विमानाशी झालेल्या धडकेमुळे मुंबईत 30 हून अधिक फ्लेमिंगोंचा मृत्यू, नक्की काय झालं असावं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Reporting from, मुंबई
मुंबईत सोमवारी 20 मेच्या रात्री तीसहून अधिक फ्लेमिंगोंचा विमानाशी धडकेमुळे मृत्यू झाला आहे. मुंबईच्या घाटकोपर उपनगरातील इथे लक्ष्मीनगर परिसरात ही घटना घडली.
वनविभागाने मृत फ्लेमिंगोला शवविच्छेदनासाठी पाठवले असून मंगळवारी 21 मे रोजी सकाळी परिसरात आणखी जखमी फ्लेमिंगोचा शोध सुरू होता.
एमिरेट्स या विमानसेवेचं दुबईहून येणारं E508 हे विमान मुंबईत सहार इथल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) उतरत होतं.. त्यावेळी रात्री पावणेनऊच्या सुमारास, साधारण 8:40 – 8:50 वाजता ही दुर्घटना घडली. विमानतळावरील सूत्रांनी याला दुजोरा दिला आहे.
या विमानात तीनशे प्रवासी होते आणि ते सुरक्षित आहेत. पक्ष्यांची टक्कर झाल्यानंतर विमानाची सुरक्षा तपासणी केली जात असल्याची माहिती देण्यात आली.

फोटो स्रोत, Getty Images
एमिरेट्स एअरलाइन्सने याविषयी निवेदन प्रसिद्ध केले आहे. एमिरेट्सच्या प्रवक्त्यांनी सांगितले की "EK508 - दुबई ते मुंबई विमानाच्या लॅंडिंगवेळी पक्ष्यांची धडक झाली. विमानाचे सुरक्षितपणे लॅंडिंग झाले आणि सर्व प्रवासी सुखरूप आहेत. पण दुःखदरीत्या हे सांगावे लागत आहे की अनेक फ्लेमिंगो पक्षांचा जीव या घटनेत गेला. या प्रकरणात एमिरेट्स एअरलाइन्स संबंधित अधिकाऱ्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करत आहे. या धडकेमुळे विमानाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे 20 मे रोजी मुंबईहून दुबईसाठी जाणारे EK509 हे विमान रद्द करावे लागले. सर्व प्रवासी आणि चालकदलातील सदस्यांची रात्रीसाठी व्यवस्था करण्यात आली आणि बदली विमानाची सोय करण्याच्या दृष्टीने पावलं उचलली गेली."
21 मे रोजी रात्री 9 वाजता बदली विमानाने हे प्रवासी दुबईला गेले.
या घटनेबद्दल एमिरेट्सने दिलगिरी व्यक्त केली आहे. प्रवासी आणि चालकदलातील सदस्यांची सुरक्षा ही आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असून त्यात कुठलीही कसूर ठेवली जाणार नाही असे एमिरेट्सने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
स्थानिक रहिवाशांकडून घटनेची माहिती मिळताच कांदळवन सुरक्षा कक्षाचे वनसंरक्षक आणि अधिकारी तिथे पोहोचले. मात्र तपासासाठी एयरपोर्टवर जाण्याची परवानगी मिळाली नसल्याचं त्यांनी स्थानिक माध्यमांना सांगितलं.
जिथे या फ्लेमिंगोंचा मृत्यू झाला, तो परिसर घाटकोपर पूर्वेला विक्रोळीनजीक आहे. हा भाग विमानतळाच्या मुख्य धावपट्टीच्या सरळ रेषेत आहे, तर इथून पू्र्व दिशेला ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि त्या पलीकडे ठाणे खाडीकाठी पाणथळ जागा आहेत.
या खाडीनजीकच्या कांदळवनांच्या परिसरात दरवर्षी लाखो फ्लेमिंग पक्षी स्थलांतर करून येतात. त्यामुळे इथे संरक्षित क्षेत्र आणि अभयारण्यही आहे.
मात्र आजवर कधी फ्लेमिंगोची विमानांशी टक्कर झाल्याची घटना घडल्याची नोंद नाही.
नेमके कशामुळे हे पक्षी विमानाच्या मार्गात आले याचा तपास सुरू आहे. पर्यावरणप्रेमींनी या परिसरात सुरू असलेल्या विकासकामांकडे बोट दाखवलं आहे.
वनशक्ती या संस्थेसाठी काम करणारे पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि पाणथळ जागांविषयी समितीचे सदस्य डी. स्टालिन सांगतात, "फ्लेमिंगोंसाठी संरक्षित क्षेत्रात नवी वीजवाहिनी टाकली आहे, ज्यामुळे पक्ष्यांना अडथळे येतात. या पॉवरलाईन्सना इथून नेण्यास परवानगी द्यायला नको होती, त्यांच्याकडे बाकीचे पर्यायी मार्गही होते. आधी अभयारण्यातून वीजेच्या तारा न्यायला परवानगी नव्हती पण वनविभागाचे अधिकारी वीजकंपनीसमोर झुकले. खाडीतल्या अभयारण्यात भर टाकून विजेचे टॉवर्स उभारण्यात आले."

फोटो स्रोत, Getty Images
स्टालिन यांनी असाही दावा केला आहे की, "या खाडीपलीकडे नवी मुंबईत NRI काँप्लेक्स आणि चाणक्य तलावाजवळच्या परिसरात बांधकाम करण्याच्या उद्देशानं फ्लेमिंगोंना हुसकावून लावण्याचे प्रयत्न गेल्या महिन्यापासून दिसून आले आहेत. रात्रीच्या वेळी कोणी या पक्ष्यांना हुसकावूनन लावायचा प्रयत्न केला असेल तर ते या बाजूला उडत आले असण्याची शक्यता आहे."
या संदर्भात वीजकंपनी अथवा नवी मुंबईतील विकासकामांवर देखरेख ठेवणारं महाराष्ट्र शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (CIDCO) यांची प्रतिक्रिया अजून आलेली नाही.
स्टालिन यांनी पर्यावरण, वन आणि हवामान मंत्रालयाला यासंदर्भात पत्र लिहिले आहे.
काही दिवसांपूर्वी (27 एप्रिल 2024) नवी मुंबईच्या DPS तलावाजवळ फ्लेमिंगोंचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या.
मुंबईजवळ फ्लेमिंगो कधीपासून यायला लागले?
वन्यजीव संरक्षण कायदा ( 1972) नुसार फ्लेमिंगो ही संरक्षित प्रजाती आहे.
मुंबई नगरीत 1997 पासून हे फ्लेमिंगो मोठ्या प्रमाणात येऊ लागले. याआधी शिवडीच्या जेट्टीजवळ हजारोंच्या संख्येने हे पक्षी दिसायचे. पण शिवडी-न्हावाशेवा या सागरी सेतूच्या बांधकामामुळे त्यांचं हे वसतिस्थान धोक्यात आलं. यासाठीच ठाणे आणि वाशीच्या खाडीपट्ट्यात 1,690 हेक्टरचं फ्लेमिंगो अभयारण्य तयार करण्यात आलं आहे.
ठाणे, वाशी, भांडुप पंपिंग स्टेशन या पट्ट्यात खारफुटीच्या दाटीमुळे या पक्ष्यांना संरक्षण मिळतं. शिवाय इथे असलेलं विशिष्ट प्रकारचं शेवाळ, कोळंबी हे त्यांचं मुख्य खाद्य आहे. या खाद्यामध्ये बिटा कॅरोटिनचं प्रमाण जास्त असतं. या द्रव्यामुळेच त्यांच्या पंखांना लालसर गुलाबी रंग येतो.
मुंबईत येणाऱ्या या पाहुण्यांचं मूळ घर कच्छच्या रणामध्ये आहे. तिथल्या निर्मनुष्य असलेल्या खाऱ्या दलदलीमध्ये हजारो फ्लेमिंगो राहतात. त्यांचं प्रजननही तिथेच होतं. म्हणूनच या भागाला 'फ्लेमिंगो सिटी' असं नाव देण्यात आलं आहे.
पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली हे त्यांच्या वसतिस्थानाचा अभ्यास करण्यासाठी उंटाच्या पाठीवरून मैलोनमैल प्रवास करून या गुलाबी शहरात गेले होते.
फ्लेमिगोंचे हे थवे हिवाळ्यात, नोव्हेंबर महिन्याच्या सुमारास खाद्याच्या शोधात मुंबईच्या दिशेने येतात. ते इथे येतात तेव्हा त्यांच्यासोबत त्यांची तपकिरी रंगाची पिल्लंही पाहायला मिळतात. मुंबईच्या किनाऱ्यावर ही पिल्लं मोठी होऊ लागतात. परतीच्या प्रवासापर्यंत त्यांच्या पंखांना लालसर छटा येऊ लागते.











