हमासने एका इस्रायली आईच्या डोळ्यासमोर तिच्या मुलीच्या डोक्यात गोळी घातली, फेसबुक लाईव्ह केलं

मायनला व्हॉलीबॉल खेळायला आवडत असे

फोटो स्रोत, FAMILY HANDOUT

फोटो कॅप्शन, मायनला व्हॉलीबॉल खेळायला आवडत असे
    • Author, अॅना फोस्टर
    • Role, बीबीसीच्या मध्यपूर्व प्रतिनिधी

(सूचना : या बातमीत दिलेले तपशील वाचकांना त्रासदायक वाटू शकतात.)

जेव्हा त्साची इदानला गाझाला नेलं जात होतं, तेव्हा त्यांचे हात त्यांच्या मुलीच्या रक्ताने माखले होते.

18 वर्षांच्या मायनला त्यांनी जेव्हा उचलून घेतलं, तेव्हा त्यांचे हात रक्ताने माखले होते. त्यांना ते हात धुण्याची देखील परवानगी दिली नव्हती. हमासच्या एका बंदुकधाऱ्याने कुटुंबीयांच्या डोळ्यांसमोर मयानची हत्या केली.

घराबाहेर स्फोटांचे आवाज येत होते. त्यामुळे त्यांची दोन लहान मुलं त्यांना बिलगून बसली होती. रक्ताने माखलेल्या हातांनीच त्यांनी मुलांना जवळ घेतलं.

हे कुटुंब कसं भयग्रस्त झालंय याविषयी हमासने फेसबुक लाईव्ह केलं आणि संपूर्ण जगाला दाखवलं.

इदान कुटुंबावर हमासचा हल्ला

त्साची यांच्या पत्नी गॅली इदान आज त्यांच्या घरापासून दूर आहेत. नाहल ओझ हे दक्षिण इस्रायलमध्ये असून 7 ऑक्टोबर रोजी हमासने इथे हल्ला चढवला होता.

आज गॅली आणि त्यांची मुलं किबुत्ज या समुदायात आधारासाठी राहिले आहेत. इथे त्यांची सर्व प्रकारची काळजी घेतली जाते आहे, पण हे त्यांचं घर नाहीये.

मायन चार वर्षांची असल्यापासून हे कुटुंब जिथं राहत होतं ते त्यांच्यासाठी घर होतं. याच घरात त्यांची इतर मुलं जन्माला आली, वाढली.

मायन आता वयात आली होती. तिचा स्वभाव थोडा लाजराबुजरा होता. तिने हल्ली हल्लीच ड्रायव्हिंग टेस्ट पास केली असल्याचं तिच्या शेजाऱ्यांनी सांगितलं. ती दिसायला ही खूप सुंदर होती. तिला वाचनाची आवड होती.

हत्येच्या चार दिवस आधी तिने वाढदिवसानिमित्त पुस्तके मागवली होती. मायनची आई गॅली सांगतात की, ती आता कायम 18 वर्षांची राहील.

झाडांच्या सावलीत बसलेल्या गॅली सांगतात की, त्यांना तो वाईट दिवस आठवायचाही नाहीये. हे आत्ताच घडलंय. पण त्या त्साची यांच्यासाठी उभ्या आहेत.

त्या म्हणतात की, "मला तो जिवंत परत हवा आहे."

रेड अलार्म ऐकून कुटुंब जागं झालं

7 ऑक्टोबरच्या त्या दिवशी रेड अलार्मने सर्वांना जाग आली. गाझाने रॉकेट डागल्याचा तो इशारा होता. आता पुढे काय करायचं सर्वांना माहिती होतं पण ती सकाळ वेगळीच होती.

गॅली सांगतात, "सतत गोळीबार सुरू होता. आम्हाला बाहेर जाऊन श्वासही घेता येत नव्हता. आम्ही आमच्या घराच्या सुरक्षित खोलीत स्वतःला कोंडून घेतलं होतं.

"त्साची आणि मी एकमेकांकडे पाहिलं आणि म्हणालो इथे सगळं ठीक वाटत नाहीये, कारण सगळीकडून भयानक आवाज येत होते."

इदान कुटुंब, मध्यभागी मायन

फोटो स्रोत, FAMILY HANDOUT

फोटो कॅप्शन, इदान कुटुंब, मध्यभागी मायन

त्या सांगतात की, "आपल्यावर हल्ला झाला आहे आणि मामाद मध्येच थांबा, असा एक मेसेज आम्हाला किबुत्झच्या अंतर्गत प्रणालीवर मिळाला. त्यांनी आम्हाला शांत राहायला सांगितलं कारण किबुत्झमध्ये अतिरेकी येण्याची भीती होती."

घराच्या बाहेर स्फोट कसा झाला याबाबत गॅली सांगतात की," स्फोट इतका भयानक होता की खिडक्यांच्या काचा फुटल्या. त्यांच्या घरात कोणीतरी शिरल्याचा आणि कुजबुजल्याचा आवाज त्यांना येऊ लागला. तेवढ्यात एक माणूस इंग्रजीत ओरडला, "वी डोंट शूट."

पण त्यांनी तसंच केलं.

त्या पुढे सांगतात, "त्साचीने दार घट्ट धरून ठेवलं होतं. पण दारावर कुलूप नसल्याने मुलं घाबरून आरडाओरडा करत होती. यामुळे खोलीत गोंधळ उडाला. अंधार पडला होता, पण मग मायनला काहीतरी सुचलं."

नाही नाही म्हणत गोळी मारली

त्या क्षणाचं वर्णन करताना गॅलीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्या सांगतात, "त्या लोकांना दरवाजा उघडता येत नव्हता. हे बघून मायनने उडी मारली आणि त्साचीला दरवाजा धरून ठेवण्यास मदत केली."

"ते लोक म्हणत होते 'आम्ही गोळी मारणार नाही', पण त्यांनी गोळी झाडली. तेवढ्यात त्साची ओरडले, कोणावर गोळी झाडली? ती मायन होती. ती त्यांच्या शेजारी पडली होती. त्यानंतर हमासच्या अतिरेक्यांना दरवाजा उघडण्यात यश आलं. त्यांनी आत येऊन लाईट सुरू केली.

"मायन रक्ताने माखली होती. मी तिला हात लावून पाहिलं तर तिच्या डोक्याला गोळी लागली होती आणि ती गंभीर जखमी होती. त्यांनी आम्हाला मामद मधून बाहेर पडायला सांगितलं. पण आम्ही मुलांना तिकडे बघू नका असं सांगितलं."

मायनची आई गॅली
फोटो कॅप्शन, मायनची आई गॅली

त्या सांगतात, "आमच्या घराजवळ युद्ध सुरू होतं आणि ते आत होते."

त्साची, गॅली आणि त्यांची दोन लहान मुलं, 11 वर्षांचा येल आणि नऊ वर्षांची शाचर जमिनीवर बसले होते. त्यांच्या आजूबाजूला गोळ्यांचा आवाज घुमत होता. त्यांच्या एका अपहरणकर्त्याने गॅली यांचा फोन उचलला, पासवर्ड विचारला आणि फेसबुकवर लाईव्ह सुरू केलं.

व्हीडिओ बघणं खूप त्रासदायक होतं. 26 मिनिटांपेक्षा जास्त वेळ सुरू असलेल्या या व्हिडिओ मध्ये हमासच्या रॉकेट हल्ल्यांचा आवाज येत होता. या आवाजाने कुटुंब घाबरलं होतं. गोळ्यांचा आवाज ऐकून मुलं अक्षरशः घाबरली होती, ती आई वडिलांना बिलगून रडत होती. तिथूनच काही मीटर अंतरावर मायनचा निष्प्राण देह पडला होता.

गॅली सांगतात, "मी भाग्यवान आहे की माझी मुलं इतकी धाडसी आहेत. त्यांनी अतिरेक्यांशी संवाद साधला, मला माहित नाही की त्यांनी ते कसं केलं. त्यांनी अतिरेक्यांना विचारलं की ते इथे कशासाठी आलेत? त्यांनी गोळीबार का केला? ते लोकांची हत्या का करतात? कदाचित यामुळेच आम्ही वाचलो."

वडिलांची असहायता

त्या सांगतात, "मी माझ्या मुलीला मरताना पाहिलं. तिच्या डोक्यात गोळी लागली आणि तिने माझ्या शेजारीच जीव सोडला. तिने नुकताच 18 वा वाढदिवस साजरा केला होता. घरात वाढदिवसाचे फुगे, शुभेच्छांचे कार्ड आणि रक्त सांडलंय."

अखेरीस, अतिरेक्यांनी त्साचीना उभं राहायला सांगितलं. त्यांचे हात पाठीमागे वायरने बांधले आणि त्यांना घेऊन गेले. मुलं त्या अतिरेक्यांवर ओरडत होती पण त्यांनी ऐकून घेतलं नाही.

गॅली यांची दुसरी मोठी मुलगी, शेरॉन, जी हल्ल्याच्या वेळी तेल अवीवमध्ये होती. ती आपल्या आईचं सांत्वन करत होती.

मायनची बहीण शेरॉन
फोटो कॅप्शन, मायनची बहीण शेरॉन

या हल्ल्यादरम्यान शेरॉनचं तिच्या वडिलांशी दूरध्वनीवरून बोलणं झालं होतं. ते म्हणाले होते, "शेरॉन, आम्ही अडचणीत आहोत, मी तुला नंतर कॉल करेन. आय लव्ह यू."

एवढं बोलून त्यांनी फोन ठेवला. ते शेवटचं एवढंच बोलले होते. गॅलीच्या मनात अजूनही नवऱ्याचे शब्द घोळत आहेत.

गॅली सांगतात, "तो घरातून बाहेर पडला तेव्हा मी त्याला म्हणाले, माझं तुझ्यावर प्रेम आहे, हिरो बनू नकोस, स्मार्ट बन. तुझी काळजी घे आणि माझ्याजवळ जिवंत परत ये. बस एवढंच. माझी इच्छा आहे की त्याने जिवंत परत यावं."

त्या म्हणतात, "त्साची आपल्या मुलीसाठी इथे हवा होता. मला त्याला मिठी मारायची आहे."

हमासने आतापर्यंत 200 हून अधिक लोकांना गाझामध्ये ओलिस ठेवलंय. यात संपूर्ण इस्रायल आणि जगभरातील कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत.

अपहरण झालेले लोक परत येण्याची आशा

गॅली सांगतात, "त्यांचे ध्येय काय आहे ते मला समजत नाही."

त्या म्हणतात, "त्यांना स्वतःला राक्षसी रुपात दाखवायचं आहे का? तुम्ही राक्षस आहात. तुम्ही आमच्या मुलांसाठी सर्वात वाईट स्वप्न आहात. तुम्ही एक दहशतवादी आहात. हे भयानक आहे, मला माहित नाही या जखमा कधी बऱ्या होतील. पण त्यांना नागरिकांना परत आणावे लागेल. त्यांना सर्वांना परत आणावं लागेल."

मायनची आई आणि बहीण-भाऊ
फोटो कॅप्शन, मायनची आई आणि बहीण-भाऊ

घरापासून फार दूर असलेल्या दुसर्‍या किबुत्झमध्ये, मायनची शवपेटी विसावली आहे.

तिच्या स्मरणार्थ रंगीबेरंगी फुलांचे हार आणि पुष्पगुच्छ घेऊन आलेल्या शेकडो लोकांना बसण्यासाठी पुरेशी जागा देखील तिथे नव्हती.

गॅली आपल्या मुलीच्या आठवणीत जमलेल्या लोकांशी संवाद साधत होत्या. त्यांनी आपल्या इतर मुलांना उराशी घट्ट धरून ठेवलं होतं.

शोकसभा
फोटो कॅप्शन, शोकसभा

अवघ्या 11 आणि 9 वर्षांच्या वयात, येल आणि शाचर यांनी इतकी भयानकता पाहिली की त्यांच्या चेहऱ्यावरील अश्रूंचे ओघळ अजूनही सुकलेले नाहीत. त्यांची बहीण जिवंत नाही आणि सांत्वन करायला वडील सुद्धा नाहीत.

त्‍साचीची उणीव सर्वत्र जाणवते. गॅली सांगतात, जगाला त्यांचं नाव कळावं अशी माझी इच्छा आहे. कोणतीही छोटी गोष्ट जी त्यांना सोडण्यात मदत करू शकते, त्या करण्यास तयार आहेत.

शोक व्यक्त करण्यासाठी आलेल्या अनेकांनी मायनचे फोटो असलेले टी-शर्ट घातले होते. त्यावर 'अपहरण केलेले वडील' आणि 'मारलेली मुलगी' हे शब्द दिसतात. मागे एक साधा आणि शक्तिशाली संदेश लिहिलेला दिसतो, "त्साचीला परत आणा."

या अकल्पनीय काळोख्या अंधारात त्यांच्या कुटुंबाला त्यांची गरज आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)