आता या 20 देशांमध्ये भारतीयांना मिळणार व्हिसामुक्त प्रवेश

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, GETTY IMAGES

इराणने भारतीय पर्यटकांच्या व्हिसा संदर्भात मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, इराणमध्ये जाणाऱ्या भारतीयांना आता व्हिसा घ्यावा लागणार नाही.

इराणच्या दूतावासाने याची घोषणा केली आहे, पण यासोबतच इराणने काही अटीही टाकल्या आहेत.

या अटीनुसार, केवळ 15 दिवसांच्या पर्यटनासाठी इराणमध्ये जाणाऱ्या भारतीयांना व्हिसा घेण्याची गरज नसेल. मात्र 15 दिवसानंतर तुम्हाला इराणमध्ये थांबता येणार नाही.

याशिवाय ही सेवा सहा महिन्यातून एकदाच घेता येईल. इराणने 4 फेब्रुवारीपासून भारतीयांसाठी व्हिसामुक्त प्रवेश सुरू केला आहे.

इराणने डिसेंबरमध्ये भारतासह 33 देशांसाठी व्हिसा मुक्त प्रवेश सुरू केला आहे. यामध्ये संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, इंडोनेशिया, जपान, सिंगापूर आणि मलेशिया या देशांचा समावेश आहे.

इराणने आणखी काय सांगितलं?

इराणच्या भारतातील दुतावासाने एक निवेदन प्रसिद्ध करत म्हटलंय की, जर कोणत्याही भारतीयाला सहा महिन्यांत एकापेक्षा जास्त वेळा इराणला जायचं असेल किंवा दुसऱ्या प्रकारच्या व्हिसाची गरज असेल तर त्याला दूतावासाकडून त्याची मंजुरी घ्यावी लागेल.

यासोबतच दूतावासाने स्पष्ट केलंय की, जे भारतीय नागरिक विमानाने इराणला जातात त्यांनाच व्हिसामुक्त प्रवेश लागू असेल.

गेल्या महिन्यात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराणला भेट दिली. यावेळी त्यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीर-अब्दुल्लायान यांची भेट घेतली.

या भेटी दरम्यान दोन्ही परराष्ट्र मंत्र्यांनी अनेक द्विपक्षीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा केली.

जागतिक पर्यटन संस्थेनुसार, 2022 सालात इराणमध्ये परदेशी पर्यटकांच्या संख्येत मागील वर्षाच्या तुलनेत 315 टक्के वाढ झाली आहे.

इराण

फोटो स्रोत, GETTY IMAGES

आकडेवारी सांगते की, 2022 मध्ये 41 लाख पर्यटकांनी इराणला भेट दिली होती. तर 2021 मध्ये त्यांची संख्या 9.9 लाख इतकी होती.

इराणच्या पर्यटन मंत्रालयाच्या फॉरेन टूरिझम मार्केटिंग अँड डेव्हलपमेंट ऑफिसचे प्रमुख मोस्लेम शोजाई यांनी सांगितलं की, 2023 मध्ये भारतातून येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत 'लक्षणीय वाढ' झाली आहे.

2023 च्या पहिल्या सहा महिन्यांत 31 हजार भारतीयांनी इराणला भेट दिली होती. आणि 2022 च्या तुलनेत ही संख्या 25 टक्क्यांनी जास्त होती.

शोजाई यांच्या म्हणण्यानुसार, इराणमध्ये येणारे बहुतेक परदेशी पर्यटक व्यवसाय, वैद्यकीय उपचार आणि तीर्थयात्रेसाठी येतात.

मलेशियानेही केली होती घोषणा

यापूर्वी मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी देखील अशीच घोषणा केली होती.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये केलेल्या या घोषणेनुसार, भारतीय नागरिक 1 डिसेंबरपासून व्हिसा न घेता मलेशियाला भेट देऊ शकतात आणि 30 दिवस राहू शकतात.

मात्र हा व्हिसा मुक्त प्रवेश किती दिवसांसाठी असेल याबाबत मलेशियाच्या पंतप्रधानांनी काहीही सांगितलेलं नाही.

मलेशिया

फोटो स्रोत, GETTY IMAGES

त्यांनी भारतासोबत चिनी नागरिकांनाही व्हिसा मुक्त प्रवेश देण्याची घोषणा केली होती. चीन आणि भारत हे मलेशियाचे अनुक्रमे चौथे आणि पाचवे मोठे व्यापारी भागीदार आहेत.

मलेशिया सरकारच्या आकडेवारीनुसार, 2023 च्या जानेवारी ते जून या महिन्यात भारतातून तब्बल 2.83 लाख पर्यटकांनी मलेशियाला भेट दिली होती. 2019 मध्ये याच कालावधीत भारतातून 3.54 लाख पर्यटक मलेशियाला गेले होते.

थायलंड आणि श्रीलंकेनेही पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतीयांना व्हिसा मुक्त प्रवेश दिला आहे.

व्हिसा

या देशांमध्ये मिळतो भारतीयांना व्हिसा शिवाय प्रवेश

आजच्या घडीला 20 देशांमध्ये प्रवेश करण्यासाठी भारतीय नागरिकांना व्हिसाची गरज पडत नाही. जर तुमच्याकडे पासपोर्ट असेल तर तुम्ही व्हिसाशिवाय या 20 देशांमध्ये जाऊ शकता.

याशिवाय परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार , 25 हून अधिक देशांमध्ये भारतीयांसाठी व्हिसा ऑन अरायव्हल ही सुविधा आहे.

गेल्या महिन्यात थायलंडनेही भारत आणि तैवानमधील पर्यटकांना सहा महिन्यांसाठी व्हिसा मुक्त प्रवेश देण्याची घोषणा केली होती. ही सुविधा यावर्षी 10 नोव्हेंबर ते 10 मे 2024 पर्यंत सुरू राहणार आहे.

इराण पासपोर्ट

फोटो स्रोत, GETTY IMAGES

थायलंडच्या पंतप्रधान श्रेथा थाविसिन म्हणाल्या होत्या की, "आम्ही भारतीय आणि तैवानच्या लोकांना व्हिसा मुक्त प्रवेश देऊ कारण तेथून बरेच लोक आमच्या देशाला भेट देण्यासाठी येतात."

त्याचप्रमाणे श्रीलंकेच्या मंत्रिमंडळाने भारत, चीन, रशिया, मलेशिया, जपान, इंडोनेशिया आणि थायलंडच्या नागरिकांना 31 मार्च 2024 पर्यंत व्हिसा मुक्त प्रवेश देण्यास मान्यता दिली आहे.

या सर्व देशांसोबत व्हिएतनाम देखील भारत आणि चीनच्या नागरिकांना व्हिसा मुक्त प्रवेश देण्याच्या विचारात आहे. सध्या जर्मनी, फ्रान्स, स्वीडन, इटली, स्पेन, डेन्मार्क आणि फिनलंड येथील नागरिकांना व्हिसा मुक्त प्रवेश दिला जातोय.

उर्वरित देशांसाठी ते 90 दिवसांच्या कालावधीसाठी ई-व्हिसा देतात.