दाभोलकर, गौरी लंकेश हत्या ते नालासोपारा : हिंदुत्ववादी तरुणांची अटक आणि नवे प्रश्न

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
गेल्या पंधरवड्यात महाराष्ट्रात दहशतवादविरोधी पथकानं (ATS) आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं (CBI) वेगवगळ्या हिंदुत्ववादी संघटनांशी संबंध असलेल्या तरुणांना अटक केली. अद्यापही सुरू असलेल्या या अटकसत्राने अनेक गंभीर प्रश्नांची मालिकाचा तयार झाली आहे.
हे तरुण कोण्या संघटनेच्या इशाऱ्यावरून काम करत होते का? की या जहाल मताच्या तरुणांचं कोणतं नवं वर्तुळ तयार झालं आहे? आणि जर असं वर्तुळ असेल, तर त्याचा सूत्रधार कोण, हे आणि असे अनेक प्रश्न या निमित्ताने पुढं आले आहे.
नालासोपाऱ्याच्या प्रकरणात ATSने क्रूड बाँब, देशी बनावटीच्या बंदुका यांच्यासह मोठी स्फोटक सामग्री हस्तगत केली. या प्रकरणात सर्वप्रथम ज्याचं नाव आलं तो वैभव राऊत कट्टर हिंदुत्ववादी आणि गोरक्षक आहे. 'हिंदू गोवंश रक्षा समिती' ही त्यानं २०१५ मध्ये आपल्या साथीदारांसमवेत स्थापन केली.
तो 'सनातन' आणि 'हिंदु जनजागृती समिती' यांच्यासहित इतर हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्या-कार्यकर्त्यांसोबत अनेक व्यासपीठांवर पाहिला गेला आहे. कर्नाटकातल्या प्रमोद मुतालिकांच्या 'श्रीराम सेने'मध्येही तो कार्यरत होता. 'युट्यूब'वर उपलब्ध असणाऱ्या एका ऑनलाईन चर्चासत्रात त्यानं 'श्रीराम सेने'चा प्रवक्ता म्हणून भाग घेतला होता. तो व्हीडिओ आजही 'युट्यूब'वर उपलब्ध आहे.
गोरक्षणासाठी मोर्चा काढणारा आणि व्यवसायानं रिअल इस्टेट एजंट असणारा अशी वैभव राऊतची ओळख नालासोपारा परिसरात आहे. हर्षद राऊत हे वैभवचे लहानपणापासूनचे सोपारा गावचे मित्र आहेत. 'बीबीसी मराठी'ला प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, "आम्ही सगळे मांसाहारी आहोत. पण वैभवनं तेही सोडलं होतं. आम्हाला म्हणायचा की दुसऱ्या प्राण्यांचा जीव घेऊन तुम्हाला काय मिळणार? असा माणूस स्फोटकं वगैरे गोळा करून दुसऱ्या माणसांचे जीव कसे घेईल? गोरक्षणासाठी त्यानं काढलेल्या मोर्चामध्ये मीही सहभागी झालो आहे. 'व्हॅलेंटाईन डे'ला तो 'मातृ-पितृ दिन' म्हणून साजरा करायचा."
'सनातन संस्थे'चे प्रवक्ते चेतन राजहंस म्हणतात, "वैभव राऊत हे मुंबईतील हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत. गोरक्षणाचं काम ते करतात. पण ते सनातनचे साधक कधीही नव्हते." 'हिंदु जनजागृती समिती'चे सुनील घनवट हेही दावा करतात की वैभव राऊत हा त्यांच्या संघटनेचे सभासद कधीही नव्हते.

फोटो स्रोत, SANATAN SANSTHA
शिवसेनेचा माजी नगरसेवकही सामील?
ज्या नालासोपारा प्रकरणाच्या चौकशीदरम्यान डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांविषयी माहिती मिळाली, त्या प्रकरणीच श्रीकांत पांगारकर या शिवसेनेच्या जालन्याच्या माजी नगरसेवकालाही ATSने अटक केली आहे. राज्यात अनेक ठिकाणी हल्ले करण्याच्या कटासाठी आर्थिक रसद पुरवण्याची कामगिरी पांगारकरवर होती, असा आरोप आहे. पांगारकर हा २००१ ते २०११ या कालावधीदरम्यान जालना नगरपालिकेत दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आला. पण गेल्या काही महिन्यांपासून त्याचा कुटुंबासहित मुक्काम औरंगाबादला होता.
महेश बुलगे जालन्याच्या 'आनंदनगरी' या वृत्तपत्राचे पत्रकार आहेत आणि ते पांगारकर यांचे अनेक वर्षांपासूनचे मित्रही आहेत. ते म्हणतात "पांगारकर यांचे वडील भाजपमध्ये होते. पण श्रीकांत हे पहिल्यापासून आक्रमक हिंदुत्ववादी असल्यानं ते मात्र शिवसेनेमध्ये गेले. दोनदा नगरसेवक झाल्यानंतर त्यांचं तिकीट कापलं गेलं. मग त्यांनी आपल्या पत्नीला अपक्ष म्हणून उभं केलं, पण त्यांचाही पराभव झाला."

फोटो स्रोत, BBC/PUNEET BARNALA
अशोक पांगारकर हे श्रीकांत पांगारकरचे चुलत बंधू आहेत आणि सध्या ते जालना नगरपालिकेत भाजपचे नगरसेवक आहेत. त्यांच्या मते त्यांच्या भावावरचे आरोप चुकीचे आहेत. "त्याची आर्थिक परिस्थिती काही खूप चांगली नाही. मग तो अशा कामासाठी कसली आर्थिक मदत करेल?" असा प्रश्न ते विचारतात.
अशोक पांगारकर म्हणतात की त्यांचा भाऊ अजूनही शिवसेनेच्या संपर्कात होता. "हिंदू संस्कृती वाचवण्यासाठी तो पहिल्यापासूनच काम करायचा. कुठं बळजबरीनं आंतरधर्मीय लग्नं होत असतील तर मुलींना परत आणण्याचे कार्यक्रमही त्यानं केले आहेत. रक्तदान शिबिरंही तो घ्यायचा. आणि राजकारणापासून लांब गेला असं कसं म्हणता येईल? २०१४मध्ये त्यानं अर्जुन खोतकरांच्या निवडणुकीत शिवसेनेसाठी काम केलं होतं."
अशोक पांगारकर हे सध्या भाजपचे जालन्यात नगरसेवक आहेत.
जालन्याचे आमदार आणि राज्य सरकारमध्ये राज्यमंत्री असलेल्या अर्जुन खोतकर यांनी मात्र पांगारकरचा शिवसेनेशी आता काहीही संबंध नसल्याचा दावा 'बीबीसी मराठी'शी बोलताना केला आहे. "२०११मध्ये त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांचा पक्षाशी काहीही संबंध राहिला नाही. निवडणुकीत लाखो लोक काम करत असतात. त्यात आपण कसं ओळखणार की ही व्यक्ती पक्षासाठी काम करत होती किंवा नव्हती. नंतर ते कोणत्या संघटनेत काम करत होते का हे मला माहीत नाही."

फोटो स्रोत, FACEBOOK/SANATAN SANSTHA
गोंधळेकर आणि शिवप्रतिष्ठान
नालासोपाऱ्यातल्या अटकेनंतर सुधन्वा गोंधळेकर याला पुण्यातून अटक करण्यात आली. गोंधळेकर मूळचा साताऱ्याचा आहे आणि कामानिमित्त सध्या पुण्यात असायचा. सांगलीच्या संभाजी भिडेंच्या 'शिवप्रतिष्ठान'चा तो कार्यकर्ता होता असं सांगण्यात येतंय. पण 'शिवप्रतिष्ठान'च्या म्हणण्यानुसार गोंधळेकरचा आता संघटनेशी काहीही संबंध राहिलेला नाही.
"३-४ वर्षांपूर्वीपर्यंत ते साताऱ्याच्या आमच्या उपक्रमांमध्ये सहभागी असायचे पण त्यांच्याकडे कोणतीही जबाबदारी नव्हती. ते आपोआपच आमच्या संघटनेपासून लांब गेले. आम्हाला वाटलं की त्यांचा व्यवसाय वाढला, ते पुण्याला गेले, म्हणून असावं. पण आमच्याशी त्यांचा काहीही संपर्क राहिलेला नाही. चांगल्या परिवाराची पार्श्वभूमी असलेला हा माणूस या अशा प्रकारात कसा गेला याच्यावर आमचाही विश्वास बसत नाही," असं 'शिवप्रतिष्ठान'चे नितीन चौगुले म्हणतात.
या तिघांमागे कोण आहे?
आधी संभाजी भिडेंच्या शिवप्रतिष्ठानमध्ये असलेला सुधन्वा गोंधळेकर, आधी शिवसेनेत असलेला श्रीकांत पांगारकर आणि आधी सनातनच्या नेत्यांसह व्यासपीठावर असलेला वैभव राऊत हे तिघेही एकमेकांच्या संपर्कात असल्याचं तपास यंत्रणांचं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
हे तिघे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा राज्यात मोठा घातपात घडवण्याचा कट होता, असा त्यांच्यावर आरोप आहे. हे तिघे संशयित या संस्थांच्या इशाऱ्यांवर वागत होते की त्यांनी स्वत:चा गट तयार केला होता की यामागे अन्य कोणी आहे? या प्रश्नांची ठोस उत्तरं तपास यंत्रणा देऊ शकत नाहीयेत.
महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक जयंत उमराणीकर यांच्या मते, "कोण कोणत्या संस्थेचा आहे किंवा नाही हा प्रश्न आता गौण आहे. ज्या व्यक्ती पकडल्या गेल्या आहेत त्यांची मानसिकता काय आहे, वैयक्तिक मतं काय आहेत आणि त्यांनी एकत्र येऊन कोणता कट रचला होता का हे जोपर्यंत तपासात समोर येत नाही, तोपर्यंत त्यामागे कोणी होते का हे समजणार नाही. जर या व्यक्ती एखाद्या कटासाठी एकत्र आल्या असतील तर सहाजिक विचारधाराही समान असेल. पण त्यासाठी समान हेतू आणि कट रचणे हे तपासानं सिद्ध करावं लागेल. जर कोणी संस्था यामागे असतील तर या कटामध्ये त्यांचे अन्य कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी आहेत हे तपासात समोर यावं लागेल. पण त्यासाठी ATSला तपासाला अधिक वेळ द्यावा लागेल."
"पण मला याच्यामध्ये एक नक्की पॅटर्न दिसतोय तो म्हणजे काही हिंदू तरुणांमध्ये ही मानसिकता बळावते आहे की त्यांच्या धर्मावर हल्ला होतो आहे. हा हल्ला अनेकांकडून होतोय तसा तो डाव्या उदारमतवाद्यांकडून होतो आहे, अशी भावना त्यांच्यात बळावत असावी. अशी भावना असलेले काही जण एकत्र येताहेत आणि गुन्हे घडताहेत. काही संघटना, पक्ष या प्रकारच्या भावनेला खतपाणीही घालताहेत," असं उमराणीकर पुढे म्हणतात.

फोटो स्रोत, FACEBOOK/NARENDRA DABHOLKAR
या आरोपींचे एकमेकांशी संबंध कसे?
दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा एक आरोपी म्हणून CBIच्या अटकेत असलेल्या सचिन अंदुरेकडे बंगळुरूच्या गौरी लंकेश हत्या प्रकरणातल्या एका आरोपीनं दिलेलं पिस्तूल सापडलं आहे, असा दावा तपास संस्थांचा आहे. अंदुरेच्या चौकशीसाठी वाढीव कोठडी मागतांना CBIने ही माहिती न्यायालयात दिली आहे. त्यामुळे दाभोलकरांचे मारेकरी आणि गौरी लंकेशचे मारेकरी एकमेकांच्या कसे संपर्कात होते, त्यांचा एकमेकांशी संबंध होता, हा संबंध कसा आणि कोणामुळे होता असे विविध प्रश्न निर्माण झाले आहेत.
सचिन अंदुरे याचे वकील मात्र CBIचा हा दावा खरा नाही असं म्हणताहेत. "सात दिवस त्यांनी अंदुरे यांची चौकशी केली, पण ज्या दाभोलकर प्रकरणात ते आरोपी आहेत त्याबद्दल त्या चौकशीतून काय समोर आलं याबद्दल ते काहीही सांगायला तयार नाहीत. या तपासात काही मिळालं नाही याकडे माध्यमांचं आणि समाजाचं लक्ष जाऊ नये यासाठी ही नवी थिअरी त्यांनी समोर आणली आहे," अशी प्रतिक्रिया अंदुरे याचे वकील प्रकाश सालशिंगीकर यांनी BBC मराठीशी बोलतांना दिली.

फोटो स्रोत, Getty Images
हे वेगवेगळ्या प्रकरणातील आणि वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे संशयितांचा एकमेकांशी संपर्क कसा आला हा प्रश्न सर्वांत महत्त्वाचा बनला आहे. नालासोपारा स्फोटक प्रकरण, डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण आणि गौरी लंकेश हत्या प्रकरण अशी या तीन वेगवेगळ्या प्रकरणातील आरोपींचा एकमेकांशी संबंध कसा, असा हा प्रश्न आहे.
सचिन अंदुरे याचं नाव ज्याच्या चौकशीतून पुढं आलं तो नालसोपार स्फोटकांतील संशयित शरद कळसकर याचा ताबा घेणार असल्याचे सीबीआयने न्यायालयात सांगितले आहे. कळसकर सध्या महाराष्ट्र 'एटीएस'च्या ताब्यात आहे आणि कळसकर आणि अदुंरे यांनी डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा संशय आहे.
ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ यांच्या मते या सगळ्या पकडल्या जात असलेल्या व्यक्ती या हिंदुत्ववादी परिवाराशी संबंधित आहेत. त्यामुळे या संघटनांनी त्यांच्याशी संबंध नाकारणं याला महत्त्व देता येणार नाही. "गोडसे आमचा नाही असा गांधींचा खून झाल्यावर संघ कायम म्हणतच आला आहे. त्यामुळं हे असं नाकारणं कायमच एका रणनीतीचा भाग आहे. आताही हे सगळे पकडले गेलेले लोक आमच्याशी संबंधित नाही असं म्हणणं ही अशीच रणनीती आहे. हे वेगवेगळ्या संस्थांमध्ये एकेकाळी असतील, पण हे हिंदुत्ववादी परिवाराशी संबंधित लोक आहेत."
प्रकाश बाळ म्हणतात, "सरदार पटेल श्यामाप्रसाद मुखर्जींना लिहिलेल्या पत्रात असं म्हणाले होते की, सावरकर गांधी हत्येत सहभागी आहेत किंवा नाहीत हे कोर्ट ठरवेल, पण हिंदुत्ववादी संघटनांनी त्याअगोदर जी वातावरणनिर्मिती केली होती त्याची परिणती गांधी हत्येत झाली याच्याविषयी माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. गेल्या काही वर्षांतलं देशातलं वातावरण पाहिलं तर या सगळ्या हिंदुत्ववादी संघटना या प्रकारचं विद्वेषाचं वातावरण तयार करताहेत."
महाराष्ट्र ATSचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांच्याशी BBC मराठीने संपर्क साधला असता त्यांनी तपासादरम्यान काहीही प्रतिक्रिया देण्यास असमर्थता व्यक्त केली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








