जेव्हा पहिल्या महायुद्धात फ्रान्सने उभं केलं होतं खोटं पॅरिस

- Author, गॅविन मोर्टिमर
- Role, बीबीसी हिस्ट्रीएक्स्ट्रा
4 ऑक्टोबर 1920 रोजी ब्रिटनच्या 'द ग्लोब' या वृत्तपत्रात एक बातमी छापून आली होती. या बातमीची हेडलाईन होती 'A Mock Paris : French Plan To Decieve German Invaders' (नकली पॅरिस : जर्मन आक्रमकांना चकवा देण्यासाठी फ्रान्सची युक्ती). बातमीची हेडलाईन फारच रंजक होती. पण, त्यावर विश्वास ठेवणं जवळपास कठीण होतं.
बातमीत लिहिलं होतं, "पहिल्या महायुद्धादरम्यान दोन्ही पक्षांमध्ये तात्पुरती युद्धबंदी झाली होती. दोन्ही बाजूने सैन्य कारवाई थांबवण्यात आली होती. फ्रान्सने ही संधी साधली आणि त्यांच्या इंजिनिअर्सने एक महत्कार्य हाती घेतलं. त्यांनी पॅरिसपासून दूर अंतरावर हुबेहुब पॅरिससारखं दिसणारं नवं शहर उभारायला सुरुवात केली. खऱ्या पॅरिसची हुबेहुब नक्कल करत अगदी तशीच घरं, गल्ल्या, रस्ते, स्टेशन्स आणि ट्रेन्सही या नकली पॅरिसमध्ये बांधण्यात आल्या."
ही शक्कल लढवली होती इलेक्ट्रिकल इंजिनिअर फर्नांड जेकोपोझी यांनी. फ्रान्स सरकारच्या सहमतीने त्यांनी ही कल्पना प्रत्यक्षात उतरवली. जर्मन विमानांना फसवून खरं पॅरिस शहर सुरक्षित ठेवण्यासाठी ही शक्कल लढवण्यात आली होती.
पॅरिसवर पहिला हल्ला केला तैब लढाऊ विमानाने. या विमानातून 30 ऑगस्ट 1914 रोजी पहिला बॉम्ब टाकण्यात आला. पुढे जर्मनीने लंडनवर बॉम्ब वर्षाव करण्यासाठीही पक्ष्याच्या आकाराच्या दिसणाऱ्या याच विमानाचा वापर केला होता.
जर्मनीला पॅरिसमध्ये रस असण्यामागे दोन कारणं होती. युद्ध मैदानाच्या सर्वात जवळ कुठल्या देशाची राजधानी होती तर ती म्हणजे पॅरिस. हे होतं पहिलं कारण. जर्मन लढाऊ विमानांसाठी फ्रान्स केवळ तीस किमी अंतरावर होतं आणि दुसरं कारण म्हणजे राजधानीचं शहर असल्याने फ्रान्ससाठी हे शहर अत्यंत महत्त्वाचं होतं.
जर्मनीने पॅरिसवर पहिला हल्ला चढवला 30 ऑगस्ट 1914 रोजी. एखाद्या देशाच्या राजधानीच्या शहरावर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ होती. यात फारसं नुकसान झालं नसलं तरी मानसिकरत्या हा मोठा धक्का होता.
युद्धाची सीमा आता आकाशापर्यंत पोहोचली होती आणि कधीही युद्धावर न जाणारे लहान मुलं आणि महिलांनाही युद्धाची प्रत्यक्ष छळ बसू लागली होती.
आकाशातून बॉम्बचा वर्षाव
पुढे तब्बल 18 महिन्यांपर्यंत शहरावर अनेकदा बॉम्बहल्ले झाले. झेपलिन विमानाने पहिल्यांदा हल्ला केला तोही याच काळात. मार्च 1915 मध्ये पहिल्यांदा झेपलिन विमानाचा वापर करण्यात आला. काउंट फर्डिनंड फॉन झेपलिन यांनी हे विमान तयार केलं होतं.
या विमानांनी बेल्जिअमच्या हवाई तळावरून उड्डाण केलं आणि पॅरिसवर बॉम्बहल्ला केला. मात्र, या हल्ल्यात फारसं कुणी जखमी झालं नाही.
29 जानेवारी 1916 रोजी फ्रान्सच्या राजधानीवर दोन झेपलिन विमानं दिसली. त्यातून करण्यात आलेल्या बॉम्बहल्ल्यात 24 लोकांचा मृत्यू झाला तर 30 जण जखमी झाले. 7 फेब्रुवारी 1916 रोजी त्या सर्वांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेवळी संबंध पॅरिसमध्ये काळ जणू थांबल्याचा भास होत होता, असं सांगितलं जातं.
मृत्यांच्या शवपेट्या 6 ट्रकमधून नॉट्रेडॅम चर्चमध्ये नेण्यात आल्या. राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांसोबत हजारो लोक या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.
चर्चेमध्ये विशेष प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. पॅरिसचे आर्चबिशप कॉर्डिनल लेयॉन अॅडॉल्फ अमेटही यावेळी उपस्थित होते. या प्रार्थनासभेने 'लोकांना आतून हेलावून टाकल्याचं', वृत्त एका ब्रिटिश वृत्तपत्राने छापलं.
ते प्रार्थनेत म्हणाले, "जर्मनीच्या क्रौर्याला बळी पडण्याआधी हे मृत्यू तुम्हाला मानवता आणि तुमच्या जिंकण्याच्या संकल्पाची आठवण करून देतील. यातून शत्रुला शक्तिहीन करण्याची उर्मी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही त्यांना पुन्हा असा गुन्हा करण्यापासून रोखाल."
मात्र, येणाऱ्या काळात फ्रान्सवरचे हल्ले वाढतच गेले. त्यांना रोखणं कठीण होऊन बसलं.
नकली पॅरिस उभारण्याची शक्कल
1917 साली जर्मनीने आपलं लक्ष लंडनवर केंद्रित केलं आणि फ्रान्सला थोडी उसंत मिळाली. लंडनवर बॉम्बहल्ल्यांसाठी जर्मनीने 'गॉथा' प्रकारच्या विमानांचा वापर केला. या विमानातून जूनमध्ये करण्यात आलेल्या बाँबहल्ल्यात 162 लोकांचा मृत्यू झाला होता.

फोटो स्रोत, Getty Images
लंडनचं नुकसान केल्यावर जर्मनी पुन्हा एकदा फ्रान्सकडे मोर्चा वळवणार, याची फ्रान्सला पुरेपूर कल्पना होती. तेव्हा स्वतःचं रक्षण कसं करायचं, हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर होता.
फर्नांड जेकेपोझी यांच्याकडे या समस्येवर उपाय होता.
इटलीच्या फ्लॉरेंस शहरात जन्मलेले फर्नांड जेकोपोझी यांनी त्याआधी 1900 साली पॅरिस इंटरनॅशनल एक्सपोझिशनमध्ये काम केलं होतं. त्याकाळी हे आंतरराष्ट्रीय स्तरावर एक मोठं आयोजन असायचं. यात मागच्या शतकातील शोधांसाठी आभार मानले जायचे आणि येणाऱ्या शतकाने माणूस काय साध्य करू शकतो, यावर चर्चा व्हायची.
येणारा काळ नव्या शोधांचा असेल, याची जेकोपोझी यांना खात्री होती. इलेक्ट्रिकल इंजीनिअर म्हणून एक चांगलं आयुष्य घडवावं, यासाठी त्यांनी पॅरिसमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. एका स्थानिक वृत्तपत्रातच्या माहितीनुसार त्यांनी पॅरिसमध्ये 'इलेक्ट्रिक लाइटिंग'वर शोध सुरू केला होता.
नकली पॅरिस उभारण्याच्या प्रकल्पात जेकोपोझीही सामील झाले. पण, यामागची कारण काय होती, हे कधीच कळू शकलं नाही. 1917 च्या उत्तरार्धात फ्रान्सच्या युद्ध विभागाने त्यांच्यावर देशाला हवाई हल्ल्यांपासून वाचवण्याची जबाबदारी टाकली. या अंतर्गत पॅरिसला हवाई हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी एक संपूर्ण शहर उभारण्याची योजना आखण्यात आली होती.
आजच्या आधुनिक काळात ही योजना काल्पनिक वाटत असली तरी त्याकाळी अशाप्रकारची योजना आखण्यामागचं कारण आपण समजू शकतो.
त्याकाळी हवाई हल्ल्याचं तंत्र नवीन होतं. विमानात स्फोटकं भरून न्यायची आणि आकाशातून बघून स्फोटकं थेट लक्ष्यावर टाकली जायची. तांत्रिक अडचणींमुळे त्याकाळी वैमानिकांना आपण खऱ्या पॅरिस शहरावरून जातोय की नकली, हे कळत नसे.

फोटो स्रोत, Getty Images
शत्रुंची विमानं रात्रीच्या वेळी राजधानीच्या शहराकडे येत. उड्डाणासाठी त्यांच्याकडे विकसित तंत्रज्ञान नव्हतं. शहराच्या टोपोग्राफीची माहिती देणाऱ्या नकाशांच्या मदतीने ते उड्डाण करायचे.
ते सेन नदीजवळून उडत बाँब टाकायचे. फ्रान्सच्या उत्तरेकडून वाहणाऱ्या सेन नदीजवळच पॅरिस वसलं आहे. मात्र, या नदीचा प्रवाह सरळ नाही. पॅरिसच्या प्रसिद्ध पूल आणि आयफेल टॉवरजवळून जाणारी ही नदी दोन ठिकाणी उंटाच्या कुबडाप्रमाणे वळण घेऊन जाते.
यापैकी एका ठिकाणी मायसौं-लफीते नावाचं एक ठिकाणं आहे. नकली शहर वसवण्यासाठी जेकोपोझी यांनी हेच ठिकाण निवडलं.
जर्मन विमानांना चकवा देण्यासाठी आणखी दोन ठिकाणं वसवण्यात आली. पहिलं राजधानीपासून 16 किमी दूर पूर्वेकडे वेरीज-सर-माने इथे एक नकली उद्योग क्षेत्र उभारण्यात आलं आणि पॅरिसच्या उत्तरेला असलेल्या सौं डिनी उपनगराच्या धर्तीवर ईशान्येकडच्या विलेपिंन्टाईनमध्ये नकली सौं डिनी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रकाशाचा खेळ
1918 साली जेकोपोझी यांनी विलेपिन्टाईनमध्ये प्रकाशाचा खेळ सुरू केला. प्रकाशाच्या सहाय्याने त्यांनी पॅरिसचं सर्वात वर्दळीचं गारे-दे-लेत हे रेल्वे स्टेशन उभारलं. इतकंच नाही तर एक धावणारी ट्रेनही तयार केली.
अनेक वर्ष प्रकाशासंबंधी केलेल्या आपल्या अभ्यासाचा पूर्ण उपयोग करत जेकोपोझी यांनी लाकडी फळ्यांपासून ट्रेनचे डबे बनवले आणि एका कन्वेअर बेल्टवर लाईट्स लावून धावत्या ट्रेनचा आभास निर्माण केला. आकाशातून बघितल्यावर ही एखादी खरीखुरी धावती ट्रेन वाटायची.
इंडस्ट्रिअल एरिया बनवण्यासाठी त्यांनी लाकडाचा भरपूर वापर केला. यातून त्यांनी कारखान्यांचे सांगाडे तयार केले. छतांसाठी कॅनव्हासचा वापर करत त्यांना वेगवेगळ्या रंगांनी रंगवलं.
पांढऱ्या, पिवळ्या, लाल यासारख्या वेगवेगळ्या रंगाच्या लाईट्सचा वापर त्यांनी इतक्या सराईतपणे केला की त्यातून कारखान्याला आग लागली आहे आणि धूर निघतोय, असा भास व्हायचा. जर्मन सैन्याला संशय येऊ नये, यासाठी हा उजेड अगदी खरा वाटावा, याकडे त्यांचं विशेष लक्ष असायचं.

जर्मनीच्या गॉथा विमानाने 16 सप्टेंबर रोजी पॅरिसवर 22 हजार किलो वजनाचा बॉम्ब टाकला. या हल्ल्यात 6 लोकांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले होते.
पुढच्या हल्ल्याच्या आधीच जेकोपोझी यांनी तयार केलेलं शहर सुरू करण्याची योजना होती. मात्र, ती वेळ कधी आलीच नाही.
या घटनेच्या दोन महिन्यांनंतर युद्ध संपलं आणि आपल्या योजनेची जर्मन सैन्याला चकवा देण्यासाठी मदत झाली की नाही, हे जेकोपोझी यांना कधीही कळू शकलं नाही.
मात्र, युद्ध आणखी काही काळ सुरू राहिलं असतं आणि शत्रू विमानांनी राजधानीच्या शहराला लक्ष्य केलं असतं तर पॅरिसच्या सुरक्षिततेसाठी आखलेली ही योजना नक्कीच यशस्वी ठरली असती, याची फ्रान्स सरकारला खात्री होती.

फोटो स्रोत, Getty Images
नकली शहर उभारण्याची जेकोपोझी यांची ही योजना युद्ध समाप्तीनंतरही गुप्तच ठेवण्यात आली. 1920 साली ब्रिटनमधल्या एका वृत्तपत्राने या योजनेशी संबंधित एक बातमी छापली आणि त्यानतंरच या अचंबित करणाऱ्या योजनेवरून पडदा उघडला गेला.
'द ग्लोब' वृत्तपत्राला ऑक्टोबरच्या सुरुवातीला या योजनेविषयीची माहिती हाती लागली. मात्र, त्याआधी 'द इलेस्ट्रेटेड लंडन न्यूज'ने 6 नोव्हेंबर 1920 रोजीच्या अंकात जेकोपोझी यांच्या या योजनेवर 'Remarkably Interesting Revelation' नावाने एक लेख छापला होता. यात फोटो, मानचिन्हं आणि योजनेशी संबंधित इतरही माहिती देण्यात आली होती.
लेखासोबत काही फोटोही छापण्यात आले होते. या फोटोंचं शीर्षक होतं 'A Fake Paris Outside Paris : A City Created To Be Bombed' (पॅरिसच्या बाहेर आणखी एक नकली पॅरिस : बॉम्बहल्ल्यासाठी उभारण्यात आलेलं शहर).
योजनेच्या शिल्पकाराच्या नावाविषयी गुप्तता
पुढे जेकोपोझी यांचा 'Legend of Honour' या फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरव करण्यात आला आणि 1920 च्या दशकात त्यांची भरभराटही झाली.

त्यांनी आयफेल टॉवरला प्रकाशाने उजळून टाकलं. शहरातल्या पॅलेस डे ला कॉनकोर्डसारख्या इतर महत्त्वाच्या ठिकाणीही त्यांनी झगमगाट केला.
उद्योजकांनाही त्यांचं महत्त्व कळलं. सिट्रियोनने आयफेल टॉवरवर आपल्या कारची जाहिरात करण्याचं काम त्यांना दिलं.
1932 साली पॅरिसमध्येच फर्नांड जेकोपोझी यांचं निधन झालं.
त्यांच्या निधनावर 'द पिपल' या वृत्तपत्राने लिहिलं, "त्यांनी आयफेल टॉवरवर लाावलेल्या दिव्यांनी संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं. पॅरिसला प्रकाशमान करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता."
मात्र, महायुद्धादरम्यान फ्रान्स सरकारने केलेल्या प्रयत्नांचा किंवा नकली पॅरिस शहर उभारण्याचा कुठलाही उल्लेख वृत्तपत्रांनी केला नाही.
(गॅविन मॉर्टिमर इतिहासकार आणि लेखक आहेत. त्यांचं 'David Stirling: The Phoney Major: The Life, Times and Truth about the Founder of the SAS' हे पुस्तक प्रकाशित झालंय. हा लेख त्यांनी बीबीसी हिस्ट्रीएक्स्ट्रासाठी लिहिला आहे.)
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








