वारिस पंजाब दे : अमृतपाल सिंह-दीप सिद्धूला जोडणारा दुवा, जाणून घ्या या कनेक्शनबद्दल

    • Author, अवतार सिंह
    • Role, बीबीसी पंजाबीसाठी

गेल्या अनेक महिन्यांपासून शीख नेता अमृतपाल सिंग चर्चेचा विषय ठरला आहे. त्याने वेगळ्या खलिस्तानची मागणी केली आहे त्यामुळे त्याच्यावर टीका होत आहे.

अमृतपाल सिंग 'वारिस पंजाब दे' या संस्थेचा प्रमुख आहे. ही संस्था अभिनेता आणि कार्यकर्ता दीप सिद्घूने स्थापन केली होती. शेतकरी आंदोलनाच्यावेळी ती चर्चेत आली होती.

पंजाब पोलीस 18 मार्चपासून अमृतपाल सिंग आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या शोधात आहे. गेल्या महिन्यापासून तो राष्ट्रीय चर्चेचा विषय झाला आहे. तो आणि त्याच्या साथीदाराने अमृतसरच्या अजनाला पोलीस स्टेशवनर हल्ला केला करून त्याच्या साथीदाराला पोलीस कोठडीतून सोडवण्याची मागणी केली होती.

त्यांनी अनेक तास पोलीस स्टेशन ताब्यात घेतलं होतं. पोलीस हतबलपणे ही सगळी परिस्थिती पाहत होते आणि शेवटी त्याच्या साथीदाराला सोडण्यात आलं.

अमृतपाल सिंह दुबईत होता. तिथे दहा वर्षं राहिल्यावर तो अमृतसरला गेल्यावर्षी परतला. त्याने 'अमृत संचार' ही चळवळ सुरू केली. शीख धर्माची दीक्षा देण्यासाठी त्याने ही प्रथा सुरू केली. शीख धर्माचं योग्य पद्धतीने पालन व्हावं यासाठी त्याने ही चळवळ सुरू केली. तसंच त्याने ड्रग विरोधातही मोहीम सुरू केली.

'वारिस पंजाब दे' संस्थेची स्थापना कशी झाली?

जेव्हा पंजाब आणि इतर राज्यातले शेतकरी शेती कायद्याच्या विरोधात दिल्लीत आंदोलन करत होते तेव्हा अभिनेता आणि कार्यकर्ता दीप सिद्धू उर्फ संदीप सिंग या चळवळीत सक्रिय कार्यकर्ता होता.

“ही लढाई आमच्या पिकांसाठी नाही तर आमच्या भविष्यातील पिढ्यांसाठी आहे.”

राज्याला जास्त अधिकार मिळावे अशी त्याची मुख्य मागणी होती.

अजयपाल सिंग त्याकाळी दीप सिद्धूबरोबर होते.

ते म्हणतात , “जेव्हा शेतकरी आंदोलन सुरू होतं तेव्हा त्याला पंजाब आणि शेती क्षेत्रात काम करायचं होतं. तसंच त्याला पंजाबच्या उद्योगक्षेत्रातही काम करायचं होतं. पंजाबच्या उद्योगधंद्यावरही त्याला काम करायचं होतं. जेव्हा शेतकरी आंदोलन संपलं तेव्हा आमचे मार्ग वेगळे झाले. पण दीप सिद्धूने त्याच्या संस्थेचं काम सुरू ठेवलं.”

राजकीय विश्लेषक आणि माजी कार्यकर्ता मलविंदर सिंग माली सांगतात, “दीप सिद्धूने जेव्हा या संस्थेची घोषणा केली तेव्हा ही संस्था अराजकीय असल्याचं म्हणाले. शीख समुदायामध्ये शिक्षणाला प्रोत्साहन देणं, शीख धर्माचा प्रचार करणं, शीख तत्त्वज्ञानाचा प्रसार करणं, चांगल्या आरोग्यासाठी तरुणांना जिमसाठी पाठवणं हे या संस्थेचं उद्दिष्ट होतं. आपण निवडणुकीत सहभाग घेणार नाही असं तो त्यावेळी म्हणाला होता.”

मात्र त्याने 2022 मध्ये झालेल्या निवडणुकीत अमरगढ विधानसभा मतदारसंघातून सिमरजित सिंग मान यांना पाठिंबा दिला होता असंही ते पुढे सांगतात. मान यांचा या निवडणुकीत पराभव झाला.

15 फेब्रुवारी 2022 ला 37 वर्षीय दीप सिद्धूचा कार अपघातात मृत्यू झाला.

दीप सिद्धू जेव्हा सक्रिय होता, तेव्हा अमृतपाल सिंग त्याच्या नातेवाईकाच्या कंपनीत दुबईला कामाला होता. ते दोघं एकमेकांशी सातत्याने संपर्कात होते. तेव्हा अमृतपालने दाढी ठेवली नव्हती.

ऑगस्ट 2022 मध्ये अमृतपाल सिंग भारतात परत आला. जेव्हा तो भारतात आला तेव्हा त्याचं रुपडं पालटलं. त्याने दाढी ठेवली. एका कट्टर शीख व्यक्तीसारखे त्याने केस आणि दाढी वाढवली. त्याने शीख धर्माची दीक्षा घेतली. शीख धर्माची तत्त्वं आचरण्यात आणण्याची त्याने प्रतिज्ञा केली.

सप्टेंबर 2022 मध्ये जर्नैल सिंह भिंद्रनवाले यांच्या गावात झालेल्या एका कार्यक्रमात अमृतपाल सिंहला वारिस पंजाब दे संघटनेचा प्रमुख करण्यात आलं. त्या दिवशी या संघटनेची वर्षपूर्ती झाली होती.

दीप सिद्धू आणि अमृतपाल सिंह यांच्यात मुख्य फरक हा आहे की, अमृतपाल खलिस्तानची मागणी करतो. दीप सिद्धूने ही मागणी कधीही केली नव्हती.

दीप सिद्धूने राज्यांना जास्त अधिकार देण्याची मागणी केली होती. जर्नैल सिंह भिंद्रनवाले त्याचा आदर्श असल्याचा तो म्हणायचा.

26 जानेवारी 2021 ला जेव्हा लाल किल्ल्यावर हिंसाचार झाला तेव्ह दीप सिद्धूने लाल किल्ल्याच्या एका ध्वजस्तंभावर शीखांचा ध्वज फडकावला होता. त्यानंतर पोलीस आणि निदर्शकांमध्ये झटापट झाली होती. या घटनेनंतर फेब्रुवारी 2021 मध्ये त्याला अटक करण्यात आली होती.

काही आठवड्यानंतर त्याला जामीन मिळाला आणि तो सामाजिक आणि राजकीय चळवळीत पुन्हा एकदा सक्रिय झाला होता.

अमृतपाल सिंहचा उदय

अमृतपाल सिंहचा जन्म अमृतसर मधील जल्लू खेरा भागात झाला होता. त्याचं शिक्षण ग्रामीण भागात झालं आणि लहान वयातच तो त्याच्या काकाच्या कंपनीत काम करायला दुबईला गेला. तो मागच्या वर्षी भारतात परतला आणि त्याचा मागच्या महिन्यात विवाहबद्ध झाला.

दुबईहून परत आल्यावर त्याने तरुणांना शीख धर्माची दीक्षा देण्याचं काम सुरू केलं आणि तो ड्रग्सविरोधी मोहीमही चालवतो. मात्र त्याच्यावर अनेक आरोपही आहेत. शीख लोकांचं ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करतात म्हणून त्याने ख्रिश्चन धर्मगुरूंच्या विरोधात भाषणं केली. खलिस्तानची मागणी केल्यामुळे काही तरुण त्याला पाठिंबा द्यायला आले खरे पण त्यांची संख्या मोठ्य़ा प्रमाणात नाही.

एका तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी काही आठवड्यांपूर्वी त्याच्यावर FIR दाखल करण्यात आला. अमृतपाल सिंहने हा आरोप फेटाळून लावला तरी त्याच्या एका साथीदाराला अटक करण्यात आली होती. त्यानंतर अजनाला प्रकरण झालं. त्याने त्याच्या कार्यकर्त्यांबरोबर थेट पोलीस स्टेशनवर हल्ला चढवला आणि त्याच्या साथीदाराला सोडण्याची मागणी केली.

तरुण 'वारिस पंजाब दे' संघटनेकडे जातात याची कारणं अद्याप स्पष्ट झालेली नाही. पंजाबमध्ये 1980 आणि 90 च्या दशकात प्रचंड प्रमाणात हिंसाचार उफाळून आला होता. ऑपरेशन ब्लू स्टार झालं. त्यानंतर इंदिरा गांधीची हत्या झाली. मग मोठ्या प्रमाणात शीखविरोधी दंगली उसळल्या. त्यानंतर तब्बल एक दशक तिथे हिंसाचार धगधगत राहिला. शीख तरुणांच्या या जखमा अद्यापही भरलेल्या नाहीत.

त्या काळातल्या कथा ऐकून तरुण मोठे झाले. अशा तरुणांना आपल्याकडे वळवण्यात अमृतपाल सिंह सारख्या तरुणांना सोपं असतं.

अमृतपाल सिंह अद्याप बेपत्ता आहेत. त्याच्या 150 साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे या संस्थेचं पुढे काय होणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)