पाकिस्तान विरुद्ध इराण: या 5 प्रश्नांच्या उत्तरामधून समजून घ्या संघर्ष

पाकिस्तान विरुद्ध इराण संघर्ष

फोटो स्रोत, IRIB

    • Author, आशय येडगे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

एकीकडे हमास-इस्रायल संघर्ष सुरू असताना आणखीन एका नवीन वादाला सुरुवात झालीय.

16 जानेवारीला इराणने पाकिस्तानच्या बलुचिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला केला आणि त्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्ताननेही 18 जानेवारीला इराणवर हल्ला केला.

या दोन्ही घटनांमुळे इराण विरुद्ध पाकिस्तान संघर्षाला सुरुवात झालीय. नेमका हा वाद कधी सुरू झाला?

इराण आणि पाकिस्तानमध्ये अशा कोणत्या दहशतवादी संघटना आहेत ज्यांच्या तळांवर हल्ले केल्याचा दावा केला गेलाय? आणि मुळात या संघर्षाची कारणं काय आहेत? याच प्रश्नांच्या उत्तरांचा हा आढावा.

1. नेमकं काय घडलं?

16 जानेवारीला इराणनं पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतावर क्षेपणास्त्र हल्ले केले. या हल्ल्यात दोन मुलं ठार झाली आणि तीन जण जखमी झाल्याचं पाकिस्तानने सांगितलं.

इराणच्या या कारवाईबद्दल स्पष्टीकरण देताना इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीर अब्दोल्लाहियन यांनी म्हटलं की, "पाकिस्तानच्या सामान्य नागरिकांवर आम्ही हा हल्ला केला नाही तर पाकिस्तानात राहून इराणमध्ये दहशतवादी हल्ले करणाऱ्यांच्या तळांवर आम्ही क्षेपणास्त्र डागली आहेत."

जैश-अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या ठिकाणांवर इराणने हल्ला केल्याचा दावा केला.

पाकिस्तान

त्यानंतर पाकिस्तानने या हल्ल्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात असा इशारा देत पाकिस्तानने इराणला व्यापारी चर्चेसाठी गेलेलं त्यांचं शिष्टमंडळ परत बोलवून घेतलं.

पाकिस्ताननं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयातील एका संबंधित वरिष्ठ अधिकार्‍याकडे निषेध नोंदवला.

इराणच्या हल्ल्यानंतर या दोन्ही देशांमधील तणाव वाढला आणि पाकिस्तानने गुरुवारी (18 जानेवारी) इराणच्या हद्दीत असणाऱ्या काही ठिकाणांवर हल्ले केले.

पाकिस्तानी लष्कराने दिलेल्या माहितीनुसार 'बलुचिस्तान लिबरेशन आर्मी' आणि 'बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट' या दोन संघटनांच्या लपण्याच्या ठिकाणांवर हे हल्ले करण्यात आले.

पाकिस्तानी नागरिकांना दहशतवादी हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असल्याचंही पाकिस्तानी लष्कराने सांगितलं.

पाकिस्तानी लष्कराच्या इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (Inter-Services Public Relations (ISPR) ने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी या ऑपरेशनला 'मर्ग-बार सर्मचार' असं नाव दिलंय.

या हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि इराणचे संबंध अधिक ताणले गेले असून आता त्या भागातील विविध दहशतवादी संघटना अधिक सक्रिय होऊ शकतात अशी माहिती तज्ज्ञांनी दिलीय.

2. पाकिस्तान विरुद्ध इराण हा वाद काय आहे?

पाकिस्तान आणि इराण यांच्यामध्ये 959 किलोमीटरची सीमारेषा आहे.

इराण हे शियाबहुल राष्ट्र आहे. इराण सरकारकडून सेस्तान-ओ-बलुचेस्तान प्रांतात राहणाऱ्या सुन्नी अल्पसंख्यांक समुदायासोबत भेदभाव केल्याची तक्रार सुन्नी समुदाय करत असतो. याच असंतोषातून 'जैश-उल-अदल' ही संघटना तयार झाली.

इराणच्या सेस्तान-ओ-बलुचेस्तान प्रांताला लागूनच पाकिस्तानातला बलुचिस्तान प्रांत आहे. त्यामुळे हा भाग संवेदनशील मानला जातो.

इराणने नेहमीच असा आरोप केलाय की पाकिस्तानने याच भागात इराण सरकारविरोधात काम करणाऱ्या दहशतवादी गटांना आश्रय दिला आहे.

त्यामुळे इराणने याआधीदेखील पाकिस्तानला लष्करी कारवाईचा इशारा दिलेला होता. पाकिस्तानने नेहमीच हे आरोप फेटाळून लावत दहशतवाद हा दोन्ही देशांचा सामायिक शत्रू असल्याचं म्हटलं होतं.

जैश अल-अदल

फोटो स्रोत, JEYSH ALADL

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

इराणच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने 18 जानेवारीला इराणच्या हद्दीत असलेल्या सेस्तान-ओ-बलुचेस्तान प्रांतातल्या काही दहशतवादी तळांवर हल्ला केल्याची माहिती दिली.

पाकिस्तानी लष्कराने या ऑपरेशनला ' 'मर्ग बार सर्मचार' असं नाव दिलंय.

आता पाकिस्तानचं असं म्हणणं आहे की "गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानी वंशाचे काही दहशतवादी इराणमध्ये राहून पाकिस्तानच्या विरोधात दहशतवादी कारवाया करत होते.

पाकिस्तानने इराणला वेळोवेळी हे दहशतवादी जिथे लपून बसले आहेत अशा ठिकाणांची माहिती दिली होती. मात्र इराणने त्यावर काहीही कारवाई केली नाही आणि म्हणून पाकिस्तानी लष्कराने हे ऑपरेशन राबवले.'

तर इराणच्या हद्दीत राहून पाकिस्तानात दहशतवादी कारवाया करणारे सर्मचार आणि पाकिस्तानच्या हद्दीत राहून इराणवर हल्ले करणारी 'जैश अल-अदल' या दोन्ही दहशतवादी संघटनांच्या तळांवर आधी इराण आणि नंतर पाकिस्तानने हल्ला केल्याचा दावा करण्यात आलाय.

इराण आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला असला तरी या दोन्ही देशांमध्ये होणार व्यापार, ऊर्जेची देवाणघेवाण यांच्यामुळे आधी हा तणाव कमी करण्याचे प्रयत्न केले गेले आहेत.

3. इराण विरुद्ध पाकिस्तान हा संघर्ष कधी सुरू झाला?

जैश-अल-अदल या दहशतवादी संघटनेकडून 2013 पासूनच इराणवर हल्ले केले जातात.

2013 ला त्यांनी केलेल्या हल्ल्यात इराणच्या लष्कराचे 14 जवान मारले गेले होते. त्यानंतर 2014 ला केलेल्या हल्ल्यात किमान पाच जवान मारले गेले.

26 एप्रिल 2017 ला इराणच्या मिरजावेहवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी जैश-अल-अदलने स्वीकारली होती. इराणने त्यावेळी या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानच्या सरकारची असल्याचा आरोप केलेला होता.

त्यानंतर 16 ऑक्टोबर 2018ला इराणी सुरक्षा दलाच्या 12 जणांचं अपहरण करण्यात आलं.

इराणच्या आग्नेय सीमेवरून हे अपहरण करण्यात आलं होतं आणि त्याची जबाबदारीदेखील जैश-अल-अदल ने घेतली होती. त्यानंतर पाकिस्तानी सुरक्षा बलाने अपहरण झालेल्या व्यक्तींची सुटका करण्यात मदत केली होती.

त्यानंतरही या संघटनेने इराणवर हल्ले केले आणि यातला सगळ्यात अलीकडचा हल्ला डिसेंबर 2023 मध्ये करण्यात आला.

इराणच्या सेस्तान-बलोचेस्तान प्रांतातल्या रस्क शहरावर हा हल्ला करण्यात आला होता आणि त्यात इराणच्या लष्कराचे 11 जवान मारले गेले होते.

4. पाकिस्तान-इराण संघर्षाचे काय परिणाम होऊ शकतात?

इराण आणि पाकिस्तानच्या मध्ये असणारा हा भाग आधीच संवेदनशील असल्याने वाढलेल्या लष्करी कारवाईमुळे त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

इराण रिव्होल्यूशनरी गार्डकडून या प्रदेशात स्वतःच वर्चस्व सिद्ध करण्यासाठी इतर देशांच्या हद्दीत जाऊन हल्ले करण्याची रणनीती वापरली जाते.

इराण विरुद्ध पाकिस्तान संघर्षामुळे या भागाचा प्रादेशिक समतोल ढासळू शकतो. दोन्ही देशांमधील भू-राजकीय स्पर्धा, अंतर्गत संघर्ष आणि दहशतवादाच्या विरोधातील लढ्यामुळे परिस्थिती अधिक अवघड होऊ शकते.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील या संघर्षाची दखल घेतली गेली आहे. इराणने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याची भारताने अप्रत्यक्षरित्या पाठराखण केल्याचं दिसत आहे.

हे दोन देशांमधील प्रकरण असलं तरी इराणने स्वरक्षणासाठी केलेली ही कारवाई आम्ही समजू शकतो, असं भारतीय परराष्ट्र मंत्रालायने म्हटलं आहे.

5. भारत आणि इतर देशांची भूमिका काय आहे ?

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी जारी केलेल्या प्रेसनोटमध्ये असं म्हटलंय की, "हा मुद्दा इराण आणि पाकिस्तान या देशांतील आहे.

भारताने यापूर्वीच दहशतवादविरोधात झिरो टॉलरन्सची भूमिका घेतली आहे. त्यामुळे एखाद्या देशाने स्वरक्षणासाठी केलेली कारवाई आम्ही समजू शकतो."

विशेषतः भारताने नेहमीच पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचे आरोप केले आहेत. त्यामुळे भारत-पाकिस्तान द्विपक्षीय चर्चाही अनेक वर्षांपासून स्थगित आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी इराण आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी तणाव वाढवणाऱ्या कारवाया टाळायला हव्यात अशी प्रतिक्रिया दिलीय. तर अमेरिकेने इराणने पाकिस्तान, इराक आणि सीरियावर केलेल्या हल्ल्यांचा निषेध केलाय.

हेही नक्की वाचा

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)