अडीच तास हवेत चकरा मारल्यानंतर इमर्जन्सी लँडिंग केलेल्या विमानाच्या क्रू - पायलट्सची एवढी चर्चा का होतेय?

लँडिंग गिअरमध्ये अडचण आल्याने विमानाने लँडिंगपूर्वी इंधन संपवण्यासाठी आकाशात अनेक फेऱ्या मारल्या.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, लँडिंग गिअरमध्ये अडचण आल्याने विमानाने लँडिंगपूर्वी इंधन संपवण्यासाठी आकाशात अनेक फेऱ्या मारल्या.

तिरुचिरापल्लीहून शारजाहकडे जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाच्या हायड्रॉलिक सिस्टीममध्ये बिघाड झाल्यानं शुक्रवारी (11 ऑक्टोबर) सायंकाळी हे विमान अडीच तास आकाशामध्ये फेऱ्या मारत होतं.

त्यानंतर, विमानाला सुरक्षितपणे रनवेवर लँड करण्यात यश आलं. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

पीटीआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी सुमारे साडेपाच वाजता तिरुचिरापल्ली विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानाच्या हायड्रॉलिक सिस्टीममध्ये बिघाड झाल्याचं निदर्शनास आलं.

सध्या विमानाला सुरक्षितपणे रनवेवर उतरवण्यामध्ये यशस्वी झालेल्या पायलट्सचं कौतुक होत असून तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांनी देखील त्यांचे आभार मानले आहेत.

एअरलाईन्सच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे विमान 141 प्रवाशांना घेऊन तिरुचिरापल्लीहून सायंकाळी 5:30 वाजता शारजाहकडे रवाना झालं होतं आणि रात्री 8:15 वाजता सुरक्षितपणे लँड झालं.

विमानाने टेक ऑफ केल्यानंतर काही वेळातच हायड्रॉलिक सिस्टीममध्ये बिघाड असल्याची बाब समोर आली.

हायड्रॉलिक सिस्टीम ही लँडिंगसाठी वापरले जाणारे ब्रेक आणि लँडिंग गिअरसहित इतर उपकरणांना नियंत्रित करणारी यंत्रणा असते.

हीच यंत्रणा विमानाचे लँडिंग गिअर आणि हवेच्या दबावामध्ये बदल करणाऱ्या पंख्यांना नियंत्रित करते.

हवेत फेऱ्या का माराव्या लागल्या?

एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी या बिघाडामागील कारणांचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या विमानातील प्रवाशांच्या पुढील प्रवासासाठी पर्यायी विमानाची व्यवस्थाही करुन देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

नागरी उड्डाण मंत्री के. राममोहन नायडू यांनी त्यांच्या 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये म्हटलं आहे की, "सायंकाळी 6:05 वाजता पूर्ण इमर्जन्सी घोषित केल्यानंतर एअरपोर्ट आणि इमर्जन्सी टीमला युद्धपातळीवर सक्रिय करुन तैनात करण्यात आलं होतं."

गेल्या काही वर्षांमध्ये बोइंग 737 सारख्या विमानांमध्ये तांत्रिक अडचणींमुळे अपघात झाले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गेल्या काही वर्षांमध्ये बोइंग 737 सारख्या विमानांमध्ये तांत्रिक अडचणींमुळे अपघात झाले आहेत.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पुढे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "हायड्रॉलिक बिघाडाबाबतचा सखोल तपास करण्यात येईल. म्हणजे या बिघाडामागचं नेमकं कारण स्पष्ट होईल."

पीटीआयने बोइंगच्या एका वरिष्ठ पायलटच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, बोइंग 737 सारख्या विमानामध्ये इंधनाच्या टँकला इजेक्ट करण्याचा वा हवेमध्येच इंधन बाहेर काढून टाकण्याचा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळं हे इंधन फक्त वापरुनच संपवावं लागतं. त्यामुळं विमानाचं संपूर्ण वजन कमी करण्यासाठी इंधन जाळण्याची गरज निर्माण झाली होती. म्हणून विमानाला हवेमध्ये फेऱ्या माराव्या लागल्या.

पुढे पायलटनं म्हटलं की, इमर्जन्सीच्या परिस्थितीमध्ये अधिक वजनासोबत लँडिंगला मंजुरी दिली जाऊ शकतेय पण अशा परिस्थितीत विमानाला आग लागण्यासारख्या घटना घडू शकतात.

मात्र, आकाराने मोठ्या असलेल्या काही बोइंग 777 आणि 787 सारख्या विमानांमध्ये हवेतल्या हवेतच इंधन बाहेर काढण्याचाही पर्याय उपलब्ध असतो.

पण या घटनेतील विमान क्रमांक IX 613 हे बोइंग 737 प्रकारचे विमान होते. त्यामध्ये अशा स्वरुपाची कोणतीही सोय उपलब्ध नव्हती.

नियमानुसार, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून लँडिंगच्या दरम्यान विमानाचं एक ठरावीक वजन निश्चित करण्यात आलं आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

विमानाचे पायलटचे कौतुक

एवढ्या आणीबाणीच्या परिस्थितीत प्रवाशांना घेऊन विमानाचे लँडिंग सुरक्षितपणे केल्यामुळे विमानाच्या पायलट्सचं कौतुक होत आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर, असंख्य लोक पायलट्सच्या निर्णयक्षमतेचं आणि धाडसाचं कौतुक करत आहेत.

तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालीन यांनी पायलट्स आणि क्रूचे कौतुक केलंय.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालीन यांनी पायलट्स आणि क्रूचे कौतुक केलंय.

तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी विमानाचे कॅप्टन आणि क्रूमधील सदस्यांचं कौतुक केलं. त्यांनी 'एक्स'वर लिहिलं की, "एअर इंडिया एक्स्प्रेस फ्लाईट सुरक्षितपणे लँड झालं, याचा मला आनंद आहे.

लँडिंग गिअरमध्ये बिघाड असल्याची माहिती मिळताच मी फोनवरुन त्वरित अधिकाऱ्यांसोबत एक इमर्जन्सी मीटिंग घेतली आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ते उपाय करण्याचे आदेश दिले.

यासोबतच अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि वैद्यकीय मदत घटनास्थळी तैनात करण्याच्याही सूचना दिल्या."

लाल रेष

या बातम्याही वाचा:

लाल रेष

लँडिंगपूर्वी मिळाली बिघाडाची माहिती

लँडिंगनंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि पायलट्सचं कौतुकही केलं.

पुदुकोट्टाई जिल्ह्यात राहणारे एक प्रवासी शाहूल हमीद यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं की, "मला विमानात काही गडबड आहे, असं मुळीच वाटलं नाही. विमान नेहमीप्रमाणेच प्रवास करत होतं.

प्रवासी शाहूल हमीद.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, प्रवासी शाहूल हमीद यांनी सांगितलं की, विमानात काहीतरी गडबड असल्याची बाब त्यांना लँडिंगपूर्वी कळली.

लँडिंगच्या 30 मिनिटे आधी आम्हाला सांगण्यात आलं की, विमान तिरुची एअरपोर्टवर उतरवण्यात येणार आहे. त्यांनी सर्वांच्या खाण्या-पिण्याचीही योग्य ती काळजी घेतली.

आकाशातून प्रवास करत असताना कुणालाही भीती वाटेल, असं वातावरण अजिबात झालेलं नव्हतं. सुरक्षितपणे विनासायास विमानाचं लँडिंग केल्याबद्दल पायलट्सचे खूप खूप आभार."

विमानातील इंधन कमी करणं का गरजेचं होतं?

एअरफोर्सचे माजी अधिकारी राम यांनी बीबीसी तामिळसोबत बोलताना म्हटलं की, "जेव्हा विमान उड्डाण करतं तेव्हा सर्वांत आधी विमानाची चाकं बंद केली जातात. हे काही मिनिटांमध्येच होतं. जर असं झालं नाही विमानाला पुन्हा खाली उतरवलं जातं.

मात्र, टेक ऑफवेळी इंधनाच्या वजनामुळे विमानाला त्वरित उतरवलं जाऊ शकत नाही. याच कारणास्तव पायलट्सकडून इंधन कमी करण्याचे प्रयत्न केले जातात.

इंधनामुळे विमानाचे वजन अदिक राहते आणि लँडिंगमध्ये अडचणी निर्माण होतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इंधनामुळे विमानाचे वजन अधिक राहते आणि लँडिंगमध्ये अडचणी निर्माण होतात.

काही मोठ्या विमानांमध्ये हे इंधन हवेतच सोडण्याची व्यवस्था असते. मात्र, या विमानामध्ये ती नव्हती. त्यासाठी हवेमध्ये अनेक फेऱ्या मारुन या विमानातील इंधन संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

पुढे त्यांनी म्हटलं की, "तिरुचीमधून शारजाहपर्यंतचे अंतर 1500 नॉटीकल माईल अर्थात 2800 किलोमीटर आहे. या प्रवासासाठी आवश्यक असलेले इंधन पुरेशा प्रमाणात होतं. त्यामुळं, इंधन पूर्णपणे संपण्याची वेळ आल्यावरच हे विमान लँड करण्यात आलं. शारजाहला पोहोचण्यासाठी विमानाला चार तास लागतात. त्यामुळं, अडीच तास हवेतल्या हवेत फेऱ्या मारणं हे इंधन संपवण्यासाठी गरजेचं होतं."

लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्यास काय करतात?

एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियातील एका अधिकाऱ्याच्या हवाल्यानं हिंदुस्तान टाइम्सने लिहिलं आहे की, "हायड्रॉलिक गिअरमध्ये बिघाड झाल्याचं कळताच 'बेली लँडिंग' करण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, जेव्हा विमान लँड झालं तेव्हा त्याचे लँडिंग गिअर सुयोग्य स्थितीत होते."

पण बेली लँडिंगची प्रक्रिया फार जोखमीची असते. त्यामध्ये विमानाची चाके उघडली जात नाहीत. विमान रनवेवरच गतीने घासत जातं आणि त्या घर्षणातून प्रचंड मोठ्या प्रमाणावर ठिणग्या बाहेर पडतात.

लँडिंग गिअरमध्ये अडचण आल्याने बेली लँडिंग करण्याचाही सल्ला देण्यात आला होता.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लँडिंग गिअरमध्ये अडचण आल्याने बेली लँडिंग करण्याचाही सल्ला देण्यात आला होता.

यामुळेच, विमानामध्ये कमीत-कमी इंधन असावं, असा प्रयत्न केला जातो. कारण बेली लँडिंग करताना विमानाचा स्फोट होण्याची जोखीम असते.

त्यामुळे, या घर्षणातून बाहेर पडणाऱ्या ठिणग्यांचा धोका कमी करण्यासाठी विमानावर पाण्याचे फवारे मारले जातात. यासाठीच इमर्जन्सी उपायांमध्ये सर्वांत आधी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि मेडिकल टीम्स तैनात केल्या जातात."

भारताने बोइंग 737 विमानासंदर्भात बाळगली होती सावधगिरी

2022 मध्ये अमेरिकन कंपनी बोइंगचे एक प्रवासी विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर देशातील विमानांसंदर्भात सतर्कता वाढवण्याचे आदेश देण्यात आले होते.

नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) सर्व बोइंग 737 विमानांवर आधीपेक्षा अधिक लक्ष ठेवण्याचे आदेश दिले होते.

2021 मध्ये इंडोनेशियामध्ये बोइंग 737 चे प्रवासी विमान दुर्घटनाग्रस्त झालं होतं. त्यानंतर विमानातील टेक्निकल बिघाडावरुन अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.

याआधी कंपनीने 2019 ते 20121 दरम्यान आपल्या बोइंग 737 मॅक्स मॉडेलला सेवेतून हटवण्याचाही निर्णय घेतला होता.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)