'आमचा मुलगा गेला, आता जगायचं कसं?' अमेरिका- इस्रायल आणि इराण युद्धात प्राण गमावलेल्या मुंबईतील तरुणाच्या वडिलांची वेदना

- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
- वाचन वेळ: 5 मिनिटे
"युद्धात आमचा मुलगा गेला, आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. आम्ही आता जगायचं कसं? मुलाचे पार्थिव येईल, शेवटचे दर्शन होईल याची आम्ही वाट पाहतोय."
अमेरिका इराण युद्धात मृत्यू पावलेल्या दीक्षित सोलंकी यांचे वडील अमृतलाल यांनी ही वेदनादायी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हवाई हल्ल्यानंतर सुरू झालेल्या युद्धात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
दीक्षित सोलंकी असे या नागरिकाचे नाव आहे. 32 वर्षीय दीक्षित सोलंकी हे मूळचे दीवचे होते, पण त्यांचे कुटुंब सध्या मुंबईत कांदिवली येथे राहते.
दीक्षित यांच्या वडिलांनी गुरुवारी बीबीसीला सांगितले की, दीक्षित हे खनिज तेल वाहून नेणाऱ्या एमकेडी व्योम नावाच्या तेल टँकरवर ऑइलर खलाशी म्हणून काम करत होते.
एक मार्च रोजी सकाळी एमकेडी व्योम ओमानच्या आखातातून जात असताना त्यावर हल्ला झाला आणि त्याला आग लागली. या घटनेत दीक्षित यांचा मृत्यू झाला.
मात्र घटनेला पाच दिवस उलटूनही दीक्षित यांचे पार्थिव भारतात परत आणण्यात आलेले नाही. केंद्र व राज्य सरकार आणि संबंधित कंपनीने अजूनपर्यंत कुटुंबाशी संपर्क केलेला नाही, असे सोलंकी कुटुंबीयांनी आणि सेलर्स युनियनने सांगत नाराजी व्यक्त केली.
1 मार्च रोजी दीक्षितच्या जहाजाचे काय झाले?
रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, लंडनमध्ये मुख्यालय असलेली व्ही. शिप्स नावाची कंपनी एमकेडी व्योम टँकरचे व्यवस्थापन करते.
रॉयटर्सने व्ही. शिप्सच्या एका अपघाताचा हवाला देत 1 मार्च रोजी वृत्त दिले की, ओमानमधील मस्कतच्या किनाऱ्याजवळ असताना जहाजावर हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये त्याच्या एका भारतीय क्रू सदस्याचा म्हणजेच एका खलाशीचा मृत्यू झाला.
"1 मार्च रोजी जहाज मस्कतच्या किनाऱ्याजवळ असताना त्यावर एका संशयित मिसाइल आदळले, ज्यामुळे स्फोट झाला आणि त्यानंतर आग लागली. घटनेच्या वेळी इंजिन रूममध्ये असलेल्या एका क्रू मेंबरचे निधन झाल्याची आम्ही अत्यंत दुःखाने सांगत आहोत," असे व्ही. शिप्सने आपल्या निवेदनात म्हटल्याचे रॉयटर्स या वृत्तसंस्थेनी सांगितले.
दीक्षित सोलंकी सहा वर्षांपासून ऑईलर म्हणून कार्यरत
दीक्षित अमृतलाल सोलंकी हे 32 वर्षांचा तरुण होते.
1994 ला दीव येथे त्यांचा जन्म झाला होता. मूळचे ते दीव येथील रहिवासी होते. मात्र गेल्या सात वर्षांपासून ते मुंबईतील महावीर नगर, कांदिवली पश्चिम येथे वास्तव्यास होते.
घरी त्यांच्या पश्चात वडील अमृतलाल आणि एक 28 वर्षीय बहीण असे त्यांचे कुटुंब आहे. बहीण दुबई येथे कामानिमित्त असते. चार महिन्यांपूर्वी आईचे निधन झाले होते.

दीक्षित यांचे बारावी सायन्सपर्यंतचे शिक्षण दीव व मुंबई येथे झाले होते. त्यानंतर जीपी रेटिंग आणि एसटीसीडब्ल्यू कोर्स म्हणजेच अभियांत्रिकीचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले होते.
गेल्या सहा वर्षांपासून ते विविध कंपन्यांमध्ये ऑईलर खलाशी म्हणून काम करत होते, अशी माहिती वडिलांनी दिली.
वडील देखील फिटर म्हणून या क्षेत्रात गेले 20 वर्षे कार्यरत होते.
वडिलांनी काम केलेल्या कंपनीतच सध्या दीक्षित गेल्या चार महिन्यांपासून कॉन्ट्रॅक्टवर कार्यरत होते. 10 डिसेंबर रोजी ते ड्युटीवर कार्यरत झाले होते, तर 10 सप्टेंबर 2026 रोजी ते पुन्हा भारतात परतणार होते.
पार्थिव व सविस्तर रिपोर्ट देण्याची वडिलांची मागणी
दीक्षितचे वडील अमृतलाल बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले की, "आम्हाला या घटनेबाबत कंपनीच्या काही लोकांनी घरी येऊन एक तारखेला सांगितलं, आम्हाला याचा धक्का बसला आहे. लहानपणापासून दीक्षितच्या खूप आठवणी आहेत."
अमृतलाल बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "मोठ्या लाडात आम्ही त्याला वाढवलं आणि आमचं आयुष्य खूप चांगलं सुरू होतं. या घटनेने संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. चार महिन्यांपूर्वी आईचे निधन झाले होते. आता त्याच्या निधनाने आम्ही पोरके झालो आहोत. आम्हाला कोणत्याही स्वरूपात मुलाचे पार्थिव हवे आहे. शेवटचे दर्शन करून सर्व प्रक्रिया आम्हाला करायची आहे."
पुढे अमृतलाल म्हणाले की, "घटना घडून पाच दिवस झाले. संबंधित कंपनी आणि त्याच्यासोबत असलेल्या खलाशींशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र कंपनीकडून काहीही प्रतिसाद मिळत नाही. खोटी माहिती दिली जात आहे. केंद्र व राज्य सरकारने देखील कोणतीही विचारपूस केलेली नाही. आमची मागणी आहे की पार्थिव आम्हाला लवकर द्यावे आणि घटना कशी घडली व मृत्यू कसा झाला याबाबत सविस्तर रिपोर्ट द्यावा."
कुटुंबाने दीक्षितचा चेहरा शेवटचा कधी पाहिला होता?
दीव येथे राहणाऱ्या दीक्षित यांच्या काकी शर्मिलाभाईन यांनी बीबीसी गुजरातीशी बोलताना सांगितले की, दीक्षित गेल्या चार महिन्यांपासून सतत ड्युटीवर होते.
शर्मिलाभाईन म्हणाल्या, "आईचे निधन झाल्यावर दीक्षित घरी आला. सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर आणि त्याची सुट्टी संपल्यानंतर तो पुन्हा कामावर गेला."
"त्यानंतर तो जवळजवळ चार महिने घरी आला नाही. आता तो मोठा झाला आहे. आम्ही त्याचे लग्न करण्याचा विचार करत होतो. पण निसर्गाने वेगळाच निर्णय घेतला असावा."
काकूंनी पुढे सांगितले की, दहा दिवसांपूर्वी आमच्याशी त्यांनी केलेले फोन संभाषण हे शेवटचे संभाषण ठरले.
दीक्षितने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आणि त्याच्या वडिलांच्या आणि काकांच्या पावलावर पाऊल ठेवून सुमारे सहा वर्षांपूर्वी मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी स्वीकारली.
या घटनेबद्दल भारत सरकारने काय म्हटले?
ओमानची राजधानी मस्कतमधील भारतीय दूतावासानेही ओमान येथे झालेल्या घटनेत एका भारतीय खलाशीच्या मृत्यूची पुष्टी केली, परंतु दीक्षितचे नाव घेतले नाही.
"एमकेडी व्योम येथील एका भारतीय नागरिकाच्या दुःखद मृत्यूबद्दल भारतीय दूतावास शोक व्यक्त करतो," असे भारतीय दूतावासाने 2 मार्च रोजी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
"त्या जहाजावरील आमच्या नागरिकांचे सुरक्षित आणि लवकर घरी परतणे सुनिश्चित करण्यासाठी दूतावास ओमानमधील स्थानिक अधिकाऱ्यांशी सतत समन्वय साधत आहे."

मात्र दीक्षित यांचे पार्थिव गुरुवार, 5 मार्च रोजी संध्याकाळपर्यंत कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले नाही, त्यामुळे वडिलांनी नाराजी व्यक्त केली.
"हा आमच्यासाठी खूप वेदनादायक काळ आहे. कारण दीक्षितला आमच्याकडे कधी सोपवले जाईल याबद्दल आम्हाला कोणतीही स्पष्ट माहिती मिळत नाही. आम्ही सतत कंपनी आणि युनियनमार्फत संबंधित प्रशासनाशी संपर्क साधत आहोत. मात्र योग्य प्रतिसाद मिळत नाही. आम्हाला प्रतीक्षा आहे मुलाच्या पार्थिवाची," असे वडील बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले.
व्ही. शिप्स कंपनीने काय प्रतिक्रिया दिली?
बीबीसी मराठीने व्ही. शिप्स कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला आणि दीक्षितच्या मृत्यूबाबत तसेच पार्थिवाबाबत विचारले. प्रतिनिधींनी अद्याप प्रतिक्रिया दिली नाही. बीबीसीने इमेलद्वारे कंपनीला प्रश्न पाठवले आहेत. त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध झाल्यावर या ठिकाणी अपडेट करण्यात येईल.
हजारो नाविक आखाती देशांमध्ये सध्या अडकलेले
हजारो नाविक आखाती देशांमध्ये सध्या अडकलेले आहेत. त्यांना परत भारतात आणण्यासाठी आणि मदत करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, अशी प्रतिक्रिया सेलर युनियनने दिली आहे.
सेलर युनियन ऑफ इंडिया अध्यक्ष आर. पी. विठ्ठील बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले की, "झालेली घटना दुर्दैवी आहे. मात्र शिपिंग कंपनीने या घटने संदर्भात तत्काळ कुटुंबीयांना योग्य माहिती देत समन्वय साधला पाहिजे. मात्र या घटनेत समन्वयाचा अभाव आहे आणि योग्य माहिती कुटुंबापर्यंत कंपनीने पोहोचवलेली नाही. घटना घडल्यानंतर तात्काळ पार्थिव कुटुंबाच्या स्वाधीन करण्यासाठी हालचाली कंपनीने केल्या पाहिजेत. तसेच नियमानुसार मदत देखील कुटुंबाला मिळाली पाहिजे."

पुढे विठ्ठील म्हणाले की, आमची सेंट्रल गव्हर्नमेंट आणि राज्य सरकारकडे विनंती आहे की, जे हजारो सिफर्स आखाती देशांमध्ये सध्या अडकलेले आहेत त्यांना परत भारतात आणण्यासाठी आणि मदत करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आमच्या माहितीनुसार साधारण 1500 बोटी या आखाती देशांमध्ये अडकलेल्या आहेत, ज्यामध्ये भारतीय नागरिक आहेत. त्यांना योग्य अन्न आणि मदत मिळत आहे की नाही, हे देखील केंद्र सरकारने आणि संबंधित प्रशासनाने पाहावे, अशी आमची विनंती आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











