'पॅलेस्टिनीयन इस्लामिक जिहाद' ही संघटना काय आहे? हमास आणि या संघटनेत फरक काय?

इस्रायल

फोटो स्रोत, Getty Images

मंगळवारी (17 ऑक्टोबर) संध्याकाळी उशिरा गाझाच्या अल-अहली अरब हॉस्पिटलमध्ये स्फोट झाला आणि त्यात किमान 500 लोक मरण पावले.

इस्रायलने या स्फोटासाठी 'पॅलेस्टिनीयन इस्लामिक जिहाद' (पीआयजे) या अतिरेकी संघटनेला जबाबदार धरलं आहे, तर इतर अनेक देशांनी यासाठी हमासशिवाय इस्रायलला जबाबदार धरलंय.

इस्रायली सैन्याचा असा युक्तिवाद आहे की पीआयजेचं रॉकेट चुकीने फायर झाले आणि हॉस्पिटलवर पडले.

अमेरिकेने इस्रायलच्या दाव्याचं समर्थन केलंय.

बुधवारपासून जगभरातील बातम्यांमध्ये चर्चेत असलेल्या 'पॅलेस्टिनीयन इस्लामिक जिहाद' म्हणजेच 'पीआयजे' या संघटनेची ही कथा आहे.

'पॅलेस्टिनीयन इस्लामिक जिहाद' म्हणजे काय?

'पॅलेस्टिनीयन इस्लामिक जिहाद' हा गाझामधील हमासनंतरचा दुसरा सर्वात मोठा कट्टरतावादी गट आहे.

हा गट त्याच्या अत्यंत कट्टरवादी भूमिकेसाठी ओळखला जातो. गाझाबरोबरच वेस्ट बँकमध्येही पॅलेस्टिनीयन इस्लामिक जिहादचे अस्तित्व आहे.

पॅलेस्टिनीयन इस्लामिक जिहाद ही एक अशी संघटना आहे जी कोणत्याही प्रकारच्या राजकीय शांतता चर्चेवर विश्वास ठेवत नाही आणि इस्रायलवर लष्करी विजय याला आपलं उद्दिष्ट मानते.

"इस्रायलवर विजय मिळविल्यानंतर, इस्रायल, गाझा पट्टी आणि वेस्ट बँक विलीन करून इस्लामिक देश निर्माण केला जाईल," असा या संघटनेचा विश्वास आहे.

इस्लामिक जिहादच्या निर्मितीची संकल्पना इजिप्शियन अतिरेकी गट मुस्लिम ब्रदरहूडपासून प्रेरित आहे.

1981 मध्ये फथी अल शकाकी आणि अब्द अल अजीझ यांनी 'पीआयजे'ची निर्मिती केली.

शिक्काकीचा जन्म गाझामधील रफाह येथे झाला. रफाह हा इजिप्तच्या सीमेला लागून असलेला गाझा पट्टीचा भाग आहे.

शिक्काकीचा जन्म एका निर्वासित छावणीत झालेला, त्याच्या कुटुंबाला पहिल्या अरब-इस्त्रायली युद्धात (1948) हद्दपार करण्यात आलेलं.

दोघेही इजिप्तमध्ये शिकले आणि तिथेच त्यांची भेट झाली.

इस्रायल

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

'द इकॉनॉमिस्ट'च्या अहवालानुसार, 1980 च्या दशकात 'पीआयजे' हे छोट्या-छोट्या विखुरलेल्या सैनिकी तुकड्यांचे नेटवर्क होतं, ज्यामध्ये एकूण मिळून फक्त काहीशे सदस्य होते.

परंतु 1988 मध्ये इस्रायली अधिकार्‍यांनी शिक्काकीला लेबनॉनला हद्दपार केले, त्यानंतर 'पीआयजे'च्या इतर व्यक्तींना हद्दपार करण्यात आले.

हे सर्व निर्वासित लोक या काळात इराणी लढवय्ये आणि लेबनॉनमधील इराण समर्थित मिलिशिया हिजबुल्ला याच्या संपर्कात आले.

'पीआयजे' सदस्यांनी हिजबुल्लाहकडून प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आणि नंतर अल-कुद्स ब्रिगेड्स या शक्तिशाली लष्करी गटाची स्थापना केली.

1990 मध्ये हमासने प्रथमच नागरिकांवर हल्ला केला. त्याआधी 80 च्या दशकात 'पॅलेस्टिनीयन इस्लामिक जिहाद'ने इस्रायलवर काही हल्ले केले आणि त्याची जबाबदारीही घेतली.

'पीआयजे'ने इस्रायलवर अनेक हल्ले केलेत आणि त्यांची जबाबदारी देखील घेतलेय, परंतु 1995 मधील त्यांचा हल्ला सर्वात मोठा हल्ला होता ज्या त्याच्यामध्ये 21 इस्रायली सैनिक आणि एक नागरिक ठार झालेला.

'पीआयजे'च्या सुरुवातीच्या नेत्यांवर इजिप्तच्या मुस्लिम ब्रदरहूडचे विचारवंत-कार्यकर्त्यांचा आणि 1960 आणि 1970 च्या दशकात गटाच्या हिंसक कारवायांचा मोठा प्रभाव होता.

'पीआयजे'च्या लोकांवर इराणचे नेते अयातुल्ला रोहोल्लाह खामेनी यांचाही खूप प्रभाव होता.

हमास आणि इस्लामिक जिहादचा काय संबंध आहे?

अमेरिका, इस्रायल आणि युरोपीय देश पॅलेस्टिनीयन इस्लामिक जिहाद आणि हमास या दोन्ही संघटनांना दहशतवादी संघटना मानतात.

या दोन्ही संघटना विचारसरणीच्या पातळीवर एकमेकांपासून भिन्न आहेत पण दोन्हीही इस्रायलला आपला शत्रू मानतात. हेच त्यांच्या एकीचं कारण आहे. असे अनेक हल्ले आहेत ज्यामधे हमास आणि इस्लामिक जिहाद एकत्र आलेत.

'जेएनयू'मधील 'मिडल इस्ट स्टडीज'चे माजी संचालक ए. के. पाशा म्हणतात की, हमासला समजून घेतल्याशिवाय पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद समजू शकत नाही.

1988 मध्ये हमासचे नेते मोहम्मद अल-जहर यांनी शांततापूर्ण निष्कर्ष काढण्याचा प्रस्ताव दिला. 1988 मध्ये हमासचे संस्थापक शेख यासीन यांनीही असेच विचार मांडले होते.

पाशा म्हणतात, "जेव्हा हे घडत होतं, तेव्हा हमासचा एक गट यांच्या बाजूने नव्हता आणि त्यांना फक्त लष्करी उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करायचं होतं. अनेक लोक जे हमाससोबत होते, त्यांनी हमासपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आणि तेव्हाच इस्लामिक जिहादला थोडं बळ मिळालं."

2017 मध्ये हमासने आपल्या मूळ चार्टरमध्ये सुधारणा केली आणि इस्रायलविरुद्ध काहीशी नरम भूमिका स्वीकारली.

अमेरिकेचं नॅशनल काउंटर टेररिझम सेंटर किंवा 'एनसीटी' म्हणतं की 2019 आणि 2020 मध्ये इस्लामिक जिहादने हमासच्या मदतीशिवाय इस्रायलवर रॉकेट सोडले.

इस्रायल

फोटो स्रोत, Getty Images

'एनसीटी'नुसार, 2022 मध्ये इस्लामिक जिहादने "त्यांच्या नेत्याच्या मृत्यूला प्रतिक्रिया म्हणून इस्रायलवर अंदाजे 1100 रॉकेटचा वर्षाव केला."

हमासप्रमाणेच पॅलेस्टिनीयन इस्लामिक जिहादची राजकीयदृष्ट्या कोणतीही शाखा नाही. ही फक्त आणि फक्त शस्त्र वापरणारी संघटना आहे. तर हमास राजकारणातही सक्रिय असून त्यांनी निवडणूक देखील लढवली आहे.

2006 मध्ये हमासने त्यांचे वर्चस्व असलेल्या पॅलेस्टिनी भागात निवडणुका जिंकल्या होत्या.

अनेक देश हमासला राजकीय शक्ती मानतात आणि हमास पॅलेस्टिनी लोकांच्या एका वर्गाचं प्रतिनिधित्व करतं, असंही मानलं जातं.

गाझामध्ये 2007 पासून हमासची सत्ता आहे. तिथले सर्व विभाग हमासद्वारेच चालवले जातात.

दुसरीकडे अलिकडच्या काळात 'पीआयजे' वेस्ट बँक परिसरात मजबूत झालाय.

90 च्या दशकात या गटाला मोठा धक्का बसला जेव्हा त्याचे सरचिटणीस फथी अल शकाकी यांची 1995 मध्ये इस्रायलच्या सिक्रेट सर्व्हिसने हत्या केली.

यानंतर, हा गट थोडा कमकुवत झाला परंतु 'पीआयजे' दुसऱ्या इंतिफादा म्हणजेच अरब-इस्त्रायली युद्ध (2000 ते 2005) दरम्यान पुन्हा मजबूत झाला. या काळात हमासही मजबूत झाला आणि त्याने गाझा ताब्यात घेतलं.

'द गार्डियन'च्या वृत्तानुसार हा गट सुरुवातीला पॅलेस्टिनी राष्ट्रवादी 'सशस्त्र संघर्ष' ला पाठिंबा देणाऱ्या धर्मनिरपेक्ष डाव्या गटांच्या असंतुष्ट सदस्यांनी तयार केला होता.

तसंच इस्रायलविरुद्धच्या लढ्याला प्राधान्य द्यायला हवं, असं मानणाऱ्या मुस्लिम ब्रदरहूडचे माजी सदस्यही त्यात सहभागी झालेले.

'पीआयजे' ने आत्मघाती बॉम्बस्फोटाची नवीन रणनिती अवलंबली आणि इस्रायली सैन्य आणि नागरिकांवर अनेक हल्ले केले.

पॅलेस्टिनी इस्लामिक जिहादला निधी कोण पुरवतं?

अमेरिकेच्या नॅशनल काउंटर टेररिझम सेंटरच्या मते, इस्लामिक जिहादला "इराण आणि लेबनॉनची अतिरेकी संघटना हिजबुल्लाह मदत करते."

मात्र, प्राध्यापक ए के पाशा यांचा यावर विश्वास नाही.

ते म्हणतात, "हमासला इराणचा पाठिंबा आहे, मग तो त्याच्या प्रतिस्पर्ध्याला का मदत करेल? आणि जर त्यांना इराणकडून मदत मिळाली असती, तर तो हमाससारखा मजबूत झाला असता."

इस्रायल

फोटो स्रोत, Getty Images

"पीआयजे सामान्य लोकांचा पाठिंबा घेतं, वक्फला जसा निधी मिळतो, कोणत्याही इस्लामिक संघटनेला निधी मिळाला तर ते त्यांच्याकडून मदत घेण्याचा प्रयत्न करतात. इजिप्तमधूनही काही मदत मिळते पण ती मदत पुरेशी नाही."

'पीआयजे'चे मुख्यालय दमास्कस, सीरिया येथे आहे, जिथे त्यांचा सध्याचा नेता झियाद अल-नखलाह राहतो. तेहरानमध्येही त्यांचे कार्यालय आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify,आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)