शेतात किती फूट खोल बोअरवेल खोदायची हे कसं शोधायचं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रुचिता पुरबिया
- Role, बीबीसी गुजरातीसाठी
“मी गेल्या 22 वर्षांत माझ्या शेतात 22 बोअर खोदले आहेत. त्यातील काहींची खोली 1350 फुटांपर्यंत करण्यात आली होती. पण त्यापैकी एकालाही पाणी लागलं नाही.”
राजकोटच्या खरेचिया गावातील 65 वर्षीय शेतकरी धनजीभाई सांगत होते.
शेतीला सिंचनासाठी पाणी मिळावं म्हणून गेल्या दोन दशकांपासून केलेल्या अयशस्वी प्रयत्नांबद्दल सांगताना त्यांच्या शब्दांत निराशा होती.
ते सांगतात, "आता आम्ही मुलाला शहरात पाठवलं आहे. कारण शेतीच्या उत्पन्नातून घर चालत नाही. आता उदरनिर्वाह होईल एवढीच शेती करतो."
धनजीभाईंच्या म्हणण्यानुसार, त्यांनी वेगवेगळ्या गावांतून अनेकांना बोलावून शेतात बोअरवेल कुठे खोदायचे हे ठरवलं.
त्यांनी काही पारंपरिक पद्धतींनी जमिनीतील भूजलाची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण ते सर्व मार्ग अयशस्वी ठरले.
शेवटी सरकारी खात्याचीही मदत घेतल्याचा दावा त्यांनी केला. त्यांचे प्रयत्न अयशस्वी झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
"या प्रक्रियेसाठी मला आतापर्यंत लाखो रुपये खर्च आला आहे," ते निराश स्वरात या प्रक्रियेच्या खर्चाबद्दल सांगतात.
धनजीभाईंप्रमाणेच गुजरातमधील अनेक शेतकरी आणि इतर गरजू लोक आता शेतीसाठी आणि वापरासाठी भूजल मिळविण्यासाठी बोअर खोदूनही पाणी मिळत नाही किंवा बोअर फेल झाल्याची तक्रार करताना दिसतात.
त्यांच्याप्रमाणेच, बरेच लोक, विशेषतः शेतकरी, शेतात जमिनीतील पाणी शोधण्यासाठी हातात फावडे घेऊन चालण्यासारख्या पारंपारिक पद्धतींचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात.
वर्षानुवर्षे वापरल्या जाणाऱ्या या पारंपरिक पद्धती प्रभावी असल्याचा दावा शेतकरी आणि इतरांकडून केला जातो.
आता अवाढव्य खर्च करून बोअर खोदल्यानंतर पाणी मिळत नसल्याच्या घटना उघडकीस आल्यावर भूगर्भातील पाणी प्रत्यक्षात कुठे आणि किती खोलवर आहे, हे जाणून घेण्याची काही शास्त्रीय पद्धत आहे का, असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे.
बीबीसी गुजरातीनं पारंपारिक पद्धती वापरणाऱ्या तज्ज्ञांशी आणि लोकांशी बोलून या प्रश्नावर स्पष्टता मिळवण्याचा प्रयत्न केला.
भूजलाचा अंदाज घेण्यासाठी कोणत्या पारंपारिक पद्धतींचा वापर?
गुजरातसह संपूर्ण भारतात, भूजलाची स्थिती निश्चित करण्यासाठी शेतकरी तथाकथित तज्ज्ञ आणि पारंपारिक पद्धतींवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.
तापी जिल्ह्यातील वांकला गावात राहणारे विरल चौधरी हे त्यापैकीच एक आहेत, ते आपल्या शेतात आंबा आणि कापूस पिकवतात.
ते त्यांच्या अनुभवाबद्दल सांगतात, “माझ्या शेतात एक बोअरवेल आहे. भूगर्भातील पाण्याचा शोध घेण्यासाठी आम्ही नारळ हातात घेऊन केलेल्या जुन्या पद्धतीवर विश्वास ठेवतो. यासाठी आम्ही या प्रक्रियेत पारंगत असलेल्या गावातील अनुभवी-तज्ज्ञ व्यक्तीला बोलावतो. या प्रक्रियेत ते नारळ हातात घेऊन शेतात फिरतात आणि पाणी कुठे आहे ते दाखवतात.”

फोटो स्रोत, GETTY IMAGES
भूगर्भातील पाण्याचा अंदाज घेण्याच्या इतर पद्धतींबद्दल बोलताना ते म्हणतात, “अशा प्रकारात अनुभवी असलेली माणसं विशिष्ट झाडाच्या फांदीचाही वापर करतात.”
भूजल शोधण्यासाठी खास यंत्रं विकसित करण्यात आली आहेत, असं सांगून त्यांनी म्हटलं की, भूजलाचा अंदाज घेण्यासाठी आधुनिक काळात विकसित केलेल्या पद्धती आम्हाला माहीत आहेत. पण नारळ वापरुन भूजल शोधण्याच्या पद्धतीनं जर आम्हाला तोच परिणाम मिळत असेल, तर आम्ही यंत्र का वापरायची.
शेवटी मशीन देखील महाग आहे. भूगर्भातील पाण्याची माहिती घेण्यासाठी मशिन वापरणं बड्या शेतकऱ्यांनाच परवडतं. पारंपारिक पद्धतीवर आम्ही समाधानी आहोत.”
असेच आणखी एक शेतकरी म्हणजे गांधीनगरच्या देहगाम तालुक्यातील मोहनलाल.
त्यांनी सांगितलं की त्यांनी त्यांच्या शेतात बोअरवेल खोदण्याची जागा निश्चित करण्यासाठी 'ब्राह्मण' बोलावले होते.
मोहनलाल सांगतात, “मी शेतात बटाटे, भुईमूग आणि कापूस पिकवतो. आम्ही गावातील ब्राह्मणांना बोलावलं आणि त्यांच्या सूचनेनुसार बोअरवेल खोदण्याचं ठरविलं.”
जामनगरच्या चंद्रगढ गावात राहणारे कमलेशभाई ढोलरिया हे देखील शेतकरी आहेत. ते बोअरवेल खोदण्याबद्दल बोलताना भूजल तपासण्याचा आणखी एक पारंपारिक मार्ग सांगतात.
"आमच्याकडे चार बोअर आहेत. आमचे शेजारी शेतात फिरून भूगर्भातील पाण्याच्या अचूक स्थानाचा आणि खोलीचा अंदाज घेणारे तज्ज्ञ आहे."
“ते हातात काठी घेऊन शेतात फिरतात आणि भूजलाचा अंदाज घेतात. याबाबत आपल्यावर निसर्गाचं ऋण आहे. प्रत्येक वेळी त्यांच्या अंदाजानुसार जमिनीत पाणी सापडलं आहे.”
या पद्धतीबद्दल बोलताना ते म्हणतात, “अशा प्रकारे काठी घेऊन चालताना तज्ज्ञ शेतातील चार-पाच क्षेत्रं दाखवतात. या ठिकाणी एकामागून एक बोअर खोदण्याचं काम सुरू आहे. 100 फूट खोदूनही पाणी न मिळाल्यास दुसऱ्या ठिकाणी खोदकाम केलं जातं. त्यापैकी एकामध्ये पाणी सापडलं आहे."

फोटो स्रोत, Getty Images
कमलेशभाई आधुनिक वैज्ञानिक तंत्राच्या मर्यादा असल्याचा दावा करतात आणि म्हणतात की, गावातील अनेक लोकांनी या प्रक्रियेसाठी मशिनचा वापर केला असला, तरी पाणी लागत नाही. अशा घटना घडल्या आहेत आणि ही यांत्रिक प्रक्रिया 'खूप खर्चिक' आहे.
भूजल शोधण्याच्या शास्त्रीय पद्धती कोणत्या?
वडोदरा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापक डॉ कृष्णा तिवारी यांनी भूजलाची नेमकी खोली आणि पाणीसाठा तपासण्याच्या पद्धतींबद्दल बीबीसी गुजरातीशी संवाद साधला.
त्यांच्या मते, या पद्धतींद्वारे भूजलाच्या खोलीचा कोणीही निश्चित अंदाज बांधू शकतो.
डॉ कृष्णा यांनी हायड्रोजियोलॉजीमध्ये पीएचडी केली आहे. याशिवाय सासनगीर, अंबाजी आणि पावागड इथं मोठ्या प्रमाणात त्यांनी काम केले आहे.
भूगर्भातील पाण्याची खोली आणि स्थिती जाणून घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या वैज्ञानिक पद्धतीबद्दल ते सांगतात की, “या कामासाठी एक महत्त्वाची वैज्ञानिक पद्धत म्हणजे विद्युत प्रतिरोधक सिद्धांत होय. ही पद्धत विद्युत वाहकता या नियमावर आधारित आहे.”
“या पद्धतीसाठी वापरल्या जाणार्या साधनाला मूलभूत तत्त्व म्हणून इलेक्ट्रिक रेझिस्टिव्हिटी असंही नाव देण्यात आलं आहे. या पद्धतीत उपकरणाची तार किंवा इलेक्ट्रोड आठ ते दहा इंच खोलीपर्यंत जमिनीत गाडलं जातं. या पद्धतीचा अवलंब करून, तारेद्वारे विद्युत प्रवाह जमिनीत जातो, तिथं भूजल पातळी शोधली जाते.”

या यंत्राच्या कार्याबद्दल माहिती देताना डॉ. कृष्णा म्हणतात, “विद्युत प्रवाहावरून यंत्राच्या रीडिंगवरून भूजलाचा अचूक अंदाज मिळू शकतो. त्याच्या मदतीनं आम्हाला कोणत्याही ठिकाणी भूगर्भात पाणी आहे की नाही याची माहिती मिळते, तसंच भूजल पातळीचाही अंदाज येतो.
"उपकरणांच्या मदतीने सर्व माहिती घेतल्यानंतर, सॉफ्टवेअरच्या मदतीनं डेटाचा अर्थ लावला जातो."
याशिवाय डॉ कृष्णा हे रेझिस्टिव्हिटी इमेजिंग सिस्टीम या आणखी एका वैज्ञानिक तंत्राबद्दल सांगतात.
या नवीन सुधारित पद्धतीच्या कार्याविषयी माहिती देताना ते सांगतात की, “या तंत्रात भूजलाचा अंदाज घेण्यासाठी सुधारित उपकरणाचे 12 ते 24 इलेक्ट्रोड जमिनीत घातले जातात.
ज्याच्या मदतीनं जमिनीची आणि त्यातील अंतर्गत घटकांची द्विमितीय प्रतिमा सॉफ्टवेअरद्वारे मिळविली जाते. त्याचा निकाल अवघ्या एक ते दीड तासात उपलब्ध होतो. जे आपण संगणकाद्वारे पाहू शकतो.”
या विषयावर एम.जी. इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे प्रोफेसर हेमन मजीठिया म्हणतात, “जर रेतीचं प्रमाण अधिक असेल तर भूजलाचे प्रमाण चांगलं असतं. पण जर जमीन खडकाळ असेल तर ती पाणी शोषत नाही आणि भूजल पातळी कमी होते.”
गुजरात वॉटर रिसोर्सेस डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (GBRDCL) चे अधीक्षक अभियंता पिनाकिन व्यास यांच्या मते, भूजल पातळी वर्षाच्या वेगवेगळ्या काळामध्ये बदलते.
झाडं आणि कीटक हे जमिनीत पाणी असण्याचे सूचक असू शकतात?
भूगर्भातील पाण्याच्या अंदाजासाठी वैज्ञानिक पद्धती समजावून सांगितल्यानंतर, डॉ. कृष्णा इतर नैसर्गिक पद्धती आणि संकेतांबद्दल बोलतात ज्यामुळं भूजलाच्या स्थितीबद्दल थोडी कल्पना येते.
"वैज्ञानिक पद्धतींव्यतिरिक्त, हायड्रोबायोलॉजिकल इंडिकेटर म्हणून ओळखली जाणारी पद्धत या उद्देशासाठी उपयुक्त ठरते," असं ते सांगतात.
“यामध्ये, शास्त्रज्ञ भूगर्भातील पाण्याच्या खोलीचा अंदाज घेण्यासाठी झाडं आणि कीटकांच्या उपस्थितीचं परीक्षण केलं जातं. या पद्धतींचं वर्णन ऋषी वराहमिहिर यांच्या 'बृहत्संहिता' या पुस्तकातही केलं आहे, ज्याला वनस्पतींचा विश्वकोश म्हणतात."
या पद्धतीची सविस्तर माहिती देताना डॉ. कृष्णा म्हणतात की, या पद्धतीत शास्त्रज्ञ कडुलिंब, नारळ, ताड किंवा खजूर यांसारख्या झाडांची वाढ आणि वाढीची दिशा तपासतात.
“झाडांच्या सर्व फांद्या वाकलेल्या नसतात. पण कधी कधी या झाडांच्या फांद्या प्रमाणाबाहेर वाकतात. तेव्हा ही स्थिती त्या जमिनीत भूजल लक्षणीय प्रमाणात असल्याचं दर्शवते.”

फोटो स्रोत, Getty Images
कृष्णा सांगतात, झाडांसोबतच कीटकांची उपस्थिती देखील भूजलाबद्दल बरंच काही सांगते.
“वाळवी देखील असंच एक सूचक आहे. ज्या जमिनीत किंवा शेतात वाळवीचा प्रादुर्भाव आहे तिथं भूजल सापडण्याची शक्यता जास्त असते. अशा मातीत अगदी कमी खोलीवर पाणी मिळण्याची शक्यता असते.”
हे सर्व संकेतक भूजल अंदाज प्रक्रिया सुलभ करतात.
डॉ. कृष्णा म्हणतात, “या प्रक्रियेनंतर शास्त्रज्ञ विद्युत वाहकता या पद्धतीचा वापर करून भूजलाच्या स्थितीबद्दल अचूक अंदाज लावू शकतात. या दोन पद्धतींमुळं वेळ आणि पैसा वाचू शकतो.”
नारळ किंवा सुक्या काठ्या, मंत्र किंवा तांब्याची छडी वापरण्याच्या पद्धती अंधश्रद्धा आणि अवैज्ञानिक असल्याचं डॉ.कृष्णा सांगतात.
डॉ. कृष्णा भूजल स्थिती ठरवण्याच्या अनुभवजन्य, अंदाजावर आधारित पद्धतींना ते अंधश्रद्धा म्हणतात.
"भूजलाची स्थिती निश्चित करण्यासाठी नारळ, सुक्या काड्या, मंत्र आणि तांब्याच्या छडी वापरण्याच्या पद्धतींना शास्त्रीय आधार नाही," असं ते सांगतात.
या पारंपारिक पद्धतीच्या यशाबद्दल कारण सांगताना ते म्हणतात, “ही पद्धत यशस्वी होण्याचं एकमेव कारण म्हणजे आजूबाजूच्या विहिरीत पाणी आहे हे त्यांना आधीच माहीत असतं आणि अशा क्षेत्रात भूजल असण्याची दाट शक्यता आहे.
गुजरात वॉटर रिसोर्सेस डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे अधीक्षक अभियंता पिनाकिन व्यास, भूजल चाचणीच्या पारंपारिक पद्धती बद्दल
सांगतात की,“या पद्धतीचा अवलंब करणारे लोक अनुभवावर आधारित काम करतात. ते वापरत असलेले तंत्र त्यांच्या आत्म-समाधानासाठी पुरेसं आहे. जवळच्या शेतात पाणी आहे, तर साहजिकचं त्याच्या बाजूच्या जमिनीत पाणी असेलचं. साधारणपणे एका छोट्या परिसरातील भूजलाच्या पातळीत फारसा फरक पडत नाही.”
भूजल पातळी मोजण्यासाठी 'निरीक्षण विहिरी'

फोटो स्रोत, Getty Images
पिनाकिन व्यास सांगतात, की भूजलाशी संबंधित डेटा मिळविण्यासाठी गुजरातच्या शासनानं दर 20 किमी अंतरावर भूजल निरीक्षण विहिरी खोदण्याचा निर्णय घेतला आहे.
ते म्हणतात, “या विहिरीच्या पाईपमध्ये फ्लो मीटर टाकून भूजल पातळीची माहिती मिळवली जाते.
“अटल भूजल योजना गुजरातमधील अनेक गावांमध्ये लागू करण्यात आली आहे. या प्रत्येक गावात खोदलेल्या 'निरीक्षण विहिरी' मध्ये वेगवेगळ्या दिशेनं सात फ्लो मीटर बसवले आहेत. तिथून आमची टीम वर्षातून दोनदा पाण्याची पातळी आणि दर्जेदार नमुने गोळा करते.”
भूजल डेटा संकलित करण्याच्या प्रक्रियेबद्दल विस्तृत माहिती देताना व्यास म्हणतात, “अशा प्रकारे गोळा केलेल्या नमुन्याचे प्रयोगशाळेत विश्लेषण केलं जातं. जेणेकरून भूजलामध्ये होणारे बदल लक्षात घेता येतील. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी आणि नंतर या विहिरीद्वारे भूजलाचं मोजमाप केलं जातं.”
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








