फ्लाईट 93 ची गोष्ट : ते विमान जे अमेरिकन संसदेवर आदळवलं जाणार होतं

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रेहान फझल
- Role, बीबीसी हिंदी
11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेत अपहरणकर्त्यांनी दोन विमानं न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर धडकवली तर एक विमान वॉशिंग्टन डीसीमध्ये पेंटागॉन या संरक्षण मुख्यालयावर आदळवलं. अमेरिकन भूमीवरचा हा सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला होता.
त्याच वेळी अमेरिकेच्या संसदेवरही असाच हल्ला करण्याची योजना होती पण तो कट धुडकावून लावण्यात आला. त्या दिवशी अमेरिकन संसद कशी वाचली? ‘फ्लाईट 93’ या विमानातील प्रवाशांनी हल्ला थोपवण्यासाठी नेमकं काय केलं? जाणून घेऊया.
फ्लाइट 93 ला नियोजित वेळेपेक्षा 40 मिनिटे उशिर झाला. युनायटेड एअरलाइन्सचे हे बोईंग 757 प्रकारचे विमान नेवार्क आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीवर उड्डाणाच्या तयारीत होते.
या विमानात अरब वंशाचे चौघेजण फर्स्ट क्लासमध्ये वेगवेगळ्या रांगांत बसले होते आणि त्यांनी परतीची तिकिटंही बुक केली नव्हती.
आदल्या रात्रीच या चौघांनी अरबीत आलेला एक संदेश वाचला होता ज्याचा अर्थ असा होता की 'स्वतःला सर्व राग-लोभांपासून दूर ठेवा, कणखर बना आणि मरणासाठी आपण घेतलेल्या शपथेचा वारंवार पुनरुच्चार करत अल्लाहचे सारखे स्मरण करा.'
त्यावेळी आणि नंतर काय घडलं याचं विस्तृत वर्णन टॉम मॅकमिलन यांनी 'फ्लाइट 93 द आफ्टरमॅथ अँड द लेगसी ऑफ अमेरिकन करेज' या आपल्या पुस्तकात केलं आहे.
मॅकमिलन लिहितात, "अल-कायदाने अगदी काटेकोर नियोजन केलं. पण त्यांनी एका गोष्टीचा विचार केला नव्हता, की विमानाला जर उशीर झाला तर काय करायचं."
“अफगाणिस्तानच्या दुर्गम डोंगरात 1996 मध्ये पहिल्यांदा ही योजना आखण्यात आली होती आणि पुढील पाच वर्षात त्या योजनेत अनेक बदल झाले.”
साधारण एकाच सुमारास चार विमानं हायजॅक करायची आणि अमेरिकेतील प्रमुख इमारतींवर धडकवायची, म्हणजे देशातील प्रमुख नेते, लष्कराचे नेतृत्व यांच्याकडे या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी वेळच मिळणार नाही, अशी ही योजना होती.

फोटो स्रोत, LYONS PRESS
या योजनेसाठी अशा चार विमानांची निवड करण्यात आली, ज्यांचं टेकऑफ म्हणजे उड्डाण सकाळी 7.45 ते 8.10 दरम्यान होणार होतं. टेकऑफनंतर 15 मिनिटांत अपहरण करायचं ठरलं होतं.
त्यापैकीच फ्लाइट -93 देखील एक होतं. या विमानाविषयीची अनेक रहस्यं कायम आहेत.
पण विमानातलं डेटा रेकॉर्डिंग आणि फोनकॉल्सच्या माध्यमातून त्या वेळी काय घडले असावे, याचा अंदाज तपास यंत्रणांनी लावला. त्यावर अमेरिकेत विस्तृत लिखाणही झालं आहे.
कॉकपीटमध्ये हल्लेखोर घुसल्याचा इशारा
अमेरिकेतली नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाच्या रेकॉर्डनुसार जेसन डाल हे या विमानाचे पायलट होते तर त्यांच्यासोबत फर्स्ट ऑफिसर म्हणून लेरॉय होमर होते.
उड्डाणासाठी परवानगी कधी मिळेल याची वाट ते पाहत होते.


एअर ट्राफिक कंट्रोलने त्यांना सकाळी 8 वाजून 41.49 मिनिटांनी संदेश पाठवला, 'आता तुम्ही रनवेवरुन टेकऑफ करू शकता.'
तो दिवस होता मंगळवार, 11 सप्टेंबर 2001.
फ्लाइट -93 ने एकदाची आकाशात झेप घेतली. 188 जणांची क्षमता असलेल्या विमानात केवळ 33 प्रवासी असल्यामुळे विमान रिकामं वाटत होतं.
विमानात फर्स्ट क्लासमध्ये वेगवेगळ्या रांगांमध्ये चौघे जण बसले होते. रेकॉर्डनुसार त्यांची नावे झियाद जर्राह, अहमद अल हजनावी, अहमद अल नमी आणि सईद अल गमडी अशी होती.
उड्डाणाच्या एका मिनिटानंतर त्यांनी त्यांच्या मिशनची तयारी सुरू केली. त्यावेळी न्यूयॉर्कमध्येच आणखी काही घडत होतं.

फोटो स्रोत, Getty Images
त्यावेळी न्यूयॉर्कमध्येच आणखी काही घडत होतं.
सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनी 500 किमी प्रति तास वेगाने उडणारे एक विमान वर्ल्ड सेंटरवर धडकण्यात आले होते. या विमानाची धडक इतकी जोरात होती की 93 व्या आणि 99 व्या मजल्यांदरम्यान एक मोठ्ठं भगदाड पडलं.
बरोबर 17 मिनिटांनी म्हणजे 9 वाजून 3 मिनिटांनी वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दुसऱ्या टॉवरवर दुसरं विमान धडकल्यावर अमेरिकेच्या सरकारला लक्षात आलं की, आपल्यावर हल्ला झाला आहे.
युनायटेड एयरलाईन्सचे डिस्पॅचर म्हणजे विमान वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी असलेले एक उच्चअधिकारी एड बॅलिंगर यांनी 9:19 वाजता त्या भागात हवेत असलेल्या 16 विमानांना इशारा दिला की 'कॉकपिटमध्ये घुसखोरी होण्याची शक्यता आहे, सावधगिरी बाळगा. नुकतीच न्यूयॉर्कमध्ये ट्रेड सेंटरवर दोन विमानं धडकवली आहेत.'
हा संदेश फ्लाइट 93 चे कॅप्टन जेसन डाल यांनीही 9 वाजून 24 मिनिटांनी ऐकला, असं रेकॉर्डमधून दिसतं.
परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी डाल यांनी दोन मिनिटांनी एड बॅलिंगर यांना विचारलं, 'एड, कंफर्म लेटेस्ट मेसेज.'
यानंतर बरोबर 2 मिनिटांनी म्हणजेच 9:28 वाजता कॉकपीटच्या दरवाजाबाहेर गोंधळ ऐकू आला.
एअर ट्राफिक कंट्रोलरनं ऐकला आवाज
डोक्यावर लाल स्कार्फ बांधलेले चौघेजण जागेवरुन उठले आणि 9:28 वाजताच त्यांनी कॉकपीटमध्ये प्रवेश केला. याचा सर्वांत मोठा पुरावा म्हणजे बरोबर त्याच वेळी विमान अवघ्या 30 सेकंदातच 680 फूट खाली आलं होतं.
त्याचवेळी क्लीवलँडच्या एअर ट्राफिक कंट्रोलरला एक आवाज ऐकू आला. 'मे डे...गेट आउट ऑफ हिअर.' 30 सेकंदांनी पुन्हा हाच आवाज ऐकू आला 'गेट आउट ऑफ हिअर.'
कॉकपीटमध्ये सुरू असलेल्या झटापटीचा आवाज खाली एअर ट्राफिक कंट्रोलरला अस्पष्ट ऐकू येत होता. कदाचित डाल किंवा होमर यांपैकी एकानं मुद्दामहून आपला मायक्रोफोन सुरू ठेवला, म्हणजे ऐकणाऱ्याला विमानात काय सुरू आहे हे कळेल.

फोटो स्रोत, Getty Images
या प्रसंगाचं विस्तृत वर्णन मिशेल जुकौफ यांनी ‘फॉल अँड राइज - द स्टोरी ऑफ 9/11’ या पुस्तकात केलं आहे. त्या लिहितात की, पुढच्या 90 सेकंदात सात वेळा क्लीवलँड एअर ट्राफिक कंट्रोलच्या जॉन वर्थ या अधिकाऱ्याने विमानाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण उत्तर आले नाही. थोड्या वेळातच त्यांना याचे कारण लक्षात आले - विमानाचे नियंत्रण बाहेरील व्यक्तीच्या हातात होते.
9:31 वाजता एका अनोळखी इसम बोलू लागला, त्याच्या श्वासोच्छवासाचा आवाजही ऐकू येत होता.
विमानातल्या लोकांना उद्देशून त्यानं घोषणा केली, 'लेडीज अँड जंटलमन हिअर द कॅप्टन. प्लीज सीट डाऊन. कीप रिमेन सीटेड वुई हॅव अ बॉम्ब.'
झियाद जर्राहने फ्लाइट 93 वर नियंत्रण मिळवले होते.

फोटो स्रोत, Getty Images
नवख्या अप्रशिक्षित पायलटसारखं जर्राह विमान खाली आणू लागला. त्यानं विमान अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीकडे वळवले.
9:33 वाजता एका महिलेचा आवाज आला. ती विनवणी करत होती, मला मारू नका. तपास अधिकाऱ्यांच्या मते कदाचित ही महिला म्हणजे विमानातील क्रू मेंबर डेबी वेल्श किंवा वाँडा ग्रीन असावी.
9/11 ला ज्या विमानांचे अपहरण झाले होते त्या चारही विमानांत अपहरणाची सुरुवात महिला क्रू मेंबरवर हल्ला करून केली होती, असं सर्वमान्य झालं आहे.
9 वाजून 35 मिनिटांनी एका महिलेचा आवाज आला, 'आय डोंट वाँट टू डाय'.
व्हॉइस रेकॉर्डरच्या ट्रान्सक्रिप्टनुसार 9 वाजून 37 मिनिटांनी कॉकपिटमधला प्रतिकार थांबला. तेव्हा एक अपहरणकर्ता, बहुदा गमडी अल सईद, म्हणाला की 'एव्हरीथिंग इज फाइन. आय फिनिश्ड.'
त्यानंतर त्या महिला क्रू मेंबरचा आवाज आला नाही. बहुतेक तिची हत्या केली आली असावी.
फोनवरून घरच्यांशी संपर्क
9 वाजून 39 मिनिटांनी जर्राहनं दुसरी अनाउन्समेंट केली, तोवर त्यानं विमान 40 हजार फुटांवर आणलं होतं.
त्याच्या आवाजात यावेळी आत्मविश्वास वाढला होता. तो जे म्हणाला तेही एयर ट्रॅफिक कंट्रोलला ऐकू आलं, "मी कॅप्टन बोलतोय. तुम्ही सर्वांना आपापल्या जागेवर शांतपणे बसा. आमच्याकडे बॉम्ब आहे. आपण एअरपोर्टवर परतत आहोत. आमच्या काही मागण्या आहेत. तेव्हा सर्वांनी शांत बसावे."
या विमानात एक अत्याधुनिक सुविधा होती. 'व्हेरीजोन' नावाच्या तंत्रज्ञानामुळे विमानातून मायक्रोफोनच्या सहाय्याने प्रवासी आणि क्रू मेंबर्सला जमिनीवरील लोकांशी संपर्क साधता येणे शक्य होते.

फोटो स्रोत, AVID READER PRESS / SIMON & SCHUSTER
विमानाचे अपहरण झाल्यावर अर्ध्या तासात 12 प्रवाशांनी 23 व्या आणि 34व्या रांगेतल्या या एयरफोनच्या मदतीने जमिनीवर 35 कॉल्स लावले. त्यापैकी 20 कॉल डिसकनेक्ट झाले पण 15 कॉल्सवर लोकांना बोलता आलं.
या कॉल्समुळे विमानात काय सुरू आहे याची कल्पना सर्वांना आली.
सर्वांत आधी 9 वाजून 30 मिनिटांनी टॉम बर्नेट नावाच्या व्यक्तीने कॅलिफोर्नियात त्याची पत्नी डीनाशी संपर्क साधला.
'द ओन्ली प्लेन इन द स्काय - अॅन ओरल हिस्टरी ऑफ 9/11' या पुस्तकात गॅरेट एम ग्राफ या कॉलविषयी लिहितात. ‘डीनाने टॉम यांना विचारलं, 'तुम्ही ठीक आहात का?' त्यावर टॉम यांनी उत्तर दिलं, ‘नाही. मी ज्या विमानात आहे त्याचं अपहरण झालंय. हायजॅकर्सने एका व्यक्तीला सुऱ्याने भोसकलं आहे आणि त्यांच्याजवळ बॉम्ब आहे. तू पोलिसांना कळव.’
विमानातली महिला क्रू मेंबर सँडी ब्रॅडशॉनं युनायटेड एयरलाइंसच्या सॅन फ्रान्सिस्कोमधील कार्यालयात 9 वाजून 35 मिनिटांनी फोन लावून अपहरणाची माहिती दिली. सहा मिनिटं ती अगदी संयत आवाजात बोलत होती.

फोटो स्रोत, Getty Images
टॉम मॅकमिलन लिहितात की, या दरम्यान मार्क बिंगहमनी आपल्या आईला फोन लावून सांगितलं, 'मी मार्क बिंगहम बोलतोय.' ते इतक्या तणावात होते की आईशी बोलताना देखील त्यांनी आपलं पूर्ण नाव सांगितलं. ते म्हणाले, “माझं तुझ्यावर प्रेम आहे. मी आता सॅन फ्रान्सिस्कोला जाणाऱ्या विमानात आहे. तिघांनी विमानावर ताबा मिळवला आहे आणि ते सांगतायत की त्यांच्याकडे बाँब आहे.”
मार्क यांची आई एलिस यांनी विचारलं, मार्क ते लोक कोण आहेत?
मार्क यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, पण ते म्हणाले, 'माझ्यावर विश्वास ठेवा. मी जे काही बोलत आहे ते खरं आहे.'
लगेच विमान उतरवण्याचा आदेश
आता परत येऊया कंट्रोल रूमकडे,
क्लीवलँड एअर ट्राफिक कंट्रोलरने जर्राहची घोषणा ऐकल्यावर त्याला लगेच उत्तर दिले, 'तुमच्याकडे बॉम्ब आहे, आमच्या लक्षात आलं आहे. आता पुढे बोला.’
त्या वेळी एअर कंट्रोलर जॉन वर्थ यांच्यासमोर आणखी एक मोठं आव्हान होतं.
9 वाजून 42 मिनिटांनी केंद्रीय यंत्रणेनं त्या भागातल्या सर्व गैरलष्करी विमानांना त्वरीत खाली उतरण्याची सूचना दिली होती.
सर्व विमानं त्वरीत खाली उतरली. पण फ्लाइट-93 मात्र उडतच होतं आणि वॉशिंग्टनकडे जात होतं.
अमेरिकन लोकांना आता अंदाज आला, की हे विमान एकतर 'व्हाईट हाऊस'च्या किंवा 'कॅपिटल हिल' ( संसद भवन) च्या दिशेनं जात आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मिशेल जुकोफ लिहितात, कॅपिटल हिलच्या हॉलमध्ये ओरडत-ओरडत एक पोलीस आला. त्याने सांगितलं की एक विमान या दिशेनी येत आहे, तुम्ही बाहेर निघा.
ते ऐकून अनेक महिला अनवाणी बाहेर पडल्या. धोक्याची सूचना देणारे सायरन वाजू लागले.
काँग्रेस म्हणजे कनिष्ट सभागृहातील सदस्य झाडाखाली जमा झाले तर सिनेट सदस्यांना पोलिसांनी शीतयुद्धाच्या काळात तयार करण्यात आलेल्या बंकरमध्ये नेलं.
प्रवाशांचा प्रतिकार
तोवर इकडे विमान 40 हजार फुटांच्या उंचीवरुन 20 हजार फुटांच्या उंचीवर आले होते.
9/11 च्या अपहरकणकर्त्यांपैकी एकट्या जर्राहकडेच पायलटचे कमर्शियल लायसन्स नव्हते आणि इतर अपहरणकर्त्यांपेक्षा त्यानं कमी काळ विमान उडवायचं प्रशिक्षण घेतलं होतं. फ्लाईट 93 उडवतानाही जर्राहला अडचणी येत होत्या.
दरम्यान प्रवाशांनी हायजॅकर्सचा प्रतिकार करण्याची योजना आखायला सुरुवात केली.
टॉम मॅकमिलन लिहितात, “टॉम बर्नेटने त्यांची पत्नी डीना यांना फोनवरुन सांगितलं होतं की ते एक योजना आखत आहेत. त्यावर डीना यांनी विचारलं की तुमच्या मदतीला कोण आहे? त्यावर टॉम म्हणाले की अनेक जण – आम्ही एक समूह केला आहे. एक दुसरा प्रवासी टेरेमी ग्लिकनी सांगितलं की आम्ही आमच्यात मत देऊन ठरवत आहोत पुढे काय करायचं. माझ्यासारखेच अंगापिंडाने मजबूत असलेले तीन जण विमानात आहेत. आम्ही हल्लेखोरांवर चाल करण्याचा विचार करत आहोत."

फोटो स्रोत, LYONS PRESS
टॉमने हेही सांगितलं की, तो हत्यार म्हणून नाश्त्याच्या वेळी मिळालेल्या बटर नाइफचा वापर करणार आहे.
टॉड बीमर यांनी फोनवर लिजा जेफरसन यांना सांगितलं की "आम्ही काहीतरी करणार आहोत, त्याशिवाय आमच्याकडे कुठला पर्याय उरलेला नाही."
'लेट्स रोल'
9 वाजून 53 मिनिटांनी झियाद जर्राह आणि सईद अल गमडीला लक्षात आलं की विमानात असलेले प्रवासी बंड करू शकतात.
त्यांना कॉकपीट बाहेर उभे असलेल्या अहमद अल हजनवी आणि अहमद अल नमी यांनी सांगितलं होतं की ‘प्रवासी सतत फोनवर आहेत, आपसांत चर्चा करत आहेत आणि आमच्याकडे रोखून पाहत आहेत.’
जर्राहला हे माहीत होतं की जर आपल्याला आपल्या नियोजित स्थळी पोहचायचं असेल तर अजून किमान अर्धा तास लागू शकतो.

फोटो स्रोत, LYONS PRESS
टॉम मॅकमिलन लिहितात, "बंडाच्या तयारीत असलेले प्रवासी विमानात मध्यभागी एकत्र आले. क्रू मेंबर सँडी ब्रॅडशॉने विमानाच्या पाठीमागच्या भागात किचनमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवले. हे पाणी अपहरणकर्त्यांवर फेकण्याचा त्यांचा डाव होता. काही तपासकर्त्यांच्या मते प्रवाशांनी खाण्या-पिण्याची ट्रॉली कॉकपीटवर जोरात आदळण्याचाही विचार केला होता.
टॉम बर्नेटच्या बायकोनं टॉमला विचारले की तुम्ही हल्ला करण्यासाठी तयार आहात का, तेव्हा टॉम यांचे उत्तर होते,
'येस, लेट्स रोल.'
प्रवाशांचा कॉकपीटवर हल्ला
बरोबर 9 वाजून 57 प्रवाशांनी हल्ला केला. तोवर विमान वाहतुकीच्या इतिहासात निशस्त्र प्रवाशांनी हायजॅकर्सवर कधी असा हल्ला केला नव्हता.
गॅरेट एम ग्राफ लिहितात की तेव्हा एलिझाबेथ व्हॅनियोनं तिच्या सावत्र आईला फोनवर सांगितलं, ‘हे लोक कॉकपीटमध्ये घुसण्यासाठी तयार आहेत. मलाही जावं लागेल. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. गुडबाय."
सँडी ब्रॅडशॉनेही तिच्या पतीला सांगितलं की, 'सर्वजण फर्स्ट क्लासकडे जात आहेत. मलाही जावं लागेल. बाय.'
बोईंग 757 प्रकारच्या त्या विमानात सीट्समधल्या 20 इंच चिंचोळ्या गल्लीतून जात त्यांनी कॉकपीटवर हल्लाबोल केला. झर्राह आणि गमडीला त्यांचे आवाज ऐकू होते, त्या दोघांना विमान उडवताना अडचणी येत होत्या.
आवाजांमुळे त्यांचे लक्ष विचलित झाले. व्हॉइस रेकॉर्डरच्या ट्रान्सक्रिप्टनुसार 9 वाजून 57 मिनिटांनी जर्राहने ओरडून विचारलं 'काय सुरू आहे तिकडे?' त्याला भांडणाचे आवाज ऐकू येऊ लागले.

फोटो स्रोत, Getty Images
प्रवाशांचे संतुलन जावे म्हणून त्यानं विमान उजवीकडून डावीकडे वळवण्यास सुरुवात केली.
त्याच वेळी टॉम बर्नेट जोराने ओरडले, 'कॉकपीटमध्ये..! कॉकपीटमध्ये..!' तेव्हा जर्राहने त्याच्या साथीदाराला अरबीत सूचना दिली, कॉकपीटचा दरवाजा आतून बंद राहू द्या.
त्याने विमानाचे पंख हलवणं सुरू ठेवलं, तोवर विमान पाच हजार फुटांपर्यंत खाली आलं होतं.
9:59 वाजता जर्राहने योजना बदलली. तो विमानाचे नोज (विमानाचा पुढचा भाग) खाली वर करू लागला. 10 वाजेपर्यंत प्रवाशांचा हल्ला आणखी तीव्र झाला, तसं अपहरणकर्ते विमान कोसळवण्याची चर्चा करू लागले.
जर्राहने विचारले की प्लेन क्रॅश करायचं का? त्यावर गमडी म्हणाला 'आताच नको, ते सगळे आत येतील तेव्हा संपवू.'
फ्लाइट 93 पुन्हा एकदा खाली येत होतं. अजून प्रवासी कॉकपीटमध्ये घुसले नव्हते आणि विमानाचं नियंत्रण जर्राहच्याच हाती होतं. पण त्याला प्रसंगाचे गांभीर्य लक्षात आले होते.

फोटो स्रोत, Getty Images
जर्राहने पहिल्यांदा गमडीचे नाव उच्चारले. 'वर खाली कर, सईद, वर खाली कर'. पाच सेकंदाने एक प्रवासी ओरडला.
'रोल इट' - कदाचित तेव्हा खाण्यापिण्याची ट्रॉली कॉकपीटच्या दरवाजावर आदळवली असावी, कारण त्यानंतर प्लेट आणि ग्लास फुटल्याचे आवाज आले होते.
फ्लाइट 93 क्रॅश
10 वाजता पुन्हा विमान वर जाऊ लागलं.
टॉम मॅकमिलन लिहितात की त्याच वेळी जर्राहने विचारलं, "वेळ आली आहे का? आता आपण प्लेन क्रॅश करायचं का?"
त्यावर गमडी उत्तरला, 'ठीक आहे, तसंच करू.'
अचानक प्रवासी ओरडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. विमान उडवणे सुरू ठेवले तर लवकरच प्रवासी आपल्यावर नियंत्रण मिळवतील, असं हायजॅकर्सना वाटलं. नाईलाजानं जर्राह ओरडला, 'सईद, ऑक्सिजनचा सप्लाय बंद कर.'
त्याच वेळी प्रवासी ओरडत होते, गो..गो.. मूव्ह मूव्ह..
त्या क्षणी प्रवासी कॉकपीटचा दरवाजा तोडण्यात यशस्वी झाले आणि जर्राहला मारू लागले.
गमडी विमानावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होता, पण परिस्थिती त्याच्या हाताबाहेर गेली होती.
विमान पेन्सिल्विनियाच्या सॉमरसेट काउंटीत खूपच खाली आलं होतं.
ताशी 563 मैल वेगाने आणि 40 अंशाच्या कोनात वळून विमानानं ‘नोज डाइव्ह’ केले. विजेच्या तारांना तोडत 10 वाजून 3 मिनिटांनी विमान जमिनीवर आदळले.
त्यावेळी विमानात पाच हजार गॅलन जेट इंधन होतं. कोसळताच विमानाचे तुकडे तुकडे झाले आणि त्यानं पेट घेतला.
विमान आदळले, ती जागा अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी पासून 15 मिनिटांवर होती. धाडसी प्रवाशांनी बलिदान देत एका मोठ्या हल्ल्याचा कट उधळून लावला होता.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











