आयफोन भिजल्यावर तांदळात ठेवून कोरडा करू नका, अ‍ॅपलचा सल्ला

अ‍ॅपल

फोटो स्रोत, Getty Images

तुमचा आयफोन भिजला तर तो वाळवायला तांदळाच्या पिशवीत किंवा बरणीत ठेवू नका, असा सल्ला ॲपलने दिलाय.

फोन वाळवण्याची ही पद्धत लोकांमध्ये लोकप्रिय असली तरी तज्ज्ञांनी असं न करण्याबाबत फार आधीपासून इशारा दिला. अनेक चाचण्यानंतर ही पद्धत फारशी उपयुक्त नसल्याचं त्यांनी सांगितलंय.

आता तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीने वापरकर्त्यांसाठी स्वतःच मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करत म्हटलंय की, धान्याच्या सूक्ष्म कणांमुळे त्यांच्या उपकरणांचं नुकसान होऊ शकतं.

आत शिरलेला द्रव पदार्थ बाहेर काढण्यासाठी लोकांनी फोनला ज्या बाजूने वायर कनेक्ट केली जाते ती बाजू खालच्या दिशेने धरावी आणि फोनवर हलकेच टॅप करावं आणि नंतर फोन सुकवण्यासाठी ठेवून द्यावा.

दिवसेंदिवस स्मार्टफोन्स अत्याधुनिक होत असूनही, तो पाण्यात पडल्यावर त्यावर उपाय म्हणून वापरल्या जाणाऱ्या लोकप्रिय पद्धती या योग्य नाहीत.

ॲपलने वापरकर्त्यांना अशा काही पद्धतींपासून लांब नेण्याचा प्रयत्न केलाय.

तांदळाच्या पिशव्याचा वापर टाळण्यासोबतच, “बाह्य उष्णता स्रोत किंवा कॉम्प्रेस्ड हवे”चा वापर करून म्हणजेच रेडिएटर्स आणि हेअर ड्रायर वापर करून ओला फोन कोरडा न करण्याचा सल्ला देखील त्यांनी दिलाय.

एवढंच नव्हे तर वापरकर्त्यांनी त्यांच्या फोनमध्ये “कापसाचा बोळा किंवा किंवा पेपर नॅपकिन यांसारख्या वस्तू देखील” टाकण्याचा प्रयत्न करू नये असं म्हटलंय.

त्याऐवजी लोकांनी त्यांचा फोन चार्जरशी पुन्हा कनेक्ट करण्यापूर्वी “हवा खेळती असलेल्या कोरड्या जागी” ठेवून द्यावा," असं अॅपलने सांगितलं आहे.

अ‍ॅप्पल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अ‍ॅपल

नवीन डिझाइननुसार हवी नवी पद्धत

मॅकवर्ल्ड वेबसाईटने सांगितले की स्मार्टफोनच्या बदलत्या डिझाइन विचारात घेता भविष्यात असे सर्व सल्ले अनावश्यक असतील.

कारण उपकरणंसुद्धा हाताच्या ओलाव्यासोबत स्वत:ला जास्तीत जास्त प्रमाणात जुळवून घ्यायचा प्रयत्न करू लागली आहेत.

ॲपलची आयफोन 12 पासूनची पुढील सर्व उपकरणं पाण्यात सहा मीटर खोलीपर्यंत आणि अर्ध्या तासापर्यंत भिजण्यास सक्षम आहेत.

परंतु रोजच्या जगण्याच्या खर्चात वाढ होण्याची भीती असल्याने जागतिक पातळीवर सेकंड-हँड मोबाइलच्या मार्केटमध्ये वाढ होतेय, त्यामुळे ओल्या झालेल्या स्मार्टफोनचं नेमकं काय करायचं याबाबत अनेकांना काय करावं आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शनाची आवश्यकता भासणार आहे.