शार्क टँकचे जज अशनीर ग्रोवर आपल्याच कंपनीतून पडले बाहेर

फोटो स्रोत, Facebook/Ashneer Grover
- Author, रोहन नामजोशी
- Role, बीबीसी मराठी
'भारत पे' या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि शार्क टँक इंडिया या शोमुळे चर्चेत आलेले अशनीर ग्रोवर यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून अशनीर आणि त्यांच्या पत्नी माधुरी जैन यांच्यावर अंतर्गत चौकशी चालू होती. ही चौकशी टळावी म्हणून त्यांनी जंग जंग पछाडले. अखेर आज त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
शार्क टँक इंडिया या रिअॅलिटी शोमुळे अशनीर ग्रोवर गेल्या अनेक दिवसांपासून प्रसिद्धीच्या झोतात आले. भारतातल्या स्टार्ट अपमध्ये पैसा गुंतवणे हे या शोचं उद्दिष्ट होतं. त्यात अशनीर अतिशय कठोर शब्दात स्पर्धकांना बोलायचे.
त्याचे अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र त्याच वेळी त्यांच्या स्वत:च्याच कंपनीत गोंधळ सुरू होता. आपण दोन महिन्याची सुट्टी घेत असल्याचंही त्यांनी ट्विटरवरून जाहीर केलं होतं. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीला कंपनीतून काढून टाकण्यात आलं होतं.
आपल्या राजीनामा पत्रात त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. गेल्या काही दिवसांत आपल्यावर बिनबुडाचे आरोप झाले आहेत असं त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
अशनीर ग्रोवर कोण आहेत?
अशनीर ग्रोवर दिल्लीस्थित उद्योजक आहेत. IIT आणि IIM या संस्थांमधून शिक्षण घेतल्यावर ते कोटक महिंद्रा बँकेत बराच काळ काम करत होते. त्यांनी अमेरिकन एक्सप्रेस या कंपनीत काम केलं.
2015 मध्ये त्यांनी ग्रोफर्स या कंपनीत मुख्य आर्थिक अधिकारी या पदावर काम केलं 2018 मध्ये त्यांनी Bharat Pe या कंपनीची स्थापना केली. अशनीर त्यांच्या आलिशान जीवनशैलीसाठीही ओळखले जातात. त्यांच्याकडेच्या आलिशान गाड्यांबद्दल इन्सटाग्रामवरही माहिती दिली होती.
शार्क टँक इंडिया या कार्यक्रमात नव उद्योजकांची शाळा घेण्यासाठी ते विशेष ओळखले जातात. कमीत कमी शब्दात ते आपली भूमिका सांगायचे. अनेक उद्योजकांना त्यांनी धारेवरही धरलं. त्यामुळे ते सोशल मीडियावर विशेष लोकप्रिय झाले.
Bharat pe कंपनीत काय गोंधळ चालू आहे?
अशनीर ग्रोवर यांच्या पत्नी माधुरी जैन या कंपनीत Head of controls या पदावर काम करायच्या. कंपनीच्या कामकाजाचं ऑडिट करण्यासाठी Alvarez and Marsal या कंपनीला पाचारण करण्यात आलं होतं. या चौकशीत माधुरी जैन यांनी कंपनीचा पैसा वैयक्तिक कारणासाठी गुंतवल्याचा ठपका ठेवला.

फोटो स्रोत, Facebook/Ashneer Grover
मिंट या वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार, या कंपनीने आपला अहवाल 30 जानेवारीलाच सादर केला. त्यात ग्रोवर दाम्पत्य दोषी असल्याचं सांगितलं गेलं. त्यांनंतर माधुरी जैन यांची हकालपट्टी करण्यात आली होती. नंतर माधुरी जैन यांनी ट्विटरवर आरोप प्रत्यारोपांच्या तोफा डागल्या.
भावनिक राजीनामा पत्र
अशनीर ग्रोवर म्हणतात, "ज्या कंपनीचा मी संस्थापक होतो त्याच कंपनीचा मी अत्यंत खेदाने राजीनामा देत आहे. तरीही माझी कंपनी Fintech क्षेत्रात दिमाखात उभी आहे हे मला आवर्जून नमूद करावंसं वाटतं. जानेवारी 2022 पासून काही लोकांनी माझ्यावर आणि माझ्या कुटुंबीयांवर खोटे आरोप केले. त्यामुळे माझ्या आणि कंपनीच्या प्रतिष्ठेला धक्का बसला.
मी भारतातल्या अनेक नव उद्योजकांसाठी प्रेरणास्रोत होतो. आता मला माझ्याच संस्थापकांबरोबर आणि गुंतवणूकदारांबरोबर भांडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे भारत पे चं अस्तित्वच पणाला लागलं आहे."

फोटो स्रोत, Facebook/Shark Tank India
"माझं कुटुंब मध्यमवर्गीय होतं. मी IIT दिल्ली आणि IIM अहमदाबाद या दोन प्रतिष्ठित संस्थांमधून शिकलो. माझ्या कुटुंबाने मला कायमच, कष्ट, प्रामाणिकपणा, याचं महत्त्व पटवून दिलं. मी अत्यंत कष्टाने माझं करिअर उभं केलं. Grofers आणि भारत पे या कंपन्या शुन्यातून उभ्या केल्या. त्यामुळे माझी आणि देशातल्या अनेक युवक युवतींची भरभराट झाली.
मी भारत पे आपल्या लहान मुलाप्रमाणे वाढवली. आमची कंपनी आली तेव्हा पेटीएम, गुगल पे, फोन पे यासारख्या अजस्त्र कंपन्या अस्तित्वात होत्या. त्यांच्याशी स्पर्धा करून आम्ही ही कंपनी उभी केली. भारत पे ने दिलेल्या कर्जामुळे लाखो लोकांना त्यांचे उद्योग उभारण्यास मदत झाली.
या राजीनामापत्रात त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांवर आणि गुंतवणूकदारांवर सडकून टीका केली आहे. कंपनीचा मालक हा गुंतवणूकदारांचा गुलाम असतो हे दाखवण्याचा प्रयत्न असल्याचं ग्रोवर म्हणाले. जेव्हा माझी गरज होती तेव्हा माझा वापर केला आणि आता बाजूला केल्याचा आरोपही त्यांनी केला.
काहीही झालं तरी भारत पे चा संस्थापक ही ओळख कधीही पुसली जाणार नाही असंही ते म्हणाले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








