इस्रायल- हमास संघर्ष कधी संपेल? हमासने युद्ध गुन्हा केलाय? अशा 7 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं

फोटो स्रोत, EPA-EFE/REX/SHUTTERSTOCK
7 ऑक्टोबर रोजी हमासच्या बंदूकधाऱ्यांनी केलेला अभूतपूर्व हल्ला आणि त्यानंतर इस्रायलकडून होणारे प्रत्युत्तराचे हल्ले आणि गाझा पट्टीवर केलेलं आक्रमण यापासून जग अजूनही त्रस्त आहे.
हा संघर्ष, त्याचा परिणाम आणि तो कधी संपू शकतो याबद्दल आम्हाला तुमचे शेकडो प्रश्न मिळाले आहेत, अनेक लोक विचारतात की इतर देश युद्धात सामील होतील का?
सध्या या प्रदेशात असलेल्या आमच्या प्रतिनिधींनी अनेकांनी वारंवार विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरं खाली दिली आहेत.
1. या संघर्षामुळे तिसरं महायुद्ध होऊ शकते का?
युकेतील स्केलमेर्सडॅले मधील क्रेग जॉन्सन विचारतात की, जर इराण थेट संघर्षात सामील झाला तर तो अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांना थेट युद्धात सामील होण्यास प्रवृत्त करेल का?आणि यामुळे तिसरं महायुद्ध होऊ शकतं का?
आमचे आंतरराष्ट्रीय संपादक जेरेमी बोवेन दक्षिण इस्रायलमधून वार्तांकन करत आहेत, ते सांगतात की :
इराण किंवा त्याचा लेबनीज सहयोगी हिजबुल्लाह यांच्या हस्तक्षेपाच्या शक्यतेबद्दल विचारले असता, जो बायडेन यांनी 'माहीत नाही' असं उत्तर दिलं
अमेरिकेनं इराणला या युद्धापासून दूर राहण्याचा अतिशय ठाम संदेश देण्यासाठी भूमध्य समुद्राच्या पूर्वेकडे दोन विमानवाहू युद्धनौका तैनात केल्या आहेत.
ते असं म्हणतात की, जर कोणी हस्तक्षेप केला तर त्यांच्याविरुद्ध फक्त इस्रायलचेच नाही तर अमेरिकचं लष्करी सामर्थ्य असेल.
पश्चिम आशियामध्ये प्रमुख दोन गट आहेत एक अमेरिका आणि त्यांचे मित्र राष्ट्र आणि इराणी आणि त्यांचे गट हा असे दोन भागात विभागले.
दोन्ही बाजूंना धोक्याची जाणीव आहे, जर ते शीतयुद्धांकडून प्रत्यक्ष युद्धाकडे गेले तर जागतिक महत्त्व असलेला पश्चिम आशिया परिसर पेटेल.
2. इस्रायलचा उद्देश काय आहे?
स्कॉटिश बॉर्डर्समधील लूसियानो सिसी विचारतात: इस्रायलचं जमिनीवरील युद्धाचं एकूण उद्दिष्ट काय आहे?
दक्षिण इस्रायलमधील आमचे मुख्य आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी लायसे डौसेट म्हणतात, "मागील युद्धांमध्येच इस्रायलनं हमासवर जोरदार प्रहार करण्याची शपथ घेतली होती, हमासचं जमिनीखालील बोगद्यांचं विशाल नेटवर्क तर लक्ष्य केलचं पण त्यांची रॉकेट मारा करण्याची क्षमता इस्रायलनं नष्ट केली होती."
"पण ही वेळ वेगळी आहे. इस्रायलनं हमासचा नाश करण्याची शपथ घेतली आहे, इस्लामिक स्टेट गटाप्रमाणे या संघटनेचं नावचं त्यांना पुसून टाकायचं आहे.
इस्रायलकडे हमासच्या पायाभूत सुविधांना उद्ध्वस्त करण्याची, त्यांचे जमिनीखालील बोगदे नष्ट करण्यासोबत त्याच्या कमांड आणि कंट्रोल नेटवर्कला निष्क्रिय करण्याची लष्करी ताकद आहे."

फोटो स्रोत, EPA-EFE/REX/SHUTTERSTOCK
पण गाझामधील इस्रायलला किती माहिती आहे हे स्पष्ट नाही, ते कसली वाट पाहत आहेत. कारण इस्त्रायली सुरक्षेबद्दल आश्चर्यकारकपणे बारीकसारीक गोष्टी जाणून घेत त्यांच्या मजबूत संरक्षण व्यवस्थेला हमास भेदू शकलं, हमासच्या लष्करी पराक्रमामुळे इस्रायलींना धक्का बसला आहे.
हमासलाही याची कल्पना असणार की प्रत्युत्तरा दाखल इस्रायल कडून घातक हल्ला केला जाईल.
हमास संघटना ही पॅलेस्टिनी समाजात अंतर्भूत असलेली एक राजकीय आणि सामाजिक संघटना आहे, जी इस्लामिक स्टेट गटापेक्षा वेगळी आहे.
लष्करी हल्ल्यानं तेथिल काँक्रिट आणि धातू नष्ट करता येतील, पण ज्या कारणासाठी ते लढताहेत त्यासाठी मरण्याचा त्यांचा संकल्प दृढ होईल.
3. या हल्ल्यामागे हमासचा उद्देश काय होता?
यूकेमधील अँड्र्यू पार्कर विचारतात: हमासच्या सुरुवातीच्या हल्ल्याचं लक्ष्य काय होतं?
फ्रँक गार्डनर, आमचे सुरक्षा विषयाचे प्रतिनिधी सांगतात की, हमासचे प्रवक्ते मोहम्मद अल-देइफ यांनी त्यावेळी दिलेलं कारण असं होतं की 'आता बस झालं.'
त्यांनी म्हटलं की, गाझा आणि वेस्ट बँक या दोन्ही ठिकाणी इस्रायलींकडून पॅलेस्टिनींना चिथावणी दिल्यानं आणि सतत अपमानाला सामोरं जावं लागत असल्याने हमासने दिलेलं हे प्रत्युत्तर होतं.
विश्लेषकांचं याबाबत असं मत आहे की, इतर अघोषित कारणंही असू शकतात.
जसं की, हल्ल्यापूर्वी, इस्रायल आणि सौदी अरेबिया हे दोन्ही देश त्यांचे व्दिपक्षीय संबंध सामान्य करण्याच्या मार्गावर होते. याला हमास आणि त्याचा पाठीराखा इराण या दोघांनी विरोध केला होता. सौदीनं आता त्या चर्चेला स्थगिती दिली आहे.
पण त्यापेक्षाही यात बरंच काही असेल.
बेंजामिन नेतन्याहू यांच्या उजव्या विचारसरणीच्या सरकारनं सुरू केलेल्या न्यायिक सुधारणांमुळे इस्रायली समाजातील तीव्र फूट हमासच्या नेतृत्वाच्या लक्षात आली असेल. इस्रायलला एक वेदनादायक धक्का देण्याचे त्यांचं ध्येय होतं आणि त्यात ते यशस्वी झाले.
4. इजिप्त रफाह क्रॉसिंग बंद का ठेवत आहे?
यूकेमधील डायना या विचारताता की, मुस्लिम इस्लाममधील कुटुंबाची भावना आणि बंधुत्वाबद्दल बोलतात. इजिप्तमधील मुस्लिमांनी गाझाची सीमा बंद ठेवण्याचं समर्थन कसं करावं?
आमचे आंतरराष्ट्रीय संपादक जेरेमी बोवेन हे दक्षिण इस्रायलमधून वार्तांकन करत आहेत,ते सांगतात की,
इस्लामवर श्रद्धा आहे पण राष्ट्रीय सुरक्षेच्या राजकारणापुढे तो मुद्दा महत्वाचं ठरत नाही. मला खात्री आहे की लाखो इजिप्शियन मुस्लिमांना गाझामधील नागरिकांचं दुःख कमी करायचं आहे.
परंतु इजिप्शियन सरकार अगदी शांततेच्या काळात ही गाझामधून रफाह क्रॉसिंगद्वारे नियमित प्रवेशास परवानगी देत नाही.
2007 मध्ये हमासनं गाझा ताब्यात घेतल्यापासून इजिप्त हा इस्रायलच्या गाझा वेढ्याच्या प्रारंभीच्या काळातील कनिष्ठ सहयोगी आहे.
हमासची मुळं ही एक शतकापूर्वी इजिप्तमध्ये स्थापन झालेल्या मुस्लिम ब्रदरहूडमध्ये आहेत. ब्रदरहुडला इस्लामिक श्रद्धा आणि शिकवण या अनुषंगानं राज्य आणि समाज बदलायचा आहे.

फोटो स्रोत, EPA-EFE/REX/SHUTTERSTOCK
इजिप्शियन सैन्य या कृतीला विरोध करतं. त्यांनी 2013 मध्ये निवडून आलेल्या राष्ट्रपतींना मुस्लिम ब्रदरहूड संघटनेशी संबधावरुन पदच्युत केलं होतं. इजिप्तच्या सध्याच्या राजवटीचे हमासशी संबंध आहेत आणि भूतकाळात हमास आणि इस्रायल यांच्यातील तो दुवा होता. पण त्यांना पॅलेस्टिनी निर्वासितांचा ओघ नको आहे.
निर्वासितांना राहण्यासाठी 75 वर्षांनंतरही गाझामधील छावण्या अस्तित्वात आहेत. नव्यानं स्वतंत्र झालेल्या इस्रायलनं जबरदस्तीनं निर्वासितांना कधीही घर देऊ केलं नाही.
5. हमासनं युद्ध गुन्हा केला आहे का?
यूकेमधील सायमन विचारतात: जगानं पुतीन विरुद्ध आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट जारी केलं. हमासच्या नेतृत्वाविरुद्धही तशीच प्रतिक्रिया का आली नाही? हा मोठ्या प्रमाणावर युद्ध अपराध नव्हता का?
आमचे जागतिक घडामोडींचे प्रतिनिधी पॉल अॅडम्स यांनी उत्तर दिलं आहे ,
मागील अनेक वर्षांच्या संघर्षाच्या परिस्थिती असूनही, 7 ऑक्टोबरपूर्वी इस्रायलनं हमास विरुद्ध युद्ध करण्याचा विचार केला नाही. इस्रायलसाठी हे युद्ध नव्हतं तर त्याच्यांसाठी ते दहशतवादी कृत्य होतं.
बेंजामिन नेतन्याहू यांचं सरकार स्वतःच्या मार्गानं न्याय मिळवून देत आहे आणि या हत्याकांडासाठी जबाबदार मानल्या जाणार्या किमान दोन हमास कमांडरना आधीच ठार मारलं आहे. आणखी अनेकांना मारण्याचा प्रयत्न केला जाईल.
कतार आणि लेबनॉनमध्ये राहणाऱ्या हमास संघटनेच्या राजकीय नेतृत्वाबद्दल प्रश्न उद्भवू शकतात. कारण त्यातील काही जण म्हणतात की, इस्रायलमध्ये आक्रमण करण्याच्या लष्करी शाखेच्या योजनांबद्दल ते अनभिज्ञ होते.
संयुक्त राष्ट्र हवाई हल्ल्यांमध्ये हस्तक्षेप का करत नाही?
लंडनमधील सादुल हक विचारतात की, जर सर्वांनी मान्य केलं असेल की इस्रायल हा नागरिकांची हत्या करत आहे आणि या नवीन हल्ल्यांमध्ये बरंच जण मारले जावू शकतात.तर संयुक्त राष्ट्र आणि इतर देश हस्तक्षेप का करत नाहीत?
यावर आमचे परराष्ट्र नीती विषयाचे प्रतिनिधी जेम्स लँडले हे उत्तर देतात की, अनेक देश इस्रायलला आपले हवाई हल्ले थांबवण्याचा आग्रह करत नाहीत याचं मुख्य कारण म्हणजे ते हे मान्य करतात की देशावर हमासनं हल्ला केला आहे आणि त्यांना स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार आहे.

फोटो स्रोत, EPA-EFE/REX/SHUTTERSTOCK
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी सांगितलं की, "मी इस्रायली पंतप्रधानांसमवेत नागरिकांवर होणारा परिणाम शक्य तितका कमी करण्याची गरज मांडली आहे."
संयुक्त राष्ट्रानंही इस्रायलला नागरिकांची जीवितहानी टाळण्याचं आवाहन केलं आहे.
संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं: "आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदा आणि मानवाधिकार कायद्याचा आदर केला पाहिजे आणि त्याचं समर्थन केलं पाहिजे. नागरिकांचं संरक्षण केलं पाहिजे आणि त्यांचा कधीही ढाल म्हणून वापरलं जाऊ नये."
इस्रायलचा दावा आहे की त्यांची लढाऊ विमानं आणि तोफखाने गाझामधील हमासच्या लक्ष्यांवर हल्ला करत आहेत.
परंतु या हल्ल्यांमध्ये अनेक नागरिक ठार आणि जखमी होत आहेत.पॅलेस्टिनींचं असं म्हणणं आहे की इस्रायलचे हल्ले अतिरेकी आणि अविवेकी आहेत. इस्रायलचं म्हणणं आहे, हमास नागरिकांचा मानवी ढाल म्हणून वापर करतो.
6. इस्रायलला हमासच्या हल्ल्याची माहिती कशी नाही?
एक निनावी वाचक विचारतो की, हे कसं शक्य आहे की, हमास गाझामध्ये नेमकं कुठं आहे, हे जाणून घेण्यासाठी पुरेशी गुप्तचर आणि पाळत इस्रायली सैन्यानं ठेवली आहे. पण मग हमास इस्रायलवर हल्ला करणार आहे किंवा हल्ल्याची कोणताही इशारा किंवा माहिती त्यांच्याकडे कशी नव्हती?
जेरुसलेम मधील आमचे पश्चिम आशियाचे वार्ताहर योलांडे क्नेल्ल सांगतात की ,मागील काळात इस्रायलच्या सैन्यानं गाझावर पाळत ठेवण्यासाठीच आपलं नियंत्रण केंद्र पत्रकारांसाठी खुलं केलं होतं.
आणि हे स्पष्ट आहे की ड्रोन आणि इतर कॅमेऱ्यांद्वारे जमिनीवरील हालचालींबद्दल उत्कृष्ट आणि वास्तविक माहिती त्यांना आहे. त्यांना माहिती देणाऱ्यांचही मोठं नेटवर्क आहे.
प्रमुख अतिरेक्यांच्या ठावठिकाणाविषयी इस्रायलची माहिती किती अचूक असू शकते हे आम्ही मे महिन्यातील इस्लामिक जिहादशी लढताना त्यांना पाहिलं आहे.
ब्रीफिंगमध्ये, इस्रायली लष्करी अधिकारी कबूल करतात की जेव्हा हमासच्या अभूतपूर्व प्राणघातक हल्ल्याचा विचार केला जातो तेव्हा मोठ्या गुप्तचर आणि सुरक्षा त्रुटी होत्या.पण, आम्ही यावर विश्वास ठेऊ शकतो की त्यांच्याकडे हमासच्या लक्ष्यांची एक अचूक, लांबलचक यादी आहे. जी ते जमिनीवर उतरताच पुढे येईल.
7. हिजबुल्लाहची हमासशी तुलना कशी होते?
गाझा पट्टीपासून उत्तरेकडे असलेल्या लेबनॉन आणि इस्रायलमध्ये तणाव वाढत आहे. एका वाचकाला हे जाणून घ्यायचं आहे की, जर लेबनॉन युद्धात सामील झाला तर हमासच्या तुलनेत हिजबुल्लाह किती मोठी शक्ती आहे?
दक्षिण लेबनॉनमधून ह्यूगो बाचेगा वार्तांकन करत आहेत. ते सांगतात की,हिजबुल्ला ही एक लेबनीज लष्करी, राजकीय आणि सामाजिक चळवळ आहे. इस्रायलनं त्यांच्याकडे हमासपेक्षा अधिक शक्तिशाली गट म्हणून पाहिलं आहे.
सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजनुसार, हिजबुल्लाह या इराण-समर्थित आक्रमक सशस्त्र गटाकडे अंदाजे 130,000 रॉकेट आणि क्षेपणास्त्रं आहेत.
यातील बहुतेक शस्त्र ही लहान, मॅन-पोर्टेबल आणि जमीनीवरुन जमीनीवर कुठेही मारा करु शकतील अशा आर्टीलरी रॉकेटच्या स्वरुपात आहेत.
पण त्यात विमानविरोधी आणि जहाजविरोधी क्षेपणास्त्रं तसंच इस्रायलच्या आत दूरवर मारा करण्यास सक्षम मार्गदर्शित क्षेपणास्त्रांचाही समावेश आहे. हमासकडे जे काही आहे त्यापेक्षा त्यांच्याकडे खूपच अत्याधुनिक शस्त्र आहे.
हिजबुल्लाच्या नेत्यानं त्यांच्याकडे 100,000 लढवय्ये असल्याचा दावा केला आहे, तर काहीच्या मते अंदाज 20,000 ते 50,000 च्या दरम्यान हा आकडा असावा. हिजबुल्लाहचे बरेच लढवय्ये उत्तम प्रशिक्षित आहेत. आणि सीरियन गृहयुद्धात ते लढले आहेत.
इस्रायलच्या म्हणण्यानुसार, हमासकडे अंदाजे 30,000 सैनिक आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








