जुगाडू कमलेश : 'शेतकऱ्याशी लग्न केलंस तर बरबाद होशील असं माझ्या बायकोला म्हणणारे आज माझं कौतुक करतात'

- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी
"आप भारत का भविष्य हो. किसीने आपको सपोर्ट नही किया, पर मैं करूंगा." शार्क टँकच्या पियुष बन्सल यांनी मालेगावच्या कमलेश घुमरेला उद्देशून उच्चारलेले हे शब्द. कमलेश घुमरे म्हटलं तर तुम्ही कदाचित त्याला ओळखणार नाही, तो स्वतःही म्हणतो की लोक मला या नावाने ओळखत नाहीच. त्याचं अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारं नाव म्हणजे 'जुगाडू कमलेश'.
मुंबई-आग्रा हायवेवर मालेगाव सोडलं की पुढे एक हॉटेल लागतं, 'साईकार' या रस्त्याने प्रवास करणाऱ्यांच्या चांगलंच ओळखीचं आहे, कारण तिथली खास खान्देशी खापरावरची पुरणपोळी प्रसिद्ध आहे.
अनेक वर्षं हे हॉटेल या भागातलं लँडमार्क होतं, म्हणजे पत्ता सांगायचा असला तर साईकारच्या उजवीकडे, डावीकडे, पुढे, मागे असं सांगायचे.
पण या भागाला आता नवी ओळख मिळाली आहे, शार्क टँकवाल्या जुगाडू कमलेशचं गाव, देवारपाडा.
कमलेशला त्याच्या कीटकनाशक फवारणी करणाऱ्या सायकलसाठी उद्योजक पियुष बन्सल यांनी 30 लाखांचं अर्थसहाय्य दिलं. शार्क टँकचा तो एपिसोडही खूप व्हायरल झाला, कमलेश एकदम प्रकाशझोतात आला. पण शेतीसाठी जुगाड यंत्र बनवायचं काम तो शाळेच्या दिवसांपासून करतोय.

कमलेशचं कुटुंब शेतकरी. वर्षांनुवर्षं शेतीत घाम गाळणाऱ्यांच्या परिवारातून तो येतो. त्यामुळेच शेतीत असणारे कष्ट त्याने जवळून पाहिलेले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
तेच कष्ट कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो असं त्याला वाटायचं आणि लहानपणापासून तो मिळेल त्या साधनात, भंगारमध्ये सापडणाऱ्या गोष्टी एकत्र करून त्यापासून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करायचा.
त्याच्या घराशेजारी असलेली कांद्याची चाळ म्हणजे त्याचं वर्कशॉप. पण या प्रयत्नांना लोक हसायचे.

"लोक मला चिडवायचे, एक 'जुगाडू कमलेश' असं म्हणायचे, मला वाईट वाटायचं. हे लोक आपली थट्टा का करतात असं वाटायचं. नंतर मी माझं युट्यूब चॅनल सुरू करायचं ठरवलं तेव्हा मला माझे जिजू म्हणाले की तुझ्या चॅनलला हेच नाव दे. मी म्हटलं, नको... ते काहीतरी विचित्रच वाटतं. तेव्हा ते मला म्हणाले की आज लोक ज्या नावाला हसत आहेत एक दिवस तेच नाव ब्रँड होईल."
वडिलांचा त्रास बघून सुचली कल्पना
कमलेशचे वडील नानासाहेब घुमरे आता कौतुकाने आपल्या मुलाच्या धडपडीकडे पाहात असतात. एकवेळ होती जेव्हा लोक घरी येऊन त्याची तक्रार करायचे, फोन करून सांगायचे, पाहिला का तुमच्या मुलाचा प्रताप?... कधी तोंडावर हसायचे.
आता त्याच मुलाला कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून बोलवायला लोक येतात, माध्यम प्रतिनिधी येतात. आपल्या मुलांच्या धडपडीवर विश्वास टाकून त्याला हवं ते करण्याठी पाठिंबा देण्याचा निर्णय योग्य होता याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकत असतं.
कमलेशच्या ज्या कीटकनाशक फवारणी सायकलच्या कल्पनेचं कौतुक झालं, जिच्यासाठी अर्थसाहाय्य मिळालं ती कल्पना त्याला आपल्या वडिलांच्या त्रासाकडे बघून सुचली.
त्या प्रसंगाबद्दल सांगताना नानासाहेब घुमरे म्हणतात, "मी कपाशीची फवारणी करत होतो. फवारणी करताना फार त्रास होतो."
"18-20 लिटरचा स्प्रे घेऊन चालल्याने पाठीत दुखतं, कमरेत दुखतं. फवारणी अंगावर उडते त्याने अंगावर चट्टे येतात, भाजल्यासारखं होतं. डोळ्यांची जळजळ होते, चक्कर येते, रात्रभर झोप लागत नाही."
"त्यामुळे मी एक दिवस कमलेशला म्हणालो की आता हे काम माझ्याच्याने होणार नाही. तुझं कॉलेज संपलं आहे, त्यामुळे हे काम तू कर, माझी ही दशा तुला घे."

कमलेशच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. त्याला शेतीतलं नेहमीचं काम करायचा फार कंटाळा यायचा.
तो म्हणतो, "मला घरचे शेतीतलं काम करायला सांगायचे, ते मला फार अवघड वाटायचं. ते करायला कंटाळा यायचा. मग मी ते काम सोपं करण्याचा प्रयत्न करायचो. असं काय करता येईल ज्याने आपले कष्ट कमी होती असा विचार करायचो."
"एक दिवसाचं जरी शेतीतलं काम असेल तर ते सोपं करण्याचा जुगाड शोधायला मी एकेक आठवडा घालवून द्यायचो. त्याशिवाय झोप यायची नाही. आणि मग तोच जुगाड घेऊन शेतीत काम करताना मला फार मजा यायची."
कमलेशने फक्त ही फवारणी सायकलच बनवली नाहीये तर कपाशीच्या पेरणीसाठी एक खास यंत्र, शेवगा आणि लिंबू कापण्यासाठी खास कात्री, तसंच चालवणाऱ्याला आरामदायक असं ट्रॅक्टरचं सीटही बनवलं आहे.
शार्क टँकपर्यंतचा प्रवास
कमलेश जुगाड या क्षेत्राशी संबंधित सगळ्या गोष्टी फॉलो करतो. त्यामुळे जेव्हा शार्क टँक या शोची जाहिरात त्याने पाहिली तेव्हा त्यात सहभागी व्हायचं ठरवलं.
"माझी मुळात फॉर्म भरण्यापासून सुरूवात होती. सगळं इंग्लिशमध्ये लिहायचं होतं आणि आपलं इंग्लिश तर धन्यवाद आहे. पण माझ्या जीजूंनी मला मदत केली, त्यांनी फॉर्म भरला."
तो पुढे म्हणतो, "जेव्हा ऑडिशनला बोलवलं तेव्हा मग खूप भारी वाटलं. पण जाताना इतके फिल्मी सीन झाले ना माझ्यासोबत. आधी इथून जाताना इथल्या गाडीवाल्याने ऐनवेळी कॅन्सल केलं. मग कसंबसं मुंबईला पोहचलो. माझा मित्र आहे उमेश, त्याने मुंबईतून त्या फाईव्हस्टार हॉटेलात जायला गाडी मॅनेज केली ती रस्त्यात बंद पडली. माझा मित्र उमेश, माझा जीवाभावाचा साथीदार नरू, मी आणि आमची सायकल कसे ऑडिशनपर्यंत पोहचलो आमचं आम्हालाच माहीत."

फोटो स्रोत, Sony TV
ऑडिशनला गेल्यावरही तिथलं वेगळं वातावरण पाहून कमलेश आणि साथीदारांना थोडं बिचकायला झालं.
"आम्ही पूर्ण दिवसभर तिथे होतो, कधी असं फाईव्हस्टार हॉटेल पाहिलं नव्हतं. तिथले सगळे लोक आमच्याकडे आणि आमच्या सायकलकडे वळून वळून पाहात होते. एक वेटर आला विचारायला की कॉफी पिणार का? आम्हाला वाटलं याचे पैसे लागतील म्हणून आम्ही नाही म्हणालो. थोड्या वेळाने आणखी एकाने विचारलं की जेवणार का? तेव्हाही नाही म्हणालो. भूक तर लागली होतीच. मग नरूनेच त्या वेटरला विचारलं, 'इसका पैसा लगेगा क्या' तर कळलं की कंटेस्टंटसाठी फ्री आहे. मग कुठे आम्ही खाल्लं."
कमलेशची ऑडिशनही मस्त झाली. तेव्हाच आपण अर्धी बाजी मारली याची जाणीव त्याला झाली.
"इथपर्यंत पोहचलो, या लोकांमध्ये आपली क्रिएटिव्हीटी दाखवली. माझ्यासाठी हीच गोष्ट मोठी होती. पण ऑडिशन झाल्यावर कळूनच चुकलं होतं की आपण फायनल राऊंडला जाणार."
तेव्हाही आणि आजही कमलेशच्या बोलण्यात आत्मविश्वास ठासून भरलेला आहे हे जाणवतं. पण एकवेळ अशीही आली होती जेव्हा त्याने सगळं सोडून द्यायचं ठरवलं होतं.
काहीच नवीन घडत नव्हतं. तो एखादा जुगाड करायचा, माध्यमांमध्ये बातमी यायची, कोणी नेते येऊन कौतुक करून जायचे, पण कमलेशचं आयुष्य बदलत नव्हतं.

त्या सहकार्य मिळत नव्हतं, मार्गदर्शन मिळत नव्हतं, इथून पुढे कसं जायचं हे कळत नव्हतं. त्याने सगळं सोडून द्यायचं ठरवलं.
"माझं लग्न ठरलं होतं आणि लग्न होताना प्रत्येक मुलाला प्रश्न विचारला जातो की तू काय करतो? जुगाड करतो हे तर सांगू शकत नव्हतो. लोक हसायचे. माझ्या बायकोने मला लग्नासाठी होकार दिला असला तरी तिलाही खूप लोक म्हणायचे की तू तुझं भविष्य खराब करते आहेत. शेतकऱ्याशी लग्न करून तुला काय मिळणार आहे. त्यात हा असा. पण माझ्या बायकोचा माझ्यावर विश्वास होता."
आज कमलेश प्रसिद्ध झाल्यावर त्याला अनेक फोन येतात, मेसेज येतात. अनेक लोक कार्यक्रमाला बोलावतात. पण माझ्या स्ट्रगलच्या फेजमध्ये हे लोक मला मागे खेचायचा प्रयत्न करायचे हेही तो आवर्जून सांगतो.
"आज माणूस मोठा झाल्यानंतर लोक म्हणतात हा मोठा झाला. पण त्याला जेव्हा गरज असेत तेव्हा पाठिंबा देणारं कोणी नसतं."
"माझ्या स्ट्रगलच्या काळात जर एकाजरी व्यक्तीने सांगितलं असतं की, 'तू करू शकतोस, कर. तुझ्यावर मला भरोसा आहे' तर उभारी मिळाली असती. पण लोक तुम्हाला हताश करत राहातात, डिमोटिव्हेट करतात. ते म्हणतात की, 'तू करूच शकणार नाहीस, तुझ्याच्याने हे शक्यच नाही. तुला जमणारच नाही. हे आपलं काम नाही, आपण शेतकरी ते मुंबई...' आणि म्हणूनच आपली शेतकऱ्यांची मुलं मागे पडतात."

फोटो स्रोत, Sony TV
कमलेशच्या कल्पनेचं कौतुक झालं, पैसे मिळाले. पण आता आव्हान आहे लोकांना परवडेल अशी वस्तू तयार करण्याचं. सध्या तो दिल्लीला आहे आणि पियुष बन्सल यांच्या टीममधले डिझायनर्स आणि इंजिनियरसोबत काम करतोय.
त्याच्या डोक्यात एक कल्पना होती, ती प्रत्यक्षात आणताना काही अडचणींचाही त्याला सामना करावा लागतोय, पण त्यावर तो मात करेल असंही त्याला वाटतं.
एक कल्पना यशस्वी झाली, तिला पैसे मिळाले म्हणून जुगाड करणं सोडणार नाही असंही तो म्हणतो.
"जुगाडू कमलेशचं नावच जुगाडू आहे आणि त्याचं कामच ते आहे. त्याने ते काम सोडलं तर तो संपला."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2








