पाकिस्तानने इराणवर केलेल्या हल्ल्यांबद्दल बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने काय म्हटलं?

फोटो स्रोत, Getty Images
इराणमधील सरकारी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात नऊ परदेशी नागरिक मारले गेले आहेत.
इराणचे गृह मंत्री अहमद वाहिदींनी सांगितलं की या हल्ल्यामध्ये तीन महिला, चार मुलं आणि दोन पुरुष मारले गेले आहेत. हा हल्ला जिथे झाला, ते ठिकाण इराणच्या हद्दीपासून तीन-चार किलोमीटर दूर आहे.
याआधी पाकिस्तानने इराणमधील सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात कट्टरपंथीयांना लक्ष्य करून हल्ला केल्याचा दावा केला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं होतं, “ज्यांच्यावर हल्ला करण्यात आला, ते पाकिस्तानमध्ये रक्तपात करणारे कट्टरतावादी होते, ज्यांनी इराणच्या त्या जागांवर आश्रय घेतला होता, जिथे कोणाचंच नियंत्रण नव्हतं.”
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितलं की, पाकिस्तानने इराणमधील बलूच कट्टरपंथीयांना लक्ष्य केलं आहे.
पाकिस्तानकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, या हल्ल्यात कट्टरपंथीय मारले गेले.
इराणनं मंगळवारी (16 जानेवारी) डागलेल्या क्षेपणास्त्रांना पाकिस्तानने गुरुवारी प्रत्युत्तर दिलं आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक पत्रक जारी करून इराणच्या हद्दीतील “काही दहशतवादी तळांना काटेकोरपणे लक्ष्य केल्याचं” म्हटलं आहे.
इराणमधील सेस्तान-ओ-बलुचेस्तान प्रांतात हे हल्ले झाल्याचं इराणनं मान्य केलं असून, पाकिस्तानच्या या हल्ल्यात 3 महिला आणि 4 लहान मुलांचा मृत्यू झाल्याचं इराणनं म्हटलं आहे.
मृत व्यक्ती इराणचे नागरिक नव्हते, असं इराणने म्हटल्याची बातमी रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिली आहे.
गुरुवारी (18 जानेवारी) सकाळी पाकिस्तानने इराणच्या सेस्तान-ओ-बलुचेस्तान प्रांतातील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर लष्करी हल्ले केल्याची माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलीय.
या कारवाईमध्ये अनेक दहशतवादी मारले गेले असून अतिशय गुप्त पद्धतीने राबविण्यात आलेल्या या कारवाईला ऑपरेशन 'मार्ग बार सरमाचार' असं नाव देण्यात आलं आहे.
विशेष म्हणजे इराणने पाकिस्तानातील काही दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर पाकिस्तानने आता इराणच्या काही भागात ही कारवाई केली आहे.
‘गेल्या अनेक वर्षांपासून, इराणच्या काही भागात पाकिस्तानी वंशाचे 'सरमाचार' दहशतवादी राहत होते. पाकिस्तानने वेळोवेळी त्यांच्या ठिकाणांची माहिती इराणला कळवली होती. इराणच्या ज्या भागात थेट सरकारी नियंत्रण नाही तिथे हे दहशतवादी लपून बसल्याची माहिती पाकिस्तानने इराणला दिली होती आणि त्यांच्या कारवायांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली होती’ अशी माहिती पाकिस्तानने दिली आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने अशीही माहिती दिलीय की ‘पाकिस्तानच्या सूचनांवर इराणने कोणतीही कारवाई केली नाही आणि हे सरमाचार निर्दोष पाकिस्तानी नागरिकांचं रक्त सांडत राहिले. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.’
पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात हेही म्हटलं आले की, ‘पाकिस्तान आपल्या लोकांची सुरक्षितता राखण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलत राहील. त्यांची सुरक्षा अभेद्य आणि पवित्र आहे. इराणच्या सार्वभौमत्वाचा आम्ही आदर करतो, पण पाकिस्तानच्या नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे.’
या हल्ल्यानंतरही इराण हा आमचा मित्रदेश असल्याचं आणि दहशतवादाच्या शत्रूशी आम्ही दोघे मिळून सामना करणार असल्याचं पाकिस्ताननं स्पष्ट केलं आहे.
इराणवर हल्ल्यांबद्दल बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने काय म्हटलं?
इराणमधील सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांवर बलुचिस्तानमधील कट्टरपंथी संघटना बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) गुरुवारी (18 जानेवारी) प्रतिक्रिया दिली आहे.
बीएलएचे प्रवक्ते आझाद बलोच यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे, “इराणच्या ताब्यातील बलुचिस्तानमध्ये बीएलएची उपस्थिती नाहीये. पाकिस्तानने सामान्य नागरिकांवर हल्ला केला आहे.”
आझाद बलोच यांनी म्हटलं की, पाकिस्तानने दावा केला आहे की त्यांच्या सैन्य दलाने इराणच्या ताब्यातील बलुचिस्तानमधील (पश्चिम बलुचिस्तान) बीएलए आणि इतर फुटीरतावादी समर्थकांच्या संघटनांना लक्ष्य केलं. बीएलएने पाकिस्तानचे दावे खोडून काढले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
बीएलएच्या प्रवक्त्यांनी आरोप केला की, पाकिस्तानच्या हल्ल्यात निरपराध लोकांचे प्राण गेले आहेत.
त्यांनी म्हटलं, “पाकिस्तानने पश्चिम बलुचिस्तानमध्ये सामान्य नागरिकांवर हल्ला करून निरपराध बलुची नागरिकांना शहीद केलं आहे.”
पाकिस्तान आणि इराण दोघांनीही बलोच लोकांच्या जमिनीवर ताबा मिळवला असल्याचं बीएलएचं मत आहे. एका कब्जाधारकाची मदत घेऊन दुसऱ्या कब्जाधारकाशी लढणं बीएलए कधीच मान्य करणार नाही, असं बीएलएच्या निवेदनात म्हटलं आहे.
इराणने मंगळवारी रात्री केले होते हल्ले

फोटो स्रोत, IRIB
इराणनं पाकिस्तानवर मंगळवारी क्षेपणास्त्र हल्ले केले. बलुचिस्तानच्या नैऋत्य भागात हे हल्ले करण्यात आले होते.
इराणनं मंगळवारी (16 जानेवारी) केलेल्या या हल्ल्यांत दोन मुलं ठार आणि तीन जण जखमी झाली आहेत, असं पाकिस्ताननं म्हटलं होतं.
'हा हल्ला आम्ही पाकिस्तानी नागरिकांवर केला नव्हता तर केवळ आम्ही कट्टरतावाद्यांना यातून लक्ष्य केले आहे', असं इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीर अब्दोल्लाहियन यांनी म्हटलं होतं
जैश अल-अदल या दहशतवादी गटाशी संबंधित दोन तळांना लक्ष्य केल्याचं इराणनं सांगितल्याचं देशाच्या सैन्याशी संलग्न असलेल्या एका वृत्तसंस्थेनं म्हटलं होतं.
तर, या बेकायदेशीर हल्ल्यांचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं होतं.
इराक आणि सीरियावर हल्ले केल्यानंतर काही दिवसांतच इराणच्या हल्ल्याचा फटका बसणारा पाकिस्तान हा तिसरा देश ठरला आहे.
इराणचे परराष्ट्र मंत्री काय म्हणाले होते?
हा हल्ला आम्ही पाकिस्तानी नागरिकांवर केला नव्हता तर केवळ आम्ही कट्टरतावाद्यांना यातून लक्ष्य केले आहे', असं इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीर अब्दोल्लाहियन यांनी म्हटलं होतं.
दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या परिषदेत त्यांनी हे सांगितलं.
इराणचे परराष्ट्र मंत्री म्हणाले, "तिथं जैश-अल आदल नावाचा इराणी कट्टरवादी गट होता, त्यांनी पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात आश्रय घेतला होता.
आम्ही त्याबद्दल पाकिस्तान आणि त्यांच्या संरक्षण दलांशी याबद्दल अनेकवेळा बोललो आहोत. त्या गटाच्या लोकांनी आमच्या संरक्षण दलातील लोकांना इराणमध्ये येऊन मारलं. त्याला आम्ही प्रत्युत्तर दिलं."
"आम्ही फक्त इराणी कट्टरवाद्यांना पाकिस्तानच्या भूमीत जाऊन मारलं. यापूर्वी मी पाकिस्तानच्या पराष्ट्रमंत्र्यांशी बोललो, आम्ही पाकिस्तान आणि इराकच्या सार्वभौमत्वाची आणि प्रादेशिक एकात्मतेचा आदर करतो असं मी त्यांना सांगितलं. परंतु आमच्या राष्ट्राच्या सुरक्षेशी छेडछाड खपवून घेतली जाणार नाही तसेच राष्ट्रहिताचा विषय आल्यावर आम्ही कारवाई करायला संकोच करत नाही," असं अब्दोल्लाहियन यांनी म्हटलं होतं.
जैश अल-अदल काय?
यूएस डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्सच्या कार्यालयानुसार, “जैश अल-अदल हा सिस्तान-बलुचिस्तानमध्ये कार्यरत असलेला सर्वांत सक्रिय आणि प्रभावशाली सुन्नी दहशतवादी गट आहे.”
आधी या गटाचं नाव जुनदल्लाह असं होतं. पण, 2012 मध्ये या गटाचं नाव बदललं. नॅशनल इंटेलिजन्सच्या वेबसाइटनुसार, या गटाला 'पीपल्स रेझिस्टन्स ऑफ इराण' असंही म्हटलं जातंय
अब्दुल मलिक रेगी यांनी 2002-2003 मध्ये हा गट स्थापन केला आणि अनेक वर्षे ते त्याचे नेते राहिले.
2003 मध्ये इराणमधील सरकारी कार्यालयांवर हल्ले केल्यानंतर आणि माजी अध्यक्ष महमूद अहमदीनेजाद यांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर हा गट चर्चेत आला होता.
18 ऑक्टोबर 2009 रोजी या गटानं इराणच्या पिशिन शहरात हल्ला केला होता. पाकिस्तानातून सीमा ओलांडून आलेल्या आत्मघातकी बॉम्बरनं इराणी बलुच आदिवासी नेत्यांच्या बैठकीत बॉम्बस्फोट केला, असं इराणनं म्हटलं होतं. या बैठकीत इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे वरिष्ठ कमांडरही सहभागी झाले होते.
या हल्ल्यात देशाचे सर्वोच्च नेते आयतोल्लाह अली खामेनेई यांच्या जवळचे मानले जाणारे रिव्होल्युशनरी गार्ड्सचे उप-कमांडर नूर अली शुश्तारी मारले गेले होते.

फोटो स्रोत, JEYSH ALADL
या हल्ल्याने दोन्ही देशांमधील संबंधांची दिशाच बदलली होती.
अब्दुल मलिक रेगी यांना इराणनं अटक करून 2010 मध्ये फाशीची शिक्षा सुनावली. त्यानंतर हा गट अनेक भागात विभागला गेला. यापैकी जैश अल-अदल सर्वांत प्रभावी गट म्हणून पुढे आला.
हा गट मुख्यतः इराणी सुरक्षा दलांना लक्ष्य करतो. तसंच सरकारी अधिकारी आणि सामान्य शिया मुस्लिमांवर देखील हल्ले करतो. या गटाच्या हल्ल्याच्या पद्धतींमध्ये गोळीबार, अपहरण, खून आणि आत्मघाती स्फोट यांचा समावेश आहे.
या गटानं सीमेवरील चेक पॉईंट आणि तेथून जाणाऱ्या वाहनांवरही लहान शस्त्रे आणि रॉकेटने हल्ले केले आहेत.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं, 4 नोव्हेंबर 2010 रोजी जुनदल्लाह गटाला परदेशी दहशतवादी संघटना घोषित केलं. नंतर यात सुधारणा करण्यात आली आणि 2019 मध्ये जैश अल-अदलचे नाव त्यात समाविष्ट करण्यात आलं.
पाकिस्तानवरील हल्ल्यावर भारत काय म्हणाला?
इराणने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याची भारताने अप्रत्यक्षरित्या पाठराखण केल्याचं दिसत आहे.
हे दोन देशांमधील प्रकरण असलं तरी इराणने स्वरक्षणासाठी केलेली ही कारवाई आम्ही समजू शकतो, असं भारतीय परराष्ट्र मंत्रालायने म्हटलं आहे.
"हा मुद्दा इराण आणि पाकिस्तान या देशांतील आहे. भारताने यापूर्वीच दहशतवादविरोधात झिरो टॉलरन्सची भूमिका घेतली आहे. त्यामुळे एखाद्या देशाने स्वरक्षणासाठी केलेली कारवाई आम्ही समजू शकतो," असं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी जारी केलेल्या प्रेसनोटमध्ये नमूद केलं आहे.
अनेक वर्षांपासून पाकिस्तान हा दहशतवादाला पाठबळ देत आहे, असं भारताचं ठाम मत आहे.
त्यामुळे भारत-पाकिस्तान द्विपक्षीय चर्चाही अनेक वर्षांपासून स्थगित आहे. भारताने अनेकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देतो, असा दावा केला आहे.
हेही नक्की वाचा
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)










