गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर जालना महापालिका निवडणुकीत विजयी

फोटो स्रोत, PC FB/Getty
- Author, प्रविण सिंधू
- Role, बीबीसी मराठी
पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर यांचा जालना महानगरपालिका निवडणुकीत विजय झाला आहे.
निवडणुकीच्या आधी श्रीकांत पांगारकर यांची शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) जालना विधानसभा मतदारसंघाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली होती. पण, या प्रकरणी टीका झाल्यानंतर ही नियुक्ती रद्द केली होती. तसंच, पांगारकर यांची शिवसेनेतून हकालपट्टी देखील करण्यात आली होती.
ऑगस्ट 2018 मध्ये दहशतवादविरोधी पथकाने (ATS) मुंबईनजिकच्या नालासोपाऱ्यातून क्रूड बाँब, देशी बनावटीच्या बंदुका यांच्यासह मोठी स्फोटक सामग्री हस्तगत केली होती.
या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांविषयी माहिती मिळाली होती. याच प्रकरणी श्रीकांत पांगारकर या शिवसेनेच्या जालन्याच्या माजी नगरसेवकालाही दहशतवादविरोधी पथकाने (ATS) अटक केली होती.
पांगारकर हे पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणातील आरोपी असून, काही दिवसांपूर्वीच त्यांची जामिनावर सुटका झाली होती. त्यानंतर त्यांना माजी मंत्री आणि शिवसेनेचे (शिंदे गट) उपनेते अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत जालना विधानसभा मतदारसंघाच्या प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली होती.

फोटो स्रोत, Facebook/arjunkhotkarjalna
अर्जुन खोतकर यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर पोस्ट शेअर करत म्हटलं होतं, "श्रीकांत पांगारकर यांची शिवसेना जालना विधानसभा प्रमुखपदी निवड करण्यात आली."
पण नंतर टीका झाल्यानंतर ही नियुक्ती रद्द केली होती.
जनतेच्या न्यायालयात मला न्याय - पांगारकर
श्रीकांत पांगारकर यांनी जालना महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 13 (ड) मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती.
निवडणूक जिंकल्यानंतर श्रीकांत पांगारकर हे त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत जल्लोष करताना दिसले.

फोटो स्रोत, ANI
विजयानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना पांगारकर म्हणाले, "हा विजय माझे सर्व सहकारी यांनी अतिशय जीवाचं रान करून निवडून आणलं. ते प्रकरण अजून न्यायप्रविष्ठ आहे आणि जनतेच्या न्यायालयात मला न्याय मिळाला आहे. प्रभागाच्या गरजा तर पूर्ण करणारच पण तरुणांसाठी काय करता येईल यासाठी जास्त प्रयत्न करणार आहे.
'राजकारणाच्या गुन्हेगारीचं सामान्यीकरण'
पांगारकर यांच्या उमेदवारीच्या मुद्द्यावरून वाद झाला त्यावेळी मानवाधिकार कार्यकर्ते आणि वकील असीम सरोदे यांच्याशी बीबीसीनं बातचित केली होती. त्यावेळी असीम सरोदे म्हणाले, "काही वर्षांपूर्वी किमान राजकारणाच्या गुन्हेगारीवर चर्चा तरी व्हायची. मात्र, आता राजकारणाच्या गुन्हेगारीचं इतकं सामान्यीकरण झालं आहे की चर्चाच बंद झाली.
"केवळ निवडून येण्याची क्षमता (इलेक्टोरल मेरिट) या निकषावर अनेक गुंडांनी राजकारणात स्थैर्य प्राप्त केलं आहे."
"गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना थेट राजकीय नियुक्ती देऊ नये, असा संकेत होता. मात्र, काही पक्षांनी ही लोकलज्जा सोडून दिली आहे. आपण सत्तापदावर आलो की, लोक सगळ्या गोष्टी स्वीकारतात असं त्यांना वाटतं.
"साध्यापर्यंत पोहचण्यासाठी साधन शुद्ध असलं पाहिजे, असं महात्मा गांधींनी सांगितलं होतं. मात्र, सध्या 'साध्य' आणि 'साधन' यात कोणताही ताळमेळ राहिलेला नाही."
पांगारकरांबाबत अर्जुन खोतकरांचा 'यू-टर्न'
2018 साली जेव्हा श्रीकांत पांगारकर यांना अटक करण्यात आली होती, तेव्हा अर्जुन खोतकर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते आणि पांगारकरांच्या अटकेवर बोलताना ते म्हणाले होते की, श्रीकांत पांगारकरांचा शिवसेनेशी आता काहीही संबंध नाही.
अर्जुन खोतकर म्हणाले होते, "2011 मध्ये त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांचा पक्षाशी काहीही संबंध राहिला नाही. निवडणुकीत लाखो लोक काम करत असतात. त्यात आपण ही व्यक्ती पक्षासाठी काम करत होती किंवा नव्हती हे कसं ओळखणार? नंतर ते कोणत्या संघटनेत काम करत होते का हे मला माहीत नाही."
अर्जुन खोतकर यांनी 2018 मध्ये एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं होतं, "श्रीकांत पांगारकर शिवसेनेत होता तोपर्यंत अशा कोणत्याही भानगडीत नव्हता. शिवसेना सोडल्यावर पांगारकर कुठे कोणाशी जोडला गेला हे परमेश्वराला माहिती. मात्र, त्यानंतर 10 वर्षात त्याचं आयुष्य कसं आहे, हे आम्हाला माहिती नाही आणि आम्हाला त्याच्याशी काहीही घेणंदेणं नाही."
पांगारकरांवर 2018 मध्ये दिलेली प्रतिक्रिया आणि आजच्या प्रतिक्रियेत फरक का, असं बीबीसी मराठीनं अर्जुन खोतकरांना (20 ऑक्टोबर 2024) विचारलं असता, ते म्हणाले, "त्यावेळी मी श्रीकांत पांगारकर शिवसेनेचा नगरसेवक नाहीय, असं म्हटलं होतं. मात्र, माध्यमं आमच्याकडून काय प्रतिक्रिया घेतात आणि काय छापतात हे आम्हालाही कळत नाही. माध्यमं 'ध' चा 'मा' करून टाकतात."
गौरी लंकेश हत्येशी नेमका काय संबंध?
ऑगस्ट 2018 मध्ये दहशतवादविरोधी पथकाने (ATS) मुंबईनजिकच्या नालासोपाऱ्यातून क्रूड बाँब, देशी बनावटीच्या बंदुका यांच्यासह मोठी स्फोटक सामग्री हस्तगत केली होती.
या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांविषयी माहिती मिळाली होती.
याच प्रकरणी श्रीकांत पांगारकर या शिवसेनेच्या जालन्याच्या माजी नगरसेवकालाही दहशतवादविरोधी पथकाने (ATS) अटक केली होती.
राज्यात अनेक ठिकाणी हल्ले करण्याच्या कटासाठी आर्थिक रसद पुरवण्याची कामगिरी पांगारकरवर होती, असा आरोप आहे.
पांगारकर हे 2001 ते 2011 या कालावधीदरम्यान जालना नगरपालिकेत दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले. मात्र मागील काही काळात त्यांचा कुटुंबासह मुक्काम औरंगाबादला होता.

फोटो स्रोत, Getty Images
ऑगस्ट 2018 मध्ये बीबीसी मराठीने नालासोपाऱ्यातील एटीएसच्या कारवाईबाबत बातमी केली होती. त्यावेळी बीबीसी मराठीने महेश बुलगे यांच्याशी बातचित केली होती. महेश बुलगे जालन्याच्या 'आनंदनगरी' या वृत्तपत्राचे पत्रकार आहेत आणि ते पांगारकर यांचे अनेक वर्षांपासूनचे मित्रही आहेत.
महेश बुलगे म्हणाले होते, "पांगारकर यांचे वडील भाजपमध्ये होते. पण श्रीकांत हे पहिल्यापासून आक्रमक हिंदुत्ववादी असल्यानं ते मात्र शिवसेनेमध्ये गेले. दोनदा नगरसेवक झाल्यानंतर त्यांचं तिकीट कापलं गेलं. मग त्यांनी आपल्या पत्नीला अपक्ष म्हणून उभं केलं, पण त्यांचाही पराभव झाला."
अशोक पांगारकर हे श्रीकांत पांगारकर यांचे चुलत बंधू आहेत आणि 2018 ते जालना नगरपालिकेत भाजपचे नगरसेवक होते. त्यांच्या मते त्यांच्या भावावरचे आरोप चुकीचे आहेत. "त्याची आर्थिक परिस्थिती काही खूप चांगली नाही. मग तो अशा कामासाठी कसली आर्थिक मदत करेल?" असा प्रश्न त्यांनी विचारला होता.
अशोक पांगारकर म्हणाले होते की, त्यांचा भाऊ अजूनही शिवसेनेच्या संपर्कात होता. "हिंदू संस्कृती वाचवण्यासाठी तो पहिल्यापासूनच काम करायचा. कुठं बळजबरीनं आंतरधर्मीय लग्नं होत असतील, तर मुलींना परत आणण्याचे कार्यक्रमही त्यानं केले आहेत. रक्तदान शिबिरंही तो घ्यायचा. त्यामुळे राजकारणापासून लांब गेला असं कसं म्हणता येईल? २०१४ मध्ये त्यानं अर्जुन खोतकरांच्या निवडणुकीत शिवसेनेसाठी काम केलं होतं."
अशोक पांगारकर हे भाजपचे जालन्यात नगरसेवक होते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











