अमेरिका : विवेक रामास्वामींची राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार, जाणून घ्या त्यांचा प्रवास

फोटो स्रोत, VIVEK2024.COM
- Author, सविता पटेल
- Role, बीबीसी न्यूजसाठी, कॅलिफोर्नियाहून
विवेक रामास्वामी यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाकडून दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
न्यूयॉर्क टाईम्सच्या बातमीनुसार, 38 वर्षीय उद्योगपती रामास्वामी यांनी त्यांच्या सुरुवातीच्या प्रचारादरम्यान माध्यमांमध्ये बरंच स्थान मिळवलं होतं.
मात्र, सोमवारी (15 जानेवारी) आयोवा कॉकसमध्ये सर्वांत कमी मतं मिळाल्यानं त्यांनी आपण प्रचार मागे घेण्याची घोषणा केली असून अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देणार असल्याचं सांगितलं आहे.
सोमवारी (15 जानेवारी) रात्री कॉकसचा निकाल आल्यानंतर ते म्हणाले, "आम्हाला जे मिळवायचे होते ते आज मिळाले नाही."
डोनाल्ड ट्रम्प यांनी आयोवामधून कॉकस जिंकले आहेत, तर रॉन डिसेंटस दुसऱ्या स्थानावर आहेत. शालेय जिम, टाऊन हॉल आणि इतर सार्वजनिक ठिकाणी कॉकसचं आयोजन केलं जातं. कॉकस ही एक प्रकारची स्थानिक बैठक आहे. दोन्ही प्रमुख पक्षांनी रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षातर्फे तिचं आयोजन केलं जातं. कार्यक्रमाचा खर्चही पक्षच उचलतात. नोंदणीकृत पक्षाचे सदस्य बैठकीत एकत्र येतात आणि अध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या निवडीसाठी त्यांच्या पाठिंब्यावर चर्चा करतात.
प्रतिनिधी निवडण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवाराला एकूण लोकांच्या ठराविक टक्के पाठिंबा मिळणं आवश्यक आहे. कॉकसचे सहभागी तांत्रिकदृष्ट्या अध्यक्षपदाचे उमेदवार निवडत नाहीत, पण त्याऐवजी ते प्रतिनिधी निवडतात. हे प्रतिनिधी नंतर अधिवेशन स्तरावर त्यांच्या उमेदवाराच्या बाजूनं मतदान करतात.
राष्ट्रीय अधिवेशनासाठी राज्यातून प्रतिनिधी निवडले जातात. आयोवासारख्या राज्यात दर दुसऱ्या वर्षी कॉकस आयोजित केले जातात. पण, बहुतेक राज्यांमध्ये, उमेदवार निवडण्यासाठी प्राथमिक स्पर्धा आयोजित केल्या जातात.
अमेरिकेत यावर्षी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आहे.
असा आहे विवेक रामास्वामींचा प्रवास
वोक पुस्तकाचे लेखक, कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक आणि उद्योजक विवेक रामास्वामींनी 21 फेब्रुवारी 2023 ला फॉक्स न्यूजच्या एका कार्यक्रमात राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत आपण उतरणार असल्याचे सांगितलं होतं.
रामास्वामींचं म्हणणं होतं की, "नव्या अमेरिकेच्या स्वप्नासाठी एक सांस्कृतिक आंदोलन उभारायचं आहे. जर एकमेकांना जोडून घेण्यासाठी आपल्याकडे काहीच उरलं नसेल, तर विविधतेला काहीच अर्थ उरत नाही."
37 वर्षांच्या रामास्वामींचा जन्म ओहायोमध्ये झाला होता. त्यांनी हॉर्वर्ड आणि येल विद्यापीठांमधून शिक्षण घेतलं आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रात कोट्यवधींची कमाई केली. त्यानंतर त्यांनी अॅसेट मॅनेजमेंट फर्म बनवली.
उच्च शिक्षणाला आणखी मजबूत करणं आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचं चीनवरील अवलंबित्व कमी करण्याचाही उल्लेख यावेळी केला होता.
भारतीय वंशाच्या नेत्यांचं समर्थन
विवेक रामास्वामींचे विचार विक्रम मंशारमणि यांच्या विचारांशी जुळतात. मंशारमणि 2022 च्या मध्यावधी निवडणुकांमध्ये अमेरिकन सिनेटसाठी हॅम्पशायरहून रिपब्लिकनचे उमेदवार होते.
विक्रम मंशारमणि यांनी काही दिवसांपूर्वीच विवेक रामास्वामींची भेटही घेतली होती. मंशारमणि यांच्या मते, रामास्वामी प्रचंड प्रभावशाली, विचारवंत आणि आपली बाजू योग्यपणे मांडणारे आहेत.
मंशारमणि म्हणतात की, रामास्वामींचा विचार अमेरिकेला वेगळं करण्याऐवजी अमेरिकेची एकजूट करणारा आहे.

फोटो स्रोत, Getty Images
"ओळखी (Identity) च्या राजकारणानं अमेरिकेत पाय पसरलं आहे आणि या प्रकारच्या राजकारणाचा परिणाम असा होतो की, एकजूट करण्याऐवजी विभागणी करण्याचं काम हे राजकारण करतं."
विवेक रामास्वामी हे ज्यावेळी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरले होते, तेव्हा बीबीसीनं त्यांच्याबद्दल विश्लेषणात्मक वृत्तलेख प्रकाशित केला होता. तो खालीलप्रमाणे :
विक्रम यांच्या राजकारणाशी असमहत
मात्र, जे भारतीय रामास्वामींच्या राजकारणाशी सहमत नाहीत, ते म्हणतात की, त्यांच्या कॅम्पेनमध्ये काही खास दिसून येत नाही.
डेमोक्रॅटिक पक्षाचे समर्थक शेखर नरसिंहन एशिया अमेरिकन्स अँड पॅसिफिक आयलँड्स म्हणजेच आपीचे संस्थापक अध्यक्ष आहेत.
नरसिंहन म्हणतात की, "अमेरिकेच्या राजकारणात भारतीय वंशाची व्यक्ती नाव कमावत आहे, याचा आनंद आहे. मात्र, रामास्वामींच्या विचारांवर काही विशेष विश्वास नाहीय."
"ते उद्यमशील आहेत आणि त्यांचा रेकॉर्ड स्पष्ट आहे. मात्र, ते काय आश्वासनं देत आहेत? वयोवृद्धांच्या वैद्यकीय सेवेबाबत त्यांना काळजी आहे? मूलभूत गोष्टींवर खर्च करण्यासाठी त्यांच्याकडे काय योजना आहेत? अनेक विषयांवर त्यांची मतं अद्याप समोर आलीही नाहीत," असंही शेखर सननरसिंह म्हणाले.

फोटो स्रोत, RAMASWAMY CAMPAIGN
नरसिंहन म्हणतात की, रामास्वामी अमेरिकेला उद्देशून काहीतरी बोलू इच्छितात आणि त्यासाठीच ते राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरले आहेत. मात्र, ते काय बोलू इच्छितात, हे अद्याप स्पष्ट नाही.
नरसिंहन असंही म्हणतात की, इतर भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांनीही रामास्वामींच्या भूमिकांचं नीट स्वीकार केला नाहीये.
'रामास्वामींना रणनीतीची गरज'
भारतीय वंशाच्या अनेकांनी अनेक दशकांपासून रिपब्लिक पक्षाला साथ दिलीय. मात्र, त्यातल्या कुणीच कधी रामास्वामींचं नाव ऐकलं नाहीय.
रिपब्लिकन पक्षाच्या समर्थक डॉ. संपत शिवांगी म्हणतात की, "मी त्यांना कधीच भेटली नाहीय. मला सांगितलं गेलं की, त्यांच्याकडे बराच पैसा आहे आणि ते चांगले बोलतात. मात्र, ते अनेक उमेदवारांपैकी एक असतील आणि त्यांना जिंकण्याची संधी फारच कमी आहे."
अनेकजण डॉ. संपत शिवांगींच्या मताशी सहमत दिसून येतात.

फोटो स्रोत, VIVEK2024.COM
जॅनी गायकवाड यांनी जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या कॅम्पेनसाठी निधी गोळा केला होता. ते म्हणतात की, "त्यांनी इतक्या लवकर राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरण्याची घोषणा केली नसती, तर क्वचितच कुणाला त्यांचं नाव कळलं असतं."
मात्र, राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रामास्वामी घेत असलेल्या सहभागाचं ते कौतुक करतात. गायकवाड म्हणतात की, रामास्वामींना एक रणनितीची आवश्यकता आहे आणि भारतीय वंशाच्या लोकांसाठी ही रणनिती वेगळी असली पाहिजे.
ते पुढे म्हणतात की, आता तर सुरुवात झालीय. फ्लोरिडामधून किमान दोन ताकदवान उमेदवार मैदानात उतरणार आहेत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








