श्रीकांत बोल्ला : अंध म्हणून शिक्षण नाकारलं गेलं, पण आज तो कोट्यवधी कमावणारा उद्योजक आहे

फोटो स्रोत, SRIKANTH BOLLA
श्रीकांत बोल्ला यांच्यावर हिंदी सिनेमा बनतोय. श्रीकांत बोल्ला यांनी 48 मिलियन पाऊंडच्या कंपनीची उभारणी केलीय आणि त्याचे ते सीईओ आहेत.
श्रीकांत बोल्ला यांना शिक्षणादरम्यान गणित आणि विज्ञान शिक्षण्यास नकार देण्यात आला होता. कारण ते दृष्टीहीन आहेत. मग त्यांनी कोर्टाचे दार ठोठावले. त्यानंतर त्यांना गणित, विज्ञान शिकण्याची परवागनी देण्यात आली. अरुंधती नाथ यांनी याबाबत सविस्तर आढावा घेतलाय…

भारतातल्या ग्रामीण भागात राहणारा श्रीकांत बोल्ला सहा वर्षाचा असताना, दोन वर्षे दररोज काही किलोमीटर चालत जाऊन शालेय शिक्षण घेत असे. त्याच्या भावाचं मार्गदर्शन आणि वर्गमित्रांच्या मदतीनं तो असा दररोज शाळेत जात असे.
शाळेकडे जाणारा रस्ता चिखलाचा, रस्त्यात दगडगोटे होते. पावसाळ्यात रस्ता जवळपास पाण्याखाली जात असे. तो काळ श्रीकांतसाठी फार कठीण होता.
मी दृष्टीहीन असल्यानं माझ्याशी कुणी बोलत नसे, असं श्रीकांत सांगतो.
गरीब घरातला जन्म, अशिक्षित आई-वडील. श्रीकांतला जवळपास समाजानं नाकारलंच होतं.
"माझ्या आई-वडिलांना लोक सांगत की, स्वत:च्या घराचा वॉचमनही बनू शकत नाही. कारण मी दृष्टीहीन असल्यानं कुत्रा जरी आत आला तरी दिसणार नाही."
"अनेकजण माझ्या आईकडे येत असत आणि उशीच्या सहाय्यानं माझी हत्या करून टाकण्याचा सल्ला देत असत."
31 वर्षांचे श्रीकांत बोल्ला त्यांची कहाणी सांगत होते.

फोटो स्रोत, SRIKANTH BOLLA
या सगळ्याकडे दुर्लक्ष करत श्रीकांतच्या आई-वडिलांनी, त्यांच्या मुलाला म्हणजे श्रीकांतला पाठिंबा दिला, वाढवलं. श्रीकांत आठ वर्षांचा असताना त्याचे वडील म्हणाले, माझ्याकडे एक आनंदाची बातमी आहे. श्रीकांतला दृष्टीहीन मुलांच्या बोर्डिंग स्कूलमध्ये जागा मिळाली होती.
श्रीकांत हैदाराबादमध्ये म्हणजे त्याच्या घरापासून जवळपास 400 किलोमीटर अंतरावर स्थलांतरित होणार होता. हैदराबाद तेव्हा आंध्र प्रदेशची राजधानी होती.
आई-वडिलांपासून दूर असूनही श्रीकांतचा तिथेही लवकर जम बसला. तो तिथे पोहायला शिकला, बुद्धिबळ खेळायला शिकला आणि क्रिकेटही खेळू लागला. हात आणि कानाचा नीट वापर करून त्यानं त्याच्या दृष्टीहीनतेवर मात करत या गोष्टी शिकल्या.
श्रीकांतनं त्याच्या छंदांचा आनंद घेण्यास सुरुवात केली. यानंतरच त्यानं त्याच्या भविष्याबद्दल अधिक उत्साहानं विचार करू लागला. इंजिनअर बनण्याचं श्रीकांतचं आधीपासूनच स्वप्न होतं आणि त्यासाठी गणित व विज्ञानाचं शिक्षण घ्यावं लागेल याची त्याला कल्पना होती.
जेव्हा हे विषय शिकण्याची वेळ आली, तेव्हा त्याच्या शाळेनं त्याला स्पष्ट नकार दिला आणि सांगितलं हे बेकायदेशीर आहे.
भारतात शाळा वेगवेगळ्या संस्थांमार्फत चालवल्या जातात. प्रत्येक राज्याचे वेगवेगळे नियमही आहेत. काही शाळा राज्य सरकारच्या अंतर्गत, तर काही शाळा केंद्र सरकारच्या अंतर्गत येतात, तर काही शाळा खासगी संस्था चालवतात.
श्रीकांतची शाळा आंध्र प्रदेशच्या राज्य शिक्षण विभागातर्फे चालवली जाते आणि तिथं दृष्टीहीन मुलांना गणित व विज्ञान शिकवण्याची परवानी नव्हती. कारण त्यात अनेक अडथळे आणि आव्हानं निर्माण होण्याची शक्यता ग्राह्य धरण्यात आली होती. व्हिजुअल डायग्राम्स, ग्राफ्स इत्यादी गोष्टी त्यात समाविष्ट असतात.
त्याऐवजी अशा दृष्टीहीन मुलांनी कला, भाषा, साहित्य आणि समाजशास्त्र यांसारखे विषय शिकावे, अशी शिक्षण विभागाचं मत होतं.
2007 सालची ही गोष्ट. श्रीकांत या नियमांना वैतागला होता. सर्व विद्यार्थ्यांना सारखे नियम नसणारी ही शाळा असल्याचं त्याला वाटलं. स्वर्णलता तक्कीलपटी याही या नियमांना वैतागल्या होत्या आणि त्यांनी श्रीकांतला याविरोधात आवाज उठवण्यास प्रवृत्त केलं.
या दोघांनीही आंध्र प्रदेशच्या माध्यमिक शिक्षण मंडळाचं दार ठोठावलं आणि या विषयावर मार्ग काढण्याची विनंती केली. मात्र, यात काही करू शकत नसल्याचं म्हणत त्यांनी ते फेटाळलं.
त्यानंतर त्यांनी शाळेच्या व्यवस्थापनाच्या मदतीने एक वकील शोधला आणि आंध्र प्रदेश हायकोर्टात याचिका दाखल केली. दृष्टीहीन विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान शिकण्याची परवानगी देण्याची मागणी या याचिकेतून त्यांनी केली.
"वकील आमच्या बाजूने लढले. विद्यार्थ्यांना कोर्टात हजर राहण्याचीही गरज भासली नाही," असं श्रीकांत सांगतो.
हा खटला प्रलंबित राहिल्यानंतर श्रीकांतनं एक अफवा ऐकली की, हैदराबादमधील चिन्मया विद्यालय दृष्टीहीन मुलांसाठी गणित आणि विज्ञान विषय शिकवतं. श्रीकांतनं तातडीनं तिथं प्रवेश घेतला.
चिन्मया विद्यालयातल्या त्याच्या वर्गात श्रीकांत एकटाच दृष्टीहीन विद्यार्थी होता. मात्र, या शाळेनं मोठ्या मनानं माझं स्वागत केलं, असं श्रीकांत सांगतो.
"माझी वर्गशिक्षिका अत्यंत चांगली आणि मदत करणारी होती. त्यांना जे शक्य आहे, ते ते त्यांनी माझ्यासाठी केलं. स्पर्शानं जाणवणारा आलेख (Tactile Diagrams) रेखाटण्यास त्या शिकल्या."
टॅक्टाईल डायग्राम म्हणजे रबराच्या मॅटवर बारीक फिल्मच्य सहाय्यानं आलेख रेखाटणं. त्यावर पेन्सिलनं आलेख काढल्यानंतर, त्याला स्पर्श करता येतो आणि ओळखता येतो.
सहा महिन्यांनंतर कोर्टातून एक बातमी आली - श्रीकांत खटला जिंकला होता.
कोर्टानं निर्णय दिला की, आंध्र प्रदेशातील राज्य महामंडळाच्या सर्व शाळांमध्ये दृष्टीहीन विद्यार्थी गणित आणि विज्ञान विषय शिकता येतील.
"मला खूप आनंद झाला. मी करू शकलो, हे जगासमोर मला सिद्ध करता आलं. त्यासाठी ही पहिली संधी मिळाली होती."
'हे तर लहानशा रोपावर पाऊस पडल्यासारखं'
श्रीकांत लवकरच त्याच्या शाळेत परतला आणि त्यानं गणित आणि विज्ञान विषय शिकण्यास सुरुवात केली. या विषयातल्या परीक्षेत त्यानं 98 टक्के मिळवले.
यानंतर श्रीकांतचं स्वप्न होतं...ते म्हणजे, भारतातील प्रतिष्ठित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (IIT) मध्ये प्रवेश मिळवण्याचं.
आयआयटीमध्ये प्रवेशासाठी प्रचंड स्पर्धा असते. एन्ट्रन्स एक्झामसाठीच कित्येकजण कोचिंग क्लास लावतात. मात्र, कुठल्याच कोचिंग क्लासनं श्रीकांतला स्वीकारलं नाही.
"मला एका मोठ्या कोचिंग क्लासनं सांगितलं की, या कोर्सचा ताण तुझ्यावर एखाद्या लहानशा रोपावर पाऊस पडल्यासारखा होईल. पण मला वाईट वाटलं नाही. जर आयआयटीला मी नको असेन, तर मला आयआयटी नकोय," असं श्रीकांत सांगतो.
त्यानंतर श्रीकांतनं अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न केले आणि त्याला पाच ऑफरही मिळाल्या. अखेर त्यातील कॅम्ब्रिज एमआयटी, मॅसाच्युसेट्समध्ये त्यानं प्रेवश घेतला. तिथं तो श्रीकांत पहिला आंतरराष्ट्रीय दृष्टीहीन विद्यार्थी ठरला. 2009 साली श्रीकांतनं अमेरिकेच्या जमिनीवर पाऊल ठेवलं. त्याला सुरुवातीच्या दिवसात थोडे मिश्र स्वरुपाचे अनुभव आले.
"टोकाची थंडी ही माझ्यासाठी धक्कादायक होती. मी इतक्या थंडीत याआधी कधी राहिलो नव्हतो. तसंच, तिथं मिळणारं अन्नही माझ्यासाठी नवीन होतं. त्यानं तसं अन्न आधी खाल्लं नव्हतं. पहिल्या महिन्यात तर मी बरेच दिवस चिकन फ्राईज आणि फ्रेंच फ्राईजवरच काढले."
त्यानतर हळूहळू श्रीकांतनं तिथं राहण्याची सवय करून घेतली.
"एमआयटीमधील काळ हा माझ्यासाठी सर्वात भारी कालावधी होता. अभ्यासाच्या दृष्टीने बोलायचं झाल्यास, थोडासा कठीणही होता. मात्र, तिथल्या दृष्टीहीनांसाठीच्या सोयी-सुविधा बऱ्यापैकी चांगल्या होत्या. या सर्व गोष्टींनी माझ्या अभ्यासात वेग आणला."
शिकत असतानाच श्रीकांतनं हैदराबादमध्ये समान्वयी सेंटर फॉर चिल्ड्रन विथ मल्टिपल डिझॅबिलिटी नावाची स्वयंसेवी संस्था सुरू केली. या संस्थेद्वारे दिव्यांगांना शिक्षण आणि प्रशिक्षणाचं काम सुरू करण्यात आलं. पैसे गोळा करून श्रीकांतनं ब्रेल लायब्ररीही सुरू केली.
आयुष्य नीट चाललं होतं. एमआयटीमध्ये व्यवस्थापनशास्त्र शिकल्यानंतर श्रीकांतला नोकऱ्यांच्या अनेक ऑफर्स येऊ लागल्या. मात्र, त्यानं अमेरिकेतच राहण्याचं ठरवलं.
श्रीकांतनं शालेय जीवनात जे पाहिलं, अनुभवलं होतं, त्याचा त्याच्यावर मोठा परिणाम झाला होता. श्रीकांतला वाटत होतं की, आपल्या देशातच आपलं बरचसं आपलं काम बाकी आहे.
नवीन प्रवासाला सुरूवात
"मला आयुष्यात खूप खडतर प्रवास करावा लागला आहे. माझ्यासारखं कुणाला लढू शकत नाही. माझ्यासारखा कुणी मार्गदर्शकही कुणी नसेल," असं श्रीकांत सांगतात. नंतर श्रीकांतला असंही वाटलं की, जर शिक्षणानंतर दिव्यांगांना नोकऱ्या मिळत नसतील, तर त्यांच्या शिक्षणासाठी संघर्ष करण्यात काहीच अर्थ उरत नाही.
त्यामुळे श्रीकांतनं विचार केला की, "आपणच आपली कंपनी का सुरू करू नये? आणि तिथं अशा दिव्यांग व्यक्तींनाच का नोकरी देऊ नये?"
श्रीकांत शिक्षण पूर्ण केल्यानंतर 2012 साली हैदराबादमध्ये परतला आणि त्यानं 'बोल्लान्ट इंडस्ट्रीज'ची सुरुवात केली. बोल्लान्ट इंडस्ट्रीज पॅकेजिंग कंपनी असून, तिच्याद्वारे इकोफ्रेंडली प्रॉडक्ट्स बनवले जातात. या कंपनीची आताची एकूण संपत्ती 48 मिलियन पाऊंड झालीय. म्हणजे जवळपास पाच अब्जांपर्यंत.

फोटो स्रोत, BOLLANT INDUSTRIES
श्रीकांतनं बोल्लान्ट इंडस्ट्रीजमध्ये मानसिक आजारासह इतर दिव्यांगांना जास्तीत जास्त नोकऱ्या दिल्यात. कोरोनापूर्वी कंपनीतल्या 500 कर्मचाऱ्यांपैकी 36 टक्के कर्मचारी दिव्यांग होते.
गेल्यावर्षी श्रीकांत 30 वर्षांचा होता. वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या यंग ग्लोबल लीडर्स 2021 च्या यादीत श्रीकांतचं नावही चमकलं होतं. श्रीकांतला आता आशा आहे की, येत्या तीन वर्षात त्याची बोल्लान्ट इंडस्ट्रीज ग्लोबल आयपीओ होईल आणि जगातल्या अनेक स्टॉक एक्स्चेंजमध्ये त्याचे शेअर्स लिस्ट होतील.
श्रीकांतचं आयुष्य एखाद्या सिनेमासारखं आहे. त्यामुळे भारतीय सिनेसृष्टीची त्याच्याकडे नजर नसती, गेली तरच नवल. बॉलिवूडमध्ये त्याच्यावर आता सिनेमा येतोय. प्रसिद्ध अभिनेता राजकुमार रावने याची घोषणा केलीय. या सिनेमामुळे लोक त्याला आणि त्याच्यासारख्या लोकांना कमी लेखणं बंद करतील, अशा आशा श्रीकांतला वाटते.
"सुरुवातीला लोक म्हणतील, 'अरे, हा दृष्टीहीन आहे. किती दु:खी आहे' पण ज्या क्षणी मी सांगेन की, मी कोण आहे आणि काय करतो, तेव्हा सर्वकाही बदलेल."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








