बॉम्बच्या खोट्या धमक्यांचा भारतातील विमान प्रवासावर काय परिणाम होतो आहे?

भारत हा जगातील सर्वाधिक वेगानं विस्तारणाऱ्या हवाई वाहतूक बाजारपेठांपैकी एक आहे

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, भारत हा जगातील सर्वाधिक वेगानं विस्तारणाऱ्या हवाई वाहतूक बाजारपेठांपैकी एक आहे
    • Author, सौतिक बिस्वास
    • Role, बीबीसी न्यूज, भारत प्रतिनिधी

विमानात बॉम्ब असल्याच्या खोट्या धमक्यांद्वारे भारतातील विमान कंपन्यांना लक्ष्य करण्याच्या घटनांमध्ये नाट्यमय आणि अभूतपूर्व वाढ झाल्यामुळे विमान उड्डाणांना आणि व्यवसायाला प्रचंड फटका बसतो आहे.

या अफवांमुळे विमानांच्या उड्डाणाचे मार्ग बदलावे लागत आहेत आणि त्यातून विमानांच्या उड्डाणांमध्ये मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो आहे. परिणामी हवाई वाहतूक क्षेत्रावर परिणाम होतो आहे.

गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या एका व्हीडिओमध्ये कॅनडातील इकॉलुएट या दुर्गम शहरातील थंड हवेत, एअर इंडियाच्या विमानाच्या बर्फाळ शिडीवरून वूलनचे कपडे घातलेले विमान प्रवासी खाली उतरताना दिसले होते.

211 प्रवाशांना घेऊन मुंबईहून शिकागोला जाणाऱ्या बोईंग 777 विमानाला 15 ऑक्टोबरच्या पहाटे बॉम्ब असण्याची धमकी मिळाल्यामुळे मार्ग बदलावा लागला होता.

"आम्ही पहाटे 5 वाजतापासून 200 प्रवाशांबरोबर विमानतळावर अडकलो आहोत. इथे नेमकं काय होत आहे किंवा आम्ही पुढे काय करायचं याबद्दल आम्हाला काहीही माहीत नाही. आम्ही पूर्णपणे अडकलो आहोत," असं हरित सचदेव या एका विमान प्रवाशानं सोशल मीडियावर पोस्ट करताना म्हटलं होतं.

त्याचवेळी त्यानं विमानतळावरील कर्मचाऱ्यांच्या 'सौहार्दपूर्ण वर्तणुकीचं' कौतुक केलं होतं तर एअर इंडिया या सर्व गोंधळासंदर्भात प्रवाशांना माहिती देण्यात कुचराई करत असल्याचा आरोप केला होता.

हरित सचदेव यांच्या पोस्टमधून अज्ञात, दुर्गम ठिकाणी विमान वळवल्यामुळे त्यातील प्रवाशांमध्ये निर्माण झालेली निराशा आणि चिंता प्रकट झाली होती.

कित्येक तासांनंतर, कॅनडाच्या हवाई दलाच्या विमानानं या खोळंबलेल्या प्रवाशांना शिकागोला नेलं आणि त्यांची ही अग्नि-परीक्षा संपली.

एअर इंडियानं नंतर या घटनेला दुजोरा देताना सांगितलं होतं की "ऑनलाइन स्वरूपात सुरक्षिततेच्या धोक्याविषयी देण्यात आलेल्या माहितीमुळे," हे विमान कॅनडातील इकॉलुएट या शहरात वळवण्यात आलं होतं.

मात्र ही धमकी खोटी होती. भारतातील विमान कंपन्यांना लक्ष्य करत यावर्षी आतापर्यंत याच प्रकारच्या अनेक खोट्या धमक्या देण्यात आल्या आहेत. गेल्या एका आठवड्यातच अशा किमान 90 धमक्या देण्यात आल्या होत्या.

याचा मोठा फटका विमानांच्या उड्डाणांवर झाला. त्यामुळे विमानांना इतर वळवावं लागलं होतं, उड्डाणं रद्द करावी लागली होती किंवा उड्डाणांना प्रचंड विलंब झाला.

बॉम्ब अफवांच्या संख्येत गंभीर वाढ

मागील काही वर्षांमधील अशा प्रकारच्या धमक्यांची संख्या लक्षात घेतल्यास या सर्व प्रकारांची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात येतं. 2014 ते 2017 दरम्यान विमानतळावरील अधिकाऱ्यांनी विमानतळावर बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या 120 खोट्या धमक्या नोंदवल्या आहेत.

यातील जवळपास निम्म्या खोट्या धमक्या दिल्ली आणि मुंबई या देशातील दोन सर्वात मोठ्या विमानतळांच्या बाबतीत होत्या. यातून गेल्या काही वर्षांमध्ये या प्रकारच्या धमक्यांची पुनरावृत्ती अधोरेखित होते.

सप्टेंबर महिन्यात फ्रॅंकफुर्टला जाणाऱ्या विस्तारा एअरलाईन्सच्या विमानाला बॉम्ब असल्याच्या धमकीमुळे तुर्कीकडे वळवावं लागलं होतं

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सप्टेंबर महिन्यात फ्रॅंकफुर्टला जाणाऱ्या विस्तारा एअरलाईन्सच्या विमानाला बॉम्ब असल्याच्या धमकीमुळे तुर्कीकडे वळवावं लागलं होतं

मात्र यावर्षी तर यात कहरच झाला आहे. यंदाच्या वर्षी आतापर्यंत खोट्या बॉम्ब धमक्यांची जणू लाटच आली आहे आणि त्यामुळे खळबळ उडवून दिली आहे.

(इतर देशांमधील अशा प्रकारच्या घटनांची आकडेवारी सहज उपलब्ध नसल्यामुळे भारताच्या तुलनेत इतर देशांमधील स्थिती काय आहे हे जाणून घेता येणं कठीण आहे.)

या घटनांबद्दल केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री, किंजरापू राम मोहन नायडू म्हणाले की, "अलीकडच्या काळात भारतीय विमान कंपन्यांना लक्ष्य करून देशांतर्गंत आणि आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांमध्ये व्यत्यय निर्माण करणाऱ्या या घटनांमुळे मला प्रचंड चिंता वाटते आहे.

"अशा प्रकारची खोडसाळ आणि बेकायदेशीर कृत्ये घडणं ही अतिशय गंभीर चिंतेची बाब आहे. आपल्या हवाई उड्डाण क्षेत्राच्या सुरक्षितता, सुरक्षा आणि कामकाजी अखंडतेबाबत तडजोड करण्याच्या किंवा त्यात अडथळा निर्माण करण्याच्या या प्रयत्नांचा मी तीव्र निषेध करतो," नायडू म्हणाले.

नेमकं काय होतं आहे?

विमान कंपन्यांना लक्ष्य करण्यासाठी देण्यात येणाऱ्या बॉम्बच्या खोट्या धमक्यांचा संबंध अनेकदा वाईट हेतू, लक्ष वेधून घेणं, मानसिक आरोग्याच्या समस्या, व्यवसायात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न किंवा खोडसाळपणा करणे इत्यादी बाबींशी असतो, असं तज्ज्ञ सांगतात.

2018 मध्ये तर इंडोनेशियातील विमानात प्रवाशांनी बॉम्बबद्दल विनोद केल्यामुळे विमानाच्या उड्डाणात व्यत्यय आला होता. अगदी काही वेळा या घटनांमध्ये विमान प्रवाशीच या प्रकारांसाठी दोषी असल्याचं देखील आढळून आलं आहे.

गेल्या वर्षी बिहारमधील एका विमानतळावर चेक-इनची प्रक्रिया चुकल्यानंतर निराश झालेल्या एका प्रवाशानं असाच खोडसाळपणा केला होता. त्यानं स्पाईस जेटच्या विमानाला उड्डाणाला विलंब करण्यासाठी बॉम्ब असल्याची खोटी माहिती दिली होती.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

मागील काही वर्षांपासून भारतातील हवाईसेवा क्षेत्रात प्रचंड विस्तार होतो आहे. भारत ही जगातील सर्वाधिक वेगानं विस्तारणारी विमान वाहतूक बाजारपेठ आहे.

मात्र अशा प्रकारच्या खोट्या बॉम्ब माहितीमुळे किंवा अफवांमुळे या क्षेत्राला फटका बसतो आहे. या क्षेत्रावर त्याचा अत्यंत प्रतिकूल परिणाम होतो आहे.

नागरी उड्डाण मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्यावर्षी भारतात देशांतर्गंत विमान उड्डाणांमधून 15 कोटीहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला.

विमान कंपन्यांना आलेल्या बॉम्बच्या धमक्यांमुळे प्रवाशांची गैरसोय होते, तुर्की हून विस्तारा एअरलाईन्सच्या दुसऱ्या विमानात बसणारे प्रवासी इथे दिसत आहेत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, विमान कंपन्यांना आलेल्या बॉम्बच्या धमक्यांमुळे प्रवाशांची गैरसोय होते, तुर्की हून विस्तारा एअरलाईन्सच्या दुसऱ्या विमानात बसणारे प्रवासी इथे दिसत आहेत

देशातील 33 आंतरराष्ट्रीय विमानतळांसह 150 हून अधिक कार्यरत विमानतळांवर भारतात दररोज 3,000 हून अधिक विमानं येतात आणि जातात.

गेल्या आठवड्यात बॉम्बसंदर्भातील अफवा शिगेला पोहोचल्या असताना 14 ऑक्टोबरला भारतातील विमान कंपन्यांनी 4,84,263 प्रवाशांची वाहतूक केली. देशात एकाच दिवसात इतक्या प्रवाशांची वाहतूक करण्याचा हा एक विक्रम आहे.

सिरियम या सल्लागार कंपनीच्या रॉब मॉरीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात 700 हून कमी व्यावसायिक प्रवासी विमानं सेवेत आहेत. तर 1,700 हून अधिक विमानांच्या ऑर्डर प्रलंबित आहेत.

रॉब मॉरीस म्हणतात, "या सर्व गोष्टींमुळे भारत ही नक्कीच व्यावसायिक विमानांची सर्वात वेगानं विस्तारणारी बाजारपेठ होईल."

एखाद्या खोट्या धमकीचा काय परिणाम होतो?

एखाद्या विमान कंपनीवर बॉम्ब ठेवल्याच्या खोट्या धमकीचा किंवा अफवेचा होणारा परिणाम लक्षात घ्या.

बॉम्ब असल्याची धमकी किंवा माहिती मिळाल्यानंतर जर विमान आकाशात असेल तर त्याला लगेचच जवळच्या विमानतळाकडे न्यावं लागतं.

उदाहरणार्थ ज्याप्रमाणे गेल्या आठवड्यात कॅनडाला जाणाऱ्या एअर इंडियाला वळवावं लागलं होतं किंवा सप्टेंबरमध्ये मुंबईहून फ्रँकफुर्टला जाणाऱ्या विस्तारा एअरलाईन्सच्या विमानाला तुर्कीमध्ये उतरावं लागलं होतं.

धोक्याची माहिती दिलेल्या काही विमानांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी लढाऊ विमानांचाही वापर करावा लागतो.

उदाहरणार्थ हिथ्रोला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या बाबतीत नॉरहोकच्या वर असताना घडलं तसं किंवा गेल्या आठवड्यात सिंगापूरला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाच्या बाबतीत घडलं त्याप्रमाणे प्रवासी विमानाला एस्कॉर्ट करण्यासाठी लढाऊ विमानांचा देखील वापर करावा लागतो.

गेल्या वर्षी भारतात 15 कोटींहून अधिक प्रवाशांनी देशांतर्गंत विमान प्रवास केला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गेल्या वर्षी भारतात 15 कोटींहून अधिक प्रवाशांनी देशांतर्गंत विमान प्रवास केला
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

एकदा का विमान विमानतळावर उतरलं की प्रवासी विमानातून उतरतात. त्यानंतर विमानातील सर्व सामान, माल आणि खाद्यपदार्थांची कसून तपासणी केली जाते. या प्रक्रियेसाठी कित्येक तास लागू शकतात.

त्यामुळे अनेकदा जे कर्मचारी विमानात आधीपासून आहेत ते पुढे देखील त्यांचं काम सुरू ठेवू शकत नाही. कारण विमानातील पायलट असो किंवा इतर कर्मचारी असो त्यांच्या कामाचे तास ठरलेले असतात. त्या मर्यादेपेक्षा अधिक तास ते काम करू शकत नाही.

परिणामी विमानातील सर्व कर्मचाऱ्यांच्या जागी दुसऱ्या कर्मचाऱ्यांची व्यवस्था करावी लागते. यातून विमानाच्या उड्डाणास आणखी विलंब होतो. याबद्दल हवाई क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे काय आहे हे आपण पाहू.

"या सर्व गोष्टींसाठी, प्रक्रियेसाठी मोठा खर्च होतो आणि विमानतळांच्या नेटवर्कवर त्याचा नकारात्मक परिणाम होतो.

"नियोजित मार्गावरून इतरत्र वळवण्यात आलेल्या किंवा विलंब झालेल्या विमानामुळे खर्चात चांगलीच वाढ होते. कारण विमानतळावर उभे असलेल्या विमानामुळे विमान कंपनी महसूल कमावत नसते तर त्यांचा अतिरिक्त खर्च होत असतो. त्यामुळे ते विमान उड्डाण कंपनीसाठी पैसे गमावणारं ठरतं.

"विमान उड्डाणास विलंब झाल्याची परिणती उड्डाण रद्द होण्यात होते आणि त्याचा वेळापत्रकावर मोठा परिणाम होतो," असं सिद्धार्थ कपूर म्हणतात. ते हवाई वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.

बॉम्बच्या धमक्या देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर

सोशल मीडियावरील निनावी अकाउंटवरुन टाकण्यात येणाऱ्या बॉम्ब अफवांमध्ये नाट्यमयरित्या वाढ झाल्यामुळे यासाठी जबाबदार असणाऱ्या गुन्हेगारांची ओळख पटवणं कठीण आणि गुंतागुंतीचं झालं आहे.

अशी खोटी धमकी देण्यामागचं कारण किंवा हेतू अद्याप स्पष्ट झालेले नाहीत. त्याचबरोबर ही धमकी एखाद्या व्यक्तीनं दिली आहे की एखाद्या संघटनेनं दिली आहे की कोणीतरी याची नक्कल करत आहे याबद्दल देखील अद्याप स्पष्टता नाही.

गेल्या आठवड्यात भारतीय अधिकाऱ्यांनी एका 17 वर्षांच्या शाळा सोडलेल्या मुलाला अटक केली होती. त्यानं अशा खोट्या धमक्या देण्यासाठी एक सोशल मीडिया अकाउंट सुरू केलं होतं.

मात्र तो असं का करत होता, यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र त्याच्यामुळे चार विमान उड्डाणांना याचा फटका बसल्याचं म्हटलं जातं आहे. यातील तीन उड्डाणं आंतरराष्ट्रीय होती.

या चार उड्डाणांपैकी दोन उड्डाणांना विलंब झाला होता, एक विमान इतरत्र वळवावं लागलं होतं तर एक उड्डाण रद्द करावं लागलं होतं.

सोशल मीडिया

फोटो स्रोत, iStock

तपास अधिकाऱ्यांनी सोशल मीडियावरील या पोस्ट कुठून टाकण्यात आल्या याचा तपास करताना आयपी अॅड्रेस (IP addresses)चा शोध घेतला असता, काही पोस्टचा उगम लंडन आणि जर्मनीहून असल्याचा संशय त्यांना वाटतो आहे.

बॉम्ब असल्याच्या अशा खोट्या धमक्यांमागे कोण आहे याचा छडा लावणं हे एक मोठं आव्हान आहे. विमानतळांच्या सुरक्षेला धोका पोहोचवणं किंवा विमानांच्या उड्डाणांमध्ये व्यत्यय आणणं या प्रकारच्या गुन्ह्यांसाठी भारतीय कायद्यात जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे.

मात्र एखाद्या खोट्या धमकीसाठी किंवा बॉम्ब असल्याचा फसव्या कॉलसाठी ही शिक्षा खूपच कठोर आहे आणि कदाचित कायदेशीर बाबींमध्ये ती टिकू शकत नाही.

वृत्तांमधून असं दिसतं की सरकार अशा गुन्हेगारांचा समावेश नो-फ्लाय लिस्टमध्ये म्हणजे त्यांना विमान प्रवास करण्यास प्रतिबंध करण्याबरोबरच या गुन्ह्यांसाठी पाच वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद करणारे नवीन कायदे आणण्याचा देखील विचार करतं आहे.

शेवटी या खोट्या धमक्यांमुळे किंवा अफवांमुळे प्रवाशांमध्ये गंभीर स्वरूपाची चिंता निर्माण होऊ शकते. माझ्या काकूनं मला हे विचारण्यासाठी फोन केला की या प्रकारच्या धमक्या येत असताना तिनं तिकीट बुकिंग केलेल्या विमानातून प्रवास करावा का. "मी रेल्वेनं प्रवास करू का?" असं तिनं मला विचारलं. मी तिला सांगितलं की, "चिंता करू नकोस, विमानानंच प्रवास कर," असं विमान उड्डाण क्षेत्रातील एक सल्लागार म्हणाले. त्यांनी त्यांची ओळख लपवणं पसंत केलं.

विमानांमधील बॉम्बसंदर्भातील या खोट्या धमक्यांनी प्रवास, जीवन विस्कळीत होणं आणि भीती पसरणं सुरूच आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.