हुमायून आणि सलीम: हे फ्लेमिंगो गुजरातपर्यंत 'असे' पोहोचले

फ्लेमिंगो पक्षी हुमायून

फोटो स्रोत, BNHS

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (BNHS) जिओ टॅग केलेले दोन 'लेसर' फ्लेमिंगो पक्षी 'हुमायून' आणि 'सलीम' भावनगरला पोहोचलेत. या पक्षांनी 300 किलोमीटरचा प्रवास करून गुजरातचा किनारा गाठलाय.

फ्लेमिंगो पक्षांचं स्थलांतर आणि प्रवासाचा अभ्यास करण्यासाठी बीएनएचएसकडून सहा फ्लेमिंगो पक्षांचं टॅगिंग करण्यात आलं होतं. ठाणे खाडीतील फ्लेमिंगो सेंचूरीत या पक्षांना जीपीएस-जीएसमएम टॅग करण्यात आलं.

प्रख्यात पक्षीतज्ज्ञ हुमायून अब्दुलाली आणि सलीम अली यांच्या नावावर या पक्षांना BNHS कडून ही नावं देण्यात आली आहेत.

संशोधक सांगतात, पक्षांना टॅगिंग केल्यामुळे त्यांना ओळखणं सोपं जातं. त्यांचा प्रवास, विश्रांतीच्या जागा, पक्षी किती उंचावर उडतोय, किती वेगाने प्रवास करतोय अशी माहिती मिळू शकते.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

'हुमायून'ने कसा केला भावनगरपर्यंतचा प्रवास?

'हुमायून' नावाच्या लेसर फ्लेमिंगोला एप्रिल 2022 बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीकडून टॅग करण्यात आलं होतं. जगप्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ हुमायून अब्दुलाली यांच्या नावावर या पक्षाचं नाव 'हुमायून' ठेवण्यात आलंय.

'हुमायून'ने भावगनर पर्यंतच्या प्रवासात वसई आणि सुरतला काहीकाळ विश्रांती घेतली होती.

फ्लेमिंगोना जिओ टॅग करणारे BNHS चे उपसंचालक डॉ. राहुल खोत म्हणतात, "'हुनमायू'ने 28 जूनला रात्री मुंबई सोडली. एक तास प्रवास करून तो वसईत पोहोचला. वसईत एक दिवस राहून 29 जूनला संध्याकाळी सुरतच्या दिशेने प्रयाण केलं." जवळपास 4 तासांचा प्रवास करून तो रात्री सुरतच्या तेणा खाडीत पोहोचला.

फ्लेमिंगो पक्षाला BNHS ने सॅटेलाइट टॅगिंग केलं

फोटो स्रोत, Mrugank Prabhu

फोटो कॅप्शन, फ्लेमिंगो पक्षाला BNHS ने सॅटेलाइट टॅगिंग केलं

सुरतच्या तेणा खाडीत 16 तास थांबल्यानंतर जून 30 ला हुमायूनचा भावनगरच्या दिशेने प्रवास सुरू झाला. अखेर 32 तासांचा प्रवास केल्यानंतर हुमायू भावनगरच्या खाडी भागात पोहोचला.

BNHS चे उपसंचालक डॉ. राहुल खोत बीबीसी मराठीशी बोलताना सांगतात, "सद्य स्थितीत हुमायून भावनगरच्या मीठागरांच्या भागांमध्ये आहे." जिओ टॅगिंगसोबतच हुमायूच्या पायात ALD नावाचा लेग-बॅंडही बांधण्यात आलाय.

'सलीम' भावनगरमध्ये कसा दाखल झाला ?

फ्लेमिंगो पक्षांचं प्रजननाचं ठिकाण आणि अन्नाच्या शोधात स्थलांतराचा अभ्यास BNHS ने सुरू केलाय. यासाठी 3 'लेसर' आणि 'ग्रेटर' फ्लेमिंगो पक्ष्यांना जीओ-जीएसएम टॅगिंग करण्यात आलंय.

संशोधकांच्या माहितीनुसार, 'हुमायून'च्या पाठोपाठ 'सलीम'ही गुजरातमध्ये दाखल झाला आहे. प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ सलीम अली यांचं नाव या फ्लेमिंगो पक्ष्यांना देण्यात आलं आहे.

फ्लेमिंगो पक्षी सलीम

फोटो स्रोत, BNHS

BNHS चे डॉ. खोत पुढे सांगतात, "हुमायूननंतर काही दिवसांनी 6 जुलैला सलीमने वाशी खाडी परिसर सोडला. आणि दुसऱ्या दिवशी 7 जुलैला तो भावनगरमध्ये पोहोचला. सलीमने सलग 16 तासांचा प्रवास केलाय."

भावनगरच्या गोघा गावात सध्या सलीम असल्याची माहिती आहे.

पक्षांना टॅग का केलं जातं?

मुंबईत स्थलांतर करून येणारे 54 विविध प्रकारचे लहान-मोठे पक्षी आढळून येतात. पक्षांची ओळख सहजतेने ओळख पटवण्यासाठी त्यांना खास टॅग दिले जातात.

2017 पासून BNHS ने स्थलांतरीत पक्ष्यांचा अभ्यास सुरू केला. टॅग करताना पक्ष्याच्या पंखांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊन एक बेल्ट पक्ष्याच्या अंगावर बांधला जातो.

BNHS ने टॅग केलेला ग्रेटर फ्लेमिंगो प्रजातीचा तिसरा पक्षी 'मॅकन'ही गुजरातमध्ये पोहोचलाय. 14 जुलैला विक्रोळीमधून निघून 15 जुलैला मॅकन गुजरातमध्ये पोहोचला आहे.

संशोधक सांगतात, जीओ टॅगिंगच्या माध्यमातून ठराविक काळाने पक्षाबद्दल माहिती मिळत रहाते. जीपीएस डेटामुळे पक्षी कुठे आहे? किती उंचीवर उडतोय, कसा प्रवास करतोय, किती वेगाने प्रवास करतोय आणि त्याठिकाणी तापमान कसं आहे याची माहिती मिळू शकते.

सॅटेलाइट टॅगिंग केल्यानंतर मिळालेली पक्षाच्या प्रवासाची माहिती

फोटो स्रोत, Mrugank prabhu

फोटो कॅप्शन, सॅटेलाइट टॅगिंग केल्यानंतर मिळालेली पक्षाच्या प्रवासाची माहिती

डॉ. खोत पुढे म्हणाले, "स्थलांतर करताना पक्षी काही ठिकाणी विश्रांती घेतात. अशा ठिकाणांवर आपलं लक्ष नसलं आणि पक्ष्यांना काही त्रास होत असेल तर त्यांच्या स्थलांतरावर परिणाम होतो."

टॅगिंग केल्याने या जागांची माहिती आपल्याला मिळते. पक्षी जाताना जसे थांबतात तसेच येतानाही थांबत असतील.

पक्षी सारखेच दिसतात त्यांना स्वत:ची वेगळी ओळख नसते. त्यामुळे ओळखणं कठीण असतं. टॅगिंगमुळे पक्ष्यांना ओळखणं शक्य होतं. ते स्थलांतर कधी, कोणत्या दिवसात करतात याची माहिती मिळणार आहे.

पक्ष्याला टॅग करण्याची प्रोसेस फक्त एका मिनिटाच्या आत पूर्ण केली जाते. पक्ष्याला बेशुद्ध करू शकत नाही. त्यामुळे पकडल्यानंतर पक्ष्याला त्रास होणार नाही. हे लक्षात घेऊन मिनिटभराच्या आत टॅग लावला जातो.

डॉ. राहुल खोत पुढे म्हणाले, "टॅग केलेल्या पक्ष्याची दर चार तासांनंतर माहिती मिळते. पण पक्षी नेटवर्कच्या बाहेर गेला तर मात्र वाट पहावी लागते."

या टॅगमध्ये दोन दशलक्ष रेकॉर्ड राहू शकतात. ज्या क्षणी पक्षी मोबाईल टॉवरच्या संपर्कात येईल डेटा मिळेल.

फ्लेमिंगोचं स्थलांतर कशावर अवलंबून असतं?

गुजरातमध्ये कच्छच्या रणात फ्लेमिंगो पक्षी प्रजजन करतात. कच्छच्या रणात फ्लेमिंगोची मोठी संख्या आहे. पावसाळा संपला की, फ्लेमिंगो अन्नाच्या शोधात किनारपट्टी भागातील खाडीच्या भागात येऊन येतात.

संशोधक म्हणाले, काही पक्षी किनारपट्टी पासून दूर गोड्या पाण्याच्या परिसरातही आढळून आले आहेत, तर काही फ्लेमिंगो दक्षिणेच्या राज्यांच्या दिशेनेही प्रवास करतात असे रेकॉर्ड उपलब्ध आहेत.

साधारणत: फ्लेमिंगो पाऊस संपल्यानंतर मुंबईच्या दिशेने येतात आणि पावसाळा सुरू होण्याआधी पुन्हा गुजरातला जातात. बीएनएचएसचे उपसंचालक डॉ. राहुल खोत म्हणाले, "मॉन्सून येणं-जाणं फक्त स्थलांतरासाठी महत्त्वाचं नाही. पाऊस चांगला पडणं देखील महत्त्वाचं आहे."

यावर्षी मुंबईत चांगला पाऊस झालाय. पण फ्लेमिंगो इथेच होते. गुजरातमध्ये पाऊस चांगला झाल्यानंतर इथून निघाले असं संशोधकांना दिसून आलंय. डॉ. खोत सांगतात, पाऊस कमी झाला तर त्यांच्या येण्या-जाण्याची वेळ मागेपुढे होते. "प्रजननानसाठी फ्लेमिंगोला कच्छचं रण पूर्ण पाण्याने भरलेलं लागतं. त्या ठिकाणच्या छोट्या टेकड्यात ते अंडी घालतात. पाऊस नसेल तर ते अंडी घालणार नाहीत.

मुंबई महानगर प्राधिकरण परिसरात 2021-2022 मध्ये सर्वात जास्त संख्येने ग्रेटर फ्लेमिंगो आल्याचं दिसून आलंय. फ्लेमिंगोच्या जगभरात आढळून येणाऱ्या सहा प्रजातींपैकी दोन प्रजाती ग्रेटर आणि लेसर फ्लेमिंगो भारतात आढळून येतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)