बलुचिस्तानातील ‘या’ कट्टरतावादी संघटना एकत्र, पाकिस्तानसाठी का आहे धोक्याची घंटा?

बलुचिस्तान

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, रियाझ सोहेल
    • Role, बीबीसी उर्दू डॉट कॉम, कराची

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये सक्रिय असलेल्या कट्टरतावादी संघटनांनी एकत्र येण्यासाठी चर्चा सुरु केलीय.

बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या दोन मोठ्या संघटनांमध्ये याविषयी एकमत झालं असलं तरी अजूनही या एकत्रित संघटनेचं नेतृत्व कोण करणार याबाबत मात्र अजूनही निर्णय झालेला नाही.

प्रामुख्याने बलोच लोकांची वस्ती असणारं कलात संस्थान पाकिस्तानमध्ये विलीन झाल्यानंतर या भागाला स्वतंत्र करण्यासाठी सुरु झालेली ही चौथी सशस्त्र चळवळ आहे.

अलीकडे पाकिस्तानातील ग्वादर बंदर बांधण्याची सुरुवात झाली आणि बलोच कट्टरतावादी चळवळीचा पाया रचला गेला आणि 'सुई'मधील एका महिला डॉक्टरवर झालेल्या कथित बलात्काराच्या प्रकरणानंतर या चळवळीने वेग घेतला.

या घटनेनंतर प्रख्यात बलुच नेते नवाब अकबर बुगती यांनी न्यायासाठी आवाज उठवला.

यानंतर अकबर बुगती आणि परवेझ मुशर्रफ यांच्यात संघर्ष सुरु झाला आणि 2006 मध्ये पाकिस्तानच्या लष्कराने केलेल्या एका कारवाईत बुगती यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर पाकिस्तानविरोधी भावनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं आणि यानंतर बलोच तरुणांच्या गायब होण्याच्या घटनांमध्ये वाढ झालीय.

चीन आणि पाकिस्तानमध्ये इकॉनॉमिक कॉरिडॉर करार झाल्यानंतर चीनने ग्वादर बंदराच्या व्यवस्थापनाबरोबरच ग्वादरमध्ये औद्योगिकीकरणाची योजना आखली, तेंव्हापासूनच बलोच कट्टरतावाद्यांनी या प्रकल्पाला लक्ष्य करण्यास सुरुवात केली.

फार पूर्वीपासून एकत्रीकरणाचे प्रयत्न सुरु आहेत

सध्या बलुचिस्तानमध्ये बलोच लिबरेशन फ्रंट, बलोच लिबरेशन आर्मी, बलोच रिपब्लिकन गार्ड, बलोच लिबरेशन टायगर्स, बलोच नॅशनलिस्ट आर्मी आणि युनायटेड बलोच आर्मी अशा वेगवेगळ्या कट्टरतावादी संघटना सक्रिय आहेत.

या संघटनांपैकी बीएलए, बीएलएफ आणि बीआरजी या तिन्ही संघटनांनी एकत्र येऊन 'ब्रास' नावाची एक संयुक्त संघटना आधीपासूनच काम करते.

या संघटनांना एकत्र येण्याची गरज का भासत आहे?

बलुचिस्तान

फोटो स्रोत, Getty Images

याबाबत बलोच लिबरेशन आर्मी या संघटनेचे कमांडर बशीर जैब यांनी बीबीसीला सांगितलं की, "पाकिस्तानपासून स्वतंत्र होण्यासाठी बलोच राजकीय आणि लष्करी शक्तींना बळकट करणं आणि शत्रूविरुद्धच्या प्रभावी चळवळीत त्यांचा समावेश करणं खूप गरजेचं आहे."

बलोच लिबरेशन फ्रंटचे प्रमुख डॉ अल्लाह नजर म्हणतात की, "सुरुवातीपासूनच विलीनीकरण किंवा एकत्रीकरणाचे प्रयत्न सुरु होते आणि आता ते यशस्वीही झाले आहेत."

ते पुढे म्हणाले की, "या भागातले सगळे पक्ष आणि संघटना एकाच उद्देशाने प्रेरित आहेत आणि ते म्हणजे स्वातंत्र्य."

'हल्ल्याची क्षमता वाढविण्यासाठी एकत्र येत आहोत'

पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ पीस स्टडीजचे प्रमुख आणि या संघटनांवर लक्ष ठेवणारे विश्लेषक आमिर राणा म्हणतात की, "संयुक्त हल्ले करण्यासाठी आणि या संघटनांची ताकद वाढविण्यासाठी विलीनीकरणाची गरज आहे."

आमिर राणा म्हणतात की, “यासोबतच त्यांची ताकद आणि संघटनात्मक बांधणी ही एकाच ठिकाणी केंद्रित झाली पाहिजे. सध्या ज्या संघटना एकत्रीकरणाचे प्रयत्न करत आहेत ते त्यांच्या क्षेत्रातील संघटनांकडे तर जातातच पण यासोबतच बलुचिस्तानच्या आदिवासी (कबायली) संघटनांकडेही ते जात आहेत."

वॉशिंग्टनमध्ये राहणारे विश्लेषक मलिक सिराज अकबर म्हणतात की, "बलोच संघटनांनी याआधी केलेल्या अशा प्रयत्नांची तुलना केली तर त्यावेळच्या रणनीती आणि पातळीमध्ये मोठा फरक आहे."

डॉ. अल्लाह नज़र

फोटो स्रोत, BLA

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

सिराज अकबर म्हणतात की, “या संघटनांचे लक्ष एकच आहे आणि ते म्हणजे पाकिस्तानचं जास्तीत जास्त नुकसान करणं, यामुळेच या संघटनांकडून होणाऱ्या कारवाईचं प्रमाण पूर्वीच्या तुलनेत कमी झालं आहे, मात्र याआधी एकत्र होण्यापेक्षा त्याचं नियोजन करण्यातच जास्त वेळ घालवल्याचं दिसतं."

"भूतकाळाच्या तुलनेत, या संघटना आता एकमेकांबद्दल जास्त सकारात्मक झाल्या आहेत आणि सोबत काम करण्याकडे त्यांचा कल वाढला आहे कारण आणि एकत्र येणे हा त्यांच्यासमोरचा पर्याय नसून त्यांच्या अस्तित्वासाठी ते अनिवार्य आहे."

बलोच संघटनांनी अलीकडच्या काळात केलेल्या या प्रयत्नांकडे बघताना विश्लेषक त्याचा संबंध बलोच नॅशनल आर्मीचे प्रमुख गुलजार इमाम यांच्या कथित अटकेशी देखील जोडतात.

याबाबत बोलताना आमिर राणा म्हणतात की, "गुलजार इमाम यांच्यासोबत जे काही घडलं ते घडू नये म्हणून सगळ्या संघटनांची शक्ती एकत्रित करण्याची गरज असल्याचं त्यांना वाटतंय."

मलिक सिराज अकबर देखील या मताशी सहमत आहेत आणि म्हणतात की गुलजार इमामची अटक त्या संघटनांसाठी एक मोठा धक्का होता कारण गुलजार इमाम हे फक्त एक सैनिक नव्हते तर ते एक कमांडर होते.

“या सगळ्या संघटनांची माहिती त्यांना आहे. गुलजारच्या अटकेनंतर आता या संघटना झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांच्याबद्दलची माहिती सरकारपर्यंत पोहोचू नये म्हणून संघटित होण्याचे ते प्रयत्न करत आहेत."

या गटाचं नेतृत्व कोण करेल?

बलुचिस्तानातील या संघटनांचं नेतृत्व दोन भागात विभागलं जाऊ शकतं. एक म्हणजे डॉ. अल्लाह नजर आणि दुसरे बशीर झैब म्हणजेच काय तर प्रत्यक्ष बलुचिस्तानमध्ये राहणारे लोक आणि परदेशात राहणारे लोक अशी ही विभागणी असेल.

पाकिस्तान सरकारच्या म्हणण्यानुसार, नवाब अकबर बुगती यांचा नातू बरहमदग बुगती, नवाब खैर बख्श मारीचा मुलगा हरबयार मारी आणि त्यांचा धाकटा भाऊ मेहरान मारी यांचाही बलुचिस्तानमधील या संघटनांमध्ये सहभाग आहे.

डॉ.अल्लाह नजर म्हणतात की, त्यांनी मित्रांच्या माध्यमातून त्यांनाही संघटनेत सामील होण्यासाठी निमंत्रित केलं आहे कारण सगळ्यांनी एकत्र येऊन स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला पाहिजे असं त्यांना वाटतं.

हल्ला

फोटो स्रोत, Getty Images

बशीर झैब म्हणतात की, "स्वातंत्र्य चळवळीत विचार आणि कृती सर्वोच्च आहेत, जी तरुणांनी त्यांच्या सजग भूमिकेतून आणि बलिदानातून स्पष्ट केली आहे."

"ही गोष्ट कोणत्याही समंजस माणसाला समजते की केवळ कागदावर एकत्र येऊन चालणार नाही तर प्रामाणिक हेतू ठेवून एकत्र येऊन हा संघर्ष झाला पाहिजे. जेणेकरून एक व्यावहारिक सामुदायिक शिस्त असलेली एक शक्ती तयार केली जाऊ शकेल."

या एकसंध संघटनेचे नेतृत्व कोण करणार याबाबत संघटनेतील लोकांमध्ये चर्चा सुरू आहे.

बलुच लिबरेशन फ्रंटचे कमांडर डॉ. अल्लाह नजर म्हणतात, "आम्ही नेहमीच संघटनेचे नेतृत्व करत आलो आहोत, भविष्यातही आमचे नेतृत्व संघटना आणि त्यांच्या संस्था करणार आहोत."

संभाव्य संघटनेच्या नावाबाबत डॉ. अल्लाह नजर म्हणतात की, 'ब्रास'सह ते कोणतेही नाव असू शकते जे संस्थेच्या मित्र आणि संस्थांच्या मतानंतर ठरवले जाऊ शकते.

बशीर झैब म्हणतात की, "बलोच चळवळ चालवणाऱ्या आणि स्वतंत्र आणि समृद्ध बलुचिस्तानसाठी संयुक्तपणे आंदोलन करणाऱ्या संघटनेचे किंवा पक्षाचे नाव काहीही असले तरी ते बलोच समुदायाला ते मान्य असेल."

आत्मघाती हल्ले

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या मजीद ब्रिगेडने गेल्या वर्षी कराची विद्यापीठातील कन्फ्यूशियस सेंटरमधील शिक्षकांवर आत्मघाती हल्ल्यासोबतच इतरही हल्ले केले आहेत.

एका महिलेने हा हल्ला केला होता आणि शरी बलोच हे त्या महिलेचं नाव असल्याचं सांगितलं होतं.

या आत्मघातकी हल्ल्यांना बलुच लिबरेशन फ्रंटचा विरोध आहे, विलीनीकरण झाल्यास या हल्ल्यांमध्ये बदल होईल का? असा प्रश्न आहे.

डॉ. अल्लाह नजर म्हणतात की, "प्रत्येक संघटनेत वेगवेगळ्या मतांचे लोक असतात, त्यामध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. पक्षशिस्त, प्रगती आणि संस्थांचे महत्त्व यामुळे पाकिस्तानशी दीर्घ लढा सुरू आहे."

कट्टरतावादी संघटनेचे कार्यकर्ते

फोटो स्रोत, Getty Images

बशीर झैब म्हणतात, "बलुचिस्तानला पूर्ण स्वातंत्र्य मिळेपर्यंत फिदाईन हल्ले अधिक ताकदीने चालू राहतील."

विलीनीकरणातून मोठी शक्ती उदयास येईल

बीएएलएफ आणि बीएलएसह 'ब्रास'मध्ये समाविष्ट असलेल्या संघटनांचेही विलीनीकरण झाल्यास ती मोठी गोष्ट ठरेल, असं विश्लेषकांचं मत आहे.

पाकिस्तान इन्स्टिटय़ूट ऑफ पीस स्टडीजचे प्रमुख आमिर राणा सांगतात की, "पाहिले तर, सर्वांत मोठा पक्ष बीएलएफ आहे तर बीआरए आणि बलुच रिपब्लिकन गार्ड यांची आदिवासी पार्श्वभूमी आहे."

ते म्हणतात की 'नेतृत्व कोणाकडे असणार?' या आव्हानाला सामोरं जावं लागेल आणि हे आव्हान यापूर्वीही बलुच संघटनांनी पेलले आहे.

विश्लेषक मलिक सिराज अकबर म्हणतात की सदस्यसंख्येच्या बाबतीत, बीएलए आणि बीएलएफ आता जवळजवळ पूर्णपणे बिगर आदिवासी नेतृत्वाच्या हातात आहेत.

तालिबानला मिळालेल्या यशातून घेतली प्रेरणा

काही विश्लेषक बलुच संघटनांच्या विलीनीकरणाची तुलना तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानशी करतात.

तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) ची या संघटनेची स्थापना डिसेंबर 2007 मध्ये झाली होती.

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात सावत, दक्षिण वझिरीस्तान, महमंद, बाजौर, औरकझाई, दर्रा आदम खेल आणि इतर भागात वेगवेगळे तालिबानी गट स्वतंत्रपणे काम करत होते.

पण नंतर, अल कायदाच्या स्थानिक नेत्यांच्या प्रयत्नांमुळे, या सर्व गटांनी तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान नावाची एक संघटना बनवली आणि एकाच प्रणालीमध्ये काम करण्यासाठी ते सगळे गट सहमत झाले.

कट्टरतावादी संघटनेचे कार्यकर्ते

फोटो स्रोत, Getty Images

युनायटेड स्टेट्स इन्स्टिट्यूट ऑफ पीसचे वरिष्ठ विश्लेषक असफंदयार मीर म्हणतात की, "तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या उदाहरणाकडे एक आदर्श म्हणून बघितलं गेलं."

ते म्हणतात, “गेल्या दोन वर्षांत बलुच चळवळीची तीव्रता वाढली आहे आणि टीटीपीप्रमाणेच तालिबानलाही अफगाणिस्तानात सुरक्षित आश्रयस्थान आहे. अशा प्रकारे, अधिक एकत्रित आंदोलन हे पाकिस्तानसाठी एक मोठं आव्हान असू शकतं."

पाकिस्तानसाठी किती मोठं आव्हान असणार आहे?

स्टॉक एक्सचेंज, चिनी दूतावास, कराची विद्यापीठ, ग्वादर पीसी हॉटेल, पंचगौर आणि नोश्की छावण्या, ओडमाडा आणि पासनी यासह कराचीमधील सुरक्षा दलांवर झालेल्या मोठ्या हल्ल्यांमध्ये बलुच कट्टरतावाद्यांचा सहभाग आहे.

आमिर राणा म्हणतात की, “अलीकडचे मोठे हल्ले बीएलएफ आणि बीएलएने केले आहेत. ते कोणत्या ना कोणत्या मार्गाने एकमेकांची मदत करतात हे स्पष्ट आहे. पाकिस्तानसाठी हे एक आव्हान असेल."

पाकिस्तानच्या सुरक्षा दलाची गाडी

फोटो स्रोत, Getty Images

पूर्वी या संघटना एकट्यानेच काम करत असत, आणि त्यामुळे त्या एवढ्या प्रभावी नव्हत्या पण ‘BRAS’ च्या स्थापनेनंतर त्यांच्या कामात अधिक समन्वय दिसून येतो.

पाकिस्तान सरकारने बलोच फुटीरतावादी गटांना एकत्र करण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांवर बारीक लक्ष ठेवलं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)