'आजोबा म्हणायचे करटुले म्हणजे माळकऱ्याचं मटण, मी त्याची लागवड केली आणि...'

फोटो स्रोत, amol langar
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
“करटुल्यांमुळे माझ्याकडे पैसा साचत गेला. मी करटुल्यांचं बियाणं सुद्धा विकलं आणि मला करटुले शेतीतून उत्पन्नही भेटलं. अर्ध्या एकर करटुल्यातून माझं दारिद्य्र दूर केलं.”
करटुल्याचा प्लॉट दाखवताना कृष्णा सांगत होता. आज कृषी दिन आहे. त्या निमित्ताने शेतकऱ्याची ही यशोगाथा पुन्हा एकदा शेयर करत आहोत.
कृष्णा फलके हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यातल्या तळेगावचा तरुण शेतकरी.
2019 पासून तो करटुल्याची लागवड करत आहे. त्याला करटुले शेतीची कल्पना सुचली ती आजोबांशी झालेल्या चर्चेतून.
कृष्णा सांगतो, “आजोबा म्हणायचे की करटुले हे माळकऱ्याचं मटण आहे. त्यामुळे मला प्रश्न पडायचा की हे जर माळकऱ्याचं मटण असेल आणि आपण गुगललाही सर्च केलं की, जगातली सर्वश्रेष्ठ भाजी कोणती, तर करटुले लिहून येते. मग याची लागवड करत का नाहीये?”
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
कृष्णानं कृषी विज्ञान विषयात पदवी संपादन केली आहे. त्यामुळे करटुले लागवडीचा हा प्रश्न सतत त्याच्या मनात येत होता.
मग त्यानं स्थानिक कृषी कार्यालयाकडून करटुले लागवडीबद्दल अधिक माहिती घेतली.
त्यानंतर 2019 मध्ये पहिल्यांदा अर्धा एकर क्षेत्रावर करटुल्याची लागवड केली.
अशी झाली सुरुवात...
कृष्णानं पहिल्या वर्षी रानावनात हिंडून करटुले गोळा केले. त्यांचं बियाणं काढलं. या बियाण्यांची उगवण क्षमता तपासून बघितली. 100 पैकी 75 पेक्षा अधिक बियाणं उगवून आल्यामुळे करटुले लागवडीचा त्यानं निश्चय केला.
कृष्णा सांगतो, “करटुले आज सकाळी विकले, तर लगेच संध्याकाळी मला पैसे भेटत होते. साध्या भाषेत म्हटलं तर मला याची एक लालूच लागली. मला कळलं की आपल्याला असेच पिकं लावावे लागतील,जेणेकरून आपण आपली आर्थिक स्थिती सुधारू शकतो.
मला लाँग टर्मची अपेक्षा नव्हती. म्हणून करटुल्याकडे मी कॅश क्रॉप म्हणूनच बघत होतो. मला पहिल्याच वर्षी अर्ध्या एकरात जवळपास 3 लाखाचं उत्पन्न झालं."

फोटो स्रोत, amol langar
सध्या कृष्णाकडे एक-एक एकरचे असे दोन एकर क्षेत्रावर करटुल्याचे दोन प्लॉट्स आहेत. जुलै महिन्यात त्यानं करटुल्याची तोडणी सुरू केलीय.
तो सांगतो, “15 जुलैच्या नंतर तोडणी सुरू झाली. आतापर्यंत माझा चौथा तोडा चालू आहे. माझ्याकडे दोन एकर क्षेत्रावर दोन प्लॉट्स असल्यामुळे एकाचा चौथा तोडा चालू आहे, तर दुसऱ्याचा तिसरा तोडा सुरू आहे.
"दर आठवड्याला मला एका प्लॉटमधून साधारणत: पावणे दोन ते दोन क्विंटल माल निघतोय. 2 एकरामध्ये चार क्विंटल माल आठवड्याला मिळतोय. आतापर्यंत मला सरासरी 121 रुपये किलो दर भेटलेला आहे.”
खर्च आणि फायद्याचं गणित सांगताना कृष्णा म्हणतो, “आतापर्यंत एका प्लॉटमधून जवळपास 70 ते 75 हजार आणि दुसऱ्या प्लॉटमधून एक ते दीड लाख रुपये उत्पन्न आलं. 2 एकरावरील करटुल्यांना बांबू, तार, काठी यासाठी जवळपास 45 हजार खर्च लागला आणि त्यातून आतापर्यंत 2 लाख रुपये प्रॉफिट मला राहिलेलं आहे.”

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc
कृष्णा ज्या गावात राहतो, त्या भागात मिरचीचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जातं. या गावांमधून मिरची नेण्यासाठी दररोज संध्याकाळी संभाजीनगर, पुणे येथील व्यापाऱ्यांच्या गाड्या येतात.
सकाळी तोडलेले करटुले पोत्यांमध्ये भरून कृष्णा संध्याकाळी या गाड्यांमध्ये विक्रीसाठी पाठवून देतो.
संभाजीनगर, पुणे येथील बाजारपेठांमध्ये तो करटुले विक्रीसाठी पाठवतो.
'करटुल्यांमुळे पूर्ण कर्ज फिटलं'
2018 पर्यंत कृष्णाची स्थितीही इतर शेतकऱ्यांप्रमाणेच होती. त्याच्याकडेही पेरणीच्या आधी पैसे नसायचे. मग तो व्याजावर पैसे घेऊन पेरणी करायचा.
तो सांगतो. “मी 2018 च्या पूर्वी काय करायचो? तर एखाद्या कृषी सेवा केंद्रावाल्याकडे जायचो. कारण पेरणीच्या टायमाला कोणत्याच शेतकऱ्याकडे पैसे नसतात, माझ्याकडेही नसायचे. मी कृषी सेवा केंद्राकडे जायचो. पूर्ण माल उधार भरायचो. त्यामुळे मग माझ्यावर वारंवार कर्ज वाढत चाललं होतं.”
करटुल्याच्या व्यावसायिक शेतीनं मात्र कृष्णाला कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढलंय.
तो सांगतो, “समजा एखाद्या कृषी सेवा केंद्रावाल्याकडून मी 5 हजार रुपयांचे खतं-औषधी नेली. तर संध्याकाळी करटुले विकून मला 10 हजार आले की, मी 5 हजार कृषी केंद्रावाल्याला नेऊन द्यायचो आणि 5 हजार घरच्या खर्चासाठी गुंतवायचो. यामुळे माझ्याकडे पैसे साठवले नसले, तरी माझ्याकडे कुणाचं काहीच कर्ज राहिलं नाही.”

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc
यंदा पुरेसा पाऊस नसल्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी चिंतेत आहेत. करटुल्याचा नोव्हेंबरपर्यंत चालणारा हंगाम ऑक्टोबरपर्यंत चालेल, अशी अशी यंदा स्थिती आहे. असं असलं तरी इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत कृष्णा थोडा 'रिलॅक्स' आहे.
“आज नाही म्हटलं तरी माझ्या घरात खर्च वजा जाता दोन-अडीच लाख रुपये करटुल्यामुळे आलेले आहेत. त्यामुळे मला चिंता नाहीये. दुष्काळ पडला तरी बी ते दोन लाख रुपये थोडे-थोडे खर्च करुन मी त्या पैशावरती एक वर्षही कसंही काढू शकतो,” कृष्णा सांगतो.
करटुले शेती करताना घ्यावयाची खबरदारी
करटुलं ही एक रानभाजी आहे. साधारणपणे शेताच्या बांधावर, माळरानावर किंवा डोंगरावर करटुलं नैसर्गिकपणे उगवून येतं.
पण आता महाराष्ट्रातले बरेच शेतकरी व्यावसायिक पद्धतीनं करटुल्याची शेती करत आहेत.
करटुले शेती करताना काही गोष्टींची खबरदारीही घ्यावी लागते.

फोटो स्रोत, amol langar
करटुल्यामध्ये नागअळीचा प्रादुर्भाव जास्त असतो. वेलवर्गीय भाजी म्हटलं की त्यावर नागअळी असते. द्राक्षांना जसा डवणी आजारा असतो तसा करटुल्यांनाही असतो.
त्यावर कृष्णा साधं इंडेक्स फवारतो. नागअळीला बायो 303 फवारतो.
कृष्णानं आतापर्यंत राज्यभरातल्या जवळपास 125 शेतकऱ्यांना करटुले लागवडीसाठी बियाणं दिलंय.
करटुले शेतीत इतर पिकांच्या तुलनेत उत्पादन खर्च कमी लागतो आणि दीड-दोन महिन्याच्या आत उत्पन्न मिळायला लागतं, असा कृष्णाचा अनुभव आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








