संजीव मेहताः ईस्ट इंडिया कंपनीचे मालक आता भारतीय उद्योजक आहेत

फोटो स्रोत, LEON NEAL
15 ऑगस्ट 2010 रोजी भारत एकीकडे 63 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत होता आणि त्याचवेळी ज्या इंग्रजांच्या सत्तेला नमवत भारताने स्वातंत्र्य मिळवलं, त्यांच्याच भूमीत म्हणजेच लंडन येथील मेफेअर परिसरात ईस्ट इंडिया कंपनी नव्याने सुरू झाली.
या लंडनस्थित लक्झरी स्टोअरमध्ये खादीचे कपडे, फर्निचर इत्यादी गोष्टी विक्रीस ठेवण्यात आल्या होत्या.
आता यात नवल ते काय? तर गोष्ट ही की, या नव्या ईस्ट इंडिया कंपनीची मालकी आता एका भारतीयाकडे आली होती. संजीव मेहता असं त्यांचं नाव.
इंग्रजांच्या सत्तेचा सूर्य कधीच मावळत नाही, असं म्हटलं जायचं. मात्र, सत्तेचा सूर्य मावळलाही आणि ज्या ईस्ट इंडिया कंपनीच्या पावलांनी ब्रिटिशांनी भारतात शिरकाव केला, ती कंपनीही एका भारतीयानेच खरेदी केली. काळाचा महिमा म्हणतात तो असा.
ब्रिटिशांच्या सत्तेच्या खाणाखुणा ज्या कंपनीशी जोडल्या गेल्यात, थेट त्याच कंपनीला विकत घेणाऱ्या संजीव मेहतांची नाळ महाराष्ट्राशी आणि त्यातही मुंबईशी जोडली गेलीय.
संजीव मेहतांचं मुंबई कनेक्शन
संजीव मेहतांचे आजोबा बेल्जियममध्ये राहत असत. तिथं ते हिऱ्यांचे व्यापारी होते. 1920 चा तो काळ. संजीव मेहतांच्या वडिलांचा जन्मही बेल्जियममधलाच. 1933 सालचा. त्यानंतर 1938 साली मेहता कुटुंब मायदेशी म्हणजेच भारतात परतलं आणि त्यांच्या परंपरागत व्यवसायाने मुंबईत पाय रोवले.
संजीव मेहतांचा जन्म 1961 साली मुंबईतच झाला. महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतल्याच सिडनहॅम महाविद्यालयात झालं. नंतर अमेरिकेतील जेमॉलॉजिकल इन्स्टिट्युटमधूनही त्यांनी शिक्षण घेतलं. घरातच हिऱ्यांचा व्यवसाय असल्याने त्यांना साहजिक त्यात आवड निर्माण झाली.
1983 मध्ये त्यांनी कौटुंबिक व्यवसायाशी स्वत:ला जोडून घेतली. मात्र, काही वर्षांतच म्हणजे 1989 साली ते लंडनमध्ये स्थायिक झाले आणि इथूनच त्यांच्या यशस्वी वाटचालीला सरूवात झाली.

फोटो स्रोत, Heritage Image Partnership Ltd/Alamy
पुढे 2000 सालापासूनच संजीव मेहता यांनी ईस्ट इंडिया कंपनीकडे आपला मोर्चा वळवला. सुरुवातीला काही शेअर त्यांनी खरेदी केले. एक एक पायरी वर चढत आणि कंपनीत जम बसवत, 2005 साली त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीची संपूर्ण मालकी स्वत:कडे घेतली. त्यावेळी 30 ते 40 उद्योगपतींच्या हातात ईस्ट इंडिया कंपनी होती. मात्र, संजीव मेहतांनी त्यांच्याकडून ती खरेदी केली.
'व्यवसाय सगळेच करतात, पण या कंपनीशी जोडणं साधी गोष्ट नाहीय.'
ईस्ट इंडिया कंपनीच्या खरेदीबाबत सांगताना संजीव मेहता भावूक झाले होते. त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं, "मी शब्दांत सांगू शकत नाही की, मला आता नेमकं काय वाटतंय. तुम्ही स्वत:ला माझ्या जागी ठेवून पाहा, तुम्हालाही अंदाज येईल. अनुभव आणि समाधान वेगळंच आहे. कारण व्यवसाय तर सगळेच करतात, नफाही अनेकांना होत असतो. मात्र, ईस्ट इंडिया कंपनीशी जोडणं म्हणजे साधी गोष्ट नाहीय."
ते पुढे सांगतात, "ईस्ट इंडिया कंपनी खरेदी केल्यानंतर जगभरातून मला भारतीयांचे ईमेल आले. दक्षिण आफ्रिका, बोस्टन, दुबई अशा अनेक ठिकाणांहून लोकांनी माझ्याशी संपर्क साधला. यावरून अंदाज येऊ शकतो की, भारतीय या कंपनीशी भावनात्मकरित्या किती जोडले गेलेत. हा केवळ व्यवसाय नाहीय, एक वारसा आहे. भारतातील माझे मित्र, शालेय शिक्षक यांनी आनंद व्यक्त केला."
ईस्ट इंडिया कंपनीवर मालकी मिळवणं हे किती मोठी गोष्ट आहे, हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासावरून लक्षात येतंच. कारण भारतात इंग्रजांनी सत्ता मिळवली, तीच मुळात ईस्ट इंडिया कंपनीच्या पावलांनी भारतात येऊन.

फोटो स्रोत, Getty Images
राणी एलिझाबेथ प्रथम यांच्या स्वाक्षरीने 31 डिसेंबर 1600 रोजी ईस्ट इंडियाची स्थापना झाली. सर थॉमस स्मिथ हे कंपनीचे पहिले गव्हर्नर होते.
1640 साली मद्रास, 1690 साली कोलकाता असं करत करत ईस्ट इंडिया कंपनीने दबक्या पावलांनी भारतात शिरकाव केला. 1690 साली कोकत्यात तर ट्रेडिंग सेंटरच उभं करण्यात आलं. व्यापाराच्या निमित्ताने ईस्ट इंडिया कंपनी भारत आणि चीनमध्ये वेगाने पसरत होती.
1600 पासून पुढे 250 वर्षें विविध देशात व्यापार करत आपलं साम्राज ईस्ट इंडिया कंपनीनं पसरवलं. दागिने, खाद्य पदार्थ, चामडं, फर्निचरचा वापर कंपनीकडून केला जात असे. भारतात तर ईस्ट इंडिया कंपनीने केवळ व्यापारच केला नाही, तर स्वत:चं सैन्य निर्माण केलं, प्रशासन निर्माण केलं आणि देशावरच सत्ता मिळवली.
1857 सालच्या उठावानंतर ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीचे सर्व अधिकर काढून घेतले.
संजीव मेहता म्हणतात, ज्या कपंनीने आपल्या देशावर सत्ता गाजवली, त्याच कंपनीवर आपली सत्ता मिळत असेल तर कुणाला नाही आवडणार?
"ईस्ट इंडिया कंपनी फायद्याचीच होती, कारण तिला प्रसिद्धीची गरज नव्हती."
ईस्ट इंडिया कंपनी खरेदीच्या वेळच्या आठवणी सांगताना संजीव मेहता म्हणतात, "1980 च्या दशकात लंडनमधील 30 ते 40 जणांना वाटलं की, ईस्ट इंडिया प्रचंड ताकदीचा ब्रँड आहे. त्यामुळे त्यांनी कंपनीत आर्थिक गुंतवणूक केली आणि कंपनीला पुन्हा सुरू केलं. पण मला असं जणावलं की, या लोकांचं कंपनीशी भावनात्मक नातं नव्हतं. मात्र, ईस्ट इंडिया कंपनीशी भारताशी असलेलं नातं माहीत असल्याने मला महत्त्व कळलं. त्यामुळे कंपनी खरेदी करण्याचा विचार केला आणि ज्यांच्याकडे मालकी होती, त्यांच्याशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. 2005 च्या सुमारास कंपनीही खरेदी केली."

फोटो स्रोत, World History Archive/Alamy
संजीव मेहता यांनी 2005 साली कंपनी खरेदी केली, त्यावेळी दीड कोटी डॉलर इतकी गुंतवणूक केली. 10 जणांची व्यवस्थापन टीम बांधली आणि कंपनीला वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले.
मात्र 18 व्या शतकातील कंपनीचा काळ आणि आताचा काळ यात मोठा फरक आहे. आता आव्हानं वाढली आहेत, असं सांगत संजीव मेहता म्हणतात, "तीन वर्षं मी केवळ ईस्ट इंडिया कंपनीचा अभ्यास केला. कंपनीचा इतिहास काय हे जाणून घेतलं, जगभरातील संग्रहालयांमध्ये गेलो, कंपनीचा व्यापार चालायचा अशा देशांना भेटी दिल्या, कंपनी त्या काळात विक्री करत असलेल्या उत्पादनांसंबंधी माहिती घेतली, जेणेकरून आज कंपनी चालवत असताना काय करावं, याचा अंदाज यावा."
व्यवसायच्य दृष्टीनेही ईस्ट इंडिया कंपनीत पैसे गुंतवणे माझ्यासाठी फायद्याचं होतं. याचं कारण या कंपनीच्या प्रसिद्धीची कोणतीही गरज नव्हती, इतकी जगभरातील लोकांपर्यंत कंपनी पोहोचली होती, असं मेहता सांगतात.
संजीव मेहतांच्या मालकीत असलेली ईस्ट इंडिया कंपनी सध्या गिफ्ट्स, खाद्यपदार्थ, सोने आणि चांदीचे दागिने, सजावटीच्या गोष्टी, फ्रेम इत्यादी विविध वस्तूंचं उत्पदान आणि विक्री करते.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








