यशवंत घाडगे : दुसऱ्या महायुद्धात एकट्या मराठी सैनिकाने जर्मन छावणी उद्धवस्त केली होती

- Author, गणेश पोळ
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
यशवंत घाडगे या मराठी सैनिकाच्या स्मरणार्थ इटलीमधील मॉन्टोन शहरात नुकतंच एक स्मारक उभारलं आहे.
इटली सरकार आणि भारतीय दूतावास यांच्या संयुक्त विद्यामाने हे स्मारक उभारण्यात आलं आहे. दुसऱ्या महायुद्धातील भारतीय सैनिकांच्या शौर्य आणि बलिदानाचं ते प्रतीक असल्याचं सांगण्यात येत आहे.
तसंच यामुळे भारत आणि इटलीमधील द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होतील असं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.
22 जुलै 2023 रोजी झालेल्या या स्मारक उभारणीच्या कार्यक्रमासाठी भारतीय दुतावासातील अधिकारी, मॉन्टोन शहराचे महापौर, सैन्य अधिकारी, लष्करी इतिहासकार आणि इटलीचे नागरिक उपस्थित होते.
त्यावेळी एक विशेष पोस्ट कार्डही जारी करण्यात आलं आहे.
रायगडमधील एका गावात जन्मलेल्या घाडगे यांच्या शौर्यासाठी इटलीत स्मारक उभारल्याबद्दल महाराष्ट्र आणि भारतासाठी ही अभिमानाची बाब असल्याचं सांगण्यात येत आहे.
यशवंत घाडगे हे सैन्यात कसे भरती झाले?
रायगडच्या माणगाव तालुक्यातील पळसगाव-आंब्रेची वाडी इथे यशवंत बाळाजी घाडगे यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव विठाबाई तर वडिलांचं नाव बाळाजीराव.
घाडगे हे गरीब शेतकरी कुटुंब होतं. यशवंत यांना एक भाऊ आणि चार बहिणी होत्या.
यशवंत अवघ्या तीन महिन्यांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झालं. तेव्हा यशवंत यांचे मोठे भाऊ वामन हे सैन्यात भरती झाले होते.
घरची परिस्थिती बेताची असल्याने पतीच्या निधनानंतर आई विठाबाईंना शेतात काम करावं लागायचं. सोबत मोलमजुरी पण करायच्या.
यशवंत यांना पळसगावच्या मराठी शाळेत घातले. वयाच्या अकराव्या वर्षी यशवंत मराठी चौथीची परीक्षा उत्तीर्ण झाले.
उच्च शिक्षणासाठी शहरात जाणे हे घरच्या गरिबीमुळे अशक्य होते. त्यामुळे यशवंत लोकांच्या शेतांवर मोलमजुरी करू लागले.
पुढे सहा वर्षांनंतर थोरले भाऊ वामन सैन्यातून निवृत्त होऊन गावी आले. तेव्हा भावाप्रमाणे सैन्यात जावे असे यशवंत यांनाही वाटू लागले.
तसा त्यांना लाठी, बोथाटी, दांडपट्टा फिरवणे आणि कसरत करण्याची आवड होती. त्यांची शरीरयष्टी सडपातळ, काटक आणि मजबूत होती.
पण यशवंत यांनी सैन्यात भरती व्हावं असं विठाबाई यांना वाटत नव्हते. पण मोठे भाऊ वामन दादाचा आग्रह आणि यशवंत यांचा हट्ट यांमुळे विठाबाईचा नाइलाज झाला.

फोटो स्रोत, Embassy of India Rome (Italy)
शेवटी आईने परवानगी दिली. पण एका अटीवर. यशवंतने सैन्यात भरती व्हायच्याआधी लग्न केलं तर आपण त्याला जाऊ देणार असं म्हटलं. यशवंतने आईची अट मान्य केली.
वयाच्या 18व्या वर्षी सन 1937 साली पाटणूसच्या पांडुरंग महामुणकरांची कन्या लक्ष्मीबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
लग्न झालं की दुसऱ्याच वर्षी सन 1938 साली पाचव्या मराठा लाईट इन्फ्रन्ट्रीमध्ये ते शिपाई म्हणून दाखल झाले.
त्यांची सैन्यातली कामगिरी पाहून त्यांना लवकरच नाईक पदावर बढती मिळाली.
त्यावेळी दुसर्या महायुद्धाचे वारे वाहू लागले होते. जर्मनी, इटली आणि जपान असा एका गट पडला. तर फ्रान्स, ब्रिटन, सोव्हिएत संघ आणि अमेरिका असा दुसरा गट झाला.
दुसऱ्या महायुद्धात घाडगे यांची कामगिरी
1939 ते 1945 या दरम्यान दुसरे महायुद्ध झालं. ब्रिटिश फौजांसोबत लढण्यासाठी पाचव्या मराठा लाइट इन्फन्ट्रीला इटलीला पाठवलं होतं, असं लष्करी इतिहासकार मनदीप सिंग बाजवा सांगतात.
त्यावेळी नाईक यशवंत घाडगे हे मराठा लाईटइन्फ्रन्ट्रीमध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळत होते.
त्यांची तुकडी मित्र राष्ट्रांतर्फे इटली आणि जर्मनीविरोधात लढत होती. दुसरं महायुद्ध शिगेला पोहोचलं होतं.
तो दिवस होता 10 जुलै 1944. जर्मन सैन्याच्या ताब्यात असलेली छावणी ताब्यात घेण्यासाठी यशवंत घाडगे आणि त्यांची तुकडी इटलीतील टायबर नदीच्या खोऱ्यात दाखल झाली होती.
"तेव्हा जंगलाचा आधार घेऊन लपून बसलेल्या जर्मन सैन्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. दोन्ही बाजूंनी बंदुका, टॉमीगन्स, तोफा धडधडू लागल्या. घाडगे यांच्या तुकडीवर शत्रुने अगदी जवळून मोठ्या मशीन-गनने गोळीबार केला. त्यात यशवंत घाडगे यांच्या तुकडीतील बहुतेक सैन्य ठार झाले. तर इतर जायबंदी झाले. आता आपल्यासोबत एकही सहकारी सैनिक उरला नाही याची कल्पना असतानाही घाडगे यांनी तिथून पळ काढला नाही. ते ठाणे जिंकेपर्यंत घाडगे लढत राहिले," असं बाजवा यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सागंतिल.
सर्वात आधी घाडगे यांनी मशीनगनच्या दिशेने हातगोळा भिरकावला. त्यात शत्रूची मशीनगन निकामी झाली. त्यानंतर ताबडतोब त्यांनी तिथल्या शत्रू सैन्यावर टॉमी गनने गोळ्या झाडल्या.

फोटो स्रोत, Getty Images
शत्रू ठाण्याचे रक्षण करणारे 4 इटलीचे सैनिक घाडगे यांच्या हल्लामुळे ठार झाले.
सोबतचे सगळे सैन्य गारद झालेले असताना ते जर्मन तुकडीवर भारी पडत होता.
पण शत्रूवर समोरासमोर आक्रमण करताना अचानक आपल्याकडील काडतुसे आणि हातबाँब यांचा साठा संपल्याचं घाडगेंच्या लक्षात आलं.
त्यांनी मागचापुढचा विचार न करता आपली बंदूक उलट धरून शत्रूच्या सैनिकांवर झेप घेतली.
बंदुकीच्या दस्त्याने हाणामारी करून ते शत्रुसैनिकांना लोळवू लागले. शेवटी घाडगे यांच्या पलटणीने गोथिक लाईन काबीज केली.
पण तेवढ्यात जवळच्याच खंदकात लपलेल्या एका जर्मन सैनिकाने संधी साधून त्यांच्यावर गोळी झाडली.
या गोळीने अचूक वेध घेतला आणि मोहिमेच्या त्याच दिवशी म्हणजे 10 जुलै 1944 रोजी घाडगेंची प्राणज्योत मावळली. तेव्हा ते फक्त 22 वर्षांचे होते. यशवंत घाडगे शौर्याने लढले. पण पार्थिव मिळालं नाही.
ले. जनरल डी बी शेकटकर यांनीही घाडगे यांच्या शौर्याला दुजोरा दिला.
"नाईक यशवंत घाडगे यांनी दाखवलेल्या शौर्य आणि धाडसासाठी दिल्लीतील लाल किल्ल्यासमोरील मैदानात भरलेल्या दरबारात त्यांना मरणोपरांत व्हिक्टोरिया क्रॉस (VC) हा किताब देण्यात आला. ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ हा ब्रिटीश सैन्यातील सर्वोच्च सन्मान मानला जातो," असं शेकटकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

व्हाइसरॉय आणि गव्हर्नर जनरल फील्ड मार्शल लॉर्ड वेव्हेल यांच्या हस्ते घाडगे यांच्या लक्ष्मीबाईंना हे मानाचे पदक प्रदान करण्यात आले.
नाईक यशवंतराव घाडगे यांच्या स्मरणार्थ माणगावच्या मामलेदार कचेरीजवळही त्यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे.
माणगावमध्ये दरवर्षी 9 जानेवारीला ‘घाडगे महोत्सव’ साजरा करण्यात येतो.
यशवंत घाडगे यांच्या पराक्रमाचा तपशील लंडन गॅझेट, नॅशनल आर्मी म्युझियम, लंडन, महाराष्ट्र नायक (राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र शासन) आणि भारतीय सैन्यदलाच्या दस्ताऐवजात सविस्तर मांडला आहे.
दुसऱ्या महायुद्धातील मराठा लाईट इन्फंट्रीचं योगदान
4 ऑगस्ट 1768 रोजी मुंबईत मराठा रेजिमेंटची स्थापना झाली. त्यावेळी ‘1 मराठा लाईट इन्फंट्री’ असं म्हटलं गेलं.
मराठा रेजिमेंटने पहिलं महायुद्ध आणि दुसऱ्या महायुद्धात महत्त्वाची कामगिरी केली, असं निवृत्त लेफ्टनंट जनरल डीबी शेकटकर यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
"इटलीतील मोहिमेने मराठा रेजिमेंटची सर्वात कठोर परीक्षा घेतली. कारण त्यांच्यासमोर थेट इटलीचं सैन्य उभं ठाकलं होतं. सिटा डी कॅस्टेलो आणि सेनियो नदीचा किनारा या प्रदेशात मराठा इन्फन्ट्रीने केलेल्या मराठा रेजिमेंटची कामगिरीची आजही आठवण काढली जाते. तिथे केलेल्या पराक्रमाबद्दल सोलापूरच्या नामदेव जाधव यांनाही व्हिक्टोरिया क्रॉस हा किताब देण्यात आला होता.
"याशिवाय दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी इशान्य भारतात जपानी सैन्याविरोधात मराठा सैन्य लढलं आहे. तिथल्या कामगिरीबद्दल या रेजिमेंटला 'Battle Honour' देण्यात आले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








