'जिलेट'च्या रेझर ब्लेडनं दाढी करण्यापलीकडं अशी बदलली अर्थिक समीकरणं...

फोटो स्रोत, Getty Images
- Author, टीम हारफोर्ड
- Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
जिलेट कॉर्पोरेशनची स्थापना करणारे किंग कँप जिलेट यांच्याकडे काही भन्नाट तात्विक कल्पना होत्या.
1894 मध्ये लिहिलेल्या एका पुस्तकात त्यांनी म्हटलं की सध्याची स्पर्धा केवळ व्यवस्था गरिबी, गुन्हेगारी आणि उधळपट्टीला पोषक आहे.
समता, सद्गुण आणि आनंद या तत्वांवर आधारित एकच कंपनी असावी, जी किफायतशीर जीवनावश्यक वस्तूंची कमी किमतीत निर्मिती करणार, अशी कल्पना त्यांनी या पुस्तकात मांडली आहे.
उत्तर अमेरिकेतील सर्वजण मेट्रोपोलिस नावाच्या एकाच शहरात राहतात, अशी कल्पना या पुस्तकात मांडण्यात आली आहे. त्या शहरात असे महाकाय अपार्टमेंट आहेत, ज्यांचा कोणात्याही संस्कृतीने विचार केला नसेल. ते अपार्टमेंट एकमेकांशी पार्कने जोडलेले आहेत, आणि त्यांच्यावर काचेचे आकर्षक घुमट आहेत.
ही एक न संपणारी सुंदर गॅलरी असेल, अशी कल्पना त्यांनी या पुस्तकात मांडले होती. अर्थातच त्यांची ही कल्पना काही आकारास आली नाही.
पण पुढच्याच वर्षी त्यांना सूचलेल्या आणखी एका कल्पनेनं मात्र खरोखर जग बदललं. एकदाच वापरून टाकून देता येणाऱ्या रेझर ब्लेडचा शोध त्यांनी लावला.
पण दाढी करण्यापलीकडंही या शोधानं बरंच काही बदललं.
टू पार्ट प्राईसिंग मॉडेलचा जन्म
हे करताना त्यांनी उभं केलेल्या व्यावसायिक मॉडेलला विश्वव्यापी स्वरूप प्राप्त झालं. हे मॉडेल म्हणजे 'टू पार्ट प्राईसिंग'चं.
तुम्ही कधी इंकजेट प्रिंटरचं कार्ट्रिज विकत घेतलं आहे का? कार्ट्रिजची किंमत ही जवळपास प्रिंटरइतकीच असते, हे कळल्यावर रागच येतो. कधी कधी तुम्हाला हे निरर्थकही वाटू शकते.
प्रिंटरही तशी मोठी वस्तू आहे आणि त्यातील तंत्रज्ञानही किचकट आहे. मग केवळ एका प्लास्टिकच्या डबीतील थोड्याश्या शाईची किमती इतकी जास्त का, असाही प्रश्न तुम्हाला पडेल.

खरंतर याचं उत्तर कठीण नाही.
प्रिंटर स्वस्तात विकल्यावर मग शाई महागात विकणं हे व्यवसायाचं मॉडेल मात्र अर्थपूर्ण आहे.
नाहीतरी तुमच्याकडं दुसरा पर्याय तरी काय असतो?
दुसऱ्या कंपनीचा प्रिंटर विकतं घेणं? जोपर्यंत तुमच्या आताच्या प्रिंटरच्या शाईपेक्षा नवीन प्रिंटर जरा महाग आहे, तो पर्यंत तुम्ही शाईसाठी अनिच्छेने किंमत मोजतच राहता.
असं चालतं किमतीचं रेझर ब्लेड मॉडेल
या 'टू पार्ट प्राईसिंग मॉडेल'ला 'रेझर ब्लेड मॉडेल'ही म्हणतात, कारण याचा मॉडेलचा उगम तिथूनच झाला होता.
प्रथम कमी किंमतीत मिळणाऱ्या रेझरकडे लोकांना आकर्षित करायचं आणि नंतर बदलाव्या लागणाऱ्या ब्लेडसाठी सातत्याने जास्त किंमत वसूल करायची.
हेच आहे किमतीचं 'रेझर ब्लेड मॉडेल'.

फोटो स्रोत, Getty Images
'जिलेट'च्या आधीचं रेझर मोठं आणि जाडजूड होतं. या ब्लेडची धार कमी झाली की पुन्हा धार लावण्यासाठी जास्त किंमत मोजावी लागायची. धार गेलेलं ब्लेड टाकून नवीन घेण्यापेक्षा त्याला धार लावण्याचा पर्याय लोक स्वीकारत होते.
जिलेट यांच्या लक्षात आलं की जर ब्लेड घट्ट पकडून ठेवण्यासाठी काही चांगलं शोधता आला तर ब्लेड अगदी पातळ बनवता येईल. म्हणजेच ब्लेडचा निर्मिती खर्च फारच कमी होऊ शकेल.
अर्थात त्यांनी सुरुवातीलाच 'टू प्राईसिंग मॉडेल' स्वीकारले नाही. सुरुवातीच्या काळात त्यांनी रेझर आणि ब्लेड दोन्हीही महागच ठेवलं होतं.
जिलेट रेझरची किंमत पाच डॉलर इतकी होती. ही रक्कम त्याकाळात एका कामगाराच्या साप्ताहिक पगाराच्या एक तृतीयांश होती.

फोटो स्रोत, Alamy
जिलेट रेझरची किंमत इतकी जास्त होती की 1913 मध्ये सीअर्सच्या कॅटलॉगमध्ये जिलेट रेझरच्या किंमतीवर कायदेशीररीत्या डिस्काउंट देता येणार नसल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली होती. यात एक खुलासाही करण्यात आला होता.
"आमच्या काही ग्राहकांच्या समाधानासाठी हा रेझर कॅटलॉगमध्ये देण्यात आला आहे. या कॅटलॉगमधील कमी किंमतीतील सेफ्टी रेझरपेक्षा हा रेझर जास्त समाधान देईल, असा आमचा दावा नाही," असं यात म्हटलं होतं.
कमी किमतीतील रेझर आणि महाग ब्लेड, हे मॉडेल नंतर जन्माला आलं.
जिलेटच्या पेटंटची मुदत संपल्यानंतर इतर स्पर्धक यात उतरले. त्यानंतर हे किंमतीचं मॉडेल विकसित झालं. सध्याच्या जगात हे मॉडेल सर्वत्र दिसतं.
आता 'प्ले-स्टेशन 4' चा विचार करा. जेव्हा जेव्हा सोनी प्ले-स्टेशन विकते, तेव्हा तेव्हा त्या कंपनीला आर्थिक नुकसान होत असते. कारण प्ले-स्टेशनच्या विक्रीची किंमत निर्मिती खर्चापेक्षा कमी आहे.
पण ते ठीक आहे. कारण जेव्हा प्ले-स्टेशन घेणारे गेम विकत घेतात, तेव्हा मात्र सोनी नफा कमवते.
नेस्लेच्या नेक्सप्रेसो कॉफी मशीनचंही तसंच आहे. नेस्ले मशिन विकून नाही तर कॉफीचे पॉड विकून नफा कमावते.
रेजर ब्लेड मॉडेलला कसं आलं यश
सहाजिकच किमतीचं हे मॉडेल यशस्वीरीत्या चालण्यासाठी रेझरमध्ये ग्राहकानं स्वस्त ब्लेड बसवू नये, यासाठी कुलुप्ती करावी लागते.
त्यासाठी एक मार्ग आहे तो कायदेशीर. तुमच्या उत्पादनाला पेटंटची सुरक्षा देणं. पण पेटंट कायमस्वरुपी नसतात.

फोटो स्रोत, Getty Images
कॉफी पॉडचं पेटंट संपत असल्यानं नेक्सप्रेसोला स्वस्त आणि पर्यायी कॉफी पॉड बनवणाऱ्यांच्या स्पर्धेला तोंड द्यावं लागत आहे. काहीजण नव्या उपायाकडंही पाहत आहेत. हा मार्ग आहे, तंत्रज्ञानाचा.
इतरांचे गेम प्लेस्टेशनमध्ये चालत नाहीत. तसेच नॉनब्रॅंडेड कार्ट्रिज काही प्रिंटरमध्ये चालत नाहीत.
काही कॉफी कंपन्यांनी तुम्हाला जेनरिक कॉफी बनवण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्या मशिनमध्ये चिप बसवल्या आहेत.
स्विचिंग कॉस्टचं महत्त्व

फोटो स्रोत, Getty Images
'टू पार्ट प्राईसिंग' ज्या तत्वावर चालतं, त्याला अर्थशास्त्राच्या भाषेत 'स्विचिंग कॉस्ट' म्हणतात. तुम्हाला दुसऱ्या ब्रॅंडची कॉफी हवी असेल तर दुसरं मशिनच घ्या, असा हा प्रकार आहे.
डिजिटलमध्ये हे जास्तच चालतं. जर तुमच्याकडं प्लेस्टेशनच्या गेमची किंवा किंडलवरील पुस्तकांची मोठी लायब्ररी असेल तर दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाणं तुमच्यासाठी फारच मोठी बाब असते.
ही 'स्विचिंग कॉस्ट' दर वेळी आर्थिक असते, असं नाही. ती किंमत वेळ, सोय यांचीही असू शकते.
जर मला अडोबी फोटोशॉपची सवय असेल तर मी त्याच्या महागड्या अपग्रेडसाठी पैसे मोजण्याची शक्यता जास्त असते. कारण स्वस्तातील सॉफ्टवेअरसाठी ते कसं वापरायचं, हे शिकावंही लागणार असतं.
ब्रॅंड लॉयल्टी
म्हणून सॉफ्टवेअर कंपन्या मोफत ट्रायल देतात. बॅंका आणि इतर सेवा पुरवणारे लोकांना आकर्षित करण्यासाठी विशेष स्वागत मूल्य देत असतात. कारण नंतर जेव्हा नकळत किंमत वाढते, तेव्हा कोणी बदल करण्याची तसदी घेत नाही.
ही 'स्विचिंग कॉस्ट' मानसिकही असते. ते ब्रॅंडसोबत असणाऱ्या निष्ठेतून येते.
जर जिलेटच्या मार्केटिंग विभागाने माझी खात्री पटवली की इतर ब्लेडनं होणारी दाढी ही कमी प्रतीची असते, तर मी जिलेटच्या ब्रँडेड ब्लेडसाठी जादा पैसे मोजण्यासाठी तयार असतो.
जिलेटचं पेटंट संपून आणि स्पर्धक कंपन्यांनी स्पर्धात्मक किमतीला ब्लेडची विक्री सुरू केल्यानंतर जिलेटचा नफा जास्तच वाढला. या विलक्षण सत्याचा उलगडा यातून होऊ शकेल.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








