विश्लेषण : या कारणांमुळे काश्मीरमध्ये अल कायदा ठरतेय निष्प्रभ

फोटो स्रोत, Al Hurr
- Author, झैनुल अबिद
- Role, बीबीसी मॉनिटरिंग
गेल्या वर्षभरापासून काश्मीर खोऱ्यात अल कायदाशी संलग्न गट सक्रिय होऊ पाहत आहे. हा प्रदेश अनेक दशकं शस्त्रास्त्रांच्या संघर्षानं धगधगतो आहे. या गटाला या प्रदेशात ठसा उमटवण्याची महत्वाकांक्षा आहे. नेमकी काय आहे ही संघटना?
अल कायद्याच्या भारतातील अधिकृत शाखेप्रमाणे 'अन्सार गाझ्वात उल हिंद' (AGH) या संघटनेला काश्मीर खोऱ्यातली कट्टरवादी संघटना आणि गटांदरम्यान थोडासाच शिरकाव करता आला आहे.
अन्सार गाझ्वात उल हिंद संघटनेला अद्याप तरी भारत प्रशासित काश्मीर एकही हल्ला घडवून आणता आलेला नाही. या भागातल्या अन्य कट्टरवादी संघटनांनी त्यांच्याशी संधान साधलेलं नाही.
जुलै 2017 मध्ये अल कायद्याच्या मीडिया विभागाच्या 'ग्लोबल इस्लामिक मीडिया फ्रंट'नं मेसेजिंग अॅप टेलिग्रामवर 'अन्सार गाझ्वात उल हिंद' ही संघटना त्यांचीच शाखा असल्याचं पहिल्यांदा सांगितलं.
28 जुलै 2018 रोजी ग्लोबल इस्लामिक मीडिया फ्रंटनं अन्सार गाझ्वात उल हिंद संघटनेच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं स्थापन करण्यामागचं उद्देश पुन्हा वितरित केलं.
मोठ्या अपेक्षा
काश्मीर खोऱ्यातल्या कट्टरवाद्यांमध्ये प्रसिद्ध अशा झाकीर मुसा यांना संघटनेच्या प्रमुखपदी नेमत अन्सार संघटनेने काश्मीरमधील गुंतागुंतीच्या जिहादी वातावरणात प्रवेश केला.
सोशल मीडिया सॅव्ही आणि करिश्मा असलेला तरुण व्यक्तिमत्वाचा मुसा अन्सार संघटनेचं नेतृत्व करण्यासाठी लायक व्यक्ती असल्याचं संघटनेला वाटलं.
काश्मीर खोऱ्यातील अन्य संघटनांप्रमाणे मुसा याचे विचार इस्लामिक राष्ट्रवादापुरते मर्यादित नव्हते. अल कायदा संघटनेने अंगीकारलेल्या इस्लामच्या जागतिक विचारधारेशी मुसाची नाळ होती.
अन्सार संघटनेच्या प्रमुखपदी मुसाची नियुक्ती काश्मीर खोऱ्यासाठी वाईट बातमी आहे, असं भारतातील प्रमुख वृत्तपत्रांपैकी एक हिंदुस्तान टाइम्सनं म्हटलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
काश्मीरमध्ये इस्लामसंदर्भात तणाव वाढत असताना मुसा याची संघटनेच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली. भारतीय लष्करानं प्रसिद्ध कट्टरवादी बुरहान वाणीला ठार केलं. या पार्श्वभूमीवर मुसा याची नियुक्ती काश्मीर खोऱ्यात अन्सार संघटनेच्या वाढत्या प्रभावाची नांदी होती. मुसा आणि बुरहान वाणी एकमेकांचे जिगरी दोस्त होते.
मुसाच्या प्रभावाशाली व्यक्तिमत्वाची भुरळ काश्मीरातल्या तरुण वर्गावर पडेल असं अन्सार संघटनेला वाटलं. भारत सरकारप्रती नाराजी आणि रोष असणारा अस्वस्थ काश्मिरी तरुण वर्ग अन्सार संघटनेचं लक्ष्य होता.
अन्सार संघटनेच्या निर्मितीवेळी, मुसा कट्टरवादी चळवळीचं स्वरुप बदलेल असं मुख्य प्रवाहातल्या विश्लेषकांना वाटलं होतं. हिझबुल मुझाहिद्दीन, लष्कर-ए-तय्यबा, जैश-ए-मोहम्मद अशा स्थानिक कट्टरवादी संघटनांकडून कट्टरवाद्यांची रसद घेऊन मुसा कामाला लागेल असा होरा होता. मात्र तसं घडलं नाही.
अन्सार संघटनेच्या स्थापनेपूर्वीही काश्मीर अल कायद्याच्या रडारवर होतं. 'आशियाई उपखंडात आता अल कायदा' अशा सूत्रासह ग्लोबल जिहादी गटानं 2014 मध्ये नव्या तुकडीची स्थापना केली. काश्मीर ही नवी कर्मभूमी असेल असं त्यांनी जाहीर केलं होतं.
काश्मीर खोऱ्यातल्या लोकांना उद्देशून 'अल कायदा इन सबकाँटिनंट'नं अनेक संदेश जारी केले. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांच्या सरकारनं अंगीकारलेल्या धोरणांवर टीका केली. टेलिग्रामवर 'अल सहाब' या संघटनेच्या अधिकृत हँडलद्वारे हे संदेश पाठवण्यात आले. मात्र एवढं करूनही काश्मीर खोऱ्यात वेधून घेण्यासारखा प्रभाव पाडता आला नाही.
मोठा हल्ला घडवून आणता आलेला नाही
जिहादाबाबत सुरुवातीला उत्साही असूनही अन्सार संघटनेला भारतीय सरकारला आव्हानात्मक ठरेल असं काहीही करता आलेलं नाही. या प्रदेशातल्या कट्टरवादी संघटनांना पर्याय म्हणून अन्सार संघटना उभी राहू शकली नाही.
भारताच्या सुरक्षा यंत्रणावर, सत्ताधाऱ्यांवर तसंच स्थानिक आणि विदेशी कंपन्यांवर हल्ले चढवा असे संदेश अन्सारतर्फे वारंवार देण्यात आले होते.
वादग्रस्त विषयांवर भारतीय मुस्लिमांना भडकावण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न अन्सार संघटनेने केले.

फोटो स्रोत, Al Hurr
काश्मीरमध्ये आठ वर्षीय असिफाबानोवर झालेल्या निर्घुण बलात्कारप्रकरणी बदला घेण्याचं आवाहन अन्सार संघटनेतर्फे करण्यात आलं होतं. हिंदू व्यक्तींनी बलात्कार केल्याचा दावा फोनरुपी संदेशात करण्यात आला होता.
मात्र या संघटनेला पुढे हा विषय लावून धरता आला नाही.
जागतिक स्तरावर जिहादसाठी काम करणारी IS अर्थात इस्लामिक स्टेट संघटना काश्मीरमध्ये कार्यरत नाही. मात्र त्यांच्याशी संलग्न असलेल्या संघटना काश्मीर खोऱ्यात सक्रिय आहेत. त्यांनी मिळून काश्मीरात मोठ्या प्रमाणावर हल्ले घडवून आणले आहेत. IS किंवा त्यांच्या भारतातील संलग्न संघटनांकडे मुसासारखं प्रभावशाली नेतृत्व नाही.
गेल्या नऊ महिन्यांमध्ये IS संघटनेनं काश्मीरात सहा हल्ले घडवून आणले. यामध्ये भारतीय लष्कराच्या पाच सैनिकांसह एका न्यायाधीशानं जीव गमावला.

फोटो स्रोत, Getty Images
IS संघटना काश्मीरात 'खोरासन प्रोव्हिन्स' या संघटनेच्या माध्यमातून हल्ले घडवून आणते. 2015 मध्ये यासंदर्भात घोषणा करण्यात आली होती. यामध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि शेजारच्या अन्य काही देशांचा समावेश होतो.
मार्च महिन्यात काश्मीरची राजधानी असलेल्या श्रीनगरपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बालहामा या ठिकाणी भारतीय लष्कराशी चकमक उडाल्याचा दावा अन्सार संघटनेनं केला होता.
गेल्या काही महिन्यात अन्सारच्या मीडिया विभागाच्या कामावरही परिणाम झाला आहे.
संघटनेची स्थापना झाल्यानंतर अल हरच्या माध्यमातून टेलिग्रामवर मेसेजचा भडिमार केला होता. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये प्रक्षोभक स्वरुपाचा त्यांचा मजकूर कमी होत गेला.
अल हरतर्फे शेवटचा व्हीडिओ मे महिन्यात जारी करण्यात आला होता. आसिफाबानोवर झालेल्या बलात्काप्रकरणी बदला घेण्याचं आवाहन त्या व्हीडिओत करण्यात आलं होतं.
स्थानिक संघटनांचं आव्हान
हिज्बुल मुजाहिद्दीन आणि लष्कर-ए-तय्यबा या दोन कट्टरवादी संघटनांच्या तुलनेत अन्सार संघटनेचा प्रभाव अगदीच मामुली असा आहे.
स्थानिक कट्टरवाद्यांना आपल्याकडे वळवून घेण्यात अन्सारला अपयश आलं. फुटीरतावादी नेत्यांची दुसरी पिढी इस्लामिक सत्ता प्रस्थापित करण्यापेक्षा राष्ट्रवादाकडे आकर्षित होतात.
हिज्बुल मुजाहिद्दीनमधून फुटून बाहेर पडलेल्या मुसानं इस्लाममध्ये राष्ट्रवादासाठीची लढाई अमान्य असल्याचं जाहीर केलं. हा विचार काश्मीरमधील फुटीरतावादी संघटनांच्या मूलभूत विचारांच्या विरोधात जाणारा होता.
यामुळे काश्मीर खोऱ्यातले कट्टरवादी अन्सारपासून दूर राहिले. अल कायदाशी संलग्न असूनही ते काश्मीर खोऱ्यातल्या फुटीरतावाद्यांकडून सहानुभूती मिळवू शकले नाहीत.
जागतिक इस्लामच्या बदलत्या ध्येयधोरणांशी जुळवून घेण्याची तयारी नाही, असं सांगत अन्सारने काश्मीर खोऱ्यातल्या फुटीरतावादी संघटनांना दांभिक म्हटलं.
अन्सार फोफावू न शकण्याचं आणखी एक प्रमुख कारण म्हणजे त्यांनी सातत्यानं पाकिस्तानवर टीका केली. काश्मीरमधल्या स्थानिक कट्टरवादी संघटनांना पाकिस्तानमधून कुमक प्राप्त होते. पाकिस्तान त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. मात्र अन्सारनं वेगळी भूमिका घेतल्यानं त्यांचं अस्तित्व नगण्यच राहिलं.
काश्मीरला भारतापासून विलग करण्याच्या पाकिस्तानच्या वल्गना आहेत, असं अन्सारचे उपनेते रेहान खान यांनी म्हटलं होतं.
पुढे काय?
काश्मीरमध्ये जिहादआधारित संघटनांना पाय रोवणं कठीणच असेल हे स्पष्ट झालं आहे. तूर्तास स्थानिक संघटनांचा या भागात प्रभाव आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या सरकारच्या धोरणांनुसार त्यांचं कामकाज चालतं.
राष्ट्रवादानं प्रेरित काश्मीरच्या मुद्याला शरिया कायद्यावर केंद्रित करणं हे अल कायदा किंवा ISसारख्या संघटनांना कठीण असेल.
यंदाच्या वर्षी नवे 87 लोक कट्टरतावादी संघटनांमध्ये सहभागी झाल्याचं भारतीय लष्करानं जाहीर केलं आहे. काश्मीर खोऱ्यातल्या गुंतागुंतीच्या जिहादी वातावरणातही IS तसंच अन्सारसारख्या संघटना त्यांच्यासाठी जमीन शोधत आहेत.
(बीबीसी मॉनिटरिंग जगभरातल्या टीव्ही, रेडिओ, प्रिंट आणि वेब माध्यमांतून प्रकाशित होणाऱ्या बातम्यांच विश्लेषण देण्याचं काम करतं. बीबीसी मॉनिटरिंगच्या बातम्या तुम्ही ट्विटर आणि फेसबुकवरदेखील वाचू शकता.)
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








