एका रस्त्याच्या दुतर्फा वसलेलं गाव जिथं राहतात 6 हजार लोक

फोटो स्रोत, Getty Images
जगात अनेक गावं असतील जी एखाद्या खास वैशिष्ठ्यासाठी प्रसिद्ध असतील. एखादं गाव स्वच्छतेत एक नंबर असू शकतं. काही त्यांच्या नैसर्गिक सुंदरतेसाठी किंवा भूगोलासाठी ओळखलं जाऊ शकतं. पण पोलंडमध्ये एक गाव आहे जे 9 किलोमीटर लांब रस्त्यावर वसलेलं आहे.
एखाद्या ड्रोन कॅमेऱ्यातून या गावाकडे पाहिलं तर ते एका रंगीबेरंगी वळणदार शेतांची मालिकेसारखं दिसतं.
पण जसं तुम्ही जवळजवळ जाता तसं तुम्हाला रस्त्याच्या दोन्ही बाजूला घरं दिसू लागतात. सोबत शेतीचे पट्टे दिसतात.
या रस्त्याच्या दोन्ही बाजूला 10-12 नव्हे तर तब्बल 6 हजार लोकांची घरे आहेत. एका टोकाच्या घरापासून रस्त्याच्या दुसऱ्या टोकावर राहणाऱ्या व्यक्तीचं घरं सुमारे 9 किलोमीटर दूर आहे.
या गावातले गावकरी एकमेकांच्या घरी जायचं म्हटलं तर 2-3 किलोमीटर चालत जातात. वाटेत कुणी भेटलं तर त्यांना लगेच लिफ्ट मिळते.

फोटो स्रोत, Getty Images
रस्त्याच्या दुतर्फा वसलेलं हे गाव पोलंडमधील मालोपोल्स्का प्रांतात आहे. याला त्याठिकाणी 'मिनी पोलंड' असंही म्हटलं जातं.
मनाला भूरळ घालणाऱ्या या मध्य युरोपीय देशातील या गावाचं नाव आहे सुलोझोवा.
या गावाला पोलिश हिरा म्हणूनही ओळखलं जातं.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला मिळून 1600 घरं असल्याचं सांगितलं जातं.
काही दिवसांपूर्वी शहराचे ड्रोनमधून काढलेले फोटो जेव्हा सोशल मीडियावर पोस्ट केले. तेव्हा ते व्हायरल झाले होते.
सुलोझोवा हे गाव ओजकोव्स्की नॅशनल पार्कचा एक भाग आहे.
हे गाव ज्या रस्त्यावर आहे त्याचं नाव आहे क्राकोव्स्का. हा पोलंडमधील सर्वात लांब रस्ता आहे.
याच रस्त्यावर सुमारे 9 किलोमीटरच्या पट्ट्यात या गावातील घरे वसली आहेत.
16व्या शतकात पोलंड राज्याच्या एका सैन्य अधिकाऱ्याने या गावाची स्थापना केली होती, असं सांगितलं जातं.
सुरुवातीला या गावातील घरे 500 मीटर पट्ट्यात वसली होती. पण हळूहळू त्यांच्या संख्या वाढली.
या गावात हॉस्पिटल, बँक, शाळा अशा सगळ्या सुविधा आहेत.
सुलोझोवा शहरात लोकांना राहायला का आवडतं?
"इथे लोक एकोप्याने आणि गुण्यागोविंदाने राहतात,” असं स्थानिक दुकानाचे मालक एडिटा यांनी डेली मेलला सांगितलं.
“आमच्याकडे स्ट्रॉबेरी डे असतो. जेव्हा आपण सर्व एकत्र येतो. नवीन पिकांचा आस्वाद घेतो आणि संगीत पार्टी करतो. तसंच आमच्याकडे बटाटा डे देखील आहे. त्यावेळी पण आम्ही एकत्र येतो आणि मजा करतो," असं एडिटा सांगतात.
इथे अनेकजण त्यांच्या शेतात राहतात. घराच्या मागे गेलं तर 1 ते 2 किलोमीटर लांब शेताचे पट्टे पाहायला मिळतात.
कदाचित त्यामुळेच हे लोक एका ठिकाणी न राहता सुमारे 9 किलोमीटर पट्ट्याच्या रस्त्यावर राहात असावेत

फोटो स्रोत, Getty Images
इतर लहान शहरांप्रमाणे सुलोझोवाच्या लोकांनाही गप्पाटप्पा करायला आवडतात. आम्ही सर्व एकमेकांना ओळखतो, असंही स्थानिक सांगतात.
महाराष्ट्रात जसं तालुक्याच्या ठिकाणी गावचा माणूस भेटला तर आपण त्यांच्याच गाडीवर घरी येतो. तसंच दूरच्या ठिकाणी या गावचं कुणी भेटलं तर सगळे सोबत येतात, असं स्थानिक सांगतात.
दिवसभर कामाची गजबज असली तर रात्र झाली की या गावात नीरव शांतता पसरते.

फोटो स्रोत, Getty Images
सुलोझोवामध्ये पर्यटकही येतात. पिस्कोवा स्काला किल्ला हा इथल्या आकर्षणाचं केंद्र आहे. तो गरुडांची घरटी असणाऱ्या रस्त्यावर आहे.
हा किल्ला पण ओजकोव्स्की नॅशनल पार्कच्या हद्दीत येतो. या गावात अनेक पर्यटक भेट देत असले तरी सध्या अनेक तरुण आता इतर ठिकाणी स्थलांतर करत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
14व्या शतकात राजा कॅसिमिर III द ग्रेट याने राज्या संरक्षणासाठी किल्ल्यांची साखळीच बांधली होती. त्याला ‘निडोस डी अगुइला’ असं म्हटलं जातं.
सुलोझोवाकडे जाताना रस्त्यात तुम्हाला 'हर्क्यूलिस' क्लब, 30 मीटर उंच चुनखडीचा स्तंभ दिसतो. अनेकजणांसाठी तोही आकर्षणाचं केंद्र ठरत आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








