इराणने पाकिस्तानच्या ज्या भागात हल्ला केला त्या भागाचं महत्त्व आणि हल्ल्याचं खरं कारण

फोटो स्रोत, REUTERS
- Author, सहर बलोच
- Role, बीबीसी उर्दू
- Reporting from, इस्लामाबाद
इराणनं बलुचिस्तान प्रांतातील पंजगुर जिल्ह्यातील सब्ज कोह नावाच्या पाकिस्तानच्या सीमावर्ती भागातील गावावर अचानकपणे हल्ला केला.
पंजगुर हा बलुचिस्तानमधील विरळ लोकवस्तीचा भाग असून पंजगुर शहरापासून 90 किलोमीटर अंतरावर हा हल्ला झाला.
बीबीसी प्रतिनिधी मोहम्मद काझिम यांच्या मते, सब्ज-ए-कोह हा इराणच्या सीमेपासून 45 किलोमीटर अंतरावर असलेला भाग आहे.
पंजगुर येथील स्थानिक प्रशासनातील एका अधिकाऱ्यानं बीबीसीला सांगितलं की, "इथल्या लोकसंख्येमध्ये बहुसंख्य लोक बलुच जमातीचे असून ते पशुपालक आहेत. या प्रदेशात पर्वत आणि वाळवंट दोन्ही असल्यानं हा प्रदेश पार करणं कठीण आहे."
इराणची कृती बेजबाबदारच नाही तर यामुळे मध्यपूर्वेतील प्रादेशिक सुरक्षा देखील धोक्यात आणू शकते, असं तज्ज्ञांना वाटतं.
रात्री उशिरा दिलेल्या निवेदनात, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं या हल्ल्याचा निषेध करत 'गंभीर परिणाम' होण्याचा इशाराही दिला.
इराणनं सीरिया आणि इराकला लक्ष्य केल्याच्या एक दिवसानंतर हा क्षेपणास्त्र हल्ला झाला आहे.
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील जैश उल-अदलच्या तळांना लक्ष्य केलं, असं इराणी मीडियाचं म्हणणं आहे.
'ड्रोनसारखा आवाज'
पंजगुरमधील एकमेव प्रत्यक्षदर्शीनं बीबीसीला सांगितलं की, त्याने रात्री उशिरा हेलिकॉप्टर आणि 'ड्रोनसारखा आवाज' ऐकला. त्याला वाटलं की, जवळपास एखादं काम होत आहे.
"तोपर्यंत कोणत्याही प्रसारमाध्यमांनी याबाबतची बातमी दिली नव्हती," असं त्यानं सांगितलं.
पाकिस्तानच्या लष्करानं या घटनेवर अद्याप कोणतंही वक्तव्य जारी केलेलं नाहीये.
वादग्रस्त भाग
इराणमधील सेस्तान-ओ-बलुचेस्तान प्रांत आणि पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांत हे आपापल्या देशांमधील सर्वांत जास्त अस्थिर परिसर मानले जातात.

फोटो स्रोत, IRIB
स्तंभलेखक आणि सुरक्षा तज्ज्ञ जैघम खान म्हणतात की, "शिया-सुन्नी संघर्षाव्यतिरिक्त, दोन्ही बाजूंनी अनौपचारिक व्यापार किंवा अन्नपदार्थांची तस्करी होत असते. तसंच अंमली पदार्थांचा व्यापार आणि शस्त्रं सहज उपलब्ध आहेत."
"त्याचा परिणाम दोन्ही बाजूंनी सशस्त्र बंडखोर गट वाढण्यात झाला. सीमेच्या दोन्ही बाजूचे लोक स्वतःला मूलभूत गरजांपासून वंचित समजतात आणि त्यांच्या स्वतःच्या देशाच्या साधन संपत्तीमधून मोठा वाटा मागतात. या हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधला व्यापार ठप्प होईल. खरंतर हा व्यापार त्यांना दिलासा देणारा होता."
पाकिस्ताननं शिष्टमंडळाला परत बोलावलं
इराणच्या हल्ल्याचा प्रारंभिक परिणाम म्हणून, पाकिस्ताननं इराणच्या चबहार शहरात संयुक्त सीमा व्यापार समितीच्या बैठकीत भाग घेणार्या त्यांच्या प्रतिनिधी मंडळाला परत बोलावलं. ही समिती सीमापार व्यापाराबाबत विविध करारांवर स्वाक्षरी करणार होती.
पाक-इराण सीमेवर हिंसाचाराच्या घटना नवीन नाहीत.
पत्रकार अदनान अमीर यांच्या मते, "इराणनं 2013 मध्ये केच भागामध्ये ड्रोन/क्षेपणास्त्र हल्ला केला. स्थानिक पोलिसांनी 2016 मध्ये इराणी ड्रोन ताब्यात घेतले आणि 2017 मध्ये पाकिस्तानच्या हवाई दलाने इराणी ड्रोन पाडले होते."

फोटो स्रोत, AFP
जैश उल-अदल गट काय आहे?
जैश उल अदल हा एक सुन्नी-बलूच अतिरेकी गट आहे. जैश उल-अदलचा ढोबळ अर्थानं अनुवाद 'न्यायासाठीचं सैन्य' असा होतो. या गटाचं मूळ इराणच्या सेस्तान-बलुचेस्तान प्रांतात आढळतं.
हा गट बर्याचदा इराणी सैन्याला लक्ष्य करतो. तसंच आपण गरिबीग्रस्त इराणी प्रांतात इराणी वर्चस्वाविरोधात लढत असल्याचं म्हणतो.
इराणने 2009 मध्ये या गटाचा म्होरक्या अब्दोल मलेक रिगी याला अटक करून फाशीची शिक्षा दिली होती. त्याला 'राष्ट्रीय सुरक्षेविरुद्ध कृत्य' केल्याबद्दल दुबईहून विमानात अटक करण्यात आली होती.

फोटो स्रोत, JEYSH ALADL
इराणच्या मोस्ट वाँटेड अतिरेकी रिगीच्या अटकेत पाकिस्ताननं महत्त्वाची भूमिका बजावली होती. ज्याची 2010 मध्ये तेहरानमधील इस्लामाबादचे राजदूत मोहम्मद अब्बासी यांनी कबुली दिली होती.
इराणमधील सुन्नी-मुस्लिम लोकसंख्या अनेकदा शिया-बहुल इराणी सरकारकडून भेदभावाची तक्रार करत असते .
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताला बलुच फुटीरतावादी गटांच्या बंडखोर आंदोलनाचा सामना करावा लागत आहे.
राजकीय संकट
पाकिस्तान आपल्या बलुचिस्तान प्रांतात दहशतवाद्यांना लक्ष्य करत नसल्याची तक्रार इराणनं अनेकदा केली आहे.
जुलै 2023 मध्ये तेहरानच्या भेटीत, लष्करप्रमुख जनरल सय्यद असीम मुनीर यांनी इराणी अधिकाऱ्यांशी सीमेवरील हिंसाचार आणि दहशतवादाचा सामना करण्याविषयी चर्चा केली.
मात्र मंगळवारी रात्रीच्या इराणच्या हल्ल्यानंतर याचे गंभीर परिणाम होतील, असं पाकिस्ताननं म्हटलं आहे. इराणने पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील दहशतवादी तळावर हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

फोटो स्रोत, getty images
सुरक्षा तज्ज्ञ आमिर राणा म्हणतात, "हे एक मोठे राजकीय संकट आहे, जे शांत होण्यास थोडा वेळ लागेल. पण, पाकिस्तानला वाढवायला आवडणार नाही अशी ही गोष्ट आहे."
ते सांगतात, "दोन्ही देशांमधील सीमावर्ती भागात इराणच्या सततच्या कृतींवर पाकिस्ताननं भूतकाळातही कधीही प्रतिक्रिया दिली नाही. परराष्ट्र कार्यालयानं आधीच या समस्येकडे लक्ष दिलं आहे. पण आता चेंडू इराणच्या कोर्टात आहे. इराणला त्याची कृती बरोबर करायची आहे की नाही हे पाहायचं आहे."
पाकिस्तानवरील हल्ल्यावर भारत काय म्हणाला?
इराणने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याची भारताने अप्रत्यक्षरित्या पाठराखण केल्याचं दिसत आहे.
हे दोन देशांमधील प्रकरण असलं तरी इराणने स्वरक्षणासाठी केलेली ही कारवाई आम्ही समजू शकतो, असं भारतीय परराष्ट्र मंत्रालायने म्हटलं आहे.
"हा मुद्दा इराण आणि पाकिस्तान या देशांतील आहे. भारताने यापूर्वीच दहशतवादविरोधात झिरो टॉलरन्सची भूमिका घेतली आहे. त्यामुळे एखाद्या देशाने स्वरक्षणासाठी केलेली कारवाई आम्ही समजू शकतो," असं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी जारी केलेल्या प्रेसनोटमध्ये नमूद केलं आहे.
अनेक वर्षांपासून पाकिस्तान हा दहशतवादाला पाठबळ देत आहे, असं भारताचं ठाम मत आहे.
त्यामुळे भारत-पाकिस्तान द्विपक्षीय चर्चाही अनेक वर्षांपासून स्थगित आहे. भारताने अनेकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देतो, असा दावा केला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








