ब्रेन गेम : मेंदूला खाद्य की निव्वळ टाइमपास?

मेंदूचे प्रारूप

फोटो स्रोत, Science Photo Library

बुद्धीला चालना देणारे खेळ मेंदूच्या आरोग्याला लाभदायी ठरतात, असा समज आहे. असे 'ब्रेन गेम' खेळण्याकडे सगळ्यांचा मोठा ओढा असतो.

ग्लोबल कौन्सिल ऑन ब्रेन हेल्थनं नुकताच या समजाचा अभ्यास केला. लंडनमध्ये सुरू असलेल्या संशोधनातून याबद्दलची आणखी माहिती समोर येते आहे.

सुडोकू खेळल्याने स्मरणशक्ती वाढते! गेमचा स्कोअर वाढतो, तसा मेंदू तल्लख होतो! छंद म्हणजे निव्वळ टाइमपास! असाच आपला आजवरचा समज... तो खरा आहे का?

ग्लोबल कौन्सिल ऑन ब्रेन हेल्थनं नुकताच या समजांचाही अभ्यास केला. या अभ्यासातून आलेल्या निष्कर्षांनी, या समजुतींना पुरता धक्का दिला आहे.

वेळखाऊ ब्रेन गेम खेळण्यापेक्षा, एखादं वाद्य शिका, शिवणकाम करा, बागकामात रस घ्या त्याचाच फायदा होईल. त्यामुळे छंद जोपासा, असाच या अभ्यासाचा सूर आहे.

एवढंच नाही, लहान वयात हे छंद जोपासले तर, उतार वयात मेंदू तल्लख राहण्यास मदत होतेच.

शिवाय, नवीन काही शिकायचं असेल तर त्याला वयाचं बंधन नसतं, यावरही या अभ्यासानं शिक्कामोर्तब केले आहे.

लंडनच्या या संस्थेत मेंदूविषयी सतत संशोधन सुरू असते. मेंदूचा अभ्यास करणाऱ्या या कौन्सिलमध्ये आतंरराष्ट्रीय ख्यातीचे वैज्ञानिक, आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिक, धोरण तज्ज्ञ यांचा समावेश आहे.

मेंदूची ग्रहण क्षमता कायम राखण्याबरोबरच, मेंदूला चालना देण्याचे उत्तम मार्ग कोणते याचा शोध घेण्याचा प्रयत्न या कौन्सिलने केला.

... आणि त्यातूनच, आपले समज 'गैर' ठरले!

मेंदूचा ऱ्हास ही थांबवता येणारी गोष्ट आहे! या क्षणी शिकता येतील अशा असंख्य गोष्टी आसपास आहेत. त्या करू लागलो, तर त्याचा मेंदूच्या आरोग्यास फायदा होईल, असं एज यूकेचे मुख्य वैज्ञानिक जेम्स गुडविन म्हणतात.

ऑनलाइन गेम, कोडी, स्मरणशक्तीचे खेळ यामुळे मेंदूला फायदा होतो, यात फारसं तथ्य नाही.

तसंच, सातत्यानं ब्रेन गेम खेळल्यानं, त्या खेळात आपण पारंगत होऊही कदाचित, पण त्यानं मेंदूची क्षमता वाढत असल्याचा कोणताही पुरावा नाही.

थोडक्यात, सुडोकूतील हुशारी आर्थिक नियोजनाचं कोडं सोडवण्यात उपयोगाची नाही.

ग्लोबल कौन्सिल ऑन ब्रेन हेल्थच्या स्थापनेत सहकार्य करणाऱ्या एज यूके या संस्थेचे मुख्य वैज्ञानिक जेम्स गुडविन यांनी हे सगळं आणखी उलगडू्न सांगितलं.

त्याऐवजी नवीन काही शिकणं मेंदूच्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असतं. एखादं वाद्य, नवीन भाषा, संगीत, हस्तकला असं शिकल्याने मेंदू तल्लख राहण्याची शक्यता जास्त असते.

नवीन काही शिकायचं असल्यास वयाचं कोणतंही बंधन नाही, हे खरंच! पण, मेंदूच्या आरोग्याची काळजी घ्यायची असेल,

तर त्यासाठी वय सरण्याची वाट बघू नका, तत्काळ कामाला लागा, हेच या अभ्यासाचं सार आहे.

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)