इस्रायल हवेपासून पाणी कसं तयार करतो?

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

इस्रायल आणि तिथल्या नागरिकांची समृद्धी आणि प्रगतीची जेव्हा चर्चा होते, तेव्हा कायम त्यांच्या वैज्ञानिक, संरक्षण आणि कृषी कामगिरीची चर्चा होते. एक तंत्रज्ञान म्हणजे हवेपासून पाणी तयार करणं.

'वॉटरजेन' नावाच्या इस्रायली कंपनीच्या या तंत्रज्ञानाच्या मदतीने हवेपासून पिण्यायोग्य पाणी तयार करता येतं.

वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा विविध आकाराच्या मशीनद्वारे पूर्ण केल्या जाऊ शकतात.

इस्रायलशिवाय भारतासह जगातील अनेक देशांतील कंपन्या या दिशेने वाटचाल करत असून त्यांना लक्षणीय यशही मिळालंय.

हवेपासून पाणी तयार करण्याच्या तंत्रज्ञानातील त्रुटींमुळे ते यशस्वी होण्याबाबत काही तज्ज्ञांनी शंका व्यक्त केलेय.

हवेतून पाणी बनवण्याचं तंत्रज्ञान

'वॉटरजेन' नावाच्या इस्रायली कंपनीने हवेपासून पाणी तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले असून त्याला आंतरराष्ट्रीय पेटंटही मिळालंय.

हवेपासून पाणी तयार करण्याच्या या तंत्राला 'अॅटमॉस्फेरिक वॉटर जनरेशन' (वातावरणातून पाण्याची निर्मिती) असंही म्हणतात.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मशीनद्वारे हवा शोषली जाते. एका विशिष्ट प्रकारचे एअर फिल्टर त्यातील प्रदूषके काढून टाकतं आणि फक्त स्वच्छ हवा आत घेतली जाते. नंतर ऊर्जा विनिमयाद्वारे पाणी वेगळं करून टाकीत गोळा केलं जातं.

त्यानंतर ते अल्ट्राव्हायोलेट किरणांमधून जातं जेणेकरून त्यातील अशुद्धता काढून टाकली जाऊन ते पिण्यायोग्य बनेल.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

वातावरणात 13 अब्ज टन ताजं पाणी आहे, जे या तंत्रज्ञानाच्या मदतीने वापरता येऊ शकते. जगातील आठ अब्ज लोकांची तहान भागवण्यासाठी ते पुरेसे आहे.

त्यामुळे हवामानावर कोणताही विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाही.

लोकसंख्या वाढीमुळे जगातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांवर सतत ताण पडतोय, परिणामी प्रदूषण होतंय. तसंच, पाणी वितरण करणा-या पाईपलाईन कालांतराने जुन्या, खराब होतात आणि त्याला सतत साफसफाईची आवश्यकता असते.

पाईपलाईनमध्ये वेळोवेळी बिघाड झाल्यामुळे प्रदूषकं मिसळली जातात, अशावेळी या प्रकारची स्वतंत्र यंत्रणा नागरिकांच्या गरजा पूर्ण करू शकते.

भारतासह जगातील अनेक देशांमध्ये जलप्रदूषणामुळे काही भागात भूजल प्रदूषित झाले आहे, अशा प्रदेशात ही यंत्रणा उपयुक्त ठरू शकते.

तेल अवीव विद्यापीठातील संशोधनाच्या निष्कर्षांनुसार, हवेत प्रदूषण असलं तरीही, WWG तंत्रज्ञानाद्वारे जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांची पूर्तता करणारं पिण्यायोग्य पाणी तयार केलं जाऊ शकतं.

सीरिया आणि गाझामध्ये युनिट्स

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, जगातील सुमारे दोन अब्ज नागरिकांना दूषित पाणी प्यावं लागतंय.

त्यामुळे टायफॉइड आणि कॉलरासारखे आजार होऊ शकतात. प्रदूषित पाण्यामुळे जगभरात दरवर्षी सुमारे पाच लाख लोकांचा मृत्यू होतो.

आंतरराष्ट्रीय धर्मादाय संस्थांच्या मदतीने, 'वॉटरजेन'ने नागरी युद्ध आणि युद्धामुळे प्रभावित झालेल्या लोकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी देण्यासाठी सीरियातील रक्का येथे स्वतःचा प्लांट उभा केलाय.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

धर्मादाय संस्था म्हणतात की, अशी सौरऊर्जेवर चालणारी युनिट्स स्थानिकांसाठी फायदेशील ठरू शकतात कारण सततच्या संघर्षामुळे सीरियाची पाणी आणि वीज पुरवठा व्यवस्था कोलमडली आहे.

या इस्रायली कंपनीने गाझातील नागरिकांसाठी हवेपासून पाणी बनवणाऱ्या मोठ्या युनिट्सचा पुरवठाही केलाय. भारतासह जगातील जवळपास 80 देशांमध्ये 'वॉटरजेन' उत्पादने उपलब्ध आहेत.

पर्यटन आणि वाहतूक क्षेत्रातील वाहनांमध्ये अशा प्रकारची युनिट्स बसवण्याकडे लोकांचा कल वाढतोय, जेणेकरून पाण्याचा विश्वासार्ह आणि अविरत स्त्रोत उपलब्ध होईल.

सन 2022 पासून एका भारतीय कंपनीसोबत हातमिळवणी करून, 'वॉटरजेन'ने घरगुती आणि व्यावसायिक युनिट्ससाठी 30 लिटर ते 6,000 लिटर क्षमतेची दैनंदिन क्षमता असलेली मशीन्स बाजारात आणली आहेत.

भारताच्या MaitriAquatech ने 'मेघदूत' नावाच्या उत्पादनांची श्रेणी सादर केलेय.

ज्यामध्ये हवा शोषून थंड केली जाते, ती गाळून त्यात खनिजयुक्त पाणी मिसळलं जातं. 2019 मध्ये भारतीय रेल्वेने सिकंदराबाद स्थानकावर अशा प्रकारचे मशीन बसवले होते.

पर्याय आणि अडचणी

हवेपासून पाणी बनवण्याच्या तंत्रज्ञानावर अनेक कंपन्या काम करत आहेत. काही कंपन्या वातावरणातील हवा शोषून न घेता फक्त पाण्याचा अंश असलेले कण शोषून घेतात, परिणामी उर्जेचा वापर कमी होतो.

तर दुसरी कंपनी उष्णता किंवा शीत विनिमय प्रक्रिया न बदलता पारंपारिक रिव्हर्स ऑस्मोसिस आणि कार्बन फिल्टर आणि यूव्हीद्वारे पिण्यायोग्य शुद्ध पाणी बनवण्याचा प्रयत्न करतेय.

कोणत्याही तंत्रज्ञानाप्रमाणे, हवेपासून पाणी तयार करण्यालाही काही मर्यादा आहेत. हे तंत्रज्ञान खूप महाग आहे. गरीब आणि उपेक्षित नागरिकांना वैयक्तिक पातळीवर त्याचा वापर करणे परवडणारे नाही.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भूजल प्रदूषण ही भारतातील एक मोठी समस्या आहे
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

महाग तंत्रज्ञानामुळे त्याचे औद्योगिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत नाही आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणं फायदेशीर नाहीए.

हे तंत्रज्ञान पूर्ण क्षमतेने कार्य करण्यासाठी वातावरणात 30 टक्के आर्द्रता असणं आवश्यक आहे आणि सामान्य कामगिरीसाठी किमान 20 टक्के आर्द्रता असणे आवश्यक आहे. शिवाय हे तंत्रज्ञान थंड प्रदेशात निरुपयोगी आहे.

'अटमॉस्फेरिक वॉटर जनरेशन' युनिट्समधील उत्पादकतेत त्वरित वाढ शक्य नाही. उदाहरणार्थ, तुमच्या युनिटची उत्पादन क्षमता प्रतिदिन 30 लिटर असू शकते आणि अचानक घरी जास्त माणसं आली किंवा तुमचीच पाण्याची मागणी वाढल्यास उत्पादन वाढू शकत नाही.

मोठ्या प्रमाणात पाण्याचे उत्पादन करणा-या युनिट्सचा आकार आणि खर्च जास्त असतो. ज्यामुळे जागा आणि देखभालीची समस्या निर्माण होते.

त्याचे एअर फिल्टर आणि मेम्ब्रेन वेळोवेळी बदलावे लागतात, जे महाग आहेत. याव्यतिरिक्त पडद्यामुळे घन कचरा देखील तयार होतो.

जर युनिट सौरऊर्जेवर चालत नसेल, तर ते चालवण्यासाठी वीज लागते, ज्यामुळे कार्बन उत्सर्जन होते आणि ते पर्यावरणासाठी पूर्णपणे फायदेशीर नसतं.

रिव्हर्स ऑस्मोसिस आणि हिमकणांपासून पाणी तयार करण्याच्या पर्यायांचे व्यावसायिक उत्पादन करण्याचा प्रयत्न देखील केला गेलाय.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)