ईस्ट इंडिया कंपनी त्यांच्या अधिकाऱ्यांना केवळ जेवणावळीसाठी 29 हजार डॉलर्स द्यायची

फोटो स्रोत, ERITAGE IMAGE PARTNERSHIP LTD ALAMY
- Author, अमांडा रुगेरी
- Role, बीबीसी कॅपिटल
आज तुम्हाला जगातली सर्वात शक्तिशाली कंपनीची कहाणी सांगणार आहोत, त्या कंपनीचं नाव होतं 'ईस्ट इंडिया कंपनी'.
या कंपनीनं भारतसह जगाच्या मोठ्या भूभागावर दीर्घकाळ राज्य केलं. त्यांच्याकडे स्वतःचं लष्कर होतं. त्यांची स्वतःची गुप्तचर संस्था होती आणि कर गोळा करण्याचाही अधिकार होता.
आज जगात अॅपल, गुगल यासारख्या अब्जावधी बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत, पण ईस्ट इंडिया कंपनीच्या तुलनेत आजच्या या कंपन्या काहीच नाहीत.
ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1600 मध्ये झाली. त्यावेळी एलिझाबेथ पहिल्या या ब्रिटनच्या महाराणी होत्या. त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीला आशिया खंडात व्यवसाय करण्याची परवानगी दिली. परंतु काळ असा बदलला की, ही कंपनी व्यवसाया करण्याऐवजी स्वतःचं एक सरकार बनली.
एक काळ असाही होता, जेव्हा आशियातील सर्व देश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात होते. या कंपनीकडे सिंगापूर आणि पेनांग सारखी मोठी बंदरं होती .
या कंपनीकडे भारतातील अडीच लाखांहून अधिक लोकांची फौज होती. केवळ इंग्लंडचं नाही तर युरोपातील सर्व देशांतील लोकांच्या जीवनावर या कंपनीचा प्रभाव दिसून येतो. त्याकाळी लोक ईस्ट कंपनीचा चहाही प्यायचे आणि ईस्ट इंडिया कंपनीचे कपडेही घालायचे.
ईस्ट इंडिया कंपनीवर पुस्तक लिहणाऱ्या निक रॉबिन्सच्या म्हणण्यानुसार या कंपनीची तुलना आजच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी केली जाऊ शकते. ईस्ट इंडिया कंपनीला सुरुवाती पासूनच स्वतःचे सैन्य सांभाळण्याची मुभा होती.
व्यापार,शेअरबाजारातील चढ-उतार यावर त्यांचा प्रभाव आणि हस्तक्षेप होता. आजच्या कंपन्या ज्याप्रमाणे स्वतःच्या फायद्यासाठी राज्यकर्ते आणि नेतात्यांकडे लॉबिंग करतात, तशीच लॉबिंग ईस्ट इंडिया कंपनीही तत्कालीन सरकारसोबत करत असे. पुढारी आणि राजांना खूष ठेण्याचा सतत प्रयत्न ही कंपनी करत होती.
ही कंपनी कशी होती? त्याचं मुख्यालय म्हणजे आजच्या गूगल किंवा फेसबुक सारख्या कंपन्यांच्या आलिशान ऑफिससारखं होतं का? त्यांच्या कर्मचाऱ्यांना किती पगार मिळत होता? इतिहासाची पानं उलगडून याची उत्तरं मिळवूयात.
त्याकाळी ईस्ट इंडिया कंपनीत नोकरी मिळवण्याची स्पर्धा होती,पण नोकरी मिळवणं फार कठीण होतं. एका संचालकाच्या शिफारशीनंतर कंपनीत नोकरी मिळत असे.महिलांना फक्त साफ-सफाईसाठी कामावर ठेवलं जात होतं.

फोटो स्रोत, ERITAGE IMAGE PARTNERSHIP LTD ALAMY
ईस्ट इंडिया कंपनीची कागदपत्रं ब्रिटिश लायब्ररीमध्ये ठेवण्यात आली आहेत. मार्गारेट मेकपीस यांच्याकडे त्यांच्या संरक्षणाची जवाबदारी आहे. मार्गारेट सांगतात की, छोट्या नोकऱ्यांसाठीही कंपनीच्या संचालकाची शिफारस आवश्यक होती.
कंपनीत एकूण 24 संचालक होते.कंपनीच्या उपलब्ध जागेच्या कितीतरी पट अधिक अर्ज येतं असतं.संचालकांच्या शिफारशींशिवाय कोणालाही काम मिळणं अवघड होतं.
लंडनमधील कंपनीच्या मुख्यालयात सध्या नोकरीसाठी ही शिफारस आवश्यक होती. कोण शिफारस करतो यावर नोकरी मिळायची. नोकरी मिळवण्यासाठी पात्रतेपेक्षा संपर्क अधिक महत्त्वाचा होता.
नोकरी मिळवण्यासाठी कंपनीला 500 पाऊंड द्यावे लागायचे, आजच्या काळात ज्याची किंमत 52,000 डॉलर्स आहे किंवा सुमारे 33 लाख रुपये इतकं रक्कम द्यावी लागे.
जेवढं मोठं पद असेलं तेवढी रक्कम द्यावी लागत असे.त्याशिवाय चांगल्या वर्तणुकीची हमी द्यावी लागत असे ती वेगळी.
कुशल कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करणारी महाविद्यालयं
आताच्या काळात वेतनाशिवाय काम करणं किंवा काम मिळवण्यासाठी पैसे देणं हे अत्यंत वाईट मानलं जातं. त्यासाठी दंडाची तरतूद ही आहे. पण ईस्ट इंडिया कंपनीतील करियरची सुरुवात बिनपगारी होतं असे. या पूर्वी पाच वर्ष पगाराशिवाय काम करावं लागत होते. 1778 मध्ये ही मुदत तीन वर्षांपर्यंत करण्यात आली.
कर्मचाऱ्यांनी फुकट काम केल्यानंतर कंपनीनं दहा पाऊंड द्यायला सुरुवात केली.19 व्या शतकाच्या उत्तरार्धात कंपनीच्या लक्षात आलं की केवळ शिफारस पत्र देऊन कर्मचारी नियुक्त केल्यानं कंपनीला काहीही फायदा होणार नाही.

फोटो स्रोत, CLASSIC IMAGE ALAMY
कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी 1806 मध्ये ईस्ट इंडिया कॉलेज सुरु केलं. हेलबारी येथील महाविद्यालयानं लिपिक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं. महाविद्यालयात इतिहास,कायदा आणि साहित्यासोबत भारतीय भाषा,संस्कृत,पर्शियन आणि तेलगू भाषांचं प्रशिक्षण दिलं जात होतं.
आज जगात फेसबुक आणि गूगलच्या मुख्यालयांची उदाहरणं दिली जातात,पण मग जगातल्या सर्वात मोठ्या ईस्ट इंडिया कंपनीचं मुख्यालय कसं होतं.
लंडनमधील ईस्ट इंडिया कंपनीचं मुख्यालय फेसबुक आणि गूगलच्या मुख्यालयासारखं नव्हत. ईस्ट इंडिया कंपनीचं मुख्यालय 1790 मध्ये लंडनच्या लीडेनहॉल भागात बांधण्यात आलेलं. या मुख्यालयाच्या दारात राजा जॉर्ज तिसरे यांचा पुतळा ठेवण्यात आला होता.
इमारतीच्या आतील भाग एखाद्या राजवाड्याहुन कमी नव्हता.जगभरातील आणलेल्या आकर्षक दगडांनी हॉल आणि खोल्या बांधण्यात आल्या होत्या.युद्धात जिंकलेल्या वस्तु मुख्यालयात ठेवण्यात येतं असतं.कुठे सिंहाची शिकार करणारा पुतळा ठेवण्यात आला होता.तर टिपू सुलतान यांचं रेशीम आणि सोन्यानं मढवलेलं सिंहासन शोभून दिसत होतं.
कंपनीची लंडनमध्ये अनेक गोदामं होती आणि तीही कंपनी सारखीच भव्य होती.इंग्लंडच्या लोकांवर प्रभाव टाकण्याच्या उद्देशानं ती बांधण्यात आली होती
कंपनीची कार्यालयं कशी होती?
आजच्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरामासाठी खास जागा बनवतात.परंतु त्या काळात ईस्ट इंडिया कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करत असे. कंपनीच्या लंडन कार्यालयाच्या कंपाउंडमध्येच बरेच कर्मचारी राहायचे,काही लोकांना त्याचं भाडं मोजावं लागत असे. कंपनीच्या सुविधांचा गैरवापर केल्यास कठोर शिक्षा दिली जायची.
इंग्लंड बाहेरील कार्यालयात काम करणाऱ्या कंपनी कर्मचाऱ्यांनाही राहण्याची सोय करण्यात आली होती. तो नेहमी त्याच्या वरिष्ठांच्या नजरेखाली असायचा.शिस्त कडक होती. दारू पिऊन कुणाशी गैरवर्तणूक करणाऱ्या कर्मचाऱ्याला तुरुंगात टाकण्यात आलं.

फोटो स्रोत, HERITAGE IMAGE PARTNERSHIP LTD ALAMY
परदेशातील ईस्ट इंडिया कंपनीची कार्यालयं वेगवेगळ्या प्रकारची होती.
उदाहरणार्थ- कंपनीच्या सुरत येथील कारखान्यात चर्च,लायब्ररी आणि स्नानगृहही होती.
जपानमधील हिराडोमध्ये बागा आणि स्विमिंगपूलही होते.
पूर्व भारतात कष्टकरी लोकांनाही अन्न दिलं जात असे, कर्मचारी कार्यालयात येताच त्यांना नाष्टा देण्यात येई. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना परदेशात जेवणही पुरवले जात होते. मात्र 1834 मध्ये कॉस्ट कटिंगच्या नावाखाली ही सुविधा बंद करण्यात आली.
इंग्रज धर्मगुरू जॉन ओव्हिंग्टन यांनी 1689 साली सुरत येथील कारखान्याला भेट दिल्यांनतर लिहलं होतं की इथं तीन स्वयंपाकी होते-एक भारतीय, एक इंग्रज आणि एक पोर्तुगीज. प्रत्येकाला त्याच्या आवडीचं जेवण मिळावं हा त्यांचा उद्देश होता. लोकांना मांसाहारी आणि शाकाहारी असं दोन्ही प्रकारचे जेवण दिलं जात होतं.
ते सांगतात, की रविवारी खाद्यपदार्थांची संख्या वाढली होती.बदाम,पिस्ता,मनुका यासारख्या सुका मेव्याला प्राधान्य देण्यात आलं. बाहेरून आलेल्या एका व्यक्तीचं भव्य स्वागत करण्यात आलं होतं. त्यासाठी खूप पैसा खर्च करण्यात आला.
ईस्ट इंडिया कंपनीच्या लोकांना दारू मुक्तपणे उपलब्ध करून देण्यात आली. सुमात्रा इंडोनेशिया येथील 19 कर्मचाऱ्यांना एका वर्षात 894 बाटल्या वाईन, 600 बाटल्या फ्रेंच वाईन,'बर्टन अले'च्या 294 बाटल्या, 42 गॅलन मडेरिया वाईन, 274 बॉटल चाडी,164 बाटल्या गोवन अरॅक एका वर्षात प्यायले.
एवढी दारू प्यायल्यामुळं कर्मचारी एकमेकांशी भांडत होते हे कंपनीच्या लक्षात आलं.
ईस्ट इंडिया कंपनीनं लंडनच्या बंदरात एक छोटी दारूभट्टी सुरु केली होती. त्यात कडक अटी घालून बिअर आणि दारूची विक्री केली जात होती.लंडनमध्ये कंपनीचं स्वतःचं तुरुंगही होतं.
आज सर्व कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना विविध सुविधाही पुरवतात.काही कंपन्या परदेशातील सहलींसाठी कुपन देतात,तर काही कंपन्या मोफत तिकीट देतात.त्याचं प्रमाणं ईस्ट इंडिया कंपनी परदेशात जाणाऱ्या कर्मचाऱ्याला स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरु करण्याची परवानगी देत असे. त्यांना त्याचे खाजगी सामान कंपनीच्या जहाजावर चढवून आणण्याची परवानगी होती. जसं टूर पॅकेजेस किंवा कॉन्सर्टच्या तिकिटावर मिळणाऱ्या मोठ्या सवलती प्रमाणं ती सवलत होती.
कंपनीच्या चेअरमनला मनोरंजनासाठी 1,32,000 पाऊंड
कर्मचाऱ्यांना वैयक्तिक फायदाही मिळत असे. एकाच परदेशी दौऱ्यामुळं मिळणाऱ्या कमाईमुळं कर्मचाऱ्याचं आयुष्यच नव्हे तर त्याच्या भावी पिढ्यांचं जीवनमान सुधारायचं. याउलट कंपनीला पगार आणि बोनस वर कमी खर्च करावा लागला.
कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कंपनीच्या शेअर्स सेल मध्ये भाग घेण्याची परवानगी होती.तो एक फायदेशीर सौदा होता.कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सामान्य लोकांपेक्षा अधिक ज्ञान होतं आणि त्या ज्ञानाचा फायदा शेअर्स खरेदी -विक्री दरम्यान होत असे.

फोटो स्रोत, THE ART ARCHIVE ALAMY
ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी करमणुकीच्या नावाखाली भरपूर पैसा खर्च करायचे. उदाहरणार्थ-19 व्या शतकातील काही कंपनी कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या एका वर्षीच्या जेवणासाठी जवळपास 29,000 डॉलर खर्च केले. कंपनीच्या चेअरमनला केवळ मनोरंजनासाठी वर्षाला 1,32,000 पाऊंड मिळायचे.
1834 मध्ये हा खर्च कमी करण्यात आला.परंतु कंपनीचे अधिकारी सर जॉन के यांनी लिहिलंय की, या कंपनीपेक्षा इतर कोणीही चांगलं डिनर दिलं नाही.परदेशातील कर्मचाऱ्यांवर अशीच मेहरबानी ठेवण्यात आली. फॅक्टरी कॅप्टननं रात्रीच्या जेवणातून वर्षाला 33,000 पाऊंड कमावले
परदेशातील कर्मचार्यांना अनेकदा दागिने, रेशमी कपडे यासारख्या महागड्या भेटवस्तू दिल्या जात होत्या.याशिवाय जमीनदार,नवाबही लोकही या कर्मचाऱ्यांना महागड्या भेटवस्तू देत असतं.
18 व्या आणि 19 व्या शतकात ईस्ट इंडिया कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सर्वाधिक पगार होता.कर्मचाऱ्यांनी जितकी अधिक वर्ष कंपनीत काम केलं तितका पगार जास्त होता.1815 मध्ये कंपनीच्या लिपिकाचा पगार वार्षिक 40 पाऊंड किंवा 29,000 पाऊंड पासून सुरु झाला.
कंपनीत 11 ते 15 वर्ष काम केल्यानंतर हाच पगार पाच पटीनं वाढत असे.कर्मचार्यानं जितकी जास्त वर्षे कंपनीत काम केले तितका पगार जास्त. 1840 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या लिपिकाचा पगार हा सामान्य मजुरापेक्षा बारा पट होता.
याशिवाय ईस्ट इंडिया कंपनी आपल्या कर्मचाऱ्याला चांगली पेन्शनही देत होती. 40 वर्ष सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्याला तीन चतुर्थांश पगार पेंशन म्हणून दिला जातो. 50 वर्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला त्याच्या पगाराच्या बरोबरीनं पेन्शन देण्यात आलं.
कंपनीत 12-13 तास काम करावं लागत होतं
ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांना सामान्य कर्मचाऱ्यापेक्षा कमी पैसा मिळत असे. त्यांना आजच्या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ( सीईओ) सारखा भरघोस पगार मिळाला नाही. परंतु संचालकांना अधिकार देण्यात आल्यानं त्यांनी ही भरपाई कधी लाच घेऊन तर कधी भेटवस्तू घेऊन भरून काढली गेली.

फोटो स्रोत, DINODIA PHOTOS ALAMY
सर्व फायद्यांची बेरीज केली तर ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांना त्यावेळी मिळणारा मोबदला हा आजच्या महागड्या सीईओंच्या पगाराएवढा होता.
आजच्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना विविध प्रकारच्या सुट्ट्या देतात,पण ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात सुट्टी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. सर्व कर्मचाऱ्यांना रजेसाठी संचालक मंडळाची मंजुरी घ्यावी लागत असे.त्या काळात आजच्या तुलनेत जास्त सरकारी सुट्ट्या होत्या ही वेगळी गोष्ट.
पण 1817 मध्ये सुट्ट्या मोठ्या प्रमाणात कमी केल्या गेल्या.कर्मचाऱ्यांना फक्त ख्रिसमसची सुट्टी मिळाली.यासोबत कर्मचाऱ्यांना त्यांच्या वार्षिक कामाच्या निमित्तानं एक ते चार दिवसांची रजा देण्यात आली होती.
ईस्ट इंडिया कंपनीत कर्मचाऱ्यांना 12-13 तास काम करावे लागत होते.सकाळी सात ते रात्री आठ अशी कर्मचाऱ्यांची कामाची वेळ ठरली होती.'लचं ब्रेक'साठी दोन तासाची वेळ दिली जाई.कर्मचाऱ्यांना काही वेळा शनिवारीही काम करावे लागत होतं.

फोटो स्रोत, LORD PRICE COLLECTION ALAMY
मात्र कर्मचाऱ्यांच्या कामावर बारीक नजर ठेवण्यात येत नसे,त्याचा गैरफायदा काही जण घेत होते.उदाहरणार्थ-1727 मध्ये संचालकांना कळले की जॉन स्मिथ नावाचा कर्मचारी 16 महिन्यांपासून कामावर आला नव्हता, परंतु तरीही त्याला पगार मिळत होता.
कंपनीच्या गोदामात लोकांना फक्त सहा तास काम करावं लागत होतं.त्यांना अर्ध्या तासाचा ब्रेकही होता.बंदरातील कामगारांना 10-12 तास काम करावं लागत होतं.परदेशी कारखान्यांमध्ये काम करणं सुकर होतं.
लोक आरामात काम करत होते.काम आणि विश्रांती यात समतोल होता.आज फक्त 50 टक्के अमेरिकन त्यांच्या नोकऱ्यांबाबत समाधानी आहेत,त्या तुलनेनं फ्रान्समध्ये 43 टक्के आणि जर्मनीत फक्त 34 टक्के कर्मचारी समाधानी आहेत.
विचार करा 200 वर्षांपूर्वी कर्मचारी त्यांच्या नोकऱ्यांबद्दल काय विचार करत होते? ईस्ट इंडिया कंपनीचे कर्मचारी त्यांच्या कामावर किती समाधानी होते?
ईस्ट इंडिया कमानीच्या कर्मचाऱ्यांना परदेशी जावं लागलं,तर त्यांचं जीवन कठीण होतं.अपघात,रोग,युद्ध हे सर्व मृत्यूचे धोके या कर्मचाऱ्यांना होते.एका अंदाजानुसार आशिया खंडात तैनात असलेल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या निम्म्या कर्मचाऱ्यांना नोकरीत जीव गमवावा लागला.
दुसरीकडं इंग्लंडमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोकरीचा कंटाळा येत होता.काहींना तर इतका कंटाळा आला होता की ते काम करायचे नाहीत.
कंपनीतील कर्मचारी चार्ल्स लॅम्ब यांनी या संदर्भात इंग्रज कवी विल्यम वर्डस्वर्थ यांना पत्र लिहून आपला कंटाळा व्यक्त केला होता.नोकरीचा कंटाळा येऊनही 30 वर्षांहून अधिक काळ काम केलं आणि आठ वर्ष पेन्शन मिळवली.
या गोष्टीवरून स्पष्ट होते की ईस्ट इंडिया कंपनी ही एक बहुराष्ट्रीय कंपनी होती,परंतु आजच्या काळातील कंपन्यांसारखी नाही.त्यांच्याकडे सत्ता, पैसा,लष्कर,हेरखातं होतं.त्यांनी भारतासह अनेक देशांमध्ये ब्रिटिश राजवट प्रस्थापित केली.प्रत्येकाची एक वेळ असते.1857 मध्ये भारतातील बंडांनंतर कंपनीला उतरती कळा लागली आणि ब्रिटिश सरकारं 1874 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी पूर्णपणे बंद केली.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








