुडिओ उभारून त्याने चित्रपट निर्मितीची परिभाषाच बदलली. टॉय स्टोरी हा पिक्सर स्टुडिओनं बनवलेला पहिला ॲनिमेशन चित्रपट होता. या चित्रपटाने रचलेल्या पायंड्यावरच पुढे ॲनिमेटेड चित्रपटांचा एक वेगळा प्रवाहच सुरू झाला.

चित्रपटातील ॲनिमेशनच्या पारंपरिक मर्यादांवर मात करत पिक्सेलनं भविष्यातील ॲनिमेटेड चित्रपटांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. पिक्सेलची उभारणी करण्याचं श्रेय सर्वस्वी स्टीव्ह जॉब्सलाच जातं.

तंत्रज्ञान

फोटो स्रोत, Getty Images

पण म्हणून आयफोन किंवा स्मार्टफोन सुद्धा स्टीव्ह जॉब्सनेच बनवला, असा अतिरेकी दावा करणं योग्य होणार नाही. स्मार्टफोन बनवण्यासाठी लागणाऱ्या बहुतांश गोष्टी बनवण्याचं श्रेय योग्य त्या ठिकाणीच जायला हवं. दुसऱ्यांनी लावलेल्या शोधांचे फक्त मालकीहक्क विकत घेऊन त्यांना एकत्रित करत बनवली गेलेली ती एक वस्तू आहे.

एखाद्या खासगी उद्योजकाच्या उद्योगशीलतेचं कौतुक करताना वाहवत जात मूळ संशोधकांचं व त्यामागे उभ्या राहिलेल्या व्यवस्थेचं श्रेय नाकारत फक्त त्याला एकट्यालाच नायक म्हणून डोक्यावर घेणं हे फक्त अप्रामाणिकपणाच नव्हे तर बौद्धिक आळसाचं देखील लक्षण आहे.

भविष्यातही असे शोध लागत राहून आपलं जगणं आणखी सुखकर करायचं असेल तर हा अप्रमाणिकपणा आणि बौद्धिक आळस पाळणं आपल्याला समाज म्हणून खचितच परवडणारं नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)