हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा होता राज्यात अनेक ठिकाणी हल्ल्यांचा कट : ATSचा दावा

फोटो स्रोत, Sanatan Sanstha
- Author, प्रशांत ननावरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
दहशतवादी कारवाया करणार असल्याच्या संशयांवरून अटक करण्यात आलेल्या हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित व्यक्तींकडून आणखी शस्त्रास्त्रं आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं असल्याचं ATSनं म्हटले आहे. शनिवारी केलेल्या तपासात सुधन्वा गोंधळेकर यांच्याकडे 10 गावठी पिस्तूले, गावठी कट्टा आणि एअर गन, तसेच इतरही साहित्य सापडले असल्याचा दावा ATSनं केला आहे.
वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर या हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित तीन व्यक्तींना ATSने (दहशतवादी विरोधी पथकाने) अटक करून शुक्रवारी मुंबईत कोर्टासमोर हजर केलं होतं. त्यांना न्यायालयाने 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
या आरोपींची अधिक चौकशी करण्यात आली. त्यात सुधन्वा यांच्याकडे 10 मॅगझीनसह गावठी पिस्तूलं, 1 गावठी कट्टा, 1 एअर गन, 10 पिस्टल बॅरल, 6 अर्धवट तयार पिस्टल बॉडी, 6 पिस्टल मॅगझीन, 3 अर्धवट मॅग्झिन, 7 अर्धवट तयार पिस्टल स्लाईड, 16 रिले स्विच, 6 वाहनांच्या नंबर प्लेट, 1 ट्रिगर मेकॅनिझम, चॉपर, स्टील चाकू सापडले असल्याचा दावा ATSने प्रेसनोटमध्ये केला आहे.

फोटो स्रोत, ATS
तसेच इतर अर्धवट बनवलेले शस्त्रांचे सुटे भाग, टॉर्च, बॅटरी, हँड ग्लोव्हज इतर अनुषांगिक साहित्य, स्फोटकांबाबत हँडबूक, हार्डडिस्क, मेमरी कार्ड मिळाले इत्याही साहित्य जप्त करण्यात आलं असून संशयितांविरुद्ध आर्म्स अॅक्टच्या विविध तरतुदी वाढवण्यात येत असल्याचे ATSने म्हटलं आहे.
ATSने दिलेल्या माहितीनुसार वैभव राऊत यांच्या नालासोपारा इथल्या घरातून 22 गावठी बाँब आणि जिलेटिनच्या कांड्या सापडल्या. शरद कळसकर यांच्या घरातून बाँब कसा तयार करायचा हे लिहिलेली चिठ्ठी सापडली. हे दोघेही सुधन्वा गोंधळेकर यांच्या संपर्कात होते, असंही ATSने म्हटलं आहे.

फोटो स्रोत, ATS
'काही अज्ञात लोक पुणे, सातारा, नालासोपारा आणि मुंबई येथे दहशतवादी कारवाया करणार असल्याची माहिती ATSकडे होती. त्यानुसार नालासोपारा येथे मध्यरात्री 3 वाजल्यापासून सकाळपर्यंत पंचनामा सुरू होता. त्यानंतर तीन जणांवर दुपारी 2 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आणि सव्वा तीन वाजता त्यांना अटक करण्यात आली,' अशी माहिती ATSने कोर्टात दिली.
वैभव राऊत कोण आहेत?
वैभव राऊत हे सनातन संस्थेशी संलग्न असल्याचा हिंदू गोवंश रक्षा समितीचे कार्यकर्ते आहेत. "श्री. वैभव राऊत हे एक धडाडीचे गोरक्षक असून ते 'हिंदू गोवंश रक्षा समिती' या गोरक्षण करणार्या संघटनेच्या माध्यमातून कार्यरत होते. ते हिंदू जनजागृती समितीच्या सर्व हिंदू संघटनांच्या एकत्रीकरणातून केल्या जाणार्या हिंदू संघटनाच्या उपक्रमांमध्ये, तसेच आंदोलनांमध्ये सहभागी होत असत; मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांचा कोणत्याही उपक्रमात सहभाग नव्हता," असं हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी म्हटलं आहे. हिंदू जनजागृती समिती सनातन संस्थेशी संबंधित आहे.
"वैभव राऊत गोरक्षक होता. त्याच्याविरुद्धच्या आधीच्या आरोपांच्या प्रती माझ्या हाती आल्या आहेत. प्रत्येकवेळी वैभव राऊतला जिल्हा सोडून देण्याचा हुकूम देण्यात आला होता. बकरी ईदच्या दिवशी गाई रस्त्यावर कापल्या जात होत्या. त्यामुळे भावना दुखावल्या जातात. त्यामुळे वैभव राऊतने विरोध केला. विरोध केला तर आम्ही तुम्हाला चिरडून टाकू अशी राज्यकर्त्यांची भूमिका आहे. नालासोपाऱ्यात त्याचे नऊ सहकारी गोरक्षक आहेत. आठ-नऊ जणांचं जीवन उदध्वस्त करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ATS त्यांच्या मागे लागले आहे. गोमाफियाकडून ATS पैसे घेत असल्याचा आरोप आहे," असं आरोपींचे वकील संजीव पुनाळेकर यांनी कोर्टाबाहेर म्हटलं.

पुनाळेकर सनातन संस्थेचे कायदेशीर सल्लागार आहेत. "वैभव राऊत सनातनचे कार्यकर्ते नाहीत. ते हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत आणि त्यांना शक्य ती मदत आम्ही करू" असंही त्यांनी म्हटलं आहे.
वैभव राऊत यांचं नाव गूगलमध्ये सर्च केल्यावर सनातन संस्थेच्या वेबसाईटचे अनेक रिझल्ट्स येतात. पण त्यातल्या काही लिंक्स आता उघडत नाहीयेत.

फोटो स्रोत, Sanatan Sanstha
सुधन्वा गोंधळेकर कोण आहेत?
सुधन्वा गोंधळेकर हे शिवप्रतिष्ठान या संभाजी भिडेंच्या संस्थेशी संबंधित आहेत. पण गेल्या अनेक दिवसांत ते आमच्या संपर्कात नव्हते, असं या संस्थेचं म्हणणं आहे. "सुधन्वा गोंधळेकर आधी शिवप्रतिष्ठानचा कार्यकर्ता होता. चार वर्षांपासून त्याच्याशी काहीही संबंध नाही," असं शिवप्रतिष्ठान संघटनेचे नितीन चौगुले यांनी TV9 मराठीशी बोलताना सांगितलं.
सनातन संस्था आणि शिवप्रतिष्ठान या दोन हिंदुत्ववादी संघटनांमध्ये काय नातं आहे, असा प्रश्न विचारला असता, सनातन संस्थेच्या चेतन राजहंस यांनी ABP माझाशी बोलताना म्हटलं की या दोन संघटनांमध्ये हिंदुत्वाचं नातं आहे.
सनातन दहशतवादी संघटना - काँग्रेस
"या अगोदरही बाँबस्फोट आणि विचारवंताच्या हत्येप्रकरणात वेळोवेळी सनातनशी संबंधित लोकांचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सनातनला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करावे," अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.
तर काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी एक फोटो ट्वीट करून दावा केला आहे की वैभव राऊत हे थेट सनातन संस्थेशी संबंधित आहेत.

फोटो स्रोत, Sachin Sawant
यापूर्वी सनातन संस्थेशी संबंधित लोकांना गडकरी रंगायतन स्फोट, मडगाव स्फोट, दाभोलकर खून आणि पानसरे खून या प्रकरणांमध्ये अटक करण्यात आली आहे.
तर कोरेगाव भीमामध्ये झालेल्या दंगलीत शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंवर पोलिसांनी संशय व्यक्त केला होता. पण त्यांच्याविरुद्ध पुरावे नसल्याचं नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








